प्रेमात पडतो जो तो...

प्रेम म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर भावना. आपल्या आवडत्या व्यक्तीशी असणारे जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते यात त्या दोन जीवांना जोडणारा दुवा म्हणजे प्रेम. आपण प्रेम कुणावरही करू शकतो पण तरीही प्रेम म्हटले की प्रथम आपल्याला आठवतात ते दोघेच-प्रियकर आणि प्रेयसी.

प्रेमात पडल्यावर कसे सर्व जग रंगीबेरंगी वाटू लागते. आपल्यावर प्रेम करणार्‍या किंवा आपण जिच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीचे बोलणे, हसने, तिचा आवाज, तिचे असणे-नसणे सगळ्याला खूप जास्त महत्त्व मिळायला लागते आणि तिच्या शिवाय या जगात काहीच सुंदर भासत नाही. तिच्याच आठवणीत रमू लागतो, तिच्याच भोवती घुटमळू लागतो. ती म्हणजे प्रेम, ती म्हणजे आयुष्य, ती म्हणजे सर्वस्व.

प्रेमात पडल्यावर बहुतेकांना कविता सुचू लागतात. कित्येकांना गाणीही सुचू लागतात किंवा निदान आपण बरे गातो असे भास तरी होतात कारण प्रेमात पडल्यापासून बरीच रोमॅंटिक गाणी गुणगुणायला सुरूवात झालेली असते. आपल्या मोबाईल मध्ये तिला आवडणारी गाणी ठेवली म्हणजे बरेच फायदे होतात. एकतर आपले महत्त्व फार वाढते शिवाय गाणी ऐकण्याच्या निमित्ताने आपल्याला तिची कंपनीही मिळते. त्यात ही जर एक हेडफोन तिच्या कानात आणि एक आपल्या कानात असेल तर अजुनच छान. कुणाला दिसो वा ना दिसो - इथे 'Do Not Disturb' चा बोर्ड लागला आहे असे गृहीत धरावे.

पावसाचे आणि प्रेमाचे ही असेच अतूट नाते आहे. पाऊस पडू लागला की तिची आठवण होते. तिच्या सोबत गेल्या पावसाळ्यात भिजलो होतो ते आठवून आपणच गालातल्या गालात हसू लागतो. कधीतरी कॉलेजला जाताना आपण छत्री आणायला विसरतो (किंवा आणली असेल तरी बॅगेतून बाहेर काढत नाही) तेव्हा तिच्या छत्रीतून एकत्र चालताना हृदयात होणारी धडधड ते आठवले की पुन्हा जाणवू लागते. परिस्थिती याहून उलटी असेल तरी हरकत नाही म्हणजे तिने छत्री आणली नसेल तर आपण मित्राला ताटकळत ठेवून तिला घरी सोडवायला गेलो तरी परत येताना हवेत तरंगत येतो. खरं तर प्रेमात पडलो की हवेतच असतो आपण. कोणी-कोणी आठवत नाही आपल्याला. बस्स मी आणि ती.

प्रेमात पडणे हे असे आयुष्य बदलवून टाकणारे असते. जो माणूस आयुष्यात एकदा ही प्रेमात पडत नाही त्याचे आयुष्य 'ब्लॅक अँड व्हाईट' चित्रपटांसारखे असेल. पण प्रेम हे ठरवून करता येत नाही. आपण नकळत त्यात गुंतत जातो आणि मग कळते की आपण प्रेमात पडलो आहोत. प्रेमात पडण्याचे तसे काही ठराविक वय नाही पण तरीही प्रेमात पडण्याचे मूळ वय म्हणजे कॉलेजचे. हल्ली शाळेतही हे प्रकार होत आहेत. पण कॉलेजमध्ये गेलो की आपल्याला जास्तच अक्कल आलेली असते त्यामुळे आपण करतोय ते सगळे बरोबर आणि बाकी सगळे चुक. आपले ते प्रेम, बाकीच्यांचे लफडे.

काही जण ठरवूनच प्रेमात पडतात. सगळेच प्रेमात पडतात मग मी पण पडणार. मला ही कोणीतरी स्पेशल हवे आहेच. मग त्या स्पेशल व्यक्तीचा शोध नकळतच सुरू होतो. ही...? का ती...? त्यापेक्षा हीच बरी...असे करता करता स्वप्नातली परी कधीतरी अचानक समोर येते. आधीच रंगीबेरंगी असणार्‍या कॉलेजमध्ये तिच्या येण्याने अधिकच बहर येतो. तिचे नाव, पत्ता शोधण्यापासून, तिच्या मित्र-मैत्रिणी सगळ्यांची चौकशी सुरू होते आणि मग काहीतरी मार्ग काढून तिच्याशी मैत्री करण्याची तयारी केली जाते. मैत्री हे प्रेमाचे पहिले पाऊल म्हणून शहाणे लोक कुणी नुसती स्माईल दिली तर लगेच तिला प्रपोझ करत नाहीत. प्रेमाच्या बाबतीत असा उतावीळपणा चांगला नाही.

एकदा का मैत्री झाली की मोठे काम झाले. मग प्रेमात पडायला किती वेळ लागतो ? (?) नुसते प्रेमात काही पडून होत नाही. आपल्याला तिच्याबद्दल काय वाटते ही सांगणे ही महत्त्वाचे आहे आणि तितकेच अवघड ही. पण कुणाला तरी प्रपोझ करणे ही देखील एक कला असावी. जे टाईमपास म्हणून प्रेम करतात ते सहज प्रपोझ करून मोकळे होतात याउलट ज्यांचे कुणावर तरी मनापासून प्रेम असते त्यांनाच हे फार अवघड जाते. आपल्या प्रिय व्यक्तीला गमवण्याच्या भीतीनेच असे होत असावे. पण जोपर्यंत आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत तिला तरी हे कसे कळणार ? मग त्यासाठी हि नवनव्या युक्त शोधाव्या लागतात.

'लवलेटर'! हे तर फारच दुर्मिळ झाले आहे. पूर्वी तिच्याशी बोलायला मिळत नसे, आपल्या मनातले सांगता येत नसे म्हणून लवलेटर हे प्रेमातील रामबाण उपाय असलेले अस्त्र आता कुणीच वापरत नाही. मुळातच मोबाईल आणि इंटरनेट यामुळे त्याला तिच्याशी जे काही बोलायचे आहे ते सहज शक्य होते. एसएमएस मार्फत ही काही जण प्रपोझ करतात असे ऐकले आहे. त्यामुळे त्याच्याकडून मिळालेले लेटर गुपचुप वाचणे आणि त्याला उत्तर म्हणून दुसरे लेटर लिहिणे यातली गंमत आता हरवली आहे. अजुन एक गोष्ट म्हणजे हल्ली कुणी आपल्या पॉकेटमध्ये तिचा फोटो लपवून ठेवत नाही. कारण मोबाईलमध्ये फोटोग्राफीची सोय झाल्याने असल्या पकडल्या जाणार्‍या चोर्‍या का कराव्यात?

प्रेमाचा अनुभव प्रत्येकाला कुठे ना कुठे मिळतोच. बहुतेकदा ते एकतर्फीच असते म्हणून प्रेम कवितांना आणि विरह कवितांना सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. प्रेम कबूल करणे यात एवढे घाबरण्यासारखे किंवा ते नाकारले तर कमीपणा येण्यासारखे काय आहे हेच कळत नाही. एरवी कित्येक गोष्टी सहज तिच्याशी बोलू शकतो पण प्रेमाचे तीन शब्द बोलू शकत नाही आणि म्हणून ही कथा मैत्रीच्या पुढे जातच नाही. प्रेमात पडायचा हक्क सगळ्यांनाच आहे आणि ते व्यक्त करायचा ही. मग आतापर्यंत कुणाला प्रपोझ केले नसेल तर ही संधी दवडू नका. बोलून टाका. नंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. जे काही असेल ते होऊन जाऊ दे.ती स्वत:हून विचारेल याची वाट पाहत बसू नका. कदाचित ती पण हाच विचार करत असेल.

आता वॅलेन्टाईन डे जवळ आलाय तर सगळीकडे ग्रीटिंग्स, गिफ्ट्स, केक्स, रोझेस, बलून्सनी बाजार भरले आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी या सगळ्या शोभेच्या वस्तू खास असल्या तरी तुम्ही सर्वात जास्त काही देऊ शकत असाल तर त्यांना वेळ द्या.कारण नुसतेच प्रेम असून उपयोग नाही. प्रेमाच्या नात्याला जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आधीच बर्‍याच ब्लॉंगर्सनी बर्‍याच वॅलेन्टाईन आइडियास दिल्या आहेत. त्या वापरा किंवा तुम्ही स्वत:च नवीन शोधा आणि अजुनही कोणी भेटली नसेल तर लवकर शोधा. प्रेमात पडण्याचे वय निघून गेले असे नंतर म्हणत बसू नका.

हॅपी वॅलेन्टाईन डे!

Comments

  1. मान्यवर,
    एकदम भन्नाट. काही बोल तुमच्या अनुभवाचे वाटले :P:P
    मस्त लिहीलंय.. १४ फ़ेब्रुवारी जवळ येऊ लागलाय अन्‌ त्यात हा तुमचा तोहफा !!!!!!!!!

    ReplyDelete
  2. कधीतरीच खरे बोलतो रे मी...:P
    बाकी प्रेम हा आमच्यासाठी पी.एच.डी. करायचा विषय आहे...

    ReplyDelete
  3. अर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्र गुर्जी तुम्ही आधी का नाही भेटलात?...
    तुमचे क्लास लावले असते मस्तपैकी आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवले असते. एखादा क्रॅश कोर्स आहे का सर? आपला अनुभव लैई दांडगा दिसतोय :) :D :p

    ReplyDelete
  4. उशीराने का होईना तुम्हाला आमची किंमत कळली...:P
    कॉलेजमध्ये याविषयावर नेहमी गप्पा व्हायच्या म्हणून मग आता पोस्टून टाकल्या...
    हॅपी वॅलेन्टाईन!

    ReplyDelete
  5. गुर्जी लय भारी ... :)

    ReplyDelete
  6. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा