मला भारतरत्न पाहिजे !

बस...ठरलं ! आता अजून काही नाही...हट्ट म्हणा हवा तर पण पाहिजेच...काय म्हणता ? मला कशाला...? छे छे...माझ्यासाठी नाही..मी कुठे काय केलेय...मला हा पुरस्कार पाहिजे तो आपल्या सचिनसाठी ! क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्याने एक हट्ट केला होता...भारताला विश्वचषक जिंकून देण्याचा ! आता २१ वर्षाच्या तपानंतर कुठे त्याचे स्वप्न साकार झालेय. २ एप्रिल २०११ रोजी तो सोनियाचा दिवस उजाडला आणि ती झळाळती ट्रॉफी त्याच्या हाती आली. आणि तेव्हापासून सगळे जण वेडेच व्हायचे बाकी राहिलेत.

मला पुरस्कार पाहिजे असे म्हटले कारण सचिनचा गौरव तो आमचाच गौरव. सचिनने शतक केले तर आपल्याला आपणच शतक झळकावल्याचा आनंद होतो. सचिन आउट झाला म्हणजे आपणच आउट झाल्याचे वाटते. सचिन खुश तर आपण खुश. गेल्या वर्षी सचिनने द्विशतक केले तेव्हा कोण आनंद झाला होता. भारतभर नुसता जल्लोष आणि आनंदी-आनंद ! पन्नास षटके खेळून काढणे ते ही वयाच्या ३७व्या वर्षी काही सोपी गोष्ट आहे का? पण त्याने ते केले. सेहवागने ही ठरवले ५० षटके खेळायचे पण काही जमले नाही. राजाचा मुकुट राजालाच लाभायचा होता ! म्हणून एवढे पराक्रम केल्यावर आता नवीन काय करावे असा विचार त्याने केला आणि मारले एक द्विशतक ! आता इतका आनंद दुसरा कोणी खेळाडू देतो का ? सचिन मात्र देतो. भारतीयांचे काहीतरी ऋण असल्यागत एकामागे एक शतक करून फेडत जातो. आता वर्ल्डकपही जिंकून दिला. काय करावे या माणसाला ? ( गेल्या काही वर्षात तो देव असल्याचा साक्षात्कार झालाय लोकांना !)

सचिनबद्दल बोलायला लागलो की शब्दच अपुरे पडतात...किती बोलू आणि काय बोलू. त्याच्या महानतेविषयी तर दर महिन्याला एक-एक पोस्ट टाकेन मी. मला एकट्यालाच नाही सर्व सचिनच्या चाहत्यांची हीच अवस्था आहे. गेल्या २१ वर्षात त्याने किती पराक्रम गाजवले. त्याच्या कारकिर्दीत रेकॉर्ड आणि सचिन हे समानार्थी शब्द बनले. बघता-बघता सगळे या जादूगाराच्या करामतीने गुंग झाले. हल्लीच नाना पाटेकरने आपल्या लेखात सचिनला म्हटले ' 'आमच्या वेळी अमुक एक महान खेळाडू होता' असे म्हणायचे पण तुझ्या बाबतीत तसे म्हणता येत नाही कारण तू सर्वांच्या वेळीस होतास !' आता अजून किती वर्षे खेळेल ते तोच (देवच) ठरवेल !

कितीतरी दिग्गजांनी भारत सरकारला सांगितले की सचिनला भारतरत्न द्या पण त्यांना काही मुहूर्त सापडत नाहीये. एक तर सचिन स्वत:हून कधी मागणार नाही...सचिन काही पुरस्कारांसाठी खेळत नाही. आता हा एक पुरस्कार मिळाला की सवयीप्रमाणे तो भारतीयांना अर्पण करेन म्हणजे आम्हालाच मिळाला की ! भारत सरकार बहुतेक निवृत्त होण्याची वाट बघताहेत पण त्याला अजून बरीच वर्षे खेळायचे आहे, तुम्ही किती वर्षे हा पुरस्कार राखून ठेवणार आहात ? मला कधी कधी वाटते की हा नक्कीच कोणीतरी अवतारी पुरुष असून, निवृत्त झाल्यावर अचानक गायब वगैरे होईल किंवा स्वर्गातून त्याला न्यायला विमान तरी येईल. मग त्याच्या पश्चात पुरस्कार देण्यापेक्षा आता दिला तर चांगले होईल. तेवढेच आम्हा सचिन-वेड्या भारतीयांना अजून एक आनंदाची बातमी. बस आता लवकरात लवकर तो शतकसोहळा आटोपता घे. म्हणजे पुढची पोस्ट लिहायला अजुन एक निमित्त.

Comments

  1. >> मला कधी कधी वाटते की हा नक्कीच कोणीतरी अवतारी पुरुष असून, निवृत्त झाल्यावर अचानक गायब वगैरे होईल किंवा स्वर्गातून त्याला न्यायला विमान तरी येईल.

    अगदी अगदी.. मस्त लिहिलं आहेस !!

    ReplyDelete
  2. धन्य हेरंबा...

    ReplyDelete
  3. जे सरकार शरद ’लवासा’ पवार सारख्या महाभ्रष्ट आणि स्वार्थी नेत्याला ’सामाजिक न्याय रामशास्त्री प्रभुणे’ पुरस्कार देते त्यांच्याकडून सचिनला काही मिळेल अशी अपेक्षा करणे अत्यंत चुकीचे आहे !!
    आपल्या मनातील प्रतिमा ही भारतरत्नापेक्षा श्रेष्ठ आहे :)

    ReplyDelete
  4. ह्म्म्म...एकीकडे सचिन हा सर्व दृष्टीने आदर्श कसा असावा हे दर्शवतो तर आपले राजकारणी आदर्श घोटाळे करत आहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा