'आर' फॉर रॉकस्टार

"११.११.११"  जगभर लोक ह्या खास तारखेचे गुणगान गात आपापल्या तऱ्हेने साजरा करत होते पण आम्ही 'रहमान भक्त' मात्र संकष्टीला गणपती मंदिरात, महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात गर्दी करावी तसे न चुकता पहिल्याच (आणि इतक्या खास) दिवशी जमलो ते रॉकस्टार पाहायला. त्यापूर्वीचे कितीतरी दिवस मोबाईलवर, लॅपटॉपवर, टी. व्ही. वर फक्त रॉकस्टारची गाणी ऐकून धन्य झालो होतो तो आता मोठ्या पडद्यावर ती ऐकायला आणि पाहायला मिळणार म्हणून जरा जास्तच उत्सुक होतो. पहिल्या पाच मिनिटात होणारी रणबीरची एण्ट्री आणि अगदी आवेषात मोठ्या जनसमुदायासमोर त्याचा रॉकिंग परफॉर्मन्स पाहून उत्सुकता एकदम वाढु लागते. लगेचच मग चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जाऊन कॉलेजयुवक रणबीर हातात गिटार घेऊन गाताना दिसू लागतो. 'जो भी मैं कहना चाहू..'

इथून मग हीर(नर्गिस) आणि जनार्दन उर्फ जॉर्डनची  (रणबीर) गोष्ट सुरू होते. मोठा कलाकार बनायचे तर आयुष्यात दु:ख हवे या भावनेने प्रेरित होऊन 'जॉर्डन' त्याच्या कॉलेजमधील 'दिल तोडने की मशीन' 'हीर' ला प्रपोझ करतो आणि तिने नकार दिल्यावर दु:खी झाल्याचे नाटक करतो. पण पुढे दोघांची चांगली मैत्री होते आणि मजा-मस्ती चालू राहते.चित्रपटात नायिकेच्या वाटेला केवळ एकच गाणे आहे...'कटिया करूँ' पण ते सुंदर जमले आहे. जिथे-जिथे हीर आणि जॉर्डन बाइकवर आहेत तिथे हे गाणे पेरले आहे.

हीर जॉर्डन बरोबर पळून जाईल असे वाटते असते पण तसे काही होत नाही. हीरचे लग्न होते आणि तिच्या लग्नासाठी म्यूज़िक कंपनीला विसरून कश्मीरला गेलेला जॉर्डन घरी परततो. 'फिर से उड चला' हे गाणे अर्धवट घेण्यात आले आहे. इथे गाडी घसरते. हीरच्या लग्नाला त्याचे जाणे, घरच्यांनी त्याला घराबाहेर काढणे, त्याचे दर्ग्यात दोन महिने राहणे या घटना जुळवून आणल्यासारख्या वाटतात. 'कुन फाया कुन' हे पुन्हा एक मास्टरपीस. रहमान अशा गाण्यांमध्ये जे काही करतो, जे काही गातो ते इतर कोणाला जमत नाही. अशा गाण्यांमध्ये गिटारपीस टाकून तो इतक्या सहजपणे एकरूप करून टाकणे हे सूचणे आणि ते करणे म्हणजेच महान बाब आहे. 'कुन फाया कुन' सारखे गाणे वैयक्तिक पातळीवर अतिउत्तम असले तरी चित्रपटात तितका परिणाम साधत नाही.

इथून पुढे जॉर्डनचा गायक म्हणून प्रवास सुरू होतो. पण सामान्य गायकांच्या पठडीत तो बसणारा नसल्याने म्यूज़िक कंपनीशी खटके उडत राहतात. 'शेहर मे' सारखे गाणे ऐकायला नाही मिळाले याचे फार वाईट वाटले. रहमानने गाणे वाटावे असे ते बिलकुल रचले नाहीये. सीडी मध्ये हे गाणे नसते तर 'मेकिंग ऑफ...'म्हणूनच ते ओळखले गेले असते.पण आधीच अकरा गाणी त्यात तीन तासांच्या जवळपास चित्रपटाची लांबी त्यामुळे कुठेतरी कात्री लावायची ती गाण्यांना लागली आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. चित्रपटात मात्र त्याचा 'शेहर' आल्बम हिट होतो आणि त्याला प्रसिद्धी मिळू लागते.

युरोपला जाण्याची संधी मिळणार असल्याचे ऐकून जॉर्डन सर्व अटी मान्य करून कांट्रॅक्ट साइन करतो. 'हीर'च्या शोधात 'प्राग' ला पोहोचलेल्या जॉर्डनला ती भेटतेही. तिच्या बोरिंग आयुष्यात तो आल्याने पुन्हा नवे रंग भरतात.' हवा हवा' मधे रहमानची प्रयोगशीलता मोहीतच्या आवाजावर झाली आहे. मोहितच्या यॉडलिंगने तर किशोरदांची आठवण करून दिली. रहमानसरांनी यात एकाहून एक अशी गाणी दिली आहेत की काही वेळेस ती चित्रपटास मारकही ठरली आहेत. लोक कथानक विसरून गाण्यात जास्त हरवून जातात. अर्थात यात कथानकाचा काही दोष आहेच.

'और हो' गाणे झक्कास झालाय. ते नेमक्या वेळी येते आणि परिणाम साधते. या गाण्यातून त्याची रॉकस्टारची प्रतिमा अधिक ठळकपणे समोर येते. 'साड्डा हक़' हे गाणे म्हणजे प्युअर रॉकस्टारला शोभणारे आहे. हे संपूर्ण गाणे, त्याचे शब्द, त्यातील रणबीरचे भाव सगळे आग लावते पण गाणे कथानकात अगदीच घुसखोरी करून आल्यासारखे वाटते. म्हणजे जे आहे ते छान आहे पण ते का आहे आणि त्याचा कथानकाशी संदर्भ काय हे कळत नाही.


हीरच्या परत येण्याने कथानकाचा वेग पुन्हा मंदावतो. रॉकस्टार म्हणून उफाळलेला ज्वालामुखीही थंडावतो. दिग्दर्शकाला या चित्रपटातून बरेच काही सांगायचे आहे पण जे काही सादर केले ते ही कमीच पडले असे वाटते. शेवटी शेवटी पुन्हा 'नादाँ परिंदे' च्या वेळेस रॉक म्यूज़िक ऐकल्याचा आनंद मिळतो पण तो पर्यंत बरेचजण कंटाळून जातात. चित्रपटाचे कथानक तसेही क्लिष्ट आहे. उत्तरार्धात कथानक खूपच झोके घेत राहते त्यामुळे हातातली मॅच पडत धडपडत जिंकल्यासारखी वाटते. चित्रपटाची लांबी जास्त असल्यामुळे प्रेक्षकांचा 'मेमरी लॉस' होण्याची शक्यता आहे कारण खूप सार्‍या घटनांचे संदर्भ जुळवावे लागतात त्यात प्रेक्षक गोंधळून जातो.

'तुम हो पास मेरे' आणि 'तुम को पा ही लिया' ही केवळ दोन गाणी रोमॅंटिक सदरात मोडणारी आहेत. एकाच ट्रॅकवर थोडेफार बदल करून मेल आणि फीमेल वर्जन रेकॉर्ड करण्यात आले आहे आणि दोन्ही गाणी अप्रतिम झालीयेत यात काही आश्चर्य नाही. ही दोन्ही गाणी मी बॅक-टू-बॅक बर्‍याचदा ऐकली आहेत आणि जे गाणे ऐकतो आहे ते मागच्या गाण्याहून चांगलेच वाटते. ( कितीतरी वेळा) फीमेल वर्जन चित्रपटात तर केवळ दोन ओळींचे घेतले आहे पण मेल वर्जन पूर्ण असूनही ते चित्रपटाच्या शेवटी आहे आणि चित्रपट संपला म्हणून गाणे न ऐकताच लोक थियेटर बाहेर पडत होते (मूर्ख!)! चित्रपटाची लांबी हे ही कारण असेल त्याला पण रहमानची गाणी न ऐकता थियेटर बाहेर जाणे म्हणजे 'गाढवाला गुळाची चव काय?'

रणबीर या चित्रपटातून 'स्टार' म्हणून उदयास आला आहे. त्याचा वावर, आत्मविश्वास, अभिनय हा सर्वथा 'रॉकस्टार' म्हणून साजेसा आहे. नर्गिसला अभिनयास वाव असूनही तिला भाव खाता आलेला नाहीए. तिचा नवखेपणा जाणवत राहतो. रणबीर समोर तरी ती फिकी वाटते (अभिनयाच्या बाबत)! रणबीर जसा यातून रातोरात स्टार झाला आहे तसाच 'मोहित चौहान' ही झाला आहे. रहमानच्या परिसस्पर्शाने त्याचे सोने झाले आहे. कधी न कल्पलेल्या रचना तो इथे गाऊन गेलाय. शम्मीजींना पुन्हा पडद्यावर पाहून आनंद जाहला. शहनाईवादक म्हणून ते शोभून दिसतात. चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्यांचा पोस्टर झळकतो आणि त्यांच्या काळी ते ही 'रॉकस्टार' होते याची आठवण करून देतो.

जाता जाता, परीक्षण वाचून चित्रपटाची योग्यता ठरवू नका. त्याचे बारकावे शोधून हिरमोड करून घेण्यापेक्षा मनोरंजन म्हणून पाहिला तर चित्रपट सुंदर आहे. प्रेमकथा आणि एका रॉकस्टारचा प्रवास यात कथानक दोन होड्यांवर पाय ठेवून जाते. चित्रपट मित्रांसोबत पाहणार असाल तर रॉकस्टारची कथा म्हणून पाहा आणि मैत्रिणीसोबत पाहायचा असेल तर प्रेमकथा म्हणून पाहा. म्हणजे पैसा वसूल झाल्याचा आनंद तरी मिळेल.

Comments

  1. बघायचा आहे यार... ऑफिसमुळे राखाडलो आहे. खूप परीक्षणं वाचली आहेत. बघायची इच्छा आहेचं आता. :) :)

    ReplyDelete
  2. आधीच सांगतोय...कुठलेच परीक्षण मनावर घेऊ नकोस...रहमानची गाणी ऐकायची एवढेच लक्षात ठेवायचे...आवडला तर चांगलीच गोष्ट आहे :)

    ReplyDelete
  3. मस्त मस्त मस्त... छान लिहिलेस मित्रा.
    बघावा लागेल आता "रॉकस्टार"

    ReplyDelete
  4. धन्यवाद नागेश
    नक्की बघ

    ReplyDelete
  5. गाण्यांनी वेद लावलय .... आणि हा सिनेमा काहीही करून थेटरात पाहायचाय ... छान परीक्षण आवडलं...

    ReplyDelete
  6. मला वाटलं आत्तापर्यंत पाहिला असशील...थेटरलाच पाहा...
    मला तर नेटवरून कॉपी पण मिळाली एक...

    ReplyDelete
  7. गाणी जितकी अत्त्युच्च आहेत तितकंच (नसलेल्या) कथेचं/पटकथेचं मातेरं केलंय इम्तियाझ अलीने. गाणी सतत ऐकतोय आणि रहमानला पुनःपुन्हा दंडवत घालतोय मात्र चित्रपट अत्यंत अत्यंत भिक्कार !!! अजिबात आवडला नाही.

    ReplyDelete
  8. तेच तर आहे...चित्रपटात फारच गोंधळ घातलाय...
    रहमान होता म्हणून तीन तास रमलो...गाणी वजा केली तर काही उरत नाही

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा