सैराट झालं जी...
फॅंड्रीनंतर नागराज मंजुळे 'सैराट' घेऊन येत आहेत हे जाहीर झाले तेव्हापासूनच चित्रपटाविषयी उत्सुकता वाढलेली होती. त्यात अजय-अतुल यांचे संगीत सैराटच्या निमित्ताने पुन्हा ऐकायला मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात 'सैराट' ची हवा आहे आणि ती उगीच नाही हे चित्रपट पाहून झाल्यावर खात्री पटते. सोलापूरच्या कॉलेजला शिकणारे परश्या आणि आर्ची हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात पण आर्ची ही गावच्या पाटलाची मुलगी आणि परश्या कोळी समाजातील मुलगा. आंतरजातीय प्रेमामुळे त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते पण तरीही ते निडरपणे त्यांचा सामना करतात. घर सोडून नव्या शहरात जाऊन संसार मांडतात पण त्यांचे प्रेम यशस्वी होते का ? प्रेम करणे जितके सोपे आहे तितके ते निभावणे नाही. या सैराट प्रेमकथेचा शेवट काय होतो हे पाहायला चित्रपटगृहात जायला हवे . 'सैराट' साठी नागराज मंजुळे यांनी आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे दोन नवोदित कलाकार घेतले पण त्यांच्याकडून पहिल्याच चित्रपटात उत्तम दर्जाचे काम करवून घेतले. राष्ट्रीय पुरस्काराने नायिकेचा सन्मान झाल्याने अपेक्षा आधीच उंचावल्या होत्य