इस्टमन कलर दुनियादारी

बहुचर्चित दुनियादारी एकदाचा प्रदर्शित झाला. दुनियादारी ही सुहास शिरवळकर याची एक अजरामर कादंबरी आहे याची प्रथमत: सर्वांनी नोंद घ्यावी. दुनियादारी पाहून आलेल्या अनेकांना हे माहीतच नाहीये त्यामुळे दर्जा काय असतो हे त्यांना चित्रपट पाहून कळणार नाही. या चित्रपटाचे परीक्षण करायचे म्हटले तर दोन प्रकारे करता येईल- एक म्हणजे केवळ चित्रपट म्हणून व दुसरे म्हणजे कादंबरीवर आधारित चित्रपट म्हणून. पण इथे लेखकाने (म्हणजे मी) पुस्तक आधीच वाचले असल्याने चित्रपट पुस्तकावर आधारित आहे हे सत्य त्याला नाकारता येत नाही. त्यामुळे या लेखात वारंवार चित्रपटाची पुस्तकाशी तुलना केली जाईल पण काही उपाय नाही.

दुनियादारी ही कथा आहे श्रेयस, मिनू, शिरीन, दिग्या, रानी माँ, एम के आणि कट्टा गँगची. कॉलेज, मैत्री, प्रेम, विरह, संघर्ष असे नाट्यमय कथानक असल्याने साहजिकच संजय जाधव यांना दुनियादारी पडद्यावर आणावीशी वाटली त्यात काही आश्चर्य नाही पण ते तसे करताना मूळ कथानकात हवे तसे बदल करत ती सादर केली आहे. (ज्याला माध्यम बदलाची गरज असे म्हणता येईल). आणि सामान्य प्रेक्षकाने पुस्तक वाचले नसल्याने तो मूर्ख ठरतो कारण जे दाखवले जाते त्याहून बरेच चांगले असण्याची क्षमता असलेली कादंबरी हाउसफुलच्या बोर्डखाली झाकोळली जाते. चित्रपटातील पात्रांचा लूक यावर दुनियादारीच्या टीमने विशेष मेहनत घेतली आहे. तो स्वतंत्र चित्रपटाच्या दृष्टीने कौतुकास्पद असला तरी पुन्हा पुस्तकाशी तुलना केली तर असे वाटते की तरुणाई तेव्हाची आणि आजची दोन्ही फॅशन फॉलो करते पण सतत फिल्मी लूक बाळगून आणि तोही प्रत्येकाने असे वागावे ही बरीच अतिशयोक्ती आहे.

आता कथानकातील पात्रांविषयी बोलायचे तर आपल्याकडे एखादाच अतुल कुलकर्णी किंवा दिलीप प्रभावळकर रोलच्या दृष्टीने शारीरिक आणि संवादफेकीत आवश्यक ते बदल घडवून आणतात. स्वप्नील जोशी आणि उर्मिला कानेटकर दोघेही खरे तर श्रेयस आणि मिनूच्या रोल साठी योग्य होते पण केव्हा ? तर दहा वर्षापूर्वीचे. तेव्हाचा स्वप्नील आणि उर्मिला या रोलच्या वयाच्या जवळपास होते. स्वप्नीलने श्रेयस साकारताना किमान ९ ते १० किलो वजन घटवणे जरुरीचे होते. (थ्री इडीयटस मधला आमिर पहा). पोट सुटलेला कॉलेजकुमार आणि तो ही चित्रपटाचा नायक म्हणून ? ('एका लग्नाची गोष्ट' मध्ये राधाने एवढे बोलूनही काही फायदा झाला नाही) उर्मिला सुंदर दिसतेय पण ती कॉलेज तरुणी वाटत नाही. स्वप्नीलचे दुर्दैव असे की जेव्हा तो चॉक्लेट बॉय होता तेव्हा त्याला चांगले मराठी चित्रपट मिळत नव्हते आणि आता एवढ्या उशीराने तरुण नायकाच्या भूमिकेत तो कुणाला गोंडस वाटत असेल तर त्यांनी डोळे तपासून घ्यावेत. त्याने साकारलेला श्रेयस स्मार्ट वाटण्यापेक्षा बावळट व पापभिरू वाटतो.

अंकुश चौधरी बद्दल काय लिहावे ? जे स्वप्नील बद्दल लिहिले त्याची उलट परिस्थिती इथे आहे. अंकुशने अमिताभची स्टाईल मारल्याने लोकांना तो भलेही आवडला असेल पण दिग्या असा नाहीये. स्वप्नील काय नि अंकुश काय सगळे सचिन द महागुरुंचे शिष्य असल्याने आपल्या पूर्वपुण्याईचा फायदा घेत अति करतात आणि लोकही वाहवा करत टाळ्या पिटतात. आता अंकुशने या चित्रपटात दिग्याचा रोल केलाय जो श्रेयसच्या तिप्पट आहे ( याला अतिशयोक्ती म्हटले तर किमान दुप्पट तरी ?) असे पुस्तकात वर्णन आहे. आणि इथे पाहिले तर शरीराची रुंदी मोजता दिग्याच श्रेयसच्या अर्धा भरेल. बरे इथे निदान रफ लूक असलेला अभिनेता अपेक्षित होता. (दाढी वाढवूनही अंकुशला तो लूक साधता आलेला नाहीये) संजय नार्वेकर (ज्याने दुनियादारी मालिकेत दिग्या साकारला होता) किंवा उपेंद्र लिमये हे दोनच अभिनेते या रोलसाठी माझ्या डोळ्यापुढे येतात. कारण केवळ लूक नाही पण दोघांचा आवाज आणि देहबोली दिग्याच्या पात्रासाठी योग्य आहे. अंकुशने फिट राहण्याच्या नावाखाली जी किरकोळ शरीरयष्टी कमावली (की गमावली ?) आहे त्यात तो आजारीच वाटतो. इथे त्याने वजन वाढवून ते साधता आले असते पण त्याची कुणाला पर्वा नाहीये.

शिरीनच्या भूमिकेत सई ताम्हणकर ठीक वाटते कारण या रोलसाठी दुसरी कोणती नायिकाही सुचत नाहीये. पुस्तकातील शिरीनची व्यक्तिरेखा फार विलक्षण आहे. ती जादुई शिरीन इकडे फारच फिकी वाटते. साईनाथच्या रोल मध्ये जितेंद्र जोशी अजिबात शोभत नाही. इथेही चित्रपट पुस्तकावर आधारित नसता तरी जितु या रोलसाठी मुळीच शोभत नाही. पुस्तकात जे वर्णन आहे त्यानुसार त्याची शरीरयष्टी प्रणव रावराणेची (म्हणजे चित्रपटातील सॉरी) आहे तशी हवी होती. त्यात कट्टा गँगचे सदस्य असलेल्या सगळ्यांनी ओवर अक्टिंगचा कहर केलाय. आता उदाहरणादाखल दुनियादारी मालिकेतील पात्रांचा हा फोटो टाकलाय. जे सतीश राजवाडेंनी केले त्याची अधिकाधिक वाट लावायची ठरवत संजय जाधवनी त्याला इस्टमन कलर मध्ये आणले. आता हे करून त्यांनी मूर्ख प्रेक्षकांचे लक्ष वेधले खरे पण कथानकाचे काय ? ज्या कथानकाला एक सोडून अनेक पैलू आहेत ते सगळे या भडकपणा पुढे फिके पडलेत.

कथानकात बदल तर असे केलेत जसे पुस्तक यांचे स्वत:चेच आहे. धीरूभाईला वगळून साईनाथशी शिरीनचे लग्न जमवले आहे. साईनाथला मूळ कथानकापेक्षा अधिक फुटेज देऊन त्याला खलनायक बनवला आहे कारण चित्रपटात रंगत निर्माण व्हावी. क्लाइमॅक्समध्ये तर श्रेयस आणि शिरीनच्या पात्रांचा फारच घोळ घातलाय. एम के ला उगाच दाखवायचे म्हणून दोन प्रसंगासाठी घेऊन त्यालाही वाऱ्यावर सोडले आहे (अक्षरश:). शिवाय सर्व पात्रांबाबत संजय जाधव यांनी आपलेच मित्र आहेत आणि आपलीच दुनियादारी आहे अशा थाटात रोल वाटप केले आहे. ते मित्र आहे म्हणून काय कथानकाची वाट लावणार का ? सुशिंनी या सगळ्यांना माफ करावे.

संजय जाधव यांनी या आधी मराठीत चांगले चित्रपट केले आहेत आणि ते मला आवडलेही आहेत. पण इथे त्यांनी दुनियादारी नावाचे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला आहे जो आर्थिक दृष्ट्या चित्रपट चालल्यामुळे यशस्वी होईलही आणि जे शाळा चित्रपटाबाबत घडले तेच याबाबत घडून म्हणजे ज्यांनी पुस्तक वाचले नाहीये त्यांना त्या कथानकाचा दर्जा माहितच नाहीये आणि काहीतरी दाखवले आहे ते आवडले म्हणजे बास. माझ्या ज्या कोणी मित्रांनी दुनियादारीची पारायणे केली आहेत त्या कुणालाच हा चित्रपट आवडला तर मला आश्चर्य वाटेल. कारण केवळ मैत्री-प्रेम-मारामारी-विरह या पलीकडे त्याची व्याप्ती आहे ती मुळात दिग्दर्शकाला दाखवायचीच नाहीये कारण तो एक दर्जेदार चित्रपट बनवण्यापेक्षा मनोरंजनपट बनवण्याकडे त्याचा हेतू आहे. 

आता चित्रपटाची दुसरी बाजू मांडता येईल.

दुनियादारी पुस्तकाचे यश हे आहे की ती कोणत्याही काळातील तरुणाला भावते. सुशिंनी ही कथा ७०च्या दशकात लिहिली तरी ती आजही तितकीच जिवंत वाटते. कारण त्याची मांडणी चित्रपटापेक्षा फार वेगळी आहे. चित्रपट फार भडक रंगात किंवा इस्टमन कलरमध्ये आहे असे म्हणू पण तो मनोरंजक आहे. कथानक माहित नसलेल्यांना तो प्रचंड आवडू शकतो कारण त्यात पुरेपूर मसाला आहे, गाणी आहेत आणि धमाल आहे. पण मूळ कथानकात अनेक गुंते असूनही ती लेखकाने सुरळीतपणे सोडवली आहेत. इथे यांची गत परीक्षेचा पेपर वेळेअभावी आटोपता घ्यावा अशी झाली आहे. पहिल्या बाजूत लूकबाबत जी टीका केली तिचे इथे कौतुक करता येईल कारण त्यामुळे प्रेक्षकांत चित्रपट पाहण्याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

चित्रपटाचे संगीत चांगले आहे आणि अशा चित्रपटात पार्श्वसंगीत प्रभावी ठरू शकले असते ते कमी पडले आहे. 'टिकटिक वाजते डोक्यात' गाणे सुंदर आहे. पण यातही लहान मुलांच्या आवाजात कोरस घेण्याचे प्रयोजन काय आहे इथेच माझे घोडे अडले आहे. तो कोरस शाळा चित्रपटात उठून दिसला असता. 'जिंदगी' उत्तम जमले आहे. हे गाणे टिपिकल कॉलेज लाईफची भाषा बोलते. शिवाय ते रुईया कॉलेजच्या कट्ट्यावर रचल्याचे संगीतकार समीर साप्तीस्कर याने एका मुलाखतीत सांगितले होते.

आता कथानकाची एवढी मोडतोड करूनही काही जमेच्या बाजू आहेत. चित्रपटाचे प्रमोशन कसे करावे याचे दुनियादारी उत्तम उदाहरण आहे. चांगले मराठी चित्रपट कधी येउन जातात हे कळतही नाही लोकांना. त्याबाबत मी संजय जाधव आणि सगळ्या दुनियादारी टीमचे अभिनंदन करेन. हिंदी चित्रपट निर्माते ट्रेलर्स आणि गाण्यांतून चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवतात. आज दुनियादारी अनेक चित्रपटगृहात हाउसफुल चालतोय कारण त्याला वारंवार जाहिरातीतून आणि बातम्यामधून दाखवले जात आहे.

जाता-जाता एवढेच सांगता येईल की दुनियादारीची खरी योग्यता ही मालिकेतून सादर होण्याची आहे. दोन-अडीच तासाच्या वेळेत ती कथा गुदमरून गेली आहे. अनेक सुंदर संदर्भ आणि प्रसंगांना कात्री लागली आहे. ज्यांनी पुस्तक वाचले नाहीये त्यांना याची जाणीवच होत नाही आणि ज्यांनी वाचले आहे त्यांना कथानकाची मोडतोड पटत नाही. पण तरीही मराठी चित्रपटाला पाठींबा मिळावा यासाठी नक्की चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि मग आपले मत ठरवावे.

Comments

Popular posts from this blog

पाऊसगाणी

सैराट झालं जी...

निषेध!निषेध!!