सैराट झालं जी...


फॅंड्रीनंतर नागराज मंजुळे 'सैराट' घेऊन येत आहेत हे जाहीर झाले तेव्हापासूनच चित्रपटाविषयी उत्सुकता वाढलेली होती. त्यात अजय-अतुल यांचे संगीत सैराटच्या निमित्ताने पुन्हा ऐकायला मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात 'सैराट' ची हवा आहे आणि ती उगीच नाही हे चित्रपट पाहून झाल्यावर खात्री पटते.

सोलापूरच्या कॉलेजला शिकणारे परश्या आणि आर्ची हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात पण आर्ची ही गावच्या पाटलाची मुलगी आणि परश्या कोळी समाजातील मुलगा. आंतरजातीय प्रेमामुळे त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते पण तरीही ते निडरपणे त्यांचा सामना करतात. घर सोडून नव्या शहरात जाऊन संसार मांडतात पण त्यांचे प्रेम यशस्वी होते का ? प्रेम करणे जितके सोपे आहे तितके ते निभावणे नाही. या सैराट प्रेमकथेचा शेवट काय होतो हे पाहायला चित्रपटगृहात जायला हवे .


'सैराट' साठी नागराज मंजुळे यांनी आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे दोन नवोदित कलाकार घेतले पण त्यांच्याकडून पहिल्याच चित्रपटात उत्तम दर्जाचे काम करवून घेतले. राष्ट्रीय पुरस्काराने नायिकेचा सन्मान झाल्याने अपेक्षा आधीच उंचावल्या होत्या आणि रिंकू राजगुरूने त्याची योग्यता सिद्धही केली. 'आर्ची' च्या भूमिकेत तिचा आत्मविश्वासपूर्ण वावर पाहता ती १४ वर्षाची आहे यावर विश्वास बसणार नाही. 'परश्या' च्या भूमिकेत आकाश ठोसर याचे कामही उत्तम आहे पण रिंकूने अधिक सरस काम केल्याने ती लक्ष वेधून घेते. वेगवेगळ्या प्रसंगातील तिचा सहज अभिनय कौतुकास्पद आहे. परश्याचे मित्र सलीम आणि प्रदीप उर्फ लंगड्या मध्यंतरापूर्वीचा चित्रपट मजेशीर करतात. आर्चीचा भाऊ म्हणून सूरज पवारही उल्लेखनीय. या सर्व अचूक पात्र निवडीबद्दल नागराज मंजुळे यांचे विशेष अभिनंदन करायला हवे.

चित्रपटाची लांबी हा सैराटच्या टीकेचा विषय आहे पण प्रत्येक कथानक दोन-अडीच तासांच्या लांबीत बसवणे म्हणजे काही चांगल्या प्रसंगांना कात्री लावणे. ज्या अर्थी चित्रपट मोठा आहे तो दिग्दर्शकाला त्यातून सांगण्यासारखे बरेच काही आहे. ते बारकावे सामान्य प्रेक्षकांना जाणवतील असे नाही. चित्रपटाचा उत्तरार्ध नक्कीच संथ आहे. पण पूर्वार्ध जितका रंगतदार आणि नावाप्रमाणे 'सैराट' आहे तो त्याचा वेगात दौडत नेला असता तर तो केवळ करमणूकपट झाला असता. चित्रपट संथ होत गेल्याने त्याचा शेवट अधिक अंगावर येतो. तो आधीच ओळखता येण्यासारखा असला तरी त्याचे सादरीकरण कसे होते याला महत्त्व आहे. मध्यंतरानंतरचा चित्रपट पूर्वार्धाहून बराच वेगळा आहे पण पुन्हा तो तसा असणे त्याला अधिक परिणामकारक करते. पूर्वार्ध जितका 'फिल्मी' आहे तितकाच उत्तरार्ध वास्तववादी आहे. प्रेमात पडणाऱ्या सैराट मनांना पूर्वार्ध जितका सुखावणारा आणि स्वप्नमय वाटतो तितकाच उत्तरार्ध समाजाचे दाहक सत्य दाखवतो.

अजय-अतुलच्या संगीताची जादू सैराटच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. अजय-अतुल मराठीला विसरले, त्यांच्या संगीतात पूर्वीची मजा नाही राहिली या टीकांना त्यांनी सैराट मधून चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यातही अजय-अतुल प्रादेशिक संगीतातच कमाल करतात असे वाटत असेल तर त्यांनी सैराट साठी केलेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑर्केस्ट्राही ऐकावा. मराठी संगीतात अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी करून अजय-अतुल यांनी मराठी संगीत सृष्टीचा दर्जा निश्चितच वाढवला आहे. उत्तम दर्जाचे आणि लोकांना प्रिय असे संगीत देणे हे अजय-अतुल यांच्याकडून शिकावे.

नागराज मंजुळे यांच्या फॅंड्रीवर अनेकांनी स्तुतिसुमने उधळली पण चित्रपट कंटाळवाणा आहे, हा फक्त चित्रपट महोत्सवात दाखवावा अशा टीकाही प्रेक्षकांकडून झाल्या. सैराट हा केवळ सामाजिक वा केवळ करमणूकपट न करता तो दोन्हींची योग्य ती सांगड घालतो. नागराज मंजुळे यांचे कथा सांगण्याचे कौशल्य उत्तम आहे आणि त्यांना असलेली सामाजिक जाण फॅंड्रीमधून दिसली आहे. त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत म्हणून काही लोकांची निराशा झाली असेल आणि नवीन काहीच पाहायला मिळाले नाही अशी टीका नक्कीच होईल पण प्रत्येक प्रेक्षकाचे समाधान नाही होऊ शकत हे ही लक्षात घ्यावे.

चित्रपटाचा नायक व नायिकेचा अभिनय ही जमेची बाजू आहेच पण केवळ देखणा नायक आणि सुंदर नायिका, काही श्रवणीय गाणी आणि चांगली लोकेशन्स म्हणजे प्रेमकथा पूर्ण झाली हा बॉलीवूडचा साचा इथे नाही. सैराट हा जातीतील विषमतेवर भाष्य करतोच पण त्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीला बॉलीवूडने कमी लेखण्याची वृत्तीही बदलायला भाग पाडतो. गेल्या काही वर्षात अनेक चांगले मराठी सिनेमे देऊन त्यात बदल होतो आहेच पण वास्तवदर्शी प्रेमकथा बॉलीवूडमध्ये ही फार कमीच पाहायला मिळतात आणि म्हणून सैराट हा हिंदीतल्या अनेक गाजलेल्या प्रेमकथांची आठवून करून देईल ही पण तो सरस ठरतो तो त्याच्या मांडणीमुळे.

नागराज मंजुळे यांनी अजय-अतुल यांच्या प्रमाणेच आपला दर्जा वाढवत नेला आहे. जातीयतेचा मुद्दा सोडला तर हाच चित्रपट श्रीमंत-गरीब भेद्भावातून साकारलेल्या प्रेमकथांच्या प्रकारात मोडला असता हे वास्तव नाकारता येत नाही पण तरीही सोनाराने कान टोचलेले बरे आणि ते मंजुळे यांनी साध्य केले आहे. सैराटच्या संगे जाळ आणि धूर तर होणारच फक्त त्यात लोकांच्या मनातील विषमतेची कीडही नष्ट व्हायला हवी.

Comments

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा