सचिन - दिग्विजयी योद्धा

वेळ-संध्याकाळी ६ ते ६.३० दरम्यानची. एव्हाना पर्यंत सचिन तेंडुलकरने तुफानी फलंदाजी करत रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. ५०व्या षटकाच्या ३र्‍या चेंडूवर सचिन स्ट्राईक वर आला तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.हृदयाचे ठोके वाढले होते, हात-पाय थरथरत होते, नखे कुरतडून संपुष्टात आली होती. भारतभर लाखो-करोडो क्रिकेटप्रेमी एकाच वेळी हात जोडुन देवास प्रार्थना करत होते. कुणी देव पाण्यात ठेवले होते, तर कुणी जागचे हलतच नव्हते. ( ही उगाच आपली अंधश्रद्धा ! जागचे हलले म्हणजे विकेट जाते म्हणे!) बस्स अजुन एक रन....! उत्कांठेपायी काय करू आणि काय नको. सर्वांच्या नजरा टी.व्ही. वर खिळलेल्या. चार्ल्स लँग्वेल्ट ने धाव घेतली. चेंडू टाकला,सचिनने हलकेच कट करत ऑफ साईडला भिरकावला आणि सार्‍या भारतभर एकच जल्लोष.....नाबाद २०० !
सचिन रमेश तेंडुलकर...भारतातील तमाम क्रिकेटप्रेमींचे दैवत. हो दैवतच...! याहून दुसरा काही योग्य शब्द नाही. तो भलेही हे देवपण नाकारत असेल. पण त्याच्या कृतीतून, देहबोलीतून तो असामान्य असल्याचे वेळोवेळी जाणवते. तो जे बोलत नाही ते त्याची बॅट बोलते आणि आजही त्याने हे सिद्ध केले की तोच सध्याच्या क्रिकेटचा बादशाह आहे. एकदिवसीय सामन्यात पहिले ( नाबाद ) द्विशतक झळकावणारा फलंदाज...अद्वितीय फलंदाज...विक्रमादित्य...विश्वविक्रमी खेळाडू...आपला सचिन...! 
आजपर्यंत अनेक विक्रमांची शिखरे पादाक्रांत करूनही तो असमाधानी आहे. तो आजही झपाटल्यासारखा अनेक नवे विक्रम प्रस्थापीत करत आहे.ते ही वयाच्या ३७व्या वर्षी. अनेकांनी त्यावर टीका केल्या...त्यास निवृत्त होण्यास सांगितले पण आज ही नाबाद २००ची मॅरेथॉन खेळी करत सर्व टीकाकारांना त्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे आणि दरवेळी तो हे करत आला आहे. वादळी खेळी...अशा काहीशा शब्दातच या खेळीचे वर्णन होईल.दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघास ही आपल्या चौफेर फटकेबाजीने सचिनने जेरीस आणले. सर्व गोलंदाजांच्या ठिकर्‍या उडवीत सचिनने त्यांना 'दे माय धरणी ठाय' करून सोडले. पूरी शिवाजीराजांबद्दल मुघल शत्रू म्हणत की त्यांना चेटूक येत असावे. तेच काहीसे सचिनच्या बाबतीत होत आहे. चेंडूवर करणी केल्याप्रमाणे चेंडू हवा त्या दिशेने सीमारेषेबाहेर जात होता. आफ्रिकेच्या संघास क्षेत्ररक्षण कुठे आणि कसे करावे हेच समजत नव्हते.वयाच्या ३७व्या वर्षी ही सचिनच्या अंगी असणारा उत्साह, जोश, जिद्द, चिकाटी हे विशितल्या तरुणांनाही लाजवतील असे. या गुणांबरोबरच त्याची क्रिकेटवरील अढळ निष्ठा,देवावरील श्रद्धा, अपार मेहनत आणि २० वर्षाच्या कारकीर्दीत संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांचा लाभलेला पाठिंबा या बळावर त्याने असा अभूतपूर्व पराक्रम करत आधीच सोनेरी असणार्‍या मुकुटात मानाचा तुरा खोवला आहे.
एरवीसुद्धा सचिनची फलंदाजी पाहणे ही त्याच्या चाहत्यासाठी पर्वणीच असते पण आज त्याने केलेली फलंदाजी ही दृष्ट लागण्या जोगी होती. अंगात वारे संचारल्याप्रमाणे तो गोलंदाजास खडे चारीत होता. पार्नेलला मिड ऑफच्या डोक्यावरून ठोकलेला कवर ड्राईव्ह, कॅलिसला लगावलेला खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह, स्टेनच्या ऑफ साईडच्या चेंडूला ही फ्लिक करत ऑन साईडला सहजपणे मारलेला चौकार सगळेच अफलातून! आणि मर्व्हच्या राऊण्ड द विकेट गोलंदाजीवर फ्रंटफुट वर येत खेचलेला षटकार तर निव्वळ लाजवाब...! तो केवळ सचिनलाच शोभणारा. शारजात शेन वॉर्नला लगावलेल्या षटकाराची आठवण करून देणारा. क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधून काढण्याचे कौशल्य तर या खेळीत विशेष दिसून आले. आणि इतक्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवून ही कुणाशी वैयक्तिक वैर नसणारा ' अजातशत्रू' सचिन शिवाय दुसरा कोण ?
महत्त्वाचे म्हणजे या खेळीत त्याला कुठेही जीवदान मिळाले नाही. अशा निष्कलंक खेळी पाहणे दुर्मिळ. मणीकांचन योग, कपिलाषष्ठी योग, दुग्धशर्करा योग सारेच योग जुळून आल्यासारखे सचिन खेळत राहिला...शेवट पर्यंत.तेव्हा ही वादळ शमले नव्हतेच. त्याला जे करायचे होते ते काम झाले होते एवढेच...! तो पॅव्हिलीयन मध्ये परतला तो दिग्विजयी होऊनच...!
सचिनने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ९० चेंडुत शतक साजरे केले पण यापुढे जे होणार होते ते कल्पनेच्या पलीकडे होते. सचिन ने कार्तिक,पठान व धोणीच्या साथीने फटकेबाजी करत धु-धु-धुलाई केली. सचिनचे दुसरे शतक निव्वळ ५७ चेंडुत पूर्ण झाले. अशी तडाखेबंद फलंदाजी करणारा सचिन हा गेल्या काही वर्षात दिसेनासा झाला होता. पण देव दिसत नाही म्हणजे तो नाही असे नसते. त्याला हवे तेव्हा तो परत येऊ शकतो. तो आज त्याचे विश्वरूप प्रकट करत ग्वालियारच्या मैदानात अवतरला. शेवटच्या काही षटकात धोणीने स्ट्राईक न दिल्याने त्याचे चौकार-षट्कार ही शिव्या-शापांचे धनी ठरले पण अखेरीस राजाने विक्रमी धाव घेतली आणि सार्‍या क्रिकेट रसिकांना जग जिंकल्याचा आनंद झाला. वयोमानाप्रमाणे या मॅरेथॉन खेळीत होणार्‍या वेदना ही तो तितक्याच ठामपणे सहन करत राहिला. सईद अन्वरने हा विक्रम करतानाही त्याला धावपटूची गरज भासली होती. पण सचिनला स्वबळावरच हा पराक्रम करायचा होता. स्वत:चीच परीक्षा घेत घेत त्याने हे एव्हरेस्ट शिखर गाठले व परमोच्च आनंदाचा क्षण पृथ्वीवर अवतरला.
४४१ वनडे सामने, १७००० हून अधिक धावा, ४५ शतके आणि २० वर्षाहून अधिक कारकीर्द इतकी प्रदीर्घ आकडेवारी सांगणार्‍या सचिनकडे या आधीच क्रिकेटचे राजेपद होते.आणि म्हणूनच त्याचा आणि या खेळाचा सन्मान वाढवण्यास हा अविश्वसनीय पराक्रम त्याच्याच नावे व्हावा अशी दैवी इच्छा असावी.खरं तर सचिन द्विशतक झळकवण्याचा विक्रम करेल ( या वयात ) ही अपेक्षाच नव्हती. पण वाघ म्हातारा झाला तरी तो वाघच असतो हे त्याने दाखवून दिले. उशीराने का होईना तो मान त्याने मिळवला व पुन्हा नव्या अपेक्षाचे ओझे स्वत:वर लादून घेतले. अगदी भारतातही वनडेत सेहवाग, युवराज, धोणी सारखे आक्रमक फलंदाज असता ही सचिनने हा विक्रम करावा याचा आनंद अवर्णनीय आहे. कारण राजाचा मुकुट हा राजालाच शोभतो आणि सचिन म्हणजे तर राजांचा राजा...! कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य करणार्‍या डॉन ब्रॅडमनला ही सचिनच्या खेळात स्वत:चे प्रतिबिंब दिसले ही त्याच्या योग्यतेची पावती. आकडेवारी बहुतेकदा सत्य सांगत नाही. सचिनची आकडे वारे जे सांगते त्याहून ही तो कैक पटींनी श्रेष्ठ आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर वनडेत १७५ हून अधिक धावा ३ वेळा करणारा तो एकमेव फलंदाज. चार महिन्यानपूर्वी ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध हैद्राबाद मध्ये एकाकी झंझावाती खेळी करत १७५ धावा केल्या तेव्हा द्विशतकाची संधीही हुकली व सामनाही गमावला. पण पुन्हा जिद्दीने त्याने स्वत:ची चुक सुधारत नवा विक्रम निर्माण केला.( खरं तर या दोन्ही वेळी सचिनच्या खेळी 'याची देही याची डोळा' पाहण्याचे भाग्य नशीबी नव्हते याचे दु:ख असले तरी ते सचिनच्या यशापुढे कवडीमोल आहे )वनडेतील टॉप टेन खेळींचा आढावा घातला तरी सचिनची खेळी स्ट्राईक रेटच्या दृष्टीने ही अव्वल होती. त्यात त्याने सर्वाधिक २५ चौकार लगावले. विक्रम करावेत ते फक्त सचिननेच आणि आपण केवळ त्याचा आनंद लुटावा.
आज त्याचे सार्‍या जगभर कौतुक होत आहे. क्रिकेट विश्वातील व इतर क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्याची तोंड भरून स्तुती केली आहे. सचिन मात्र आजही तितकाच नम्र व शांत आहे. द्विशतक पूर्ण झाल्यावरही नेहमी प्रमाणे हेल्मेट व बॅट उंचावत देवाचे आभार मानले तेव्हा त्याचे पाय जमिनीवरच होते. सचिनच्या विक्रमाचा आनंद व कौतुक त्याच्या चाहत्यांनाच अधिक. तो तितक्याच सहजपणे प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारतो आणि पुन्हा नवे विक्रम करण्यास सज्ज होतो. खेळाडू म्हणून प्रचंड यशस्वी होण्यात कुठे तरी त्यातील सच्चेपणा, मेहनती वृत्ती व माणुसकी त्यास पाठबळ देत राहते. देवाने दिलेल्या अलौकिक प्रतिभेस जपताना सचिनच्या मनाचा मोठेपणा व शुद्ध चारित्र्य त्यास अधिकच मोठे करून जातात. म्हणूनच आपण त्यास दैवी अवतार असल्याचेच मानतो. प्रत्यक्षात तो जरी हाडा-मासाचा माणूस असला तरी माणसाला त्याच्या कर्मानेच देवपण प्राप्त होऊ शकते हेच तो वारंवार त्याच्या नकळत सिद्ध करत आला आहे.
सचिनबद्दल अनेकानी प्रचंड लिहून, बोलून आपली मते व्यक्त केली आहेत. मी स्वत: १ वर्षाचा होतो तेव्हापासून सचिन खेळतो आहे. त्याच्या बरोबर खेळणारे आले अन् गेले ही ! तो अजुनही खेळतो आहे. त्याचे क्रिकेटविषयीचे प्रेम अन् धावांची भूक तसुभर ही कमी झाली नाही. कौतुक-कौतुक तरी किती करावे? पण सचिन या सार्‍याच्या पलीकडचा आहे. अनेकांनी त्याच्या विषयी पुस्तकेही लिहिली पण सचिन दिवसागणिक नवनवे विक्रम करत असता त्याची पुनरावृत्ती तरी किती वेळा करावी ? अजुन तरी निवृत्त होण्याचा विचार सचिनच्या मनात नाही. अजुन शतकांचे शतक त्याला साजरे करायचे आजे. शिवाय भारताने विश्वचषक जिंकावा ही त्याची महत्वाकांक्षा अजुन पूर्ण व्हावयाची आहे. ती पुढील वर्षी पूर्ण होवो. त्याला पाहताना मला महाभारतातील भीष्म पितामहांची आठवण होते. स्वत: कर्णधारपद न स्वीकारता ही भारताचे खंबीरपणे नेतृत्व करणारा. फक्त देशासाठीच खेळायचे अशी प्रतिज्ञा करून मैदानात उतरलेला शूर योद्धा...आणि खर्‍या अर्थाने त्याला ही इच्छामरणा प्रमाणेच वर लाभला असावा म्हणून जो पर्यंत तो स्वत:हून माघार घेत नाही तो पर्यंत त्याचे संघातील स्थान अढळ आहे. तो खेळला तो केवळ देशासाठी, लोकांना आनंद देण्यासाठी. आज ही सचिनचे द्विशतक साजरे होताना सार्‍या देशभर आनंदाची लाट पसरली आहे. ही किमया केवळ सचिनच करू शकतो. इतर क्षेत्रातील दिग्गज कलाकार, अभिनेते, गायक, नेते कुणी ही इतक्या समर्पक पणे हे करू शकत नाही. सर्व भारतीयांना क्षणभर आपल्या चिंता, दु:खे विसारावयास लावून आनंद देणारा ' आनंदयात्री' सचिन एकमेवाद्वितीय आहे. तो केवळ लोकांस आनंद देत राहतो, हातचे काही न राखता. या पुढेही त्याच्या विक्रमांच्या रथाची घोडदौड अशीच चालू राहो आणि त्याच्या यशाच्या सागरी अधिकाधिक भर पडत रहो. आपण फक्त या राजास मुजरा करीत राहावे. बाकी सचिनविषयी बोलताना शब्द अपुरे पडतात तेव्हा शेवटी दोन ओळीत सांगतो...
'झाले बहू होतील बहू...
पण या सम हाच...!'


प्रतिक्रिया-
शंतनू देव said...
Tuzi hi post wachtanna dole bharun aale. faar sundar lihilis re.
Bhism pitamaha - sachin .. Kharach ajod tulana aahe.
Keep writing
-Shantanu
http://maplechipaane.blogspot.com

Sagar said...
धन्यवाद शंतनू....
आपण सचिन विषयी जितके बोलू तितके कमीच आहे...
तो अतुलनीय आहे

Comments

  1. नमस्कार.. मराठीत क्रिकेटवर लिखाण असलेले ब्लॉग्स शोधत असतानाच आपला ब्लॉग दिसला.. आपण क्रिकेटवर वरचेवर लिहिता का? हे विचारायचे कारण म्हणजे लवकरच झी नेटवर्कतर्फे भारतातील पहिलीवहिली क्रिकेटला वाहिलेली संपूर्णपणे मराठीतील वेबसाइट लॉन्च होणार आहे. त्यात आम्ही द्वारकानाथ संझगिरी, चंन्द्रशेखर संत यांसारख्या तज्ज्ञांनबरोबरच मराठी ब्लॉगर्सचेही लेख प्रसिद्ध करणार आहोत. तर आपणास या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल का ? सध्या तुम्ही काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेली आमची cricketcountry.com ही इंग्रजीतील साइट पाहू शकता. याच धर्तीवर आपली मराठीतील साइट येत आहे. तरी याबद्दल आपला प्रतिसाद कळवावा.. धन्यवाद..

    अमेय गिरोल्ला
    ९८७००९४६२२
    sanmitra4@gmail.com

    ReplyDelete
  2. धन्यवाद अमेय,
    क्रिकेटवर नियमितपणे लिहीत नसलो तरी लिहायला नक्की आवडेल.
    सध्या फक्त छंद म्हणून ब्लॉग लिहीत आहे. तू सांगितल्या प्रमाणे एखादा उपक्रम तुम्ही करत असाल तर त्यात सहभागी व्हायला निश्चितच आवडेल.

    ReplyDelete
  3. स्टेनच्या ऑफ साईडच्या चेंडूला ही फ्लिक करत ऑन साईडला सहजपणे मारलेला चौकार >>>> आजही तो शॉट विसरू शकत नाहीये. मनगटात अतुलनीय ताकद आणि प्लेसमेंटची अचूक जाण याशिवाय हा शॉट निव्वळ अशक्य आहे .
    सचिनला देव मानणाऱ्या लोकांपैकी मी देखील एक आहे. काय वाट्टेल ते झाले तरी मी त्याला कधीही नावे ठेऊ शकत नाही.
    पण सचिन इतकेच मला गांगुली-द्रविड सुद्धा आवडतात. हे तिघे ब्रह्मा-विष्णू-महेश वाटतात मला !!
    त्यांच्याबद्दल आणि एकूणच २००० - २०१० या दशकातल्या भारतीय क्रिकेट बद्दल मी देखील एक लेख लिहिलाय
    http://prasadgates.blogspot.in/2013_06_01_archive.html
    नक्की वाच

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा