झोप गेली उडून...

सुखाची झोप काही आमच्या नशीबी नाही...! लहानपणापासूनच माझे आणि झोपेचे संबंध अनिश्चिततेच्या झुल्याने बांधले गेले आहेत. मी जेव्हा जेव्हा प्रयत्नपूर्वक झोपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दर वेळीस डोळे 'आ' वासून झोपेला दूर दूर जाताना पाहिल्याचे मला आठवते. झोप ही अशी हळूवार क्रिया असल्याने मी डोळे घट्ट मिटून झोपण्याचा प्रयत्न करता न येणारी झोप अधिकच बेचैन करत राहते. मग शेवटी सुरू राहते ते केवळ विचारांचे चक्र आणि ते चालूच राहते...

कधी कधी मला वाटते की माणूस विचार करत नसता तर कसे झाले असते? म्हणजे रात्रभर जागून ही जर डोक्यात काहीच विचार आले नसते तर मी नक्कीच एखादा साधू अथवा ऋषिमुनी झालो असतो. पण इथेच तर खरी गंमत आहे. माझ्या विचारांचे घड्याळ असे अविरत चालू राहिल्याने माझ्या कित्येक थोर विचारांचे श्रेय या न येणार्‍या झोपेलाच आहे. बर्‍याच कविता ही मी रात्री न येणार्‍या झोपेच्या भरातच केल्या आहेत. मग आई-बाबांना जाग येऊ नये म्हणून अंधारात चाचपडत एखाद्या कोर्‍या कागदावर खरडल्याही आहेत. ( काय लिहितोय हे दिसत नसताना ही !) हल्ली हल्ली मोबाईल आल्याने आता मोबाईल वरच कविता लिहीणे होते आणि शिवाय कित्येक लिखाणांचे विषय ही अशा वेळी सुचल्याचे मला सकाळी उठल्यावर आठवते. त्यातील बरेचसे मी लिहायचा कंटाळा करतो.' रात गई बात गई' असे काहीसे होते आणि रात्री जे डोळ्यापुढे अंधारात ही स्पष्ट दिसत असते ते सकाळी सारे धूसर आणि अस्पष्ट दिसू लागते. ते काही का असो, पण विचार करण्यासाठी मला रात्रीची वेळ जेवढी शुभ वाटते ती दिवसाचे अनेक मुहूर्त शोधून ही सापडायची नाही!

रात्रीचे जागणे हे प्रत्येक वेळी झोप न आल्याने होते असे काही नाही. बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करताना ही रात्रभर जागणे होई पण त्यात काही मजा नव्हती. परीक्षेच्या टेन्शनमुळे अभ्यास करताना रात्रीचा आनंद फारसा लुटता येत नाही. तेव्हाची रात्र फारच फिकी-फिकी वाटे. नंतर कॉलेजला असताना ही 'अभ्यासा'साठी जागरण झाली तेव्हा ती अभ्यासू न होता थोडी खट्याळ झाली. रात्री घरातले सगळे झोपल्यावर मोबाईल वर मित्र-मैत्रिणींशी चालणार्‍या गप्पा आणि Late Night SmS यांची मजा ही आता कॉलेज संपल्यावर मनापासून मिस करतोय. कधीतरी मित्रांच्या घरी रात्रभर अभ्यासाच्या नावाखाली घातलेला धिंगाणा, मग गुपचुप रात्री घराबाहेर पडून मारलेला फेरफटका, एखाद्या टपरीवर थंडीच्या दिवसात घेतलेला चहा, कुत्री भूंकत असताना ही रस्त्याने मोठ्याने गाणी गात, आरडा ओरडा करत जाणे ही तर रात्र जागवण्याची खरी मजा आहे. सध्या अविवाहित असल्याने हे ठीक आहे, नंतर मात्र ही जागरण नेहमीच चालू राहतील!

घरी असताना रात्री जागताना हतबलपणा असेल ही, पण घराबाहेर असताना जागण्यात वेगळेच 'थ्रील' आहे. पिकनिकसाठी गेलो असता रात्रभर 'कॅंप फायर' अर्थात शेकोटी पेटवून मित्रांसोबत गाणी गात धमाल करणे किंवा समुद्रकिनारी चांदण्यात बसून लाटांचा आवाज ऐकत बसणे म्हणजे रात्र सार्थकी लागल्याचे वाटते. त्याच रात्री मग रूमवर जाऊन एखादा हॉरर मूव्ही पाहायला बसणे आणि रात्री झोपताना अंधारात चित्र-विचित्र आवाज करणे हे प्रकार न केले तर रात्र रंगणार कशी? अनवानी पायांनी रात्री मित्रांसोबत सिद्धीविनायकला चालत जाणे किंवा थर्टी फर्स्ट च्या पार्टीला बाइकवरुन शहरभर 'हॅपी न्यू इयर' ओरडत फिरणे, सगळेच थ्रीलिंग. पूर्वी नवरात्रीत ही रात्र गरबा दांडियात रंगात असे, पण आता मात्र यात पूर्वी इतकी मजा नाही राहिली.

लहानपणी भुता-खेतांच्या गोष्टी ऐकून फार भीती वाटे. पण जस-जसे मोठे होत गेलो तशी भीती जाऊन कुतुहलच वाटायला लागले. मग उलट जाणून-बुजून रात्री हॉरर मूव्ही पाहू लागलो. मतकरींच्या गूढ कथा व शेरलॉक होम्सच्या रहस्य कथात रमू लागलो. ही भूत, आत्मे रात्रभर झोपत नसावीत किंवा दिवसा तरी झोपत असावीत. मला एकदा त्यांना भेटण्याची फार इच्छा आहे ( भीती वाटत असली तरी !) माझी देवावर श्रद्धा असल्याने आणि गळ्यात आणि हातात बरेच धागे-दोरे असल्याने मी फार काही घाबरत नाही. कोकणात बरीच भुतावळ असल्याने कधी तरी कोकणभेटीचा योग यावा. इच्छुक भूतांनी संपर्क साधावा!!!

मला रात्री झोप न येण्याचे प्रमुख कारण म्हणजे शारीरीक श्रमांचा अभाव. आमची सर्व कामे ही मेंदूच्या आणि डोकॅलिटीच्या बळावर चालत असल्याने शरीर थकावे असे काही आमच्या हातून घडत नाही. आम्हा बुद्धिजीवी लोकांच्या डोक्यालाच ताप अधिक. थकून भागून बेडवर पडताच झोप लागावी असे क्षण दुर्मिळच. त्यामुळे 'रात्रंदिन आम्हा जागण्याचा प्रसंग'. काही वर्षांपूर्वी शिर्डी पदयात्रेला गेलो होतो तेव्हा त्या दिवसात रात्री ज्या झोपा लागल्या त्या पुन्हा काही लागल्या नाहीत.
काही महिन्यांपूर्वी कुठून जाणे कसा पण एक कीटक प्राणी घरात शिरला तो म्हणजे ढेकूण आणि या किड्याने जो काही उच्छाद मांडला की बेडवर झोपायची सोय नाही. लाईट बंद करायचा अवकाश की यांचे आक्रमण सुरू, बरीच औषध फवारणी झाली, लक्ष्मण रेखा आखल्या पण ढेकून रक्त पिऊन माजले होते की कशाला भीक घालत नव्हते. कधी नाही ती येणारे झोप अधेमधे उठून त्यांना मारण्यात जाऊ लागली. शेवटी कंटाळून नवीन बेड आणला तेव्हा कुठे झोप लागली.

मध्यंतरी पुन्हा माझी झोप उडवणारे विचित्र प्रकार घडू लागले. ते म्हणजे रोज रात्री मला बरोबर 3 वाजता जाग येई. पहाटे लवकर उठून पूजा अर्चा करणार्‍यातला मी नाही तरीही अलार्म लावल्याप्रमाणे जाग यायची. अचानक डोळे उघडावे आणि घड्यालात पाहावे तर 3 वाजलेले. हा असा चमत्करीक प्रकार बरेच दिवस चालू राहिला.नंतर आपोआपच बंद झाला. 3 अंक माझा आवडता असल्याने असेल कदाचित!

लहान असतानाही मी कधी चांदोबा गीते किंवा गोष्टी ऐकून पेंगत नसे. ते ऐकताना झोप उडवणारे प्रश्न अधिक पडत. आमचा चंद्र निंबोणीच्या झाडामागे कधी लपला नाही व आईने ही कधी अंगाई गीत गाऊन मला झोपवल्याचे मला आठवत नाही. मी झोपलो नाही हे पाहताना झोपेत ही तिचा 'दटावणी' चा सूर असे. मग बर्‍याचदा झोपेचे सोंग घ्यावे लागे. पण झोपेचे सोंग घेतलेल्यास जागे करणे जसे कठीण तसे त्याला झोप येणे ही कठीण असते आणि मग ती रात्र अधिकाधिक प्रसन्न वाटू लागते. त्या उत्साहात मी कित्येक संकल्प करून मोकळा होतो जे नव्या सकाळी विसरून ही जातो.

रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नाव घ्यावे असे लहानपणी शिकवले होते त्यामुळे 33 कोटी देवांमध्ये एखादी निद्रादेवी असण्याची शक्यता आहे. पण ती अंधारात असल्याने तिचा कुठे उल्लेख होत नसावा. बाकी तिचे स्वभाव गुण मला लक्ष्मीसारखेच भासतात. आपण जितके तिच्या मागे धावतो तितकी ती दूर जाते. रविवारच्या एखाद्या दुपारी भरपेट जेवणानंतर मस्त पावसाळी हवेत रेडिओ वर छान मराठी गाणी ऐकता बेडवर जी छान तन्द्री लागते, ती काय रोज रोज मिळते ? मग अशा वेळी अभ्यासाची सुट्टी आणि झोपेशी गट्टी जमते. अगदी घरीच असे काही नाही ऑफीसमध्येही दुपारी बॉस नसताना ए.सी. ऑन झाल्यावर लॅपटॉप समोर बसावे तर डोळ्यांपुढे अंधारी येते. मग चहावाला येई पर्यंत डुलकतच कामे होत राहतात.

रात्री बेडवर पडून झोप येत नाही आणि पुढचे काही तास तरी ती येणार नाही याची खात्री पटली की मी मोबाईलवर खुशाल गाणी ऐकत बसतो. मग हिंदीतल्या ' मुझे नींद ना आए' पासून ' रैना बीती जाए... निंदीया ना आए' पर्यंत आणि मराठीत ' रात्रीस खेळ चाले' पासून 'नीज माझ्या नंदलाला' पर्यंत सर्व गाणी इथे हजेरी लावतात. बेडरूमच्या खिडकीत मंद वार्‍याचा आनंद लुटत गाणी ऐकताना जो निवांतपणा जाणवतो तो दिवसभराच्या धकाधकीत फारच विरळ. हे असे रात्री जागणे मला फार आवडते. आजारपणात कधी हॉस्पीटल मध्ये असताना ही बेडवर गाणी ऐकत पडून राहायचो मी. पंचांगात भले ही दिवसभराचे शुभ-अशुभ काळ असतील पण मनाचा आनंद जेव्हा लाभतो तो खरा शुभ काळ नाही का?

वैद्यकीय दृष्ट्या भलेही जागरण चांगली नाहीत पण आमच्या मात्र पाचवीला पूजल्या सारखी ती मानगुटीवर बसली आहेत. श्रीमंत वर्गातील तरुणाई आजकाल रात्रभर डिस्को आणि पार्टीस मध्ये रमत असते. रात्रभर नाचून थकल्याशिवाय आणि नशेत बुडल्या शिवाय त्यांना झोप येत नाही. आपण मध्यम वर्गीय त्या मानाने बरेच सुखी आहोत. झोप येण्यास आपल्याला अशा व्यसनांचा आधार तरी लागत नाही.

माझ्या बाबतीत झोपेचे धोरण हे नेहमीच डळमळीत राहीले आहे. ती कधी येते, तर कधी येत नाही. पण आपण मात्र नेहमी लक्षात ठेवावे की,'लवकर निजे लवकर उठे, तया आरोग्य भेटे'.....बाकी आमची सकाळ थोडी उशीरा होते हे खरे. पण माणूस जिथून उठतो तिथे त्याची सकाळ होते. आणि महत्वाचे म्हणजे शरीर झोपले तरी मन कुठे झोपते. त्याला सकाळ काय आणि रात्र काय. म्हणून झोपेतून कितीही वाजता उठलो तरी घड्याळाकडे पाहण्याआधीच मी म्हणतो....गुड मॉर्निंग...!

प्रतिक्रिया-
Ashish Deshpande said...
nidranashakade durlaksh naka karu..pahilyanda dakhavun ghya ekhadya changlya doctorana...baaki post atishay uttam zaliye tumachi

हेरंब said...
मस्त जमलंय (अ)निद्रादेवीचं पुराण !!!

Sagar said...
धन्यवाद मित्रांनो...
बर्‍याच वर्षांनी लिहायला सुरूवात केली...अजुन बरेच लिहायचे आहे...
प्रतिसादा बद्दल आभारी आहे...

Comments

Popular posts from this blog

पाऊसगाणी

निषेध!निषेध!!

बालपणीचा खेळ सुखाचा