सैनिकहो तुमच्यासाठी...

भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी
सैनिकहो तुमच्यासाठी...सैनिकहो तुमच्यासाठी...

गाणे तर ऐकले असेलच ना तुम्ही? गदिमांनी लिहिलेल्या या गाण्यात त्यांच्या मनातील देशाविषयी, सैनिकांविषयीची कृतज्ञता सहजपणे उतरली आहे. आज इतकी वर्षे होऊनही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी न चुकता कुठे न कुठे गाणे ऐकू येते आणि या दोन दिवशीच ऐकू येते. एरवी आपण ऐकतो का हे गाणे? ह्याच गाण्यातील काही ओळी अशा...

परि आठव येता तुमचा...
आतडे तुटतसे पोटी...
खरंच तुटते का?
आशा भोसले यांनी हे गाणे स्वरबद्ध करताना हे शब्द इतक्या भावपूर्ण रीतीने गायले आहेत पण आपली हृदये इतकी कठोर झाली आहेत की हे शब्द खोटेच वाटतात काही वेळा.कारण सामान्य नागरिकांना काहीच वाटत नसते. अनोळखी माणसांना श्रद्धांजली वाहून पुन्हा कामाला लागावे तसे आपली विचारसरणी झाली आहे. केवळ २ मिनिटे मौन पळावे तेवढीच आपली त्यांच्याप्रतीची निष्ठा. आपल्याला त्यांची आठवण ही होत नाही आणि आपण त्यांचा विचारही करत नाही. ते लढत राहतात, असीम पराक्रम गाजवून शौर्य पदके मिळवतात, प्रसंगी अमर ही होतात, आपल्याला काही फरक पडत नाही.
माफ करा आम्हाला,
कारण स्वातंत्र्यदिन साजरा करावा असे काहीच कृत्य आमच्या हातून घडले नाही. त्याचे श्रेय देशासाठी लढलेल्या असंख्य देशभक्तांचे आहे, त्याचा हक्क आजही सीमेवर लढणार्‍या सैनिकांचा आहे. आपण कोण? केवळ एक दिवस झेंडावंदन करणार ( कित्येकजण तेही करत नाहीत), देशभक्तिपर गीते गाणार आणि नंतर विसरून जाणार. फारफार तर सकाळी एखादी रॅली काढणार, भाषणे देणार, ते ही नाहीच तर मित्रांना 'स्वातंत्र्य दिनाचे' एसएमएस पाठवणार, बास!  नंतर सुट्टीच आहे तर संध्याकाळी पार्टीही करणार. म्हणूनच माफ करा. आमची लायकी नाही देशप्रेम व्यक्त करण्याची.
स्वातंत्र्य मिळवणे इतके सोपे होते का? या अग्निकुंडात कित्येकांनी उड्या घेतल्या, कैक पिढ्या खर्ची पडल्या तो हा सोनियचा स्वतंत्र भारत जन्मास आला. हसतमुखाने 'देशासाठी' प्राण अर्पण केलेल्यांनी स्वत:च्या घरादाराचा कधी विचार केला? त्यांनी विचार केला फक्त देशाचा, या भारतभूमीचा, या मातीचा, तिच्या रक्षणाचा आणि त्याप्रमाणे सर्वस्व वाहिलेदेखील. आपल्याला तर विचारही करवत नाही. आणि हेच तर दुर्दैव आहे. सगळेजण स्वत:चा विचार करत आहेत फक्त. मी, माझे घर, माझे करियर, माझा पैसा, माझे आयुष्य इ...-देशासाठी काही विचार केला का?
'स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !'

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पाऊसगाणी

सैराट झालं जी...

निषेध!निषेध!!