सिरीयल कीलिंग

आज मी एका गंभीर विषयावर लिहायचे ठरवले आहे. पोस्टच्या शीर्षकावरून तुम्हाला जर असे वाटले असेल की हे कुठल्या तरी सिरीयल किलर विषयी लिहित आहे तर तसे बिलकुल नाहीये. हा मुद्दा समस्त पुरुष वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मांडणे जरुरीचेच होते! तशाही स्त्रिया नेहमीच नवरोबांचे डोके खातात पण गेल्या काही वर्षात त्यांच्या डोक्यावर हे सिरीयलचे भूत बसले आहे तेव्हापासून पुरुषांना टी.व्ही. ही पाहायला मिळू नये हे अतीच होत आहे. या संदर्भात कोणी काही मोर्चे वगैरे पण काढत नाहीत.

मला गेल्या कित्येक वर्षात मी असा निवांतपणे टी. व्ही. पाहत बसलोय असे आठवतच नाही. दुपारी सगळे झोपलेत आणि मी पिच्चर पाहतोय किंवा सगळेजण आपापल्या कामात आहेत आणि मी तासभर नुसतीच चॅनेलसर्फिंग करतोय हे फार मिस होतंय...पण हे सगळे सुखाचे क्षण आता पुन्हा मिळतील असे वाटत नाही. टी.व्ही.फेकून नाही दिलाय आमचा,पण बिघडलाय जरूर! गेली दहा वर्षे समस्त टी.व्ही.ना ही सिरीयल नामक कीड लागलीय पण 'जिच्या हाती रिमोट कंट्रोल, तीच करील पेस्ट कंट्रोल' असेच म्हणायची वेळ आली आहे. मी टी.व्ही.पाहायचो असे मी हल्ली बोलतो. नाहीतरी लॅपटॉप आहेच त्यामुळे टी.व्ही.काही खास निमित्त असेल तरच म्हणजे क्रिकेट,बातम्या वगैरे तरच पाहिले जाते.

आता मुद्द्याचे बोलू-तर गोष्ट अशी असते कि एक नायिका असते. गोड चेहऱ्याची, सुसंस्कृत, सगळ्यांशी प्रेमाने वागणारी, मोठ्यांचा आदर करणारी. लग्नानंतर जी आदर्श सून-पत्नी-आई आणि सर्व काही असते. नायिका बनायचे तर एवढे आणि अजून बरेच गुण असायलाच हवे तिच्यात. ती पतिव्रता असते शिवाय बरीच सोशिकही असते. ती कधीच संकटात हार मानत नाही( संकटे पण नेमकी तिच्याच वाटेला येतात), सत्याची साथ सोडत नाही. आणि तिच्याच घरात कोणी-ना-कोणी तिच्या वाईटावर टपलेले असते. खलनायिकेच्या भूमिकेत तिची सासू,जाऊबाई,वहिनी,बहिण यापैकी कोणीही असू शकते. हे कमी म्हणून मग तिची एक लाडकी सवत वगैरे पण असते. म्हणजे नायकसुद्धा तसा पत्नीव्रताच असतो पण तरी त्याचे कुठेतरी अनैतिक संबंध असतात किंवा नसले तरी ते या ना त्या कारणाने जोडले जातात. घरातील लोकांना बाहेरच्या लोकांबद्दल काहीच माहित नसते. बऱ्याच वर्षांनी त्यांना त्याचा साक्षात्कार होतो तेव्हा ती अनैतिक मुले मोठी झालेली असतात. ती बदला वगैरे घ्यायला येतात पण आपली नायिका सुरुवातीला प्रचंड अश्रू ढाळते, आकांड-तांडव करते (बॅकग्राउंड मध्ये जे मंत्र वगैरे लावतात ते तर त्यांना मुळीच शोभत नाही) आणि तरीही शेवटी त्यांचा स्वीकार करते. हे असे तर फक्त सीरियल मधेच होऊ शकते.

सिरीयल मधल्या पात्रांचे मृत्यू आणि त्यांचे होणारे कमबॅक हा तर संशोधनाचा विषय आहे. आणि त्यासाठी नायिका जितक्या हुशारीने शोध लावते तितकेच हुशार लोक नेमले पाहिजेत. बरे नायिका सगळे शोध लावण्यातही पटाईत असते. एसीपी(प्रद्युम्न)ची मुलगी असल्याप्रमाणे खलनायिकेचा पाठलाग वगैरे करून तिचे डाव उधळून लावते. सिरीयल जर 'सोनी'वर नसेल तर एसीपी(प्रद्युम्न)ला गेस्ट अपिअरन्स करायला ही संधी नाही. म्हणजे इथेही हीच भाव खाणार. एकवेळ रियलिटी शो मध्ये कॉलबॅक होणार नाही. पण सिरीयल मध्ये कुणी मेलेले दाखवले तर ते पात्र काही एपिसोड नंतर पुन्हा दिसणार नाही याची काही खात्री नाही. नायक किंवा नायिका मेली तर मग कुठेतरी भलत्याच शहरात ती सापडते आणि बहुधा तिची स्मृती गेलेली असते. इकडे घरात एकदम सुतक पडते. काही एपिसोड नंतर नायक किंवा नायिकेचे दुसरे लग्न वगैरे करायचे ठरते तेव्हा अचानक त्याच वेळेला त्याची/तिची एन्ट्री होते. लेखकाकडे अजून बरेच पर्याय असतात- जसे तिची प्लास्टिक सर्जरी करणे, त्यांचा पुनर्जन्म करणे. बरे तिच्यासारखी दिसणारी नायिकाही ती मेल्यावरच नायकाला भेटते तोपर्यंत ती कुठेच नसते. कारण लेखकानेच तिला उशीराने जन्माला घातलेले असते.

काही कार्यक्रमात 'बीस साल बाद'चे लीप घेतले जातात त्यात फक्त केसाची एक बट पांढरी होते. आणि भावाच्या वयाचे कलाकार मुले बनून परिवारात सामील होतात. आजीबाई तर मालिकेची प्रमुख नायिका असते. तिला अमरत्व मिळाले असते किंवा ती लेडी अश्वथामा तरी असते आणि एवढे करून ते थांबत नाहीत तर अजुन एखादा 'बीस साल बाद' चा लीप यायचा असतो.एपिसोड लिहीणे म्हणजे वर्तमानपत्रातले राशिभविष्यच झाले आहे.

या मालिकांत केले जाणारे एवढे भडक मेकअप हा देखील एक चेष्टेचा विषय आहे. जणू काय सगळीकडे कृष्ण-धवल चित्र दिसणार आहे अशा रीतीने इतके गडद मेकअप केले जातात. बरं घरी काही कार्यक्रम असेल तर ठीक आहे पण रात्री झोपतानाही आणि सकाळी उठल्यावरही तितकाच मेकअप असतो म्हणजे जन्मजात कुंडलाप्रमाणे मेकअप ही जन्मजात असावा त्यांचा.

हे आणि असे अनेक प्रश्न आपल्यासारखे त्या सिरीयल पाहणाऱ्या स्त्रियांनाही पडतात पण हे नाही बघायचे तर काय बघायचे असा उलट प्रश्नही असतो. सिरीयल पाहण्यापेक्षा बातम्या पहा, सिनेमे पहा, रियलिटी शो पाहा, खाद्य संस्कृती दाखवणारे सगळे कार्यक्रम पहा ( हे महत्वाचे !) पण त्यांना तेच पाहायचे असते. काही वर्षांपूर्वी यांना टी.व्ही. पाहायला वेळ मिळत नसायचा पण हल्ली सगळी कामे चालू असली तरी टी.व्ही. पाहिजेच. टी.व्ही. पाहायला आक्षेप नाही पण चांगल्या सिरीयल पहा ना...( शोधून दाखवा बरे !). आजकाल सगळ्याच चॅनेलवर डेली सोप्सचे जाळे पसरले आहे. आणि त्याच चालतात हे माहित असल्याने चॅनेलही वेगळे काही देण्याचा प्रयत्नच करत नाही. विनोदी मालिका पाहायला माझी काहीच हरकत नसते पण डेली सोप्सने विनोदाची परिसीमा गाठली आहे.

हिंदीमध्ये एकता कपूरने निर्विवादपणे मालिका विश्वात वर्चस्व राखले आहे (जी हल्ली मराठीतही आली आहे). कैच्याकै कथानक, सॉलिड ड्रामाबाजी, मोठमोठाले सेट्स ह्यांची सुरुवात हिने केली आणि लोकांना सवयच लागली मग. हिंदीतल्या काही गाजलेय 'क' कारांत मालिका म्हणजे -क्योंकी सास भी कभी बहु थी, कहाणी घर घर की, कसौटी जिंदगी की, कही तो होगा, कही किसी रोज,कसम से, केसर, काव्यांजली आणि अजूनही बऱ्याच काही होत्या (कसल्या पकाऊ होत्या ना सगळ्या !). मला ही नावे ठाउक आहेत कारण आमच्या घरी कायम या मालिका लागलेल्या असायच्या. त्या चालू झाल्या की डोके दुखायचे. विशेष म्हणजे यातलेच काही कलाकार नंतर काही कॉमेडी कार्यक्रमातून त्या डेली सोप्स्ची खिल्ली उडवू लागले. हल्ली एकतासुद्धा एका विनोदी कार्यक्रमात जज आहे आणि तिच्या समोरच सगळे तिच्या डेली सोपसची,आपल्याच कामाची चेष्टा करतात. लाज विकलीय सगळ्यांनी.

स्टार परिवार हा एक असाच मूर्खांचा बाजार आहे. नात्यांचे कसले अवॉर्ड देतायत? काय तर म्हणजे फेवरेट बहू, फेवरेट सौतन, फेवरेट मजेदार सदस्य(?)...च्यायला...! आणि आव तर सगळ्यांचा असा असतो की फिल्मफेअर जिंकल्याचा ! बिनडोक लोकांचे कार्यक्रम बिनडोक लोक बघतात!

हल्ली हिंदी मालिका आमच्या घरी कमी झाल्या असून त्याची जागा मराठीने घेतली आहे पण ही काही एक अभिमानाची गोष्ट नाहीये त्यामुळे मराठी पाऊल पुढे जाण्यापेक्षा तिथल्या तिथेच अडकून पडले आहे. आमच्याकडे हल्ली संध्याकाळी झी मराठी आणि सकाळी रिपीट टेलीकास्ट मध्ये स्टार प्रवाह असे वेळापत्रक झाले आहे.(ई टी व्ही पासून सूटका झाली एकदाची!) शिवाय मधल्या ब्रेकमध्येही इकडून तिकडे उड्या चालूच असतात. त्यामुळे कुठलीच मालिका पाहायची चुकत नाही. एक दिवस मालिका चुकली की हळहळ होते. ज्या दिवशी केबल जाते तेव्हा मला फार आनंद होतो.

सुरुवातीला ठरवले की याच लेखाचा दुसरा पार्ट म्हणून 'मराठी सिरीयल किलिंग टू' असे लिहूया पण म्हटले जे आजकाल हिंदीत दाखवतात तेच मराठीत चालते मग वेगळे लिहायचे काय ? म्हणून मग एकाच भागात डबल धमाका !

मला पहिले वाटायचे की सिरीयल फक्त घरातल्या गृहिणी पाहत असतील. पण एकदा कॉलेजला जाताना बसमध्ये काही 'सो कॉल्ड फॅशनेबल' मुलींना सिरीयलच्या गप्पा मारताना ऐकले आणि हसूच फुटले. घरोघरी सीरीयल पाहणार्‍या मुली याची मला तेव्हाच खात्री पटली. पण ऑफिसमध्येही जे मित्र मुलींशी सिरीयल विषयी गप्पा मारतात ते त्यांच्या बायकोच्या धाकात आहेत असे समजावे.

दहा-बारा वर्षांपूर्वी ज्या चांगल्या सिरीयल पहिल्या त्या नंतर पाहायलाच नाही मिळाल्या. त्यांचे रिपीट टेलीकास्ट लागले तरी मी पाहेन. मराठीतल्या काही चांगल्या सिरीयल म्हणजे नायक, प्रपंच, श्रीयुत गंगाधर टिपरे, श्रावणसरी, ४०५ आनंदवन,हसा चकटफू, पिंपळपान, साईबाबा, व्यक्ती आणि वल्ली, कथाकथी आणि अजून ही काही चांगल्या मालिका होत्या. विशेष म्हणजे आठवड्यातून एकदाच लागायच्या त्यामुळे खास आठवणीने पाहिल्या जायच्या.

झी मराठीवर तर एका दिग्दर्शकाने कहरच केलाय...त्याच्या सगळ्या मालिकांमध्ये(वहिनीसाहेब, सावित्री, भाग्यलक्ष्मी) नायिकेचे अतोनात हाल होतात. तिच्यावर देवी प्रसन्न असते तरीही सगळी संकटे तिच्याच वाटेला. इतक्या फालतू सीरियल बायका का पाहतात ? त्या पाहतात म्हणून यांचे फावते. म्हणून सारख्या एकसारख्याच सीरियल बनवल्या जात आहेत. कुठे अक्कल गहाण ठेवलीस बा प्रेक्षका!

हल्ली मराठी मालिकांची शीर्षक तर उगाच काहीपण ठेवली जातात. जसे माझिया प्रियाला प्रीत कळेना, स्वप्नांच्या पलिकडले, तुजविण सख्या रे, मन उधाण वाऱ्याचे, कळत नकळत, आभास हा...आता या शीर्षकाचा कथानकाशी काही संबंध नाही...पण शीर्षक गीत चांगले असले पाहिजे या हट्टापायी काहीपण नाव ठेवून देतात. त्यातल्या त्यात लज्जा, अनुबंध या मालिकांनी काहीतरी वेगळे विषय तरी हाताळले. पण भरकटणे हा स्थायीभाव असल्याने त्याही वाहवत गेल्या. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' मधून काही नवे कलाकार आले पण बहुतेक पुन्हा त्याच टिपीकल मालिकांमध्ये रमले. मराठी तरुणाईच जर या मालिका करू लागली तर काय म्हणावे ?

काही दिवसांपूर्वी एक बातमी ऐकली कि 'चार दिवस सासूचे' हि मालिका बंद झाली म्हणून. पण मला लगेच कळले की ही अफवा असणार. अशी कशी बरी बंद पडेल. वर्षानुवर्षाचा इतिहास आहे या मालिकेला. मी शाळेत होतो तेव्हापासून लागायची ही, अजूनही आहेच. कोणत्या मुहूर्तावर चालू केली होती ते एक शोधायला हवे. बाकी फार लहानपणी एक 'दामिनी' नावाची मालिका होती जी बराच काळ चालली पण या मालिकेचे सगळे रेकॉर्ड्स मोडायचे असे ठरवून 'चार दिवस...'सुरु झाली. 'भिकेला लागलो तरी चालेल पण मालिका चालूच ठेवायची...'असा बहुतेक या मालिकेच्या निर्मात्यांचा निर्धार असावा. किंवा निदान सचिन तेंडूलकरचा आदर्श तरी त्याच्या डोळ्यापुढे असावा. म्हणजे या मालिकेच्या सुरुवातीला जे जन्मलेही नव्हते त्यांना ही बहुतेक देशमुख घराण्याचे पणतू-खापर पणतू व्हायचे भाग्य मिळणार...कठीण आहे!

अजून एका गोष्टीचे फार वाईट वाटते ते म्हणजे मराठीत इतके चांगले चांगले कलाकार असूनही ते सगळे या सिरीयलच्या कचाट्यात अडकून पडले आहेत. इथे पैसा मिळतो, झटपट नाव मिळते म्हणून रंगभूमी गाजवणारे कलाकारही या टुकार मालिकांत काम करत आहेत. चांगल्या मालिका बनत नाहीत हे खरे असले तरी असंभव, अग्निहोत्र सारख्या मालिकांना प्रेक्षक ही मिळाले व कौतुक ही झाले. चांगली मालिका बनवायची प्रक्रिया ही चित्रपटाप्रमाणेच असावी. ज्याला काही निश्चित कथानकच नाहीये ती चांगली मालिका कशी बनेल आणि नंतर हवे तसे कथानकात बदल करू या सध्याच्या वृत्तीमुळे मालिकेचा शेवटही (लो टीआरपी मुळे) कसाबसा केला जातो. मालिका निर्माते केवळ पैसा कमावण्याच्या दृष्टीने मालिका बनवत आहेत. काही चांगली कलाकृती सादर करावी असे कुणालाच मनापासून वाटत नाही त्यामुळे आपण पाहणार तरी काय ?

या टुकार मालिकांविषयी राज ठाकरेंचे काय मत आहे हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. म्हणजे त्यांचा यांना विरोध असेल तर लागलीच एक आंदोलन करून टाकू. मराठी प्रेक्षकांवरील अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे. चला तर मग एक पत्र पाठवूनच देऊ.

Comments

  1. हा हा हा .. लई भारी रे :) माझ्या ब्लॉगचं नाव काही पण नाही रे ठेवलंय ;-)
    ह्या सिरिअल किलिंगला अंत नाही आपल्या अंतापर्यंत, काय माहित अजुन काय काय बघावं लागणार आहे :(

    ReplyDelete
  2. धन्य सुहास...
    दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चाललीय... काय मालिका काय कथानक...छे छे!

    ReplyDelete
  3. सागर, ही कॉमेंट आत्ताच खरे तर मी बझ म्हणून टाकलाय, पण तुझे हे पोस्ट वाचल्या वर पुन्हा तेच इथे देत आहे.निदान ह्या वरून माझ्या कडे आत एक अन बाहेर दुसरे असे काही नाही ह्याची खात्री पटेल.:) असो.विनोद बाजूला ठेऊ पण तुझी चीड-चीड स्वाभाविक आहे....पण टाळी एका हाताने कधीच वाजत नाही."लिंबू टिंबू" "भावोजी "चे जेव्हा उस्फुर्त स्वागत अन प्रतीक्षा होत रहाते तेथे दुसऱ्या कोणत्या ही मालिकांची आपण अपेक्षा ठेवणे ही त्यांची नव्हे तर आपली चूक आहे.
    नि तसेच अति स्वार्थी नि अर्थातच व्यावसाईकता मालिका निर्मात्यांच्या नि चॅनल वाल्यांच्या रक्तात भिनल्या मुळे प्रेक्षकांवर सुद्धा हि वेळ आलीये.येनकेन प्रकारे कूर्म गतीने मालिकेचा प्रवास सुरु ठेवत कथानकात काही ना काही विकृत प्लॉट डेव्हलप करून प्रेक्षकांच्या डोक्याला सततचा भुंगा लाऊन ठेवणे हे प्रत्येक मालिकांचे एकमेव उद्दिष्ट्य आहे/असते असे प्रकर्षाने लक्षात येते.कारण निखळ किंवा वैचारिक करमणूक करणे,प्रबोधन करणे हे प्रचंड आव्हानात्मक असते हे निर्मात्याला हि ठाऊक आहे त्या मुळे प्रमुख पात्राला किंवा त्याच्या कुटुंबाला सतत कोणत्या ना कोणत्या भानगडीत अडकवत ठेवेणे किंवा संकटात ढकलणे हि सर्वात हुकमी नि एकदम सोप्पी आयडीया आहे.त्या मुळे" आता कुंकू मधल्या जानकी वर नवे कोणते संकट येणार ? परशु नि अहिल्या आता नवीन कोणत्या कंड्या करणार ?किंवा बंध रेशमाचे मधली नंदिनी आता रुद्रला बासुंदी करून देणार का ? नि दिली तर पुढे काय?त्या शेखरराजचा भूतकाळ काय असणार नि प्रेक्षकांना तो कधी कळणार? इतके फालतू प्रश्न हे सुद्धा जिव्हाळ्याचे विषय बनून जातात.खास करून महिला वर्गा साठी. नि त्यांची हि मती कुंठीत होऊन जाते. अन त्या मुळेच काही बेसिक नि अगदी बाळबोध असे जे प्रश्न….. कि उदाहरणार्थ जानकी इतकी भाबडी (इथे मला खरे तर मतीमंद असेच म्हणायचे आहे )बाई आजच्या जगात असते काय ? असेल तर ती जगायला लायक ठरेल काय? कारण अहो,आमच्या कन्स्ट्रक्शन साईट वरच्या अगदी बिगार्याची बायको सुद्धा ह्या पेक्षा कित्येकपटीने हुशार नि शहाणी असते नि त्या नरसिंहा पेक्षा कि जो मुख्य मंत्री पदाची स्वप्ने पहातो त्या पेक्षा आमच्या वार्डाच्या कुठल्या हि पक्षाचा अगदी साधा सेक्रेटरी सुद्धा खूप मोठा राजकारणी असतो.पण नाही दिवा स्वप्नात तात्कालिक रमत राहणे हि आजच्या कुटुंब व्यवस्थेचा भाग बनून गेल्या मुळे हा सारासार विचार बाजूला पडलाय.अन त्या मुळे नंदिनी सारखी सुस्वरूप बायको असताना सुद्धा तिचा नवरा एपिसोडन -एपिसोड हाणगाच दाखवत ठेवायचा हि मालिकेची गरज बनते.

    ReplyDelete
  4. एवढी मोठी प्रतिक्रिया...!
    टी. व्ही. सारखे चांगले माध्यम केवळ मनोरंजन ( आणि तेही फालतू दर्जाचे) यात अडकून पडले आहे. पैशापुढे सगळे गौण ठरते. आणि राग तर या मूर्ख मालिका पाहणार्‍या प्रेक्षकांचा येतो. जे विकले जाते तेच पिकवले जाते.

    ReplyDelete
  5. सागर,
    "मोठी प्रतिक्रिया" म्हणजे कसंय.... एकदा बाण सुटला कि सुटला रे. तो थांबवता थांबत नाही.अन तसे हि मी माझ्या ब्लॉग वर "गप्पांच्या" नावाखाली तशा चकाट्याच पिटतो नां ? ते मला हि ठाऊक आहेच नाहे रे ? त्यां मुळे तुम्ही लोकांनी "विषय दिला " नि मला सुद्धा "तो घावला" कि सुटणे हे क्रमप्राप्त आहेच:)पण पोस्ट म्हणून लिखाण म्हणावे तर..... थोडी टंगळ मंगळ नि बराचसा कंटाळा कारणीभूत आहे.

    ReplyDelete
  6. तुम्ही सर्व लोक एवढ्या हिरिरीने लिहिता आहात त्यावरून तुम्ही सुद्धा सर्व सीरियल्स नेहेमी पहात असणार असे वाटते!
    मराठी सीरियल्समुले एक गोष्ट मात्र नक्की ठाऊक होते. घरोघरी चाकू, सुर्‍या, पिस्तुले वापरण्याचा सर्व स्त्री-पुरुषाना उत्तम सराव झालेला आहे अशी खात्री पटते. प्रत्येकीत एखादा तरी खूनखराबा असतोच!

    ReplyDelete
  7. @ mynac असो आभार आहे आणि स्वागत ही...

    ReplyDelete
  8. @ प्रभाकरजी
    आम्ही कुठे पाहतो...येता जाता दिसतात तेवढ्याच....ठरवून पाहिल्या तर या क्षेत्रात गेलो असतो ना...

    ReplyDelete
  9. घरोघरी मातीच्या चुली…. मी तर घरातल्या स्त्री-वर्गाबरोबर लढाईत माघार घेऊन टीवी बघण बहुतांशी सोडून दिल आहे…रच्याक अनेक मराठी मालिकांची शीर्षकगीत मात्र मला आवडतात… :)

    ReplyDelete
  10. हो रे...कथानकाशी संबंध नसलेली शीर्षक गीते!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा