शाळा- पुस्तक, चित्रपट आणि बरेच काही

शाळेत गेलेल्या सर्वांसाठी...असे वाचूनच पुस्तकाची सुरूवात होते.

डोंबिवलीच्या सुखदेव नामदेव वऱ्हाडकर हायस्कूल या छोट्याश्या मराठमोळ्या शाळेत शिकणारा मुकुंद जोशी आणि त्याचे मित्र चित्रे, सुऱ्या आणि फावड्या ही कथानकातील प्रमुख पात्रे. आजची डोंबिवली ही शहर म्हणून विकसित झाली असली तरी ७०च्या दशकात तिचे स्वरूप खेडे म्हणूनच होते. शेतजमीन, डोंगर आणि बराचसा ग्रामीण मातीचा गंध सांगणारे वर्णन यात आपण सहज मागे खेचले जातो. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण ठिकाणी शिक्षण झालेल्यांनाच नव्हे तर शहरी भागात ही पूर्वीच्या मराठमोळ्या शाळांमधून शिकलेले विद्यार्थ्यांना देखील ती आपलीच शाळा वाटते.

शाळा ही म्हटली तर एक प्रेमकथा आहे म्हटली तर नाहीही. मुकुंदा जोशी हा या कथेचा नायक आहे आणि संपूर्ण पुस्तकात तो आपल्या अवतीभवतीचे शाळेचे व शाळेबाहेरचे विश्व आपल्यासमोर मांडतो. शिरोडकर ही या कथेची नायिका आहे पण ती ही केवळ मुकुंदाला आवडत असते म्हणून. प्रेमकथा यासाठी कारण मुकुंदा सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठेही, कधीही शिरोडकरच्याच विचारात बुडालेला. आपले प्रेम तिच्यापर्यंत कसे पोचवणार या चिंतेने कायम त्याच्या पोटात खड्डा पडलेला. पण या कथेलाच समांतर असे अनेक प्रवाह सुरु राहतात आणि ते कधीच या प्रेमकथेचा रसभंग करत नाहीत उलट सहजपणे त्याशी एकरूप होऊन जातात.

मिलिंद बोकील यांनी पुस्तकात कुठेही बोजड, काव्यमय किंवा लेखन शैलीचा छाप पाडणारे लेखन केले नाहीये. बोलीभाषेचा वास्तवाइतकाच स्पष्ट वापर तोही अगदी आपल्या मनातले काहीतरी बोलल्यासारखा. ते एक नववीतल्या मुलाचे विचार वाटावे इतके सहज, सुंदर लिहिले आहे. मुकुंद जोशी जो नववीतला विद्यार्थी आहे त्याला आजूबाजूला दिसणाऱ्या, नव्याने कळणाऱ्या आणि काहीवेळा न कळणाऱ्या गोष्टी त्यांनी या कथेत गुंफल्या आहेत. मुकुंदाचे विचार हे निरागस वाटत नाहीत, ते स्पष्ट वाटतात. काही खास शब्द आणि वाक्प्रचार पुन्हा पुन्हा वापरण्यात आले आहेत ते फारच गोड वाटतात. जसे सुममध्ये राहणे, इमानदारीत असणे, आडीबाजी करणे, डाउट खाणे वगैरे. त्या वयात आपल्याला आता सगळे काही कळते अशी जी आपली भावना असते आणि तसे असूनही ज्या काही चुका होत राहतात त्यातून हळूहळू शिकत जाण्याची वृती हे नेमके टिपले आहे.

कथानकात मुळातच एक हवाहवासा वाटणारा निवांतपणा आहे. कथानक बऱ्याच संथपणे जाते पण कुठेही कंटाळवाणे होत नाही. ते जितक्या निवांतपणे वाचू लागतो तसे हळूहळू ग्रामीण मातीचा गंध, पक्ष्यांचा किलकिलाट, कोवळ्या उन्हाचा स्पर्श जाणवतोय असे वाटू लागते. मुकुंदाला शिरोडकरच्या प्रेमात पडल्यापासून बाकी जगापासून दूर गेल्यासारखे वाटते आणि त्याचे केवळ तिच्यातच त्याचे हरवून जाणे जसे आहे तसे पुस्तक वाचताना आपल्याला होते. वाचकास आपल्या शाळेची आठवण होणार नाही असे शक्य होणार नाही कारण कुठे ना कुठे शाळेत गेलेल्या त्या प्रत्येकास ते कथानक जवळचे वाटते. तीन दशकांपूर्वीची गोष्ट असूनही ती आजच्या पिढीलाही तितकीच जवळची वाटते यातच लेखकाचे आणि पुस्तकाचे यश आहे.

पुस्तकाच्या बाबत लिहायला गेलो तर काय काय आणि किती लिहू असे आहे. उल्लेखनीय म्हणावे असे अनेक प्रसंग आहेत. कुमारवयात मुलांना वाटणारे लैंगिक आकर्षण, त्याचे चावट संवाद आणि या साऱ्या बाबत त्यांचा विचार करण्याचा दृष्टीकोन हा म्हटले तर सगळ्यांनीच आपापल्या बालपणी अनुभवला असेल पण तो नेमका उतरलाय पुस्तकात. बाटली फुटण्याची भीती, नायकिणीच्या गोष्टी, गंगू कुठं गेलीचे गाणे हे सारे वाचताना सगळे जुनेच संदर्भ वेगळ्या रूपात जाणवतात. त्याच वेळेस आणीबाणी म्हणजे काय, त्यांच्याच चाळीत केला जाणारा जातीभेद, तत्कालीन समाज आणि समज हे सगळे वेगवेगळे विषय ही गुंता न करता गुंफले गेले आहेत. 'लाईन देणे' याबाबत तर काळानुरूप त्याचे नामकरण झाले फक्त पण मुलं-मुली शाळेतच लाईन द्यायला-घ्यायला, किमान हा प्रकार काय ते तरी शिकतात, त्यासाठी कॉलेजची पायरी चढावी लागत नाही. शाळेतल्या शिक्षकांच्या जोड्या लावणे, त्यातील काही आवडते असणे, काही नावडते असणे. त्यांच्या लकबी, स्वभाव अगदी हुबेहूब. मुख्याध्यापक आणि त्यांची खोली तंतोतंत.



चित्रपटाबाबत बोलायचे तर पुस्तकामुळे अपेक्षा फार वाढलेल्या. त्यात पुन्हा वेळेची मर्यादा त्यामुळे सगळेच काही २ तासात मांडता येणे शक्य होत नाही. पण दिग्दर्शक सुजय डहाके यांनी ते शक्य तितक्या चांगल्या परीने मांडले आहे. चित्रपट पाहताना असेही वाटते की हा पुस्तकावर बेतलेला नसता तर कदाचित दिग्दर्शकास अधिक स्वातंत्र्य मिळाले असते. नावाजलेल्या पुस्तकावर चित्रपट निर्माण करण्यात मोठी अडचण म्हणजे वाचकांना पानोपानीचे संवाद आणि संदर्भ सगळे पाठ असतात. त्यात कुठेही बदल घडला तरी तो रुचत नाही आणि मग या सगळ्या प्रक्रियेत अनेक बंधने आपसूकच येतात.

पात्र निवडीत जोशी, शिरोडकर, सुऱ्या, फावड्या, चित्रे, आंबेकर, सुकडी, बिबीकर, बेंद्रे बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, आप्पा, अंबाबाई, नरूमामा सगळे अचूक. काही पात्र दाखवली गेली नाहीत ते अपेक्षित होतेच. काही प्रसंग गाळले तेही अपेक्षित होतेच. रांगोळीच्या डब्यात सर्व रंग असावेत पण स्पर्धेत मोजकेच रंग दिले जातील असा नियम असल्याची जाणीव ठेवून रांगोळी काढली आहे, ती विलक्षण सुंदर झाली आहे पण अपेक्षा इतक्या आहेत की चित्रपट याहून सुंदर झाला असता तरी समाधान झाले नसतेच.

जोशी आणि शिरोडकर कायम लाईमलाईट मध्ये राहतात कारण जोशी चित्रपटाचा नायक आहे आणि जिथे जोशी आहे तिथे कायम त्याची मनी-ध्यानी शिरोडकरही आहेच. अंशुमन जोशीने मुकुंद जोशी उत्तम साकारलाय. त्याचे संवाद आणि देहबोली अगदी खरीखुरी वाटते. केतकी माटेगावकर शिरोडकर म्हणून प्रचंड गोड दिसते. तिचे बोलके आणि सुंदर डोळे तिच्या संवादांची जागा भरून काढतात. फावड्या आणि चित्र्या पण मस्त. चित्र्याला वाव कमी मिळालाय. पुस्तकात बिबीकर जरी भाव मारू असला तरी चित्रपटात मात्र भाव खाल्लाय तो सुऱ्याने ! तो अगदी अस्सल वाटतो. जोशी म्हणतो त्याप्रमाणे मुलांचे जसे वेगवेगळे संच असतात त्या संचात हा मस्तीखोर मुलांच्या संचात पहिला येणारा. सगळ्या शाळांत असले अवली विद्यार्थी असतातच त्यामुळे प्रत्येकाला कुणाच्या ना कुणाच्या रूपात तो आठवतोच.

चित्रपटात काही खटकलेल्या गोष्टीही आहेत. सहलीच्या वेळेस जेव्हा सगळे विद्यार्थी शेकोटी भोवती बसलेले असतात आणि शिरोडकर सगळ्यांच्या नजरा चुकवून जोशीच्या दिशेने एक चॉक्लेट टाकते. पुस्तकात स्पष्टपणे लिहिले आहे की ती 'रावळगाव'चे चॉक्लेट त्याच्या दिशेने टाकते पण इथे मात्र 'पारले'चे वापरण्यात आले आहे. असा बदल जाणीवपूर्वक आहे की नाही ते दिग्दर्शकास ठावूक पण ते पाहता क्षणी लगेच लक्षात आले. शिवाय केटी, अशोक आणि विजयच्या खोलीत 'चे गव्हेरा'चे चित्र असलेला कॉफी मग आहे. त्या काळी तसे प्रिंटेड मग उपलब्ध होते की नाही याबद्दल शंका आहे.

चित्रपटात शेवट बऱ्याच घाईघाईत आटोपता घेतला आहे. पुस्तकाच्या शेवटी वाचताना जी पायाखालची जमीन सरकते आणि जोश्याबरोबरच आपलेही मन गलबलते ते तसे चित्रपटात होत नाही. तो अधिक परिणामकारक करता आला असता. पुस्तकाचा शेवट मात्र अगदी काळजाला हात घालणारा आहे. सगळे काही इतके सुरळीतपणे चाललेले असताना असे काही होईल असे अपेक्षितच नसते. शेवटचे पान बंद केले आणि त्या बाहेर पडून जरा विचार केले तर वाटते की जोशीच्या बाबत जे झाले ते इतकेही काही भयानक नाही आहे. कदाचित आणखी काही वर्षांनी तो इंजिनियर झाला असेल. त्याच्या आयुष्यात शिरोडकरच्या जागी दुसरी कोणी आली असेल. नवीन मित्रही भेटले असतील. पण त्या वयातील आपले दु:खाचे प्रसंग आठवले तर वाटते की त्याहून अधिक वाईट काही होऊ नाही शकत.

वारंवार टाळायचे ठरवूनही तुलना होत राहते. दोघांची तुलना करायची म्हटली तर असे म्हणता येईल की शाळा पुस्तक म्हणजे सचिन तेंडूलकरची एखादी उत्कृष्ट जमलेली खेळी आहे आणि चित्रपट त्याच्या काही निवडक क्षणांची हायलाईट्स. त्यातील महत्वाच्या घटना आणि प्रसंग हे चौकार, षटकार असतील पण सचिनने काढलेल्या एकेरी आणि दुहेरी धावा ही तितक्याच आकर्षक आणि नजाकतभऱ्या आहेत. त्या अनुभवायच्या असतील तर पुस्तकच उघडायला हवे. जे चित्रपटात मांडले आहे ते सुंदर आहे पण ज्यांनी पुस्तक वाचले आहे त्यांचे यावर समाधान होणार नाही हे तितकेच खरे आहे.

विशेष कौतुक म्हणजे चित्रपटाने पुस्तकाच्या प्रसिद्धीचा आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मचा उत्तम वापर केलाय. मराठी चित्रपटाच्या भवितव्याच्या दृष्टीने ही फार चांगली गोष्ट आहे कारण मार्केटिंगच्या बाबत मराठी सिनेमा मागेच पडायचा कायम. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने बरेच पुरस्कार मिळवले आहेत. 'माउथ पब्लिसिटी' ही प्रचंड जोरात चालली आहे. पण याबाबत माझी अशी इच्छा आहे की या पुस्तकावर एखादी मालिका बनवता आली तर त्या कथानकाला योग्य न्याय देता येईल. चित्रपट केल्याने मराठी चित्रपट सृष्टीला दर्जेदार चित्रपट मिळाला खरे पण टी.व्ही. मालिकांना ही या निमित्ताने एक चांगली मालिका मिळाली तर सुजाण प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच ठरेल.

जाता जाता, नुकतीच पाहण्यात आलेली शाळा सिनेमाची शीर्षकांची पाटी वर शेअर केली आहे. काळा फळा आणि पांढरा खडू एवढेच साहित्य वापरून बनवलेले हलते चित्र जणू आणि चित्रपट पाहताना खास लक्षात राहिलेली मधली सुट्टीची पाटी. आता तुम्हीही लवकरात लवकर शाळेत दाखल व्हा आणि जुन्या स्मृतींना उजाळा द्या. आम्ही तर पुन्हा पुन्हा जाणार आहोत. शक्य असल्यास शाळेच्या मित्रांसोबतच पाहा.

Comments

  1. बेस्टच... बघायचाय. काहीही अपेक्षा न ठेवता बघणार आहे.

    ReplyDelete
  2. बेस्ट... सुंदर नक्की बघणार "शाळा", हेरंब अगदी सहमत काहीही अपेक्षा न ठेवता बघणार

    ReplyDelete
  3. मी कालच 'शाळा' पहिला.कादंबरीच्या तुलनेत सिनेमाला असलेल्या मर्यादित अवकाशात 'शक्य तितक्या चांगला' झाला आहेच. तुमची 'खेळी आणि हायलाईटस' ची उपमा आवडली.

    ReplyDelete
  4. review aavadala..tv serial cha mudda lakshat ghenyasarakha ahe..Hazaron Khwahishe Aisee

    ReplyDelete
  5. छान लिहीलंयस रे.
    रच्याक, वाक्य कॉपीपेस्ट का होत नाहीत? क्वोट करता येत नाही!

    तो प्रिन्टेड मगचा मुद्दा पटला. पण जाऊ दे, सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून सोडून द्यावं. कारण, पोलीस चेकींगला आल्यावर तो मग तो गुपचूप घेऊन घरी येतो... आणि नंतर ताई तो मग घेते... ब्येश्ट कल्मिनेशन! :D

    टिव्ही सिरीयल नको. केलीच तर ११ भागांची वगैरेच बास! :)

    ReplyDelete
  6. हेरंब- आमच्या ग्रुपमध्ये मी एकट्यानेच पुस्तक वाचलेले त्यामुळे मीच तेवढा अपेक्षा बाळगून होतो. तरीही चित्रपट चांगला आहेच आणि तू लिहिलेली पोस्ट तर सुरेखच आहे.

    ReplyDelete
  7. नागेश दादा- आभार. लवकर बघून लवकर कळवा...

    ReplyDelete
  8. धन्यवाद प्रीती. ब्लॉगवर स्वागत. आम्ही पण फर्स्ट डे लास्ट शो.

    ReplyDelete
  9. धन्यवाद हर्षद...तुझ्या ब्लॉगवरील रिविव्ह वाचला. मराठी चित्रपटासाठी मराठीतून लिहायचा ना ?

    ReplyDelete
  10. आल्हाद- कॉपी डिसेबल रे... अरे पुस्तक वाचलेस तर यावर सिरीयल लिहिता येईल असे वाटेल बघ. कथानक बरेच मोठे आहे आणि पानोपानी प्रसंग असे की पुन्हा पुन्हा पाहावे आणि वाचावे.

    ReplyDelete
  11. सागर, विचार छान मांडले आहेस. 'हायलाईट्स' ची उपमा आवडली. चित्रपट पाहण्याची उत्सुकता होती तरीही अपेक्षा मी डोंगराएव्हढी होऊ दिली नाही. त्यामुळे उणिवांसकट (अगदी बघताना ठळकपणे जाणवूनही) पहायला मजा आली. ('casting' हा मुख्य जमलेला भाग) एखाद्या रसग्रहण करणा-या लेखातून मूळ कलाकृतीच्या सौंदर्यस्थळांचा पुन:प्रत्यय यावा तसे काहीसे वाटले चित्रपट पाहताना.

    ReplyDelete
  12. धन्य रे राहुला...
    गेले काही दिवस सगळीकडे शाळा-शाळाच सुरु आहे.

    ReplyDelete
  13. शाळा... अल्टिमेट :) :)

    किती बोलू..किती नाही असं होतंय. पुस्तकाचा दर्जा अफाट आहे, तरी सुजय ने त्याला उत्तम न्याय देण्याचा प्रयत्न केलाय.

    मस्त पोस्ट रे सागरा :) :)

    ReplyDelete
  14. सध्या माझे पुस्तक घरोघरी फिरत आहे पिच्चर पाहिल्यापासून...
    धन्य फॉर कमेंट !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा