दुनियादारी ! दुनियादारी !!

दुनियादारी हे एक व्यसन आहे. 

दुनियादारी म्हणजे तरुणाई ! दुनियादारी म्हणजे प्रेमभंग ! दुनियादारी म्हणजे अतूट मैत्री ! दुनियादारी म्हणजे कोमेजलेले बालपण ! दुनियादारी म्हणजे नियतीने केलेली फसवणूक ! दुनियादारी म्हणजे अनुभवातून आलेलं शहाणपण !

दुनियादारी वाचून जो त्याच्या प्रेमात पडत नाही तो तरुण नाही आणि जो वयाने तरुण नसूनही त्याला ती आवडत नाही तर तो मनानेही तरुण नाही. दुनियादारीची स्वतंत्र अशी एक शैली आहे. ती स्पष्ट आणि सरळ आहे आणि ती तशी आहे म्हणून वाचक तिच्यावर प्रेम करतात. याशिवाय दुनियादारी एक काल्पनिक सत्यकथा आहे. वाचक दुनियादारी 'ढापतात', वाचनालयातून वा मित्राकडून नेलेली परत आणून देत नाहीत या अशा कारणांमुळे मी सर्वांना दुनियादारी वाचायला सुचवतो पण देत नाही. दुनियादारीने सर्वप्रथम हेच शिकवले.

दुनियादारीचे कथानक नाट्यमय आहे पण नाटकी नाहीये आणि ते नसे न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कथानकातील पात्रांच्या तोंडी असणारे संवाद. लेखकाच्या म्हणण्यानुसार दुनियादारी ही एक काल्पनिक सत्यकथा असल्याने ही पात्रे कुठेही सहज आढळणारी आहेत म्हणूनच त्यांचे संवादही तितकेच खरे असणे ही कथानकाची गरजच होती आणि असे असूनही कथानक मात्र वैचारिक पातळीवर आपल्याला गुंगवत राहतेच. पूर्ण दुनियादारी वाचताना कुठेच कंटाळवाणे वाटत नाही. एकामागून एक घटना घडत राहतात ज्यामध्ये श्रेयस आणि त्याची कट्टा गँग गुंतत जाते आणि आपण पुस्तकात.

श्रेयस ही या कथेतील प्रमुख व्यक्तिरेखा आहे. श्रेयसबद्दल मला आवडणारी गोष्ट म्हणजे तो फार समजूतदार आणि तत्त्वनिष्ठ मुलगा आहे. आई-वडिलांपासून दुरावून देखील तो संस्कारशुन्य नाही. कट्टा गँगचा सदस्य झाल्यावरही त्यांच्या वाईट सवयी न अंगीकारता शक्य तेथे त्यांनाच त्यांच्या सवयी बदलण्यास भाग पाडतो. काही वेळा भावनेच्या भरात तो काही चुका करतो पण त्याची जाणीव झाल्यावर त्या दुरुस्त करायला खंबीरपणे परिस्थितीला सामोरा जातो. शिरीनवर प्रेम असूनही तो मिनुच्याही प्रेमात पडण्याइतका बालीश वागतो. 

शिरीनची जी व्यक्तिरेखा आहे ती कमालीची आकर्षक आहे. ती सुंदर आहे, विचारी आहे आणि कुणालाही भुरळ पडावी असे तिचे व्यक्तिमत्त्व आहे. शिरीनच्या वागण्या-बोलण्यातील गूढता श्रेयसला आणि आपल्यालाही कायम तिच्यात गुंतवून ठेवते. दुनियादारीतील प्रत्येक पात्राला काही न काही दु:ख आहेत, शिरीनलाही आहेच. पण या दु:खांना ती ज्या तऱ्हेने सामोरी जाते ते इतर कुणाला जमत नाही. ' तुझी दु:ख कायम माझ्याहून मोठी असतात' असे श्रेयसला वाटते. श्रेयसच्या प्रेमात पडूनही 'धीरूभाई'ला दिलेला शब्द पाळण्यासाठी ती स्वत:ला श्रेयसपासून दूर लोटते.

कट्टा गँग ही दिग्या उर्फ 'डी एस पी' याची गँग. कॉलेजचे इतर सभ्य आणि पापभिरू विद्यार्थी जे करायला धजावत नाहीत ते सारे काही कट्टा गँग करते आणि मनमानी करण्याच्या त्यांच्या या सवयीमुळे बदनाम असूनही त्यांची तितकीच दहशतही असते. प्रत्येक प्रश्न ताकदीच्या जोरावर सोडवू पाहणारा दिग्या, सुरेखाच्या प्रेमात स्वत:ला बदलू पाहणारा आणि तिचे लग्न झाल्यावर वेडापिसा झालेला दिग्या, श्रेयसच्या समजूतदार वागण्याने वेळोवेळी शहाणा झालेला दिग्या अशा अनेक छटा दिग्याच्या व्यक्तिरेखेला आहेत.

एम के चे पात्र फार महत्त्वपूर्ण आहे. तो कुठल्याशा कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे आणि त्याचे कसलेसे अनाकलनीय दु:ख दारूच्या नशेत विसरू पाहतोय. पण ' दुनियामे ऐसा कोई गम नाही जिसे शराब के सहारे भुलाया जा सकता है' हेही त्याला ठाऊक आहे. 'मीरा सरदेसाई' त्याच्या आयुष्यातून निघून जाते आणि हा 'एम के' भ्रमिष्टासारखा दारूच्या नशेत आयुष्यभर भटकत राहतो. नशेत भान हरवून बसलेल्या एम के चे तत्त्वज्ञान आणि त्याची दर्दभरी गाणी ऐकताना आपलाही मेंदू बधीर होऊन जातो.

दुनियादारीतील प्रत्येक पात्राचे काही ना काही दु:ख आहे आणि ते विलक्षणरीत्या एकमेकांत गुंतलेले आहे. श्रेयसला त्याच्या आई-वडिलांचे प्रेम मिळत नाहीये म्हणून तो एकाकी आहे. डॅडींना राणी मां ला समजून घेणे जमत नाही. राणी मां तिच्या मनाविरोधात लग्न झाल्याने तिच्यातील- 'मीरा सरदेसाई' गमावून बसली आहे आणि राणी तळवलकर म्हणून श्रीमंतीचा उपभोग घेतानाही तिला कधीच सुख लाभले नाहीये. दिग्याला त्याचे प्रेम मिळत नाही, त्याच्याच मित्रांपासून दगा-फटका होतो. एम-के ची कथा तर फारच दु:खद आहे. शिरीन आणि प्रीतमलाही आई-वडिलांपासून दूर राहावे लागते आहे. कदाचित समदु:खी असल्यानेच श्रेयस आणि शिरीन एकमेकांकडे आकर्षिले जातात.

दुनियादारी ही फसवी कादंबरी आहे. त्यातील अनेक प्रसंग नाट्यमय आणि रंजकतेने परिपूर्ण आहेत. पण ती पडद्यावर मांडणे तितकी सोपी नाहीये. संजय जाधव 'दुनियादारी' वर आधारित चित्रपट घेऊन यॆत आहेत. पण ती दोन-अडीच तासात सांगणे कसे जमेल हा प्रश्न आहेच. साधारण दहा वर्षांपूर्वी अल्फा मराठीवर 'दुनियादारी' मालिका आली होती. सतीश राजवाडे दिग्दर्शित मालिकेत अनेक चांगले कलाकार ही होते पण इतके उत्तम कथानक असलेली मालिका उत्तरार्धात अगदीच गुंडाळून टाकली होती. तोपर्यंत 'दुनियादारी' वाचण्यात आले नव्हते. ते तसे वाचण्यात आले असते तर मालिका पाहताना उगाच मनस्ताप झाला असता. मालिकेचे माध्यम निवडूनही कथानकाचे सोने करण्याची संधी राजवाडेंनी हातची घालवली.

दुनियादारीने काय शिकवले तर...
कॉलेजच्या सोनेरी दिवसात रंग भरणारे जीवा-भावाचे मित्रही काही काळानंतर परकेसे होऊन जातात. प्रत्येकजण आपल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त होऊन जातो. इथे खरी मैत्रीची कसोटी आहे. दहा वर्षानंतर पुन्हा भेटलो तर काय बोलावे असा प्रश्न पडणार नसेल तर ती खरी मैत्री. ज्यांना असे मित्र लाभतात आणि ते जपता येतात त्यांनाच मैत्री कळली.

एरवी मित्रांसोबत कितीही स्वच्छंद आयुष्य जगता आले तरी आयुष्यात काही ध्येय नसेल तर ते निरर्थक होऊन जाते. परीक्षेच्या काळात जेव्हा सर्व अभ्यासात मग्न होऊन जातात तेव्हा दिग्याला आपल्या एकटेपणाची जाणीव होते. श्रेयसने वारंवार समजावूनही दिग्या आपल्या संतापाला आवर घालत नाही आणि मग जे काही होते त्याचे परिणाम त्याचे आयुष्य बरबाद करायला पुरेसे असतात. एम के जो पूर्वी हुशार विद्यार्थी होता तो सुद्धा आपले प्रेम गमावल्यावर आयुष्यातील ध्येयच गमावून बसतो. दु:ख प्रत्येकाच्या वाट्याला असतात पण त्याकडे प्रत्येकाला सकारात्मक दृष्टीने पाहता येईलच असे नाही. इथे श्रेयस आणि शिरीनचे वेगळेपण अधिक ठळक होते. आपले प्रेम सर्वव्यापी आभाळाइतके मोठे आहे असे सांगताना त्यांनी केलेला त्याग मनाला भिडतो.

प्रत्येक वेळेस आपण चुका कराव्यात आणि मग त्यातून शिकावे असे नाहीये. एम के आणि राणी मां दोघेही पहिल्या प्रेमाला विसरू शकले नाही. राणी मां आपल्या नवऱ्याशी सुखाचा संसार मांडू शकल्या नाहीत. एम के तिच्या आठवणीत वेड्यासारखा दारूच्या आहारी गेला. शिरीनच्या आईने तिच्या मुलांचा विचार न करता त्यांना सोडून जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी अनेक वर्षानंतर भेट झाल्यावरही मिनू आणि शिरीन दोघींनाही श्रेयससोबत पळून जाण्याचा मोह होतो पण इथे श्रेयस जितक्या समंजसपणे परिस्थिती हाताळतो ते कौतुकास्पद आहे. शिरीनचे लग्न आधीच ठरलेले म्हणून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा विश्वास अबाधित राहण्यासाठी श्रेयस तिला मागणी घालत नाही. मिनूची कथा अनादि-अनंत काळाची कथा आहे. आई-वडिलांचा विरोध पत्करून ती श्रेयसकडे कशाच्या बळावर संसार मांडणार होती जेव्हा श्रेयस स्वत:च विद्यार्थी-दशेत होता. मनीष आणि अपर्णाची कथा नकळतपणे याचे उत्तर देऊन जाते. मिनूशी लग्न होणे शक्य नाही हे कळल्यावरही तो फार शांतपणे नियतीचा निर्णय मान्य करतो.

विशेष म्हणजे जेव्हा ही कादंबरी पहिल्यांदा वाचण्यात आली तेव्हा काही दिवसांसाठी मी पुण्यातच वास्तव्याला होतो. दुनियादारी वाचणारे अनेकजण म्हणतात की कॉलेजात असतानाच प्रत्येकाने दुनियादारी वाचायला हवी. मला वाटते की कॉलेज संपून अनेक वर्षे सरल्यानंतर 'दुनियादारी' सारखे पुस्तक हाती लागले की मनात जी चलबिचल सुरु होते ती कळण्याइतकी दुनियादारी आपण मुळी पाहिलीच नसते कॉलेजात असताना. तेव्हा एकदा वाचून झाल्यावर ती मनात रुजली नाही तरी दुसऱ्यांदा वाचताना ती बरेच काही शिकवून जाईल.

दुनियादारी अमर आहे. त्याची खात्री सुशिंना होती आणि आता मलाही आहे. पुढच्या कित्येक पिढ्या दुनियादारीत स्वत:ला, आपल्या शिरीनला, दिग्याला, कट्टा गँगला, एम के ला शोधत राहतील.

Comments

  1. तरुणाईची भगवदगीता आहे रे दुनीयादारी !
    मस्त झालाय लेख, आवडेश :)

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद विशालदादा !
    तुझ्या ब्लॉगवरच्या सुशिंच्या अर्पणपत्रिका वाचल्या एवढ्यातच.

    ReplyDelete
  3. झकास झालाय ब्लॉग!! पुन्हा एकदा दुनियादारी वाचल्यासारखं वाटलं! :) :)
    मालिकेचे माध्यम निवडूनही कथानकाचे सोने करण्याची संधी राजवाडेंनी घालवली..>> +१
    अवांतर: श्रेयस गोखलेवाला स्पोयलर डिसक्लोज करशील असं वाटलं नव्हतं...

    ReplyDelete
  4. मी सिरीयल आधी पाहिली मग पुस्तक वाचलं. सिरीयल तेव्हाही अर्धवट सोडून दिल्यासारखीच वाटली होती पुस्तक न वाचताही. अर्थात तेव्हा ना राजवाडे कोण ते माहित होतं ना संजय नार्वेकर... आणि शिरीन म्हटलं शर्वरी जमेनीस लगेच येतेच डोळ्यासमोर. :)
    तेव्हा सिरीयल होती म्हणून ठीक होतं पण सिनेमाकडून निदान मी तरी फार अपेक्षा ठेवत नाहीये.

    ReplyDelete
  5. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद चैतन्य,
    ते कोणाच्या लक्षात येईल असे वाटत नाही रे...
    ज्याने वाचले आहे त्याला पात्रांची नावे लक्षात राहतात. ज्याने वाचलीच नाहीये नाहीये त्याला तो स्पोय्लर आहे हे कळायचे नाही.

    ReplyDelete
  6. मी देखील सिरीयल आधी पाहिली होती. त्यामुळे श्रेयस म्हणजे आशुतोष कुलकर्णी, दिग्या म्हणजे संजय नार्वेकर आणि शिरीन म्हणजे शर्वरी जमेनिस हेच डोळ्यांपुढे येते.

    ReplyDelete
  7. so cool and awsome writing shaggy... as watat ki ekhada prodh critics aapal mat vyakt karat ahe ..... nicely done .

    ReplyDelete
  8. धन्यवाद संचित !

    ReplyDelete
  9. वा !! छान लिहिले आहेस. दुनियादारी माझी आतोनात आवडती कादंबरी आहे. 'दुनियादारी' वाचताना जेवढी मजा येते तेवढीच मजा 'दुनियादारी'बद्दल वाचताना सुद्धा येते.

    "दु:ख प्रत्येकाच्या वाट्याला असतात पण त्याकडे प्रत्येकाला सकारात्मक दृष्टीने पाहता येईलच असे नाही. इथे श्रेयस आणि शिरीनचे वेगळेपण अधिक ठळक होते" >>>>> पटलेच एकदम

    मी सुद्धा दुनियादारी वर लिहिले आहे. : http://prasadgates.blogspot.in/2013/02/blog-post_3776.html
    वाचून मला नक्की प्रतिक्रिया कळव…

    एक विनंती : स्पॉयलर काढून टाक. तुझा blog वाचून ज्याला दुनियादारी वाचायची इच्छा होईल, त्याची अर्धी मजा आधीच निघून गेलेली असेल.

    ReplyDelete
  10. मला तर इतकं काही 'ग्रेट' पुस्तक वाटलं नाही. टाकाऊ नाहीच, पण असाधारणही नाही.
    वन्स रिडेबल, बस्.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा