Posts

बालपणीचा खेळ सुखाचा

Image
या विषयावर तसं या पूर्वी बऱ्याच जणांनी, बऱ्याच ठिकाणी लिहिले आहे पण तरीही मी पुन्हा लिहिणार आहे. एक तर ही पोस्ट लिहायची असे दीड वर्षापूर्वीच सुचले होते आणि तेव्हापासून मोडक्या-तोडक्या अवस्थेत ती ब्लॉगच्या अडगळीच्या ई-पानात बंद होती आणि काही केल्या लिहायचे होते पण जमत नव्हते. शिवाय लहानपणीचा विषय निघाला आहे तर तेव्हा एखादी गोष्ट तो करतो म्हणून मी पण करणार या त्या वेळच्या स्वभावास अनुसरून मला पण या विषयावर लिहायचे होतेच. बालपणीचे खेळ तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. लिहायला सुरुवात करणार तर प्रत्येक खेळाच्या कैक आठवणी. त्यातील निवडक आठवणी शेअर करतो आहे. पत्ते हे आम्ही पार लहानपणापासून खेळत आलो आहोत. बैठ्या खेळांमध्ये सगळ्यात जास्त हाच खेळला असावा. आम्ही भावंडे गावी जमलो की न चुकता पत्त्यांचे डाव होतात. गावाच्या घरातच तशी काही जादू आहे म्हणून की तिथे फक्त पत्ते खेळल्याच्या आठवणी आहेत म्हणून ते काही ठाउक नाही पण एरवी वर्षभर आम्ही कधी पत्ते खेळत नाही आणि गावी गेलो की पुन्हा लहान होऊन पत्ते मांडून बसतो. त्यात पत्ते खेळण्याचा मोठ्या मंडळींना त्रास कमीच म्हणून त्यांचा ही काही आक्षेप ...

दुसरा वाढदिवस

Image
गेलं वर्ष इतक्या लवकर कसं गेलं कळलंच नाही आणि हे असं दरवर्षी होतं. नव्या वर्षी, वाढदिवशी, सणासुदीला मागे वळून पाहिलं तर गेल्या वर्षीच्या घटना अगदी ताज्या वाटतात. यंदा अभ्यासात, कामात जरा जास्त बिझी झाल्याने ब्लॉगकडे दुर्लक्ष झाले खरे ( ते नेहमीच होत राहील बहुधा ) पण म्हणून वाढदिवस विसरून चालणार नाही. तसं दुसऱ्या वाढदिवसाचं पहिल्या वाढदिवसाइतकं कौतुक नसलं तरी निदान या पोस्टच्या निमित्ताने मी जीवंत असल्याची (ब्लॉगवर) वाचकांना खात्री पटावी आणि ब्लॉगिंगला कंटाळून मी हे ब्लॉगविश्व सोडल्याच्या अफवा पसरू नयेत असाही हेतू आहे. शिवाय कासवाच्या गतीने चालणाऱ्या ब्लॉगच्या पोस्टसंख्येत अजून एक भर. त्यामुळे दरवर्षी वाढदिवशी तरी एक पोस्ट टाकावीच असा संकल्प आहे जो शक्यतो मोडला जाणार नाही. पहिल्या वाढदिवशी ब्लॉगिंगच्या अनुभवाबद्दल एवढे काही लिहिले की या वेळेस वेगळे काही लिहायला सुचत नाहीये. आणि यंदा ब्लॉगने विशेष आणि कौतुकास्पद असे काहीही केले नसल्याने त्याबद्दल उल्लेख करण्याजोगेही काही नाहीये. पण जे काही आहे ते आपलं आहे आणि कशीही का असो आपलीही एक पतंग आकाशात उडते आहे याचा आनंद आहेच. वाढदिवसाच...

'आर' फॉर रॉकस्टार

Image
"११.११.११"  जगभर लोक ह्या खास तारखेचे गुणगान गात आपापल्या तऱ्हेने साजरा करत होते पण आम्ही 'रहमान भक्त' मात्र संकष्टीला गणपती मंदिरात, महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात गर्दी करावी तसे न चुकता पहिल्याच (आणि इतक्या खास) दिवशी जमलो ते रॉकस्टार पाहायला. त्यापूर्वीचे कितीतरी दिवस मोबाईलवर, लॅपटॉपवर, टी. व्ही. वर फक्त रॉकस्टारची गाणी ऐकून धन्य झालो होतो तो आता मोठ्या पडद्यावर ती ऐकायला आणि पाहायला मिळणार म्हणून जरा जास्तच उत्सुक होतो. पहिल्या पाच मिनिटात होणारी रणबीरची एण्ट्री आणि अगदी आवेषात मोठ्या जनसमुदायासमोर त्याचा रॉकिंग परफॉर्मन्स पाहून उत्सुकता एकदम वाढु लागते. लगेचच मग चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जाऊन कॉलेजयुवक रणबीर हातात गिटार घेऊन गाताना दिसू लागतो. ' जो भी मैं कहना चाहू.. ' इथून मग हीर(नर्गिस) आणि जनार्दन उर्फ जॉर्डनची  (रणबीर) गोष्ट सुरू होते. मोठा कलाकार बनायचे तर आयुष्यात दु:ख हवे या भावनेने प्रेरित होऊन 'जॉर्डन' त्याच्या कॉलेजमधील 'दिल तोडने की मशीन' 'हीर' ला प्रपोझ करतो आणि तिने नकार दिल्यावर दु:खी झाल्याचे नाटक करतो. पण पुढ...

मोरया- जल्लोष की आक्रोश...!!

Image
तूच माझी आई देवा तूच माझा बाप गोड मानूनी घे सेवा पोटी घाल पाप... या ओळींसह चित्रपटाची सुरूवात होते आणि सोबतीला सगळ्यांच्या लाडक्या लालबागच्या राजाची मिरवणूक. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणेशाच्या नावाने करावा तशी 'मोरया' चित्रपटाची सुरूवात ही या गाण्याने आणि ज्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहतात अशा लालबागच्या राजाच्या दर्शनाने होते. (अवधूत गुप्ते ज्यांनी या चित्रपटाचे संगीत आणि दिग्दर्शन अशा दोन्ही बाजू सांभाळल्या आहेत त्यांनी हल्लीच एका मुलाखतीत सांगितले की 'मोरया' चित्रपट करायचा ठरला तेव्हाच म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी ही लालबागच्या राजाची मिरवणूक रेकॉर्ड करायचे ठरवले. तब्बल १० तासाच्या रेकॉर्डिंग पैकी जेमतेम ५-६ मिनिटांची दृश्‍ये या चित्रपटात वापरली आहेत. परंतु ती प्रदीर्घ शूटिंग पाहताना कधीच कंटाळा येत नाही. प्रत्येक भाविकच्या चेहऱ्यावरील भाव, ढोल -ताशाच्या गजरात तल्लीन होऊन नाचणारे भक्तगण पाहताना आपणही हरवून जातो.) 'गणेश चाळ' आणि' खटाव चाळ' या मुंबईतील दोन जुन्या चाळी आणि तेथील २० वर्षांची परंपरा लाभलेले दोन गणेश मंडळे य...

अस्वस्थ मनाचे किडे

माणसाचं मन हे फार चंचल असते. जन्मल्यापासूनच त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असते. 'मन चिंती ते वैरी न चिंती' असं म्हणतात कारण विचार करणं हे कित्येकदा त्याच्या हाताबाहेर गेलेले असते. असंख्य विचारांनी आपले मन कायम गुंतलेले असते. म्हणून आजचा हा लेख काही अशा गोष्टींसाठी ज्या करायच्या तर असतात किंवा कराव्याश्या वाटतात पण आपणच त्या करणे टाळतो आणि मग अस्वस्थ मनास अजून बेचैन करून सोडतो. याला आम्ही सभ्य भाषेत किडे म्हणतो कारण मनातल्या मनात ते वळवळ करत राहतात. ते असणे तसे फायद्याचेही असते नाहीतर माणूस आळशी आणि मंद बनत जातो. याउलट जो सतत काहीना काही विचारांनी अस्वस्थ राहतो तो पुढे पुढे जात राहतो. ( तत्त्वज्ञान पुरे !) आपल्याला हवे तसे वागण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे म्हणून एखाद्या क्षणी आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटली तरी ती करता येईलच असे नाही. परीक्षेच्या दिवसात मला नेहमी वाटते की आपण परीक्षेला जातो असे सांगून कुठेतरी दुसरीकडेच फिरायला जावे. परीक्षा न देऊन होणारे नुकसान लक्षात घेतले की आपण शहाण्या मुलासारखे मनास मुरड घालतो. परीक्षा हॉल मध्ये गेलो कि मला नेहमी गाणी गुणगुणावीशी व...

पाऊसगाणी

Image
जून महिना सुरु झालाय आणि पाऊस आता मुक्तहस्ताने बरसू लागलाय. उन्हाळ्याची तहान भागवणारा, धरतीस तृप्त करणारा, सगळ्यांना वेड लावणारा असा पाऊस आभाळातून खाली उतरला आणि मग पावसाच्या निमित्ताने सगळीकडे आनंदसोहळा सुरु झाला. पावसाच्या ओघानेच मग पाऊसगाणीही साऱ्यांच्या ओठी मृदगंधाप्रमाणे दरवळू लागली. कधी पावसात भिजताना तर कधी खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरी पाहून नकळत ही गाणी आपण गुणगुणायला लागतो. म्हणूनच पाऊसगाण्यांनी भिजलेला हा ओला लेख. पावसाचे वेड तर तसे सगळ्यांनाच आहे आणि तसेच पाऊसगाण्यांचेही. पण ब्लॉग मराठी असल्याने आणि मराठी भाषेवर आणि संगीतावर हिंदीहून जास्त प्रेम असल्याने आज केवळ मराठी पाऊसगाणीच ऐकुया. पावसावर कविताही असंख्य लिहिल्या गेल्यात पण त्यांची संख्या आणि उपलब्धता पाहता त्याच्यावर लिहिणे फारच कठीण आहे. म्हणून आपल्या आवडीची, मनोमनी रुजलेली व काही नवी पाऊस गाण्याची मैफिल आज ब्लॉगच्या दरबारी सादर करीत आहे. बालपणीचा पाऊस म्हटला कि सर्व प्रथम आठवणारे बालगीते म्हणजे - 'येरे येरे पावसा...' ज्या कुठल्या मराठी कुटुंबात हे गाणे पावसाकडे पाहून पालकांनी आपल्या चिमुकल्यांस शिक...

सिरीयल कीलिंग

आज मी एका गंभीर विषयावर लिहायचे ठरवले आहे. पोस्टच्या शीर्षकावरून तुम्हाला जर असे वाटले असेल की हे कुठल्या तरी सिरीयल किलर विषयी लिहित आहे तर तसे बिलकुल नाहीये. हा मुद्दा समस्त पुरुष वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मांडणे जरुरीचेच होते! तशाही स्त्रिया नेहमीच नवरोबांचे डोके खातात पण गेल्या काही वर्षात त्यांच्या डोक्यावर हे सिरीयलचे भूत बसले आहे तेव्हापासून पुरुषांना टी.व्ही. ही पाहायला मिळू नये हे अतीच होत आहे. या संदर्भात कोणी काही मोर्चे वगैरे पण काढत नाहीत. मला गेल्या कित्येक वर्षात मी असा निवांतपणे टी. व्ही. पाहत बसलोय असे आठवतच नाही. दुपारी सगळे झोपलेत आणि मी पिच्चर पाहतोय किंवा सगळेजण आपापल्या कामात आहेत आणि मी तासभर नुसतीच चॅनेलसर्फिंग करतोय हे फार मिस होतंय...पण हे सगळे सुखाचे क्षण आता पुन्हा मिळतील असे वाटत नाही. टी.व्ही.फेकून नाही दिलाय आमचा,पण बिघडलाय जरूर! गेली दहा वर्षे समस्त टी.व्ही.ना ही सिरीयल नामक कीड लागलीय पण 'जिच्या हाती रिमोट कंट्रोल, तीच करील पेस्ट कंट्रोल' असेच म्हणायची वेळ आली आहे. मी टी.व्ही.पाहायचो असे मी हल्ली बोलतो. नाहीतरी लॅपटॉप आहेच त...