झोप गेली उडून...
सुखाची झोप काही आमच्या नशीबी नाही...! लहानपणापासूनच माझे आणि झोपेचे संबंध अनिश्चिततेच्या झुल्याने बांधले गेले आहेत. मी जेव्हा जेव्हा प्रयत्नपूर्वक झोपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दर वेळीस डोळे 'आ' वासून झोपेला दूर दूर जाताना पाहिल्याचे मला आठवते. झोप ही अशी हळूवार क्रिया असल्याने मी डोळे घट्ट मिटून झोपण्याचा प्रयत्न करता न येणारी झोप अधिकच बेचैन करत राहते. मग शेवटी सुरू राहते ते केवळ विचारांचे चक्र आणि ते चालूच राहते... कधी कधी मला वाटते की माणूस विचार करत नसता तर कसे झाले असते? म्हणजे रात्रभर जागून ही जर डोक्यात काहीच विचार आले नसते तर मी नक्कीच एखादा साधू अथवा ऋषिमुनी झालो असतो. पण इथेच तर खरी गंमत आहे. माझ्या विचारांचे घड्याळ असे अविरत चालू राहिल्याने माझ्या कित्येक थोर विचारांचे श्रेय या न येणार्या झोपेलाच आहे. बर्याच कविता ही मी रात्री न येणार्या झोपेच्या भरातच केल्या आहेत. मग आई-बाबांना जाग येऊ नये म्हणून अंधारात चाचपडत एखाद्या कोर्या कागदावर खरडल्याही आहेत. ( काय लिहितोय हे दिसत नसताना ही !) हल्ली हल्ली मोबाईल आल्याने आता मोबाईल वरच कविता लिहीणे होते आणि शिवाय कित्य...