Facebook Twitter Delicious Stumble Upon
0 comments

महाशतकवीर

'वाट पाहुनी जीव शिणला' होता सगळा चाहत्यांचा पण तो सोनियाचा दिवस काही येतच नव्हता. गेल्या वर्षी आफ्रिकेविरुद्ध ९९चा आकडा गाठला आणि तेव्हापासून त्या १०० व्या महाशतकाची महाप्रतीक्षा सुरु झाली. मग सेमी फायनलला पाकविरुद्ध करणार, फायनलला वानखेडेवरच करणार, इंग्लंडला क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डसवर नक्कीच, त्याच्या आवडत्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध १०० टक्के असे करता करता १६ मार्च उजाडला आणि एकदिवसीय सामन्यात ज्याची पाटी कोरी होती त्या बांग्लादेश विरुद्ध 'महाशतक' लागले आणि तमाम क्रिकेटप्रेमींचे वर्षभराचे टेन्शन संपले.

सचिनबद्दल काही बोलायचे म्हणजे आपल्या क्षेत्रात कितीही ग्रेट असलो तरी आपण ह्या सागरातील एक थेंबही नाही असे वाटत राहावे असा त्याचा पराक्रम. तसे मी १ वर्षाचा होतो तेव्हापासून तो खेळतो आहे. २२ १/२ वर्षांची त्याची कारकीर्द, त्याचे वय, त्याचे कर्तृत्व पाहता मी त्याला सचिनजी किंवा सचिनसरच म्हणायला हवे पण इतका आदर असूनही त्याला हे असे संबोधणे माझ्या आणि माझ्यानंतरच्या पिढीलाही जमले नाही. आम्ही कायम त्याला सचिन, सच्चू आणि कधीकधी तेंडल्याही म्हटल्याचे आठवते पण त्यात अनादर करण्यापेक्षा त्याच्याविषयीचे प्रेमच जास्त असल्याचे जाणवते. ह्या प्रेमामुळेच आपण हक्काने त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि तो प्रत्येक वेळी शक्य नसले तरी सातत्याने त्या पूर्ण करत आला आहे. क्रिकेटविश्वात रसिकांचे इतके प्रेम लाखातून एका एकाच खेळाडूला मिळाले आहे आणि तो आपला मराठमोळा सचिन रमेश तेंडूलकर आहे.

आज सचिनच्या महानतेविषयी फार काही बोलायचे नाही. तो खेळाडू म्हणून, माणूस म्हणून कसा महान आहे. सचिन गुणांची खाण आहेच हे सांगायला त्याची यादी करायची आवश्यकता नाही. त्याचे परिश्रम, जिद्द, चिकाटी, निष्ठा या सर्व गुणांचा गौरव त्याच्या निवृत्तीच्या वेळी पुन्हा करूच. आज केवळ शतकांचा उत्सव. शतकांचे शतक ही अशक्यप्राय गोष्ट होती आणि पुढील किमान दशकभर तरी राहील.

इतक्या सातत्याने शतकांचा सपाटा लावण्याची किमया केवळ सर डॉन ब्रॅडमन करू शकत होते. त्यांचा वारसदार बनून त्याने हे शिखर गाठले. त्याचे समकालीन खेळाडू उशीराने आले आणि गेले सुद्धा, तो अजूनही आहे. तो थकला नाही आणि लोकही त्याचे कौतुक करताना थकले नाही. सचिनच्या शतकांच्या आठवणी चाहत्यांच्या मनावर इतक्या कोरल्या आहेत की जुन्या मित्रांना भेटल्यावर आठवणींना उजाळा देत अनेक स्मृतीदालने उघडावीत तसं सचिनच्या आठवणी निघाल्या की त्यांचं होतं कारण असे अनेक आनंद सोहळे त्याने दिले आहेत, अजूनही देतो आहेच.

अवघ्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनने सुरुवातीपासूनच सर्वांचे लक्ष वेधले होते. इंग्लंड दौऱ्यावर पहिले वहिले शतक वयाच्या १७ व्या वर्षी झळकावले आणि तेव्हापासून शतकांची रांग सुरूच आहे. विशेष म्हणजे पहिली चार शतके भारताबाहेरील मैदानांवर केली ते ही विशी ओलांडण्यापूर्वी. त्यातील दोन ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच राज्यात तेही वेगवान खेळपट्ट्यांवर. पर्थमध्ये केलेले ११४ हे अजूनही सर्वात कठीण शतकांपैकी एक गणले जाते. त्याच दौऱ्यात सिडनीला जेव्हा फिरकीचा जादुगार शेन वॉर्नने पदार्पण केले त्याला फटकावून शतक लावले होते. तेव्हापासूनच त्याने सचिनचा धसका घेतला असावा.

एकदिवसीय सामन्यातील पहिले शतक यायला वेळ लागला खरा (७९ सामने) पण ५० षटकांच्या खेळात सचिनची आकडेवारी इतर कुठल्याही फलंदाजापेक्षा सरस आहे. कसोटीत कदाचित सचिन इतकी शतके कुणी करेलही पण मर्यादित षटकांच्या खेळात हा विक्रम मोडणे अधिकच कसोटी पाहणारे आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता हे कित्येकांना माहित नसेल पण हाच खेळाडू नंतर एकाहून एक विक्रम प्रस्थापित करेल हे तेव्हा कुणाला माहिती होते. संपूर्ण क्रिकेट विश्वात सर्वाधिक विक्रम सचिनच्याच नावावर आहेत.

शारजा मधील शतकांचा उल्लेख नाही झाला तर मी सचिनला पाहिलेच नाही असे म्हणावे लागेल. शारजात सचिनने तब्बल शतके ठोकली आहेत. १९९८ च्या मोसमात ज्या वर्षी सचिनने सर्वोत्तम कामगिरी करत १२ शतके नोंदवली त्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या दोन शतकांचा समावेशही होता. लागोपाठ दोन सामन्यात वादळी खेळी करत सचिनने भारताला कप जिंकून दिला. आपल्या २५व्या वाढदिवशी सचिनने स्वत:च भारताला भेट म्हणून विजय मिळवून दिला. बिचाऱ्या शेन वॉर्नला स्वप्नातही सचिन दिसायचा म्हणे !

सचिनवर कायम टीका केली जाते की तो मॅच विनर नाही, त्याने शतक झळकावले की भारत हरतो तर त्यांनी हा रेकॉर्ड पाहावा. ज्या वेळीस सचिन चांगला खेळूनही भारत हरतो तेव्हा एकतर इतर फलंदाज हाराकिरी करतात किंवा गोलंदाज तरी प्रचंड मार खातात. भारताला सातत्यपूर्ण कामगिरी करणारे चांगले गोलंदाज न लाभल्याने सचिनच्या शतकांवर पाणी पडले तर हा त्याचा दोष नव्हता. १९९९ च्या चेन्नई कसोटीत पाकिस्तान विरुध्द १२ धावांनी पराभव पत्करावा लागला पण पाठदुखीचा प्रचंड त्रास होत असूनही त्याने १३६ धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा भारताला जिंकायला १६ धावा हव्या होत्या पण उरलेल्या ३ विकेट्स ४ धावांतच गेल्या आणि पराभव हाती आला. ज्या काही मोजक्या सामन्यात सचिनने शतक करूनही भारताला जिंकता आले नाही त्यापैकी हा एक.

सचिन परदेशात चांगला खेळत नाही असे कुणाला वाटत असेल तर कसोटीत ५१ पैकी २९ शतके परदेशात आली आहेत आणि एकदिवसीय सामन्यात देखील ४९ पैकी २९ शतके भारताबाहेर आहेत. २००४च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेले द्विशतक-(नाबाद २४१) फार महत्त्वाचे होते असे सचिनलाही वाटते. त्या आधीचा काही काळ तो फॉर्ममध्ये नव्हता आणि त्या खेळीत म्हणूनच फार संयम राखत तो खेळपट्टीवर उभा राहिला. त्या नंतर दोन महिन्यांनीच त्याला पाकिस्तान विरुद्ध पुन्हा एकदा द्विशतक करण्याची संधी आली होती पण कर्णधार द्रविडने डाव घोषित केला आणि सचिन १९४ वर नाबाद राहिला. त्या वेळेस याचा बराच गाजावाजा झाला पण संघहित लक्षात घेत त्याने कधीच या वैयक्तिक विक्रमाला महत्त्व दिले नव्हते आणि तेव्हाही नाही दिले. याचेच अजून एक उदाहरण म्हणजे १९९९ च्या विश्वचषकादरम्यान सचिनच्या वडिलांचे निधन झाले पण भारतीय संघाला आपली गरज आहे याची जाणीव ठेवत सचिन केनिया विरुद्धच्या सामन्यासाठी पुन्हा इंग्लंडला रवाना झाला आणि १४० नाबाद धावा करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली. क्रिकेटप्रती इतकी निष्ठा फार कमी खेळाडू बाळगतात त्यात सचिनचे नाव कायम मोजले जाते.

२००८ साली भारतात २६/११ च्या वेळी आतंकवादी हल्ला झाला आणि संपूर्ण भारतभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तेव्हा इंग्लंड विरुद्ध चेन्नई कसोटीत ४थ्या डावात शतक (नाबाद १०३) झळकावत ३८७ धावांचे लक्ष्य गाठले आणि दु:खात ही लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम त्याने केले. २२ वर्षाच्या कारकिर्दीत हे पुण्य त्याने अनेकदा कमावले आहे त्यासाठी प्रत्येक वेळेस त्याला शतक करण्याची ही आवश्यकता नव्हती.

२ वर्षापूर्वी असाच अशक्यप्राय विक्रम सचिनने केला तो ग्वालीयारच्या मैदानात द्विशतक (नाबाद २००) झळकावले. त्या खेळीत आफ्रिकन गोलंदाजांची इतकी धुलाई झाली की तसेही फेअरनेस क्रीम लावून गोरे झालेल्या गोलंदाजांचे चेहरे अधिकच पांढरे झाले. राजाच्या मुकुटाने राजाची कीर्ती अधिकच झळाळून उठली आणि सचिन नामाचा जप सर्वदूर पुन्हा चालूच राहिला. त्याच्याच काही महिन्यापूर्वी हैदराबाद मध्ये सचिनने १७५ धावांची तुफानी खेळी करत भारताला विजयाच्या दारात आणले होते पण शेवटी शेपूट गळाले आणि ३ धावांनी पराभव झाला. ३५० चे धावांचे लक्ष्य गाठताना निम्म्याहून अधिक धावा त्याने केल्या पण तरीही सामना गमावला आणि सचिनने शतक केल्यावर भारत हरतो हा परिणाम केवळ लक्षात राहतो लोकांच्या.


एकदिवसीय सामन्यात सचिनने १६० हून अधिक धावा ४ वेळा केल्या आहेत जिथे इतर अनेक महान फलंदाज एकदाच पोहोचू शकले आहेत. मोठी खेळी करण्याची जिद्द सचिनकडे आहेच पण मैदानावर टिकून राहण्याइतका संयमही आहे. विश्वचषकात देखील सर्वाधिक शतके सचिनच्या खात्यात जमा आहेत. एकदिवसीय सामन्यातील ४९ शतकांपैकी ३३ वेळा भारताचा विजय झाला आहे तर १४ वेळा पराभव झाला आहे. १ सामना अनिर्णीत तर एक बरोबरीत सुटला आहे. कसोटीत ५१ शतकांपैकी २० वेळा भारताचा विजय झाला आहे. २० वेळा कसोटी अनिर्णीत राहिली आहे तर केवळ ११ वेळा पराभव झाला आहे. म्हणजे १०० शतकांपैकी एक चतुर्थांश पराभव असेल तरी पण आपण सचिनला दोष द्यायचा का ?

सचिनचे टीकाकार सचिनवर या ना त्या कारणाने कायम टीका करत राहतीलच पण जो फलंदाज इतकी वर्षे सातत्याने भारताचा आणि क्रिकेटचा सन्मान वाढवत आला आहे त्याला पाठींबा देण्यापेक्षा त्याबाबत नकारात्मक बोलण्यात धन्यता वाटते तर तो त्यांचा दोष आहे. त्याच्या निवृत्तीची चर्चा २ वर्षापूर्वीपासूनच सुरु आहे त्यानंतरही त्याने द्विशतक केले, विश्वचषकात २ शतकांसह नवे विक्रम केले. शेवटी या शतकांच्या यज्ञातून महाशतकाची ज्वाला बाहेर आली आणि तिच्या तेजाने केवळ क्रिकेटविश्व नव्हे तर सारे जगच झळाळून उठले. अजूनही बोलण्यासारखे बरेच आहे, कायमच असणार आहे. ते त्याच्या पुढील विक्रमासाठी राखून ठेवू. या जादूगाराच्या पोतडीतून कधी काय बाहेर पडेल हे त्या (सचिन) देवालाच ठावूक.
14 comments

शाळा- पुस्तक, चित्रपट आणि बरेच काही

शाळेत गेलेल्या सर्वांसाठी...असे वाचूनच पुस्तकाची सुरूवात होते.

डोंबिवलीच्या सुखदेव नामदेव वऱ्हाडकर हायस्कूल या छोट्याश्या मराठमोळ्या शाळेत शिकणारा मुकुंद जोशी आणि त्याचे मित्र चित्रे, सुऱ्या आणि फावड्या ही कथानकातील प्रमुख पात्रे. आजची डोंबिवली ही शहर म्हणून विकसित झाली असली तरी ७०च्या दशकात तिचे स्वरूप खेडे म्हणूनच होते. शेतजमीन, डोंगर आणि बराचसा ग्रामीण मातीचा गंध सांगणारे वर्णन यात आपण सहज मागे खेचले जातो. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण ठिकाणी शिक्षण झालेल्यांनाच नव्हे तर शहरी भागात ही पूर्वीच्या मराठमोळ्या शाळांमधून शिकलेले विद्यार्थ्यांना देखील ती आपलीच शाळा वाटते.

शाळा ही म्हटली तर एक प्रेमकथा आहे म्हटली तर नाहीही. मुकुंदा जोशी हा या कथेचा नायक आहे आणि संपूर्ण पुस्तकात तो आपल्या अवतीभवतीचे शाळेचे व शाळेबाहेरचे विश्व आपल्यासमोर मांडतो. शिरोडकर ही या कथेची नायिका आहे पण ती ही केवळ मुकुंदाला आवडत असते म्हणून. प्रेमकथा यासाठी कारण मुकुंदा सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठेही, कधीही शिरोडकरच्याच विचारात बुडालेला. आपले प्रेम तिच्यापर्यंत कसे पोचवणार या चिंतेने कायम त्याच्या पोटात खड्डा पडलेला. पण या कथेलाच समांतर असे अनेक प्रवाह सुरु राहतात आणि ते कधीच या प्रेमकथेचा रसभंग करत नाहीत उलट सहजपणे त्याशी एकरूप होऊन जातात.

मिलिंद बोकील यांनी पुस्तकात कुठेही बोजड, काव्यमय किंवा लेखन शैलीचा छाप पाडणारे लेखन केले नाहीये. बोलीभाषेचा वास्तवाइतकाच स्पष्ट वापर तोही अगदी आपल्या मनातले काहीतरी बोलल्यासारखा. ते एक नववीतल्या मुलाचे विचार वाटावे इतके सहज, सुंदर लिहिले आहे. मुकुंद जोशी जो नववीतला विद्यार्थी आहे त्याला आजूबाजूला दिसणाऱ्या, नव्याने कळणाऱ्या आणि काहीवेळा न कळणाऱ्या गोष्टी त्यांनी या कथेत गुंफल्या आहेत. मुकुंदाचे विचार हे निरागस वाटत नाहीत, ते स्पष्ट वाटतात. काही खास शब्द आणि वाक्प्रचार पुन्हा पुन्हा वापरण्यात आले आहेत ते फारच गोड वाटतात. जसे सुममध्ये राहणे, इमानदारीत असणे, आडीबाजी करणे, डाउट खाणे वगैरे. त्या वयात आपल्याला आता सगळे काही कळते अशी जी आपली भावना असते आणि तसे असूनही ज्या काही चुका होत राहतात त्यातून हळूहळू शिकत जाण्याची वृती हे नेमके टिपले आहे.

कथानकात मुळातच एक हवाहवासा वाटणारा निवांतपणा आहे. कथानक बऱ्याच संथपणे जाते पण कुठेही कंटाळवाणे होत नाही. ते जितक्या निवांतपणे वाचू लागतो तसे हळूहळू ग्रामीण मातीचा गंध, पक्ष्यांचा किलकिलाट, कोवळ्या उन्हाचा स्पर्श जाणवतोय असे वाटू लागते. मुकुंदाला शिरोडकरच्या प्रेमात पडल्यापासून बाकी जगापासून दूर गेल्यासारखे वाटते आणि त्याचे केवळ तिच्यातच त्याचे हरवून जाणे जसे आहे तसे पुस्तक वाचताना आपल्याला होते. वाचकास आपल्या शाळेची आठवण होणार नाही असे शक्य होणार नाही कारण कुठे ना कुठे शाळेत गेलेल्या त्या प्रत्येकास ते कथानक जवळचे वाटते. तीन दशकांपूर्वीची गोष्ट असूनही ती आजच्या पिढीलाही तितकीच जवळची वाटते यातच लेखकाचे आणि पुस्तकाचे यश आहे.

पुस्तकाच्या बाबत लिहायला गेलो तर काय काय आणि किती लिहू असे आहे. उल्लेखनीय म्हणावे असे अनेक प्रसंग आहेत. कुमारवयात मुलांना वाटणारे लैंगिक आकर्षण, त्याचे चावट संवाद आणि या साऱ्या बाबत त्यांचा विचार करण्याचा दृष्टीकोन हा म्हटले तर सगळ्यांनीच आपापल्या बालपणी अनुभवला असेल पण तो नेमका उतरलाय पुस्तकात. बाटली फुटण्याची भीती, नायकिणीच्या गोष्टी, गंगू कुठं गेलीचे गाणे हे सारे वाचताना सगळे जुनेच संदर्भ वेगळ्या रूपात जाणवतात. त्याच वेळेस आणीबाणी म्हणजे काय, त्यांच्याच चाळीत केला जाणारा जातीभेद, तत्कालीन समाज आणि समज हे सगळे वेगवेगळे विषय ही गुंता न करता गुंफले गेले आहेत. 'लाईन देणे' याबाबत तर काळानुरूप त्याचे नामकरण झाले फक्त पण मुलं-मुली शाळेतच लाईन द्यायला-घ्यायला, किमान हा प्रकार काय ते तरी शिकतात, त्यासाठी कॉलेजची पायरी चढावी लागत नाही. शाळेतल्या शिक्षकांच्या जोड्या लावणे, त्यातील काही आवडते असणे, काही नावडते असणे. त्यांच्या लकबी, स्वभाव अगदी हुबेहूब. मुख्याध्यापक आणि त्यांची खोली तंतोतंत.



चित्रपटाबाबत बोलायचे तर पुस्तकामुळे अपेक्षा फार वाढलेल्या. त्यात पुन्हा वेळेची मर्यादा त्यामुळे सगळेच काही २ तासात मांडता येणे शक्य होत नाही. पण दिग्दर्शक सुजय डहाके यांनी ते शक्य तितक्या चांगल्या परीने मांडले आहे. चित्रपट पाहताना असेही वाटते की हा पुस्तकावर बेतलेला नसता तर कदाचित दिग्दर्शकास अधिक स्वातंत्र्य मिळाले असते. नावाजलेल्या पुस्तकावर चित्रपट निर्माण करण्यात मोठी अडचण म्हणजे वाचकांना पानोपानीचे संवाद आणि संदर्भ सगळे पाठ असतात. त्यात कुठेही बदल घडला तरी तो रुचत नाही आणि मग या सगळ्या प्रक्रियेत अनेक बंधने आपसूकच येतात.

पात्र निवडीत जोशी, शिरोडकर, सुऱ्या, फावड्या, चित्रे, आंबेकर, सुकडी, बिबीकर, बेंद्रे बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, आप्पा, अंबाबाई, नरूमामा सगळे अचूक. काही पात्र दाखवली गेली नाहीत ते अपेक्षित होतेच. काही प्रसंग गाळले तेही अपेक्षित होतेच. रांगोळीच्या डब्यात सर्व रंग असावेत पण स्पर्धेत मोजकेच रंग दिले जातील असा नियम असल्याची जाणीव ठेवून रांगोळी काढली आहे, ती विलक्षण सुंदर झाली आहे पण अपेक्षा इतक्या आहेत की चित्रपट याहून सुंदर झाला असता तरी समाधान झाले नसतेच.

जोशी आणि शिरोडकर कायम लाईमलाईट मध्ये राहतात कारण जोशी चित्रपटाचा नायक आहे आणि जिथे जोशी आहे तिथे कायम त्याची मनी-ध्यानी शिरोडकरही आहेच. अंशुमन जोशीने मुकुंद जोशी उत्तम साकारलाय. त्याचे संवाद आणि देहबोली अगदी खरीखुरी वाटते. केतकी माटेगावकर शिरोडकर म्हणून प्रचंड गोड दिसते. तिचे बोलके आणि सुंदर डोळे तिच्या संवादांची जागा भरून काढतात. फावड्या आणि चित्र्या पण मस्त. चित्र्याला वाव कमी मिळालाय. पुस्तकात बिबीकर जरी भाव मारू असला तरी चित्रपटात मात्र भाव खाल्लाय तो सुऱ्याने ! तो अगदी अस्सल वाटतो. जोशी म्हणतो त्याप्रमाणे मुलांचे जसे वेगवेगळे संच असतात त्या संचात हा मस्तीखोर मुलांच्या संचात पहिला येणारा. सगळ्या शाळांत असले अवली विद्यार्थी असतातच त्यामुळे प्रत्येकाला कुणाच्या ना कुणाच्या रूपात तो आठवतोच.

चित्रपटात काही खटकलेल्या गोष्टीही आहेत. सहलीच्या वेळेस जेव्हा सगळे विद्यार्थी शेकोटी भोवती बसलेले असतात आणि शिरोडकर सगळ्यांच्या नजरा चुकवून जोशीच्या दिशेने एक चॉक्लेट टाकते. पुस्तकात स्पष्टपणे लिहिले आहे की ती 'रावळगाव'चे चॉक्लेट त्याच्या दिशेने टाकते पण इथे मात्र 'पारले'चे वापरण्यात आले आहे. असा बदल जाणीवपूर्वक आहे की नाही ते दिग्दर्शकास ठावूक पण ते पाहता क्षणी लगेच लक्षात आले. शिवाय केटी, अशोक आणि विजयच्या खोलीत 'चे गव्हेरा'चे चित्र असलेला कॉफी मग आहे. त्या काळी तसे प्रिंटेड मग उपलब्ध होते की नाही याबद्दल शंका आहे.

चित्रपटात शेवट बऱ्याच घाईघाईत आटोपता घेतला आहे. पुस्तकाच्या शेवटी वाचताना जी पायाखालची जमीन सरकते आणि जोश्याबरोबरच आपलेही मन गलबलते ते तसे चित्रपटात होत नाही. तो अधिक परिणामकारक करता आला असता. पुस्तकाचा शेवट मात्र अगदी काळजाला हात घालणारा आहे. सगळे काही इतके सुरळीतपणे चाललेले असताना असे काही होईल असे अपेक्षितच नसते. शेवटचे पान बंद केले आणि त्या बाहेर पडून जरा विचार केले तर वाटते की जोशीच्या बाबत जे झाले ते इतकेही काही भयानक नाही आहे. कदाचित आणखी काही वर्षांनी तो इंजिनियर झाला असेल. त्याच्या आयुष्यात शिरोडकरच्या जागी दुसरी कोणी आली असेल. नवीन मित्रही भेटले असतील. पण त्या वयातील आपले दु:खाचे प्रसंग आठवले तर वाटते की त्याहून अधिक वाईट काही होऊ नाही शकत.

वारंवार टाळायचे ठरवूनही तुलना होत राहते. दोघांची तुलना करायची म्हटली तर असे म्हणता येईल की शाळा पुस्तक म्हणजे सचिन तेंडूलकरची एखादी उत्कृष्ट जमलेली खेळी आहे आणि चित्रपट त्याच्या काही निवडक क्षणांची हायलाईट्स. त्यातील महत्वाच्या घटना आणि प्रसंग हे चौकार, षटकार असतील पण सचिनने काढलेल्या एकेरी आणि दुहेरी धावा ही तितक्याच आकर्षक आणि नजाकतभऱ्या आहेत. त्या अनुभवायच्या असतील तर पुस्तकच उघडायला हवे. जे चित्रपटात मांडले आहे ते सुंदर आहे पण ज्यांनी पुस्तक वाचले आहे त्यांचे यावर समाधान होणार नाही हे तितकेच खरे आहे.

विशेष कौतुक म्हणजे चित्रपटाने पुस्तकाच्या प्रसिद्धीचा आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मचा उत्तम वापर केलाय. मराठी चित्रपटाच्या भवितव्याच्या दृष्टीने ही फार चांगली गोष्ट आहे कारण मार्केटिंगच्या बाबत मराठी सिनेमा मागेच पडायचा कायम. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने बरेच पुरस्कार मिळवले आहेत. 'माउथ पब्लिसिटी' ही प्रचंड जोरात चालली आहे. पण याबाबत माझी अशी इच्छा आहे की या पुस्तकावर एखादी मालिका बनवता आली तर त्या कथानकाला योग्य न्याय देता येईल. चित्रपट केल्याने मराठी चित्रपट सृष्टीला दर्जेदार चित्रपट मिळाला खरे पण टी.व्ही. मालिकांना ही या निमित्ताने एक चांगली मालिका मिळाली तर सुजाण प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच ठरेल.

जाता जाता, नुकतीच पाहण्यात आलेली शाळा सिनेमाची शीर्षकांची पाटी वर शेअर केली आहे. काळा फळा आणि पांढरा खडू एवढेच साहित्य वापरून बनवलेले हलते चित्र जणू आणि चित्रपट पाहताना खास लक्षात राहिलेली मधली सुट्टीची पाटी. आता तुम्हीही लवकरात लवकर शाळेत दाखल व्हा आणि जुन्या स्मृतींना उजाळा द्या. आम्ही तर पुन्हा पुन्हा जाणार आहोत. शक्य असल्यास शाळेच्या मित्रांसोबतच पाहा.

11 comments

अस्वच्छ भारत

समस्या तर तशा खूप आहेत जगात. सगळ्याच काही माणसाला वैयक्तिक पातळीवर सोडवता येणे शक्य नसते. पण माणूस प्रयत्न करू शकतो आणि खासकरून तेव्हा, जेव्हा या समस्या त्याच्याच चुकांमुळे उद्भवल्या असतील.

मुंबईसारख्या शहरात कधी घराबाहेर पडलो आणि डोक्यातील इतर सर्व विचारचक्रे थांबवून कधी आपल्या शहराचे निरीक्षण केले तर लक्षात येईल कि जिथे-तिथे कचराच कचरा आहे. कचरा जो लक्ष नसेल तर दिसत नाही पण पाहिले तर सगळीकडेच आहे. वैचारिक कचऱ्याच्या गोष्टी नाही करत मी, भौतिक कचराच आहे आणि तो टाकणारेही आपणच. रस्ते पहा, इमारती पहा, भिंती पहा आणि जिथे कचरा टाकू नये असे लिहिले आहे तिथेही माणूस जिवंत असल्याच्या खुणा तो उमटवत जातोच आहे. पान थुंकू नये लिहिले असेल तर तिथेच पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगकाम आढळते. पोस्टर लावू नये लिहिले तर ते जुने पोस्टर काढले तर त्याखाली लिहिलेले सापडते. तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही निर्लज्ज आहोत!

बसचे वा ट्रेनचे तिकीट, चॉक्लेटचे कागद, सिगारेटचे पाकीट, वेफर्सचे रॅपर्स, रिकाम्या बाटल्या ( दारुच्याही), प्लास्टिक पिशव्या....सगळ्या चीजवस्तू काम झाले की निसर्ग नावाच्या कचरापेटीत ! इतका बेजबाबदारपणा ? इतकी बेफिकिरी ? इतके असंस्कृत का आपण ? आपलेच शहर, आपलाच देश आपणच खराब करतो आणि वर अपेक्षा करतो की सरकारने आपले शहर स्वच्छ राखावे. सरकारही जबाबदार आहेच म्हणा याला. स्वच्छता या अति महत्त्वाच्या बाबीकडे कुणाचे लक्ष नाही. जनतेच्या मूलभूत गरजांमध्ये स्वच्छ सुंदर परिसर केवळ पुस्तकात शोभण्यासारखा आहे.

स्वच्छता मोहीमपण एखाद्या अपवादात्मक गावामध्ये घडते तेही कुण्या समाजसेवकाच्या पुढाकाराने. नगरसेवक निवडून येतात, आश्वासने देतात पण आपला विभाग स्वच्छ ठेवण्याचेही आश्वासन देतात का ते? देत असतील तर त्याची अंमल बजावणी करणे विसरत असतील मग आपल्या कामाच्या व्यापात ! मध्यंतरी वाचण्यात आले की गेल्या वर्षाप्रमाणे येत्या महिन्याभरात वार्षिक नालेसफाई सुरु करण्यात येईल. अर्थात नाले ही काही स्वच्छ राखण्याची आवश्यकता वर्षातून एकदाच कशी वाटते. जे कायम डम्पिंग ग्राउंड म्हणून वापरण्यात येते, रोगराई आणि दुषित पर्यावरणाचे कारण बनते ते कायम स्वच्छ नाही का ठेवता येत ? प्लास्टिक पिशव्यांमुळे नाले तुंबतात आणि पावसाळ्यात पंचाईत होते पण चालेल आम्हाला...

रेल्वेने प्रवास करत असाल तर नुसतीच दारात उभे राहून हवा खाण्यापेक्षा कधी रेल्वे ट्रकच्या बाजूचा परिसर पहिला तर दिसेल की मुंबईत सर्वत्र बकाल वस्ती आणि गलिच्छ परिसर आहे. मला हिंदी सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या परदेशातील रम्य स्थळांची चित्रे डोळ्यापुढून गेली, तिथले लोक इथे आल्यावर काय म्हणत असतील...? तरी कौतुकाने फोटो काढतात त्याचे ! त्यात येता-जाता खाड्या दिसल्या की निर्माल्य टाकायला हात जास्तच सरसावतात...देवपूजेचे निर्माल्य असे पाण्यात टाकून घाण वाढवण्यापेक्षा कचऱ्यात टाकलेले चांगले. धार्मिकदृष्ट्या पाप नाही लागायचे पण सामाजिकदृष्ट्या पुण्य तरी मिळेल.

दिवाळी झाली की पहा सर्वत्र फटाक्यांचा कचरा असतो...पिकनिकला जायचे आणि तो सुंदर परिसर घाण करायचा...स्वातंत्र्य दिनी झेंडे मिरवायचे आणि ते मातीत मिळतील याचीही खात्री बाळगायची. कुणाला असे कचरा टाकताना अडवू पाहिले तर ते तुमच्या इज्जतीचा कचरा करू पाहणार...'तुमच्या बापाचं काय जातं म्हणे ?' जागोजागी थुंकायची तर लोकांना एवढी सवय झालीये की जणू सरकारने तरतूद केली आहे थुंकण्याची. कचरा सर्वत्र टाकतो कारण आम्ही टॅक्स भरतो ना...सफाई कामगार आहेत कचरा उचलायला. चुकून एखाद्याला आपल्या चुकीची जाणीव होईल पण आपण प्रयत्न नाही सोडायचे.

स्वच्छता पाहण्यात येते ती फक्त कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये कारण तिथे अमुक एका मालकाच्या हाती सत्ता असते, बिझिनेसमध्ये पाश्चिमात्य देशांकडून आलेली स्वच्छतेची, शिस्तीची, टापटीपपणाची परंपरा स्पर्धेत टिकायला हवे असेल तर जपायलाच हवी म्हणून. अन्यथा भारतातील पारंपारिक व्यवसाय कुठे इतके नियम आणि मॅनर्स पाळायचे. इतका मोठा देश लोकशाही तत्वावर चालवायचा तर त्याची प्रांतवार विभागणी आणि त्या त्या प्रांताची जबाबदारी सांभाळणारे सरकार निवडून देण्यात यावे याच अनुषंगाने राज्यघटना लिहिली असावी ना...पण देशाच्या प्रगतीपेक्षा आपला खिशा कसा भरायचा याची अधिक चिंता म्हणून जिथे 'जाऊ तिथे खाऊ' आणि त्याचे परिणाम म्हणून स्वत:ची मुले सुद्धा याच अस्वच्छ परिसरात वाढणार आहेत हे सर्रासपणे विसरत आहेत.

आपली संस्कृती म्हणून ओळख असणारे किल्ले, प्रेक्षणीय स्थळे तर 'बंटी' लव्स 'बबली' अशा प्रेमवीरांच्या हस्तकलांनी बरबटली आहेत. माझे तिच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला कळले पाहिजे...संस्कृती गेली खड्ड्यात ना ? काय फरक पडतो नाव लिहिले तर...फरक पडतो ना...कुण्या एकाच्या बिनडोक कृत्त्यांनी देशाची लाज जाते पण त्याची पर्वा नाहीच त्यांना. स्वातंत्र्य म्हणजे काय ? त्याची किंमत काय? आणि आज या अशा मनमानी स्वातंत्र्याला आला घालायचा तर इंग्रजी शासनच हवे. त्यांच्या गुलामीत वाढले असते तर इतका माज चढला नसता, नाही का?

या सर्व बेशिस्त कारभारावर कायद्याने दंड करणे हा एक उपाय फक्त डोळ्यापुढे दिसतो. आता काहीजण म्हणतील यातही नेमलेला अधिकारी पैसे खाईल पण १०० ऐवजी २० रुपये जरी द्यावे लागले तरी ते काही कुणाला आवडणार नाहीच. म्हणून हा नियम अतिशय आवश्यक आहे पण सरकारला केव्हा जाग येणार ठाउक नाही. काही ठिकाणी हा नियम सुरु आहे देखील, परिणाम नाही पण !मध्यंतरी क्लीन-अप मुंबई मोहीम आली होती त्याचे काय झाले ? माहित नाही. मला तरी अजूनही सर्वत्र कचरा दिसतोच आहे याअर्थी मोहीम थंडावली आहे एवढे नक्की, की बंद पडली ? स्वच्छता मोहीम ही संघटनांमार्फत न होता सरकारमार्फत व्हायला हवी तरच लोकांना शिस्त लागेल. काही लोकांचा गट कचरा उचलणार आणि बाकीचे परत टाकणार तेव्हा तो उचलला जाईल आणि परत कुणी टाकणार ही नाही अशी खबरदारी घ्यायला हवी. 

मला माझी मुंबई स्वच्छ आणि सुंदर हवी आहे. मला माझा देश स्वच्छ आणि सुंदर हवा आहे आणि ती फक्त माझी वैयक्तिक जबाबदारी नसून आपली सामुहिक जबाबदारी आहे तेव्हा तुम्हीही शक्य असेल तिथे कचरा न करण्याची प्रतिज्ञा करा आणि इतरांनाही याची जाणीव करून द्या.
6 comments

पत्रास कारण की...


शेवटचं पत्र केव्हा आलं होतं काही आठवत नाही पण बरीच वर्षे झाली असावीत. बहुतेक विसाव्या शतकातच आले असेल. तेव्हापासून पोस्टमनकाका, पोस्टाचे पाकीट, पोस्टाची तिकिटे काहीच पाहण्यात नाही. तरी त्या मानाने माझ्या (तरुण) पिढीने पत्रे फार काही पाहिलीच नाही. आमची लहान होतो तेव्हाच काय ती पत्रे पाहिली. जसे मोठे झालो तशी पत्रे हळूहळू कमीच झाली आणि मग एकदम साक्षात्कार झाला...पत्र हरवलं कुठे ?

पत्र कारभाराचा इतिहास चाळला तर कळले की इंग्रजांनी १६८८ मध्ये (आमच्या!) मुंबईत देशातील पहिले टपाल कार्यालय सुरु केले. पूर्वी संदेशवहनासाठी म्हणून निर्मिलेले हे दळणवळणाचे साधन हळूहळू जिव्हाळ्याचे झाले. लोक आपल्या प्रियजनांना आपले क्षेम कुशल पत्राद्वारे कळवू लागले आणि त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत पत्रांच्या वाटेकडे डोळे लावून बसले.

पत्रांमध्ये कित्येकांच्या भावना गुंफल्या जात. पत्र लिहायचे तर एकजन लिहिणारा पण त्यात सर्वांचे निरोप, काळज्या, आपुलक्या यांचे मिश्रण होई. पत्र वाचणे हा तर आनंद सोहळाच ! कुणी तरी आपली प्रयत्नपूर्वक आठवण ठेवून, वेळ काढून ( तेव्हा लोक इतके बिझी नव्हते म्हणा! ) आपल्याला पत्र लिहिले आहे याचेच किती कौतुक. पत्र वाचायचे तर घरातील शक्यतो नव्या पिढीच्या मंडळींनी आपल्या अशिक्षित पण जाणत्या वडीलधारया मंडळींस वाचून दाखवावे. दीड पानाच्या पत्रात काय तो मजकूर मावायचा पण त्यात सर्वांची खुशाली वाचून जो दिलासा मिळायचा तो हल्ली सहजासहजी शक्य असणाऱ्या संपर्कातून लोप पावत चालला आहे.

गेल्या दहा वर्षात पत्रांच्या दळणवळणात ७२ टक्क्यांनी घट झाली आहे असे वाचण्यात आले. सर्वत्र आधुनिकतेचे वारे वाहू लागल्याने जिथे-तिथे लोकांच्या खिशात मोबाईल खणखणू लागला आहे. हल्ली तर मोबाईलपेक्षा नेटवर ऑनलाइन भेटीगाठी होत असल्याने टपाल खाते 'बुडित खाते' झाले आहे. हल्लीच्या अभ्यास क्रमातून 'पत्र लेखनाचे' धडे दिले जातात की नाही याबद्दल मला शंका आहे आणि दिले तरी प्रत्यक्षात कोण लिहिणार ते ?

इतिहास अभ्यासकांना ऐतिहासिक पत्रांचा अभ्यास करायची संधी मिळत असते. शिवाजी महाराजांची पत्रे, तसेच स्वातंत्र्य संग्रामात काही थोर लोकांची दुर्मिळ पत्रे आता एखाद्या संग्रहालयात जपून ठेवली जातात. पुढील काही वर्षात साधे पोस्ट कार्ड सुद्धा दुर्मिळ म्हणून गणले जाईल पण तेव्हा या पत्रांना विचारणार कोण ?

टपाल खात्यावर तर आपल्या 'पुलंचेही' प्रेम एवढे की 'माझे पौष्टिक जीवन' सांगताना वाचकांना अगदी पोस्ट हापिसात नेऊन बसवले आहे. टपाल खात्याचे वेगळेपण, त्याचा स्थायीभाव आणि पत्र व्यवहाराचा त्या काळी असणारा प्रभाव पुलंनी जो वर्णिला आहे त्याच टपाल खात्याची आज झालेली दयनीय अवस्था पाहून 'पुल'देखील हळहळले असते.

पत्रांची महती सांगणारी कित्येक गाणी जुन्या पिढ्यांनी गायली. 'ये मेरा प्रेमपत्र पढकर' ,' चिट्ठी आयी है', 'संदेसे आते है', 'कबूतर जा जा...' यां गाण्यांनी पत्रांना सिनेसृष्टीत स्थान दिले. प्रेमपत्र लिहायला प्रेमवीरांना उद्युक्त केले ते या रंगीत दुनियेनेच ! प्रेमपत्रास अधिक गुलाबी छटा देत त्याला ग्लॅमरही मिळवून दिले.

आता ई-मेल, मोबाईल, एसएमएस, इंटरनेट यामुळे कोण पत्र लिहिण्यात वेळ दवडतो. जग एका हाकेच्या अंतरावर आले आहे मग पत्र 'आउट डेटेड' होणार नाही तर काय? पोस्टाची तिकिटे जमवण्याचे छंद जुने झाले नाही का? आईचं पत्र हरवलं हा खेळ सध्याच्या पिढीस माहिती आहे का? की तो काळाच्या ओघात नाहीसा होणार आहे...पत्रासारखाच !
8 comments

फेसबुक चाट

संध्याकाळचे ७.३० वाजले आहेत.
मी ऑफीसमधून घरी येऊन लॅपटॉप उघडतो आणि फेसबुक लॉग-इन करतो.

पाहतो तर ४ नवीन फ्रेंड रिक्वेस्ट्स, ६ मेसेजेस, ४५ नोटीफिकेशन्स आणि २५ जन ऑनलाइन !

माझ्या भिंतीवरचे अपडेट्स पाहायला सुरूवात करणार तोच...

प्राची: हा....य!!
मी: हेल्लो...!
प्राची: कसा आहेस? (नेहमीचाच प्रश्न- काही जणांच्या फेसबुक प्रोफाइल मध्ये हा डिफॉल्ट चॅट सेव झालाय का?)
मी: एकदम मजेत...तू कशी आहेस?
प्राची: आहेस कुठे तू? भेटत नाही, फोन पण नाही.
मी: कामं आहेत ग...बिझी असतो आजकाल [:P]
प्राची: माझ्यासाठी पण वेळ नाहीये का?
मी: तो कसा नसेन...उलट तू ऑफीस सोडल्यापासून बोर होतंय ऑफीसमध्ये...[;)]
प्राची: खरंच?

अनघा: हाय स्वीटहार्ट....:) 
मी: हाय डियर... :) (अजुन एक आली!) 
अनघा: कसा आहेस ? [:P] 
मी: एकदम मजेत (पुन्हा तेच...!) 
अनघा: मला वाटले विसरलास मला...:( 
मी: शक्य आहे का ते ? [:D] 
अनघा: काय करतोस सध्या? कॉलेज मधले फ्रेण्ड्स भेटतात का कोणी? 
मी: तुझ्याखेरीज कोणीच नाही...तुलाच तेवढी आठवण होते माझी [;)] 

प्राची: हेल्लो...कुठे हरवलास...? 
मी: अग इथेच आहे...म्हणजे हरवलो होतो तुझ्या स्वप्नात (!) 
प्राची: हो का? जागेपनी स्वप्न पाहु नयेत अशी...
मी: मग झोपायला जातो मी...[:P] 
प्राची: ए...थांब रे...बर सध्या काय करतोयस मग...? 
मी: तुझाच विचार करतोय...[!] 

अनघा: कसला विचार करतोयस...? 
मी: तुझाच विचार करतोय...[!!] 
अनघा: मला वाटले गेलास... 
मी: तुला न सांगता कसा जाईन बरे...? 

प्राची: त्यापेक्षा कामाचा विचार कर... 
मी: ( तू अर्धवट टाकून गेलेल्या....?) ते तर करेनच... 

अनघा: सन्डे ला काय करतोयस? मूवीला जाऊया? 
मी: चालेल... 
अनघा: मी वाशीला येणार आहे एका मैत्रिणीकडे...संध्याकाळी भेटू... 
मी: चालेल... 
अनघा: आणि मला शॉपिंग पण करायची आहे नंतर 
मी: (अरे देवा) चालेल... 

प्राची: काय? 
मी: काय? 
प्राची: आता काय? 
मी: कामाचा विचार करतोय! 

केतकी: हाइइइई.........:) 
मी: हाय डियर....( ही एक अजुन आली...) 
केतकी: हाउझ यु? 
मी: F9... 

केतकी likes your profile pic

मी: थॅंक्स 
केतकी: छान आहे... 
मी: थॅंक्स [;)] 
केतकी: तुझी त्या दिवशीची कविता पण मस्त होती... 
.
.
.
.

प्राची/ अनघा: अजुन कोणी आहे का चॅटवर...? 
मी: नाही ग...नेट स्लो आहे.... 

प्राची: बोर होतंय यार... 
मी: तेच ना....[:o] 
प्राची: कधी भेटतोयस मग? 
मी: तू बोलशील तेव्हा...आता येऊ ? (हो बोलू नकोस फक्त) 
प्राची: आता कुठे? त्यापेक्षा सन्डेला भेटू...
.
.
.
.

मी: आवडली तुला ? 
केतकी: हो...कोणासाठी केली आहे? 
मी: [तुझ्याचसाठी!] अशीच केली...कुणाला स्पेशली डेडिकेट नाही केली. 

अमित: नमस्कार... 
मी: ( हा कुठून टपकला आता?) बोला साहेब...! 
अमित: काय चाललाय राव? 
मी: तुझ्यासाठी वहिनी शोधतोय...! 
अमित: अजुन? 
.
.
.
.


मी and प्रियांका जोशी are friends now

अनघा: ही प्रियांका कोण रे? 
मी: नवीन गर्लफ्रेंड... 
अनघा: तुझी? 
मी: नाही ग...अभीची... 
अनघा: हो...? स्वातीशी ब्रेक-अप झाले त्याचे? 
मी: असेल...फेसबुक वर काही दिवस सिंगल होता तो... 

मी: सन्डेला नको...फॅमिलीबरोबर बाहेर चाललोय... 
प्राची: मग कधी...? 
मी: शनिवारी भेटू ना...मी ठाण्याला येणार आहे काही कामासाठी...ऑफीस सुटल्यावर भेटू! 
प्राची: ग्रेट...! 
मी: आहेच मी...[;)] 

अमित: आम्हाला शोधा की एखादी...? 
मी: वहिनी का गर्लफ्रेंड ? 
अमित: ते सोड...अरे...माझ्यासाठी जॉब शोधनार होतास ना रे... 
मी: प्रयत्न चालू आहेत... 

केतकी: आपण नेहमी ऑनलाइनच भेटतो ना...कधी भेटूया ना वेळ काढून 
मी: ह्म.... 

अनघा: अभीची कितवी गर्लफ्रेंड असेल रे ही...? 
मी: (तुला काय करायचेय त्याचे?) मला काय करायचेय त्याचे...? 
अनघा: पक्का फ्लर्ट आहे तो... 
मी: (माझ्यापेक्षा कमीच) हो ना....पण मी तसा नाहीये.... 
अनघा: माहितीये मला... 

बराच वेळ विचार करून....

केतकी: एक विचारू ? 
मी: (पडली वाटते प्रेमात !) काय ? 
केतकी: तुला गर्लफ्रेंड आहे? 
मी: दोन आहेत ! [:D :D :D ] ( कधी नाही ते खरे बोललो...!) 
केतकी: [:( :( :( ]मी सीरियसली विचारतेय... 
मी: मी मस्करीत बोलतोय!! 
केतकी: मग सांग ना खरे काय ते...? 
मी: आय अम सिंगल [इश्श्य!] 

अमित: लवकर दे ना यार...इथे कंटाळा आलाय पार.... 
मी: मग मी काय करू?

अमित: जॉब दे ना यार...
मी: जास्त डोकं नको खाऊस...(निघ आता) 


प्राची/ अनघा: परत गायब? 
मी: {जास्त डोक नको खाऊस...निघ आता} लॅपटॉप हॅंग होतोय...(ओवरलोड होतोय...!) 

केतकी: मग काय विचार आहे? 
मी: बघुया कोणी भेटतेय का? 

अमित: अरे तुझ्याशिवाय कोण मदत करणार यार? 
मी: (साईन आउट हो.....)??? 

(ह्या अम्याच्या प्रोफाइल मध्ये ही 'नेहा साने' कोण? सीम्स इंट्रेस्टिंग...! गुड प्रोफाइल)

मी: अरे देतो रे...टेन्शन नको घेऊ... 

मी: ओके मी निघतो आता... 
मी: ओके मी निघतो आता... 

सोनल: हाय....! 

मी: तुला नाही का बॉयफ्रेंड...? 
केतकी: ना...अजुन कोणी आवडलाच नाही 
मी: मिळाल्यावर सांग मला... 
केतकी: नक्की... 

अनघा: चाललास पण? ओके...पण सन्डेचे नक्की! 
मी: नक्की... 

प्राची: ठीक आहे...मिस मी ओके... 
मी: नक्की... 

सोनल: आहेस का रे..? 
मी: ( )

अमित: थॅंक्स यार...तू ही तो मेरा दोस्त है... 
मी: आय नो.... 

अनघा: लव यु...मिस यु <3 
मी: लव यु अनु <3 

मी: लव यु अनु <3 
प्राची: अनु? 
मी: जानु...! जे राहिला लिहायचा...[:P] 
प्राची: अच्छा....लव यु...<3 

केतकी: (पुन्हा बराच वेळ विचार करून) बाय...टेक केअर...सी यु सून 
मी: लव यु.... 




माय फ्रेंड...:) 
केतकी: <3 

सोनल: ????? 
अमित: अरे ऐक ना...! 

मी फेसबुक साईन आउट करतो.

तळटीप: वरील सर्व नावे आणि व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत आणि संभाषणातील मी म्हणजे 'वाचणारा मी' आहे 'लिहिणारा मी' नाही. 
2 comments

बालपणीचा खेळ सुखाचा


या विषयावर तसं या पूर्वी बऱ्याच जणांनी, बऱ्याच ठिकाणी लिहिले आहे पण तरीही मी पुन्हा लिहिणार आहे. एक तर ही पोस्ट लिहायची असे दीड वर्षापूर्वीच सुचले होते आणि तेव्हापासून मोडक्या-तोडक्या अवस्थेत ती ब्लॉगच्या अडगळीच्या ई-पानात बंद होती आणि काही केल्या लिहायचे होते पण जमत नव्हते. शिवाय लहानपणीचा विषय निघाला आहे तर तेव्हा एखादी गोष्ट तो करतो म्हणून मी पण करणार या त्या वेळच्या स्वभावास अनुसरून मला पण या विषयावर लिहायचे होतेच. बालपणीचे खेळ तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. लिहायला सुरुवात करणार तर प्रत्येक खेळाच्या कैक आठवणी. त्यातील निवडक आठवणी शेअर करतो आहे.

पत्ते हे आम्ही पार लहानपणापासून खेळत आलो आहोत. बैठ्या खेळांमध्ये सगळ्यात जास्त हाच खेळला असावा. आम्ही भावंडे गावी जमलो की न चुकता पत्त्यांचे डाव होतात. गावाच्या घरातच तशी काही जादू आहे म्हणून की तिथे फक्त पत्ते खेळल्याच्या आठवणी आहेत म्हणून ते काही ठाउक नाही पण एरवी वर्षभर आम्ही कधी पत्ते खेळत नाही आणि गावी गेलो की पुन्हा लहान होऊन पत्ते मांडून बसतो. त्यात पत्ते खेळण्याचा मोठ्या मंडळींना त्रास कमीच म्हणून त्यांचा ही काही आक्षेप नाही. रमी, मेंढीकोट, तीन-पानी,चॅलेंज,भिकार-सावकार, लाडू-लाडू,डॉंकी-मंकी,सात-आठ, पाच-तीन-दोन, गटार-उपसी,चटई-चटई, गुलामचोर, जोडपत्ता पासून सगळे खेळ आम्ही उकरून उकरून काढतो.

पत्त्यांची जादू ही आठवत असेलच न तुम्हाला ? लहान मित्रांना अशा जादू करून दाखवायच्या आणि भाव खायचा, मग कधीतरी त्याची युक्तीही 'कुणालाच सांगायची नाही !' या अटीवर सांगून टाकायची. म्हणजे या जादूचा वारसा तसाच पुढे चालू राहावा म्हणून...! पत्त्यांचे घर तर पत्ते खेळणाऱ्या प्रत्येकाने बांधले असेलच. सिनेमात दाखवतात तसे स्वप्नाळू नायिकेने बांधलेल्या पत्त्यांच्या घरापेक्षा आपण प्रथमच बांधलेले पत्त्यांचे घर आणि वाऱ्यापासून वाचवत ते पूर्ण झाल्यावर झालेला आनंद व्यक्त करत सगळ्यांना तो पाहायला बोलावणे हे आता कुठे ?

नव्वदीच्या दशकात ट्रम्प कार्ड्सचा खूप बोलबाला होता. आमच्या मित्र मंडळीत बऱ्याच जणांकडे तसे WWF आणि क्रिकेटचे 'कॅट' होते. हाईट आणि वेट 'क्लॅश' होण्याची शक्यता ही यातच कळली आणि क्रिकेटचे चाहते असाल तर तेव्हाचे Big Fun आणि centre fresh यांनी काढलेले क्रिकेट कार्ड्स तर माहिती असायलाच हवेत. माझ्याकडे कित्तीतरी म्हणजे जवळपास हजारेक कार्ड्स जमले होते आणि ते अजूनही कुठल्याशा बॉक्स मध्ये ठेवले आहेत जपून. त्यातील काही आम्ही दुकानामधून ढापले ही होते हे सांगायला आता मला बिलकुल अपराधी वाटत नाही. कारण चिंगममध्ये इंटरेस्ट नव्हताच आम्हाला...! ट्रम्प कार्ड्स सारखे पैशाने विकत घ्यायचे खेळ तेव्हा परवडत नव्हते म्हणून मग आम्ही माचीसाचे कवर जमा करायचो. असे वेगवेगळे १००-२०० कवर जमवून त्यांनी तशाच प्रकारचा एक खेळ खेळायचो. तो बहुतेक नवीन शोध लावला होता आम्ही.

बैठ्या खेळांमध्ये कॅरम आणि बुद्धिबळ जास्त लोकप्रिय असले तरी लहान असताना ते मोठ्यांना खेळताना पाहायला तितकेच आवडायचे. पत्ते खेळताना 'मला पण घ्या न...'म्हणणारी लहान मुले बुद्धिबळ बघताना कशी सिरीयस होऊन तो खेळ पाहत राहायची. अगदी लहान असायचो तेव्हा हा खेळ कधी समजायचाच नाही असे वाटायचे. केवढे डोके लावावे लागते हा खेळताना...कॅरम मध्ये हाताचे कौशल्य आणि अचूकता लागते पण बुद्धिबळात हुशारी आणि योग्य निर्णयक्षमता असावी लागते हे त्या भाबड्या मनास कसे कळायचे. तेव्हा तरी आम्ही या दोन्हीमध्ये प्रेक्षकच होतो पण कुतूहल मात्र भारी !

त्याशिवाय काही विकत आणलेले खेळ ही त्या-त्या वेळी खूप आवडते असत. सापशिडी आणि ल्युडो हे अगदी घराघरात पोहोचलेले खेळ. मजल-दरमजल करत, शिड्यांच्या सहाय्याने घर गाठायला यावे तर ९८ वर सापाने गिळून पुन्हा १३ वर यावे. या उलट ल्युडो मध्ये सगळ्या चार सोंगट्या घरी पोचवण्याची घाई आणि शिवाय रस्त्यामध्ये शिकार करायची संधी आणि व्हायची भीतीसुद्धा ! त्याचे कवडे फेकताना ही त्यावर जादू फुकून टाकायचे म्हणजे हवे ते आकडे मिळतात. हे सारे खेळ पाहुणे मंडळी आली की विशेष उत्साहाने खेळले जात. सापशिडी पण महाग म्हणून गावी आठ-चल्लस ने जमिनीवर चौकोन आखून एक वेगळा खेळ मांडायचो. त्याचे नाव नाही आठवत. सोंगट्या असायच्या बांगड्यांचे तुकडे किंवा दगडी. आठ किंवा चल्लस पडल्या शिवाय डावाला सुरुवात नाही आणि पट आखायचे ते कोळशाने.

सापशिडी प्रमाणेच 'नवा व्यापार' हा ही एकदम आवडीचा. हा खेळायचा म्हणजे भरपूर वेळ हवा. रविवारी दुपारी खेळायला घेतला तर सूर्य मावळतीला आला तरी पूर्ण होत नाही. सगळे खेळाडू नवी शहरे घेण्यात आणि तिथे घरे बांधून भाडे वसूल करण्यात दंग ! हा खेळ आम्ही बऱ्याचदा मोडायचा नाही म्हणून लिहून ही ठेवायचो...पुन्हा इथून पुढे सुरु करण्यासाठी...तो किती वेळा केला असेल ते काही आठवत नाही. 'व्यापार' सदृश असे नवनवे खेळ आलेही काही पण आमची पिढी रमली ती यातच. क्रिकेट आवडायचे म्हणून एक हिरवी चादर पसरलेला क्रिकेटचा खेळही आणला होता पप्पांनी. ज्यात ११ खेळाडू उभे करायचे आणि घसरगुंडीवरून पडणारा सिसम म्हणजे चेंडू एक होल्डरला जोडलेल्या बॅटने तटवायचा आणि बाउंडरी म्हणून कुंपणदेखील ! पण बसून बसून पाठ दुखून यायची मग संध्याकाळी खऱ्या-खुऱ्या क्रिकेटची ओढ लागायची. 

कागदी खेळांमध्ये 'नाव-गाव-फळ-फुल' आणि 'चोर-पोलीस'. अभ्यासाच्या वहीची पाने आईच्या नकळत फाडली जायची आणि एका पानावर सगळ्या खेळगड्यांची नावे आणि गुण. अर्धा ते एक तास खेळ झाला की 'टोटल'...मग मी पहिला, तू दुसरा आणि चोर कोण ? याने कल्लोळ नुसता...'जानेवारी-फेब्रुवारी' तर अजूनही खेळतो आम्ही...!

फुल्ली-गोळा तर ऑल-टाईम फेवरेट. एका मिन्टात उरकण्याइतका छोटा खेळ. शिवाय मधले बोट ओळखा म्हणत एका हाताच्या पंजात दुसऱ्या हाताची बोटे वेडी-वाकडी लपवायची. नाही ओळखले तर ठेंगा ! अलीकडेच मी फुल्ली-गोळाचा प्लास्टिक गेम पण पाहिला. जुनेच खेळ नव्या रुपात पाहून आश्चर्य वाटले

असेच आठवले...आमच्या लहानपणी काही कागदी फॉर्म मिळायचे ज्यावर १ ते १५ किंवा २० असे चौकोन असायचे आणि त्यावर चिकटवायचे ते विकत घेतलेल्या चॉकलेट सोबत मिळणारे कागदी लेबल. त्या लेबलने ठराविक पान पूर्ण झाले की मग त्यावर सायकल, टोपी, बॅट अशी बक्षिसे असायची. हिरो-हिरोईन पासून WWF असे वेगवेगळे फॉर्म आणि त्याचे लेबल...कमालीचे प्रसिद्ध होते तेव्हा !

घरात कुणीतरी चिमुरडा असायचा ज्याची पाटी आणि दगडी पेन्सिल सहज मिळायची. त्यात मामाच्या घरी जायचा रस्ता शोधायचा खेळ ही आवडता. एक लाईन दुसऱ्याला चिकटली नाही पाहिजे म्हणून अगदी जपून रस्ता काढत सांगितलेल्या आकड्यावर गाडी थांबायची. पाटीवरून आठवली ती 'दगडी पेन्सिल', कळायला लागल्यावरही जी चोखत राहायला आवडायची.

साबणाच्या पाण्याचे बुडबुडे हा दुपारचा उद्योग...गावच्या घरी माडीवर गॅलरीत उभे राहून बुडबुडे सोडायचे आणि लहान भावंडे ती पकडायला खाली. साबणाचे पाणी पण घरीच बनायचे. कपडे धुण्याची पावडर एका ग्लासात किंवा वाटीत घ्यायची आणि फुगे बनवण्यासाठी रिफील काढलेलं पेन किंवा शेविंग रेझरची दांडी. पण अगदीच हे नाही मिळाले तर मोठ्या कागदाची सुरळी करून पण हे फुगे बनवता येतात आणि ते अधिक चांगले बनतात हे आम्हाला उशीराने कळले.

शाळा-कॉलेज मध्ये पेन फाईट हा कॅरम सदृश खेळ कोणी शोधून काढला असेल त्याचे आभार कारण त्यामुळे आमच्या बऱ्याच मधल्या सुट्ट्या रंगल्या होत्या. शेवटच्या पानावर ठिपके काढून आपल्या अक्षराचे बॉक्स बनवण्याचे खेळ तास चालू असतानाही खेळलो आहे. शाळेत तर वहीचे शेवटचं पान हे खेळ खेळण्यासाठीच असायचे.

काय म्हणता ? बसून बसून पाठ दुखून आली...?चला तर मैदानावर!

मैदानी खेळांमध्ये तर रांगच आहे. क्रिकेट आणि फुटबॉल हे विदेशी खेळ सोडले ( ज्यांची हल्ली जास्तच 'क्रेज' आहे ) तरी भारतीय खेळांमध्ये कितीतरी खेळ आहेत आणि ते सगळे मैदानातच खेळायला पाहिजे असेही नाही तर अंगणात, गच्चीवर, मंडपात कुठेही जमू शकतात. 'आंधळी-कोशिंबीर' ह्या खेळात कोशिंबीर कुठून आली पण आम्ही कुणी विचारले नाही आणि बहुतेक कोणाकडे याचे उत्तर असेल असे वाटत नाही. एकाला डोळ्यांवर पट्टी बांधून तीन वेळा गोलाकार फिरवले की आंधळा कारभार सुरु...! 'ए-शुक शुक...इकडे-इकडे, धोका-धोका' असे बोलत, डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या मित्राच्या पाठीवर मारत खेळ रंगत जातो आणि चुकून सापडलो की आपल्या डोळ्यापुढे अंधार...पण राज्य येईल या भीतीने लांब राहिलो तर खेळाची मजा कुठे येणार ?

लपंडाव उर्फ लपाछपी हा कायम संध्याकाळसाठी राखून ठेवलेला खेळ असे. सकाळी किंवा दुपारी हा खेळण्यात मजा येत नाही. सूर्य मावळतीला आला की जणू लपलेले गडी अंधारात गुडूप होऊन जाणार आणि सापडता सापडणार नाही अशा भावनेने लपंडाव खेळायला हुरूप येतो. लपंडाव हे झाले पुस्तकी नाव, गल्लोगल्ली हा लपाछपी म्हणूनच जास्त 'फेमस' होता. राज्य आलेला गडी भिंतीकडे तोंड करून डोळे मिटून, चेहरा झाकून आकडे मोजणार आणि मोजून झाले की 'रेडी का ?'म्हणून विचारणार. 'नो रेडी' असा आवाज आला तर अजून मागे वळायची परमिशन नाही आणि मागून काही आवाज नाही आला तर मग मिशन सुरु. त्यात राज्य असणारा हातात पिस्तुल घेतल्याप्रमाणे शोधाशोध करणार. कुणी सापडलाच तर मग '.....ई-स्टोप' असे जोरात नाव घेऊन पिस्तुल रोखून ओरडायचे. पण लपणारे ही हुशार असत. ते एकमेकांचे शर्ट किंव टी-शर्ट बदलत आणि राज्य असणाऱ्याने त्याला पाहून चुकीचे नाव घेतले की मग 'अंड...!' नाहीतर सगळे मिळून 'धप्पा' करायला टपलेलेच असतात. ते ही सगळे एकत्र दिसले की लांब-लांब पळत नाव घेत -ई-स्टोप, ई-स्टोप ओरडायचे.मग पहिला कोण सापडला त्याच्यावर डाव...आम्ही बहुतेक कच्चे लिंबुच होतो तेव्हा म्हणून दादाच्या मागे-मागेच आमचं शेपूट...

लगोरी उर्फ लिगोर्चा म्हणजे एकावर-एक थप्प्या मांडायच्या आणि बरोब्बर नेम लावून म्हणजे असा एक डोळा बंद करून चेहरा वाकडा-तिकडा करत चेंडू फेकायचा आणि दुसऱ्या टीमने चेंडू घेऊन आपल्याला आउट करायच्या आधी थप्पी पुन्हा लावायची. टिक्कर आणि थप्पीच्या खेळात काही चौकोन आखून थप्पी घेऊन ते पार करायचे असा काहीसा खेळायचे पण आमच्याकडे हा खेळ मुली जास्त खेळात त्यामुळे माहित असूनही खेळलो नाही कधी. तसे खेळायला बरेच खेळ होते पण काही आवडत नसायचे वा येत नसायचे म्हणून कधी खेळलोच नाही. डब्बा -ऐसपैस, आट्या-पाट्या सारखे खेळ आमच्या मित्र-मंडळींना कोणी शिकवलेच नसावेत म्हणून ते खेळ मुकलोच आम्ही. विटी-दांडू हा खेळ पण माहित असूनही फार खेळायलाच मिळाला नाही. विटीला ऐटीत उडवायचे आणि फिरवायचा दांडू की नजर दूर-दूरवर...एक तर एवढे खेळ खेळायला असत की सगळे खेळ खेळणे प्रत्येक वेळी शक्यच होत नसे.

लगोरी प्रमाणे आबादुबी म्हणजे चेंडूची हाणाहानी...प्लास्टिक चेंडूने जास्तच मजा ! चेंडू वरून आठवले तेव्हा 'क्रेझी बॉल्स' मिळायचे जे टणाटण उडायचे पण ते महाग असत त्यामुळे कधीतरी हरवला की पुन्हा घ्यायला पैसे मिळत नसत. आम्हाला जास्त लागायचे ते रबरी बॉल्सच. लंगडी हा खेळ खेळायचा तर जितके जास्त जण तितकी मजा जास्त. एक पाय गुडघ्यात दुमडून एका पायावर पळत सगळ्यांना 'आउट' करायचे आणि नुसतेच हात लावून आउट नाही करायचे तर जोरात धपाटा हाणायचा पाठीत.यात बऱ्याचदा धडपडून गुडघे फुटले होते, खरचटले होते पण म्हणून थांबणार कोण ? शाळेत आम्ही छोट्या वर्गात असे पर्यंत तर मुला-मुलींची एकत्र लंगडी जमायची.त्यात शिवाय किती जणांना आउट केले हे ही मोजले जायचे म्हणजे इज्जत का सवाल! हे असले खेळ कॉलेजमध्ये असताना का नाही झाले ?

खो-खो आणि कबड्डी सारखे खेळ मात्र जास्त करून शालेय स्पर्धापुरतेच मर्यादित राहिले. आवडीने मित्रांनी जमून खेळण्यासाठी हे कधी 'फेवरेट' नव्हते. खो-खो मध्ये शाळेत पण असे काही नियम होते की आउट केले तर 'आउट' बोलायचे नाही, नाही तर आउट झालेला आउट नाही. कबड्डी मध्ये पण कबड्डी किंवा हुतुतू जे बोलायचे असेल ते सिनेमात लीप मुवमेंट करत तशा फक्त पुटपुटायच्या. मग कोणी बोललेच तर 'बोलतोय ना...' असे डोळ्यांनीच खुणावत आवाज वाढवायचा...

गोट्या हा खेळ पण फार लोकप्रिय कारण खेळाचे साहित्य फार काही महाग नाही. मातीमध्ये कुठेतरी खड्डे खणायचे आणि एक वित- दोन वित मोजत नेम लावायचे. नेम लागल्याचा आनंद एक विलक्षण असायचा. गोट्यांचा खेळ आमचा तासंतास रंगायचा. बहुतेक सकाळीच !गोट्यांमध्ये एखादी दुधाळ,पांढरी गोटी लकी समजली जायची. ती हरवून नाही द्यायची. शिवाय नेमबाजीसाठी एखादा खास मोठा 'ढंपर' असायचा. कोयबा हा देखील गोट्यांसारखाच पण खेळला जायचा दगडी पांढऱ्या गोट्यांनी.

गोट्यांप्रमाणे भोवरा हाही अतिफेवरेट खेळ. कोल्ड्रिंक बाटल्यांचे बिल्ले भोक पडून जाळी गुंफायची आणि गुंडाळला भोवरा सर्रकन जमिनीवर वा डायरेक्ट हातावर घ्यायचा. तो तसा घेणे किंवा जमिनीवरून हातावर घेणे हे पहिल्या-पहिल्यांदा फारच कठीण काम वाटायचे. कित्येक भोवरयांना टोकदार खोपचे पडायचे आणि त्यात प्रतिस्पर्ध्यांचे कौशल्य दडलेले. कानावर जाळी घेऊन दुसऱ्या भोवऱ्याला पार करायचे असा ही काही नियम असल्याचे आठवतेय. ह्या बिल्ल्यांवरून आठवले, मुली जशा काचापाणी खेळत तसे आम्ही बिल्ल्यांनी खेळायचो. असे नाविन्यपूर्ण खेळ प्रत्येकाने आपापल्या बालपणी खेळले असतातच. खेळ कोणी आणि कसा बनवला ते महत्त्वाचे नसतेच आनंद महत्त्वाचा !

सायकल चालवणे हा देखील तेव्हा एक खेळच होता. आजकालच्या प्रमाणे तेव्हा प्रत्येक कडे सायकली नव्हत्या आणि घरी विकत घ्यायची तर सगळे मित्र मागत राहतील म्हणून टाळाटाळ केली जाई. तेव्हा सगळे मित्र भाड्याने सायकली विकत घ्यायचो- एक किंवा अर्धा तास आणि मग वाऱ्याशी स्पर्धा. टायर किंवा चाकाचे चक्र एका तारेने पळवत नेण्याचा उद्योग ही एक आगळा-वेगळा खेळ. मला ते लहान असताना जमत नसायचे तर पप्पांनी एका लाकडी काठीला एक छोटे चाक खिळ्याने ठोकून दिले म्हणजे मोठे मित्र हे खेळायला पळत सुटले की माझी ही काठीची गाडी त्यांच्या मागे.

पतंग उडवायचे तर थंडीतच...संक्रांती जवळ आली की बाजार आपोआप पतंगांनी भरले जात. फिरकी धरायला आम्ही आणि पतंग उडवायला दादा. मांजा पण कसा धारदार! ''बदव...बदव अजून...अरे ढील दे ना...''आणि पतंग कटली की धावाधाव...एकदा आमचा एक मित्र अशीच पतंग पकडण्याच्या नादात एका काट्याच्या झाडात जाऊन अडकला होता.

कांदा-फोडी मध्ये ही 'कांदा-फोडी' हे नाव कसे हे न विचारता एक-एक लेवल पार करत उद्या मारणे सुरु व्हायचे.त्यात मी लहानपणापासूनच उंच म्हणून सगळे माझ्या पाठीवरून उडी मारताना माझ्यासकट धडपडायचे. संगीत-खुर्ची, चमचा-गोटी सारखे खेळ सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा मध्ये जास्त खेळले गेले. तळ्यात-मळ्यात, डोंगर का पाणी हेही खेळले जात अधून-मधून...'डोंगराला आग लागली पळा..पळा' आठवतंय की नाही अजून ?

एकदम लहानपणी 'शिवाजी म्हणतो' तसंच करायचं असं आजीने शिकवले आणि त्याचाही एक खेळ झाला...टीपी-टीपी..टीप-टोपं म्हणत कोणता रंग म्हटला की सांगितला रंग शोधायची काय धावपळ. अमुक एकाच्या शर्टावर रंग सापडला तर सगळे त्याला लटकलेले आणि सापडायच्या आधी पकडला की बाद. गावी असलो की आम्ही मंदिराच्या आवारात 'आईचं पत्र हरवलं....तेSSS मला सापडलं' खेळायचो. खेळून बरीच वर्षे झाल्याने अस्पष्टसा आठवतोय. पण ही ओळ आणि तिचा ठेका अजूनही कानात घुमतोय- गाभाऱ्यात घुमणाऱ्या आवाजासारखा.

खुपसनी हा खेळ खास पावसाळी खेळ...लोखंडी सळ्या भिजल्या मऊ मातीत खुपसत अंतर कापत जायचे. सळी पण अशी जोरात फेकायची की ऐटीत उभी राहिली पाहिजे मातीत.आणि हरणार तो लंगडी घालत जिथून सुरुवात केली तिथपर्यंत येणार...पावसाळी दिवसात रस्त्याच्या कडेने वाहणारे पाणी असेल की आम्ही आपापले पान त्यात सोडून वाहवत न्यायचो. पाण्यात होड्या सोडण्यापेक्षा ही हे अधिक प्रिय होते आम्हाला.

काहीच नाही तर मग पकड-पकडी किंवा झटापटी आहेच. हल्ली पिकनिकला गेलो तर शक्य असूनही हे खेळ कोणी खेळत नाही. तिथे सो-कॉल्ड प्रोफेशनल खेळच खेळले जातात. टीम-वर्क चा चांगला धडा देणारे साखळी-साखळी,खांब-खांब, विष-अमृत सारखे खेळ आजची पिढी खेळते असे वाटत नाही. अमुक एका मित्राला विष दिले तर आउट व्हायची भीती असूनही त्याला अमृत देऊन आपल्यात घेणे हे शिकण्यासारखे आहेच ना?

 'टॅमप्लीज' हा प्रकार खेळ सुटले तसा परत दिसलाच नाही.टॅमप्लीज म्हणजे आपण सुरक्षित आहोत. म्हणजे ऑफिस मध्ये एखाद्या महत्त्वाच्या मीटिंग दरम्यान आपण बॉसला मनगटावर थुकी लावून 'टॅमप्लीज' म्हणून बाहेर गेलो तर कसे वाटेल ना ? किंवा असेच 'जास्ती की मेजॉरिटी' असे हात पालथा की सरळ ठेवत सुटण्यातली गंमत कुठे हरवली ? त्या सुटण्यात काय तर दिलासा मिळायचा ! 'राज्य' आपल्यावर नाही !! आणि सुटलो की गुडघ्या खालून हात घालत टाळी वाजवायची. आता मजा करायला मोकळे किंवा राज्य असणाऱ्या मित्राला छळायला तरी !

अजून एक आठवले ते म्हणजे -टीम पाडायच्या युक्त्या. एक तर दोन गटप्रमुख एक-एक जन निवडणार नाही तर मग नाव पाडून या असा आदेश दिला जायचा- मग मी आंबा-तू पेरू, मी वाघ- तू सिंह, मी ढवळ्या- तू पवळ्या...आणि मग ढवळ्या पाहिजे का पवळ्या पाहिजे हे विचारले जायचे. यातून निर्माण होणारी गटबाजी खेळ संपताच मोडली जायची हे किती बरे होते. कट्टी-बट्टीचे रुसवे फुगवे आता कायम स्वरूपी भांडणात बदलले आहेत. हल्ली त्याला 'पॅच-अप' असेही आधुनिक नाव मिळाले आहे.

बाप रे...कित्ती खेळ झाले...किती तरी विस्मरणात ही गेले...आठवतो तो फक्त किलकिलाट...लुटुपुटूची भांडणे, दंगा-मस्ती आणि हसरे चेहरे...आता सुद्धा कित्येक जण हे खेळ आठवून जुन्या आठवणीत रमले असतील पण पुन्हा खेळावेसे वाटले तरी खेळतील का ? आता मोठे झालो म्हणून, लोक हसतील म्हणून का आपण आपले सुखाचे क्षण गमावून बसायचे...जुन्या स्मृतींना उजाळा देण्यापेक्षा पुन्हा आयुष्यभर पुरेल असे सोहळे साजरे केले तर काय वाईट आहे का?

लेख बराच मोठा झालाय...पण आठवणीच इतक्या की संपता संपेना...बऱ्याचशा गोष्टी तर मेंदूला ताण देऊन आठवाव्या लागल्या. इतक्या दूर राहिल्या का त्या आठवणी ? पण लिहिता लिहिता चेहऱ्यावर हसू आले आहे. वाटतंय पुन्हा लहान व्हावं, शाळेच दप्तर टाकून खाली खेळायला पळावं आणि दमून आल्यावर हात-पाय धुवून शांत पडावं. आई बोलावतेय जेवायला आणि मी इकडे झोपेच्या आहारी...कसलीच चिंता नाही...काही नाही...शांत शांत !

तुम्हाला आजूबाजूचे काही ऐकू येतंय की गेलात तुम्हीही भूतकाळात ?
6 comments

दुसरा वाढदिवस


गेलं वर्ष इतक्या लवकर कसं गेलं कळलंच नाही आणि हे असं दरवर्षी होतं. नव्या वर्षी, वाढदिवशी, सणासुदीला मागे वळून पाहिलं तर गेल्या वर्षीच्या घटना अगदी ताज्या वाटतात. यंदा अभ्यासात, कामात जरा जास्त बिझी झाल्याने ब्लॉगकडे दुर्लक्ष झाले खरे ( ते नेहमीच होत राहील बहुधा ) पण म्हणून वाढदिवस विसरून चालणार नाही.
तसं दुसऱ्या वाढदिवसाचं पहिल्या वाढदिवसाइतकं कौतुक नसलं तरी निदान या पोस्टच्या निमित्ताने मी जीवंत असल्याची (ब्लॉगवर) वाचकांना खात्री पटावी आणि ब्लॉगिंगला कंटाळून मी हे ब्लॉगविश्व सोडल्याच्या अफवा पसरू नयेत असाही हेतू आहे. शिवाय कासवाच्या गतीने चालणाऱ्या ब्लॉगच्या पोस्टसंख्येत अजून एक भर. त्यामुळे दरवर्षी वाढदिवशी तरी एक पोस्ट टाकावीच असा संकल्प आहे जो शक्यतो मोडला जाणार नाही.

पहिल्या वाढदिवशी ब्लॉगिंगच्या अनुभवाबद्दल एवढे काही लिहिले की या वेळेस वेगळे काही लिहायला सुचत नाहीये. आणि यंदा ब्लॉगने विशेष आणि कौतुकास्पद असे काहीही केले नसल्याने त्याबद्दल उल्लेख करण्याजोगेही काही नाहीये. पण जे काही आहे ते आपलं आहे आणि कशीही का असो आपलीही एक पतंग आकाशात उडते आहे याचा आनंद आहेच.

वाढदिवसाचे आमंत्रण सगळ्यांना दिले आहेच, शुभेच्छा द्यायला विसरू नका...:)