शाळा- पुस्तक, चित्रपट आणि बरेच काही

शाळेत गेलेल्या सर्वांसाठी...असे वाचूनच पुस्तकाची सुरूवात होते. डोंबिवलीच्या सुखदेव नामदेव वऱ्हाडकर हायस्कूल या छोट्याश्या मराठमोळ्या शाळेत शिकणारा मुकुंद जोशी आणि त्याचे मित्र चित्रे, सुऱ्या आणि फावड्या ही कथानकातील प्रमुख पात्रे. आजची डोंबिवली ही शहर म्हणून विकसित झाली असली तरी ७०च्या दशकात तिचे स्वरूप खेडे म्हणूनच होते. शेतजमीन, डोंगर आणि बराचसा ग्रामीण मातीचा गंध सांगणारे वर्णन यात आपण सहज मागे खेचले जातो. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण ठिकाणी शिक्षण झालेल्यांनाच नव्हे तर शहरी भागात ही पूर्वीच्या मराठमोळ्या शाळांमधून शिकलेले विद्यार्थ्यांना देखील ती आपलीच शाळा वाटते. शाळा ही म्हटली तर एक प्रेमकथा आहे म्हटली तर नाहीही. मुकुंदा जोशी हा या कथेचा नायक आहे आणि संपूर्ण पुस्तकात तो आपल्या अवतीभवतीचे शाळेचे व शाळेबाहेरचे विश्व आपल्यासमोर मांडतो. शिरोडकर ही या कथेची नायिका आहे पण ती ही केवळ मुकुंदाला आवडत असते म्हणून. प्रेमकथा यासाठी कारण मुकुंदा सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठेही, कधीही शिरोडकरच्याच विचारात बुडालेला. आपले प्रेम तिच्यापर्यंत कसे पोचवणार या चिंतेने कायम त्याच्या पोटात ...