मोहीम: कोथळीगड-पेठ
कुठल्याही शुभ कार्यासाठी सकाळी उठायचे ठरले की लेखक महाशयांना रात्री झोप येत नाही. कोथळी गड -पेठ येथे जायचे ठरले तसे सर्व सामानासकट रात्रीच मित्राचे घर गाठले पण सर्व झोपले तरी निद्रादेवी माझ्यावर प्रसन्न होईना. चार वाजता कुठेशी थोडी झोप लागल्यासारखे वाटले तोच सहा वाजले आणि मोहीम सुरु झाली. सगळ्यांची जमवाजमव आणि ट्रेकच्या सूचनांचे कार्यक्रम झाल्यावर सात वाजता गाडी हलली. प्रवासामध्ये उत्साही मावळ्यांनी लोकगीते,पोवाडे,भजन म्हणत प्रवास सुखकर केला. आंबिवली गावाच्या पायथ्याशी १० वाजता नाश्त्यासाठी उतरलो. पोहे आणि चहा पोटात उतरवून गडाच्या दिशेने चालू लागलो. बऱ्याच दिवसांनी लेखक महाशयांनी कॅमेरा बाहेर काढल्याने फोटो सेशन जोरदार सुरु झाले. कॅमेऱ्याच्या जीवात जीव असेपर्यंत फोटो काढायचे असे ठरवून मिळेल ते क्लिकत चाललो होतो. सोबतीला नावापुरतेही उन्ह म्हणून नव्हते त्यामुळे ट्रेकसाठी वातावरण प्रसन्न होते. शिवाय इतर ट्रेकर्सप्रमाणे पाठीवर बॅग न घेता चालल्याने आम्ही बरेच बागडत होतो. पेठ गावाचा परिसर येईपर्यंत प्रशस्त पायवाट आहे आणि त्यानंतर त्याहून प्रशस्त मैदानी प्रदेश. इथे आम्हाला फो...