बीपी पाहावा !

काही चित्रपट पाहायचे तर त्याआधी विचार करावा लागतो की तो घरच्यांसोबत पाहता येईल की नाही. ते सिनेमागृहात मित्रांसोबत जाऊन तसे पाहता येतात हे खरे पण तोच सिनेमा घरी टी.व्ही.वर पाहताना अजूनही अवघडल्यासारखे वाटते. बीपी अर्थात बालक-पालक या सिनेमाच्या बाबत हीच परिस्थिती असली तरी त्याचे कारण वेगळे आहे. बोल्ड समजले जाणारे, पुरेपूर अंगप्रदर्शन असणारे सिनेमे पाहताना अमुक एका दृश्याला अवघडलेपणा येत असेलही, पण बीपी सिनेमाचा विषयच ह्या अवघडलेपणावर भाष्य करतो आणि चांगला, सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आवश्यक अशी विचारसरणी मांडतो. त्यामुळे बालकांनी अगदीच पालकांसोबत चित्रपट नाही पाहिला तरी ठीक पण स्वतंत्रपणे मात्र दोघांनीही आवर्जून पाहायला हवा. अव्या, भाग्या, चिऊ आणि डॉली ही चौकट चित्रपटातील प्रमुख पात्रे आहेत. एकाच शाळेतले आणि एकाच चाळीतले सवंगडी. चाळीतली कोणी ज्योतीताई 'शेण खाते' म्हणून ती चाळ सोडून निघून जाते आणि 'शेण खाणे' म्हणजे नक्की काय हे कोणीच त्यांना समजावून न सांगितल्याने त्यांची उत्सुकता अजूनच वाढत जाते. त्यातच त्यांना भेटतो 'विशू' जो इतरांच्या नजरेत वाया गेलेला टवा...