माझी आजारपणे

आजारपण काही कुणाला सांगून येत नाही, ते येते अनपेक्षीतपणे, एखाद्या वादळी वार्‍याप्रमाणे. ते येते, जे काही सुरळीतपणे चालले आहे ते बिघडवते आणि आपण हताशपणे पाहत राहतो. मग पुन्हा नव्याने सुरूवात...

आजारपण म्हणजे नुसतेच बेडवर पडून राहणे असते तर एक वेळ ठीक होते पण आजारपण त्यासोबत औषध व गोळयांची फौजही घेऊन येते. मला या एका कारणासाठीच आजारपण आवडत नाही. आतापर्यंत आजारपणातील औषध आणि गोळयांच्या एवढ्या बाटल्या मी रिचवल्या आहेत की मी एखादे केमिस्टचे दुकान टाकून फावल्या वेळात त्या खात बसायला हव्यात. या बाबतीत ही मी थोडा आळशीच आहे. आतापर्यंत कोणत्या आजारावर कोणत्या गोळ्या खाव्यात याची काही नोंद ठेवली असती तर डॉक्टर भेटीचा योग सारखा-सारखा आला नसता. निदान पार्टटाइम जॉब म्हणून आमच्याकडे अमुक-तमुक आजारावर औषधे मिळतील असा बोर्ड ही लावता येईल.

पूर्वीच्या काळी बायकांनी बाळंतपणाच्या गोष्टी सांगाव्या अशी बरीच बाळे त्यांना असत. त्या एकदा सुरू झाल्या की अनेक आठवणी निघत. माझ्या बाबतीतही अशी अनेक आजारपणे झाल्याने मला सांगण्यासारखे बरेच काही आहे. त्या प्रत्येक आजारपणाची काही लेखी नोंद ठेवली असती तर एव्हाना एखादे पुस्तकही प्रकाशित केले असते. असे बरेच किस्से अन् दर्दभर्‍या आठवणी मी मनात जपल्या आहेत. त्यामुळे आजारपणात काय पथ्ये पाळावीत, काय खावे, काय खाऊ नये हे सगळे मला पाठ झाले आहे. पण कंबखत माझ्या या शरीरावर कसल्याच पथ्याचा काहीच परिणाम होत नाही. उलट हे सारे आजारपणाच्याच पथ्यावर पडत असते नेहमी.

एका ओळखीतून दुसरी ओळख निघावी तसे माझे आजाराशी (अ)हितसंबंध वाढत गेले आहेत. उगाच पोठदुखी छातीदुखी पर्यंत येऊन हळूहळू डोकेदुखी गाठत जाते. हे सारे आजार एका माळेचे मणी. वरकरणी आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे असल्याचे भासवणार्‍या साऱ्यांची आतून युती असणार हे निश्चित. त्यामुळे माझे आजारपण हे नेहमीच दीर्घकालीन उपक्रम असतो. हल्ली हल्ली आजारपण संपल्यावर मी पेढेवाटप ही केले आहे अन् पार्ट्याही दिल्या आहेत.

आजार हा जसा माझा कायमचा शत्रू आहे तसा डॉक्टरही आहेच.सिनेमात जरी डॉक्टरला देवासमान मानले गेले असले तरी मला काही त्याचे देवपण दिसले नाही.त्या हसर्‍या चेहर्‍यामागे लपलेला 'एक बकरा' मिळाल्याचा आनंद माझ्या चाणाक्ष नजरेतून कधीच सुटत नाही. माझे म्हणणे ज्याला आणि ज्याचे म्हणणे मला पटत नाही असा हा प्राणी मला कधीच आवडला नाही. मी पूर्वेकडे आणि तो पश्चिमेकडे. आणि तेव्हापासून डॉक्टर असणारी मुलगी पसंत करायची नाही हे ठरवून टाकले आहे. ( खर तर डॉक्टर मुलीशी लग्न केल्यास घरच्या घरी उपाय होईल याकडे मी दुर्लक्ष केले आहे) कुणाचे गिर्‍हाईक व्हावे असे मला मुळीच वाटत नाही पण तसा या दुनियेचा नियमच आहे. एक गिर्‍हाईक दुसर्‍याला बनवतो अन् दुसरा तिसर्‍याला...

आजारपणात होणारा दृष्टीबदल हा तर महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जग दिसण्यात काही बदल होत नाही तर भासण्यात होतो. भलते-सलते भास आणि स्वप्नांची वर्दळ मनाच्या घरात वाढू लागते. फार गंभीर आजार असल्यास हेच बहुतेक शेवटचे आजारपण असेही वाटू लागते. खर तर या वाक्यास सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास पुन्हा आजारी न पडण्याचा संकल्प ही म्हणता येईल पण तेवढे संकल्प करायची ताकद कुठून येणार..? आजारपण कधीकधी मग भूल-भुलैया वाटू लागते. तेव्हा आपण कुठे भरकटत आहोत, त्यातून बाहेर कधी पडणार अन् पडणार की नाही असे प्रश्न भेडसावत राहतात.

आजारपणासारखे कंटाळवाणे काही नसते हे मात्र खरे. सुरळीत चालणार्‍या आयुष्यात आजारपण येणे म्हणजे एखाद्या रात्री घरी मित्रांसोबत रंगात आलेली लाइव क्रिकेट मॅच बघताना लाइट गेल्यासारखे वाटते. मग अशा वेळी ती लाइट कधी येणार याची वाट पाहत 'चक-चक' करण्यापेक्षा सगळे मित्र गप्पा मारायला, अंताक्षरी म्हणायला सरावतात. तसेच मग मी ही आजारपणात गाणी ऐकणे,पुस्तके वाचणे, कविता करणे असे रिकाम-टेकडे उद्योग करतो. माझ्या बर्‍याच कलात्मक कृतींचे श्रेय या अधून-मधून येणार्‍या आजारपणांना आहे. नाही तर एरवी धकाधकीच्या आयुष्यात कसल्या कविता सुचणार? तशी मी माझी आजारपणे इतकी रंगवून सांगितली आहेत की कुणास ही हेवा वाटावा. म्हणजे आजारपणात कसे सर्वजण आपली काळजी घेतात, प्रेमाने वागतात, मित्रवर्ग मदतीसाठी धावून येतात, सुंदर मैत्रिणी सुंदर फुले घेऊन भेटायला येतात. अशी रॉयल ट्रीटमेंट मिळणार असेल तर मग आजारपणात अजुन काय हवे ! पण या फायद्यांच्या बदल्यात त्याचे दुष्परिणाम कैक वेदनेसह भोगावे लागतात.

आजारपणाचा अजुन एक फायदा म्हणजे एरवी घाई-घाईत देव पूजा आटपनारा मी या काळात मनोभावे देवाची पूजा करू लागतो.( कदाचित देवाची आठवण व्हावी यासाठीच देव हे सारे करत असावा) देवाची आरती गाउन मस्का लावण्याचा प्रयत्न केला जातो. देवापुढे नैवेद्य ठेऊन लाडी-गोडी लावली जाते. देव बराच दयाळू आहे म्हणून उशीरा का होईना तो बरा करतो मला.

अर्थात निरोगी असणे हे किती सुखाचे असते ते जे आजारी पडतात त्यांनाच ठाऊक असते. उन्हाचे चटके सोसल्यावरच सावलीचे महत्त्व कळते ना! त्यामुळे उगाच आजारी पडण्याच्या फंदात पडू नका. देवाने शरीर रूपाने आपल्याला एक मौल्यवान भेट दिली आहे तिची काळजी घ्या. भरपूर खा,प्या आणि मजा करा अन् तितकाच व्यायाम ही करा. कारण स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत:च घ्यावी लागते ना! म्हणूनच अनुभवाचे बोल सांगतो आहे. निरोगीपणासारखे सुख नाही. तेव्हा मनसोक्त जगा आणि कायम लक्षात ठेवा...आरोग्यम धन संपदा...!

आजारपणाच्या उत्साहात केलेली एक अर्थहीन कविता सादर करीत आहे.आवडल्यास माझी काही हरकत नाही.

आजकाल आज़ारपण ही आवडू लागले आहे
बरे होण्याचे स्वप्न आता खोटे वाटु लागले आहे

आजकाल मेंदूवर शेवाळ साचू लागले आहे
दूष्ट मन काळी बाहुली बनुन नाचू लागले आहे

आजकाल आयुष्याचे कोडे अर्धवट राहत आहे
वेडया आशेने उगाच मदतीची वाट पाहत आहे

आजकाल डोळ्यांपुढे फकत अंधार दिसत आहे
माझी अवस्था पाहुन मीच मला हसत आहे

आजकाल जीवनाचे सारे रंग उड़ू लागले आहेत
मनाच्या आरशावर काळे डाग पडू लागले आहेत

आजकाल रंगीबेरंगी फूलांत मन रमत नाहिये
चवदार गोळ्या आणि औषधाशिवाय जमत नाहिये

आजकाल मनाच्या खिड़कीतून प्रकाशाला प्रवेश नाहिये
दिवसरात्र झोपा काढन्यात आता काही विशेष नाहिये

आजकाल अधुनमधुन बरे वाटु लागले आहे
बरे होण्याचे स्वप्न आता खरे वाटु लागले आहे

टीप - वरील लेखातील बरेचसे संदर्भ काल्पनिक आहेत. तेव्हा माझ्या प्रकृती विषयी काळजी करत कमेंट देऊ नयेत.



प्रतिक्रिया-
हेरंब said...
हा हा हा.. एकदम सही झालंय आजार-पुराण.

Sagar said...
धन्यवाद...

sharayu said...
घ्याव्या लागणार्या गोळ्यांची संख्या कमी केल्यावरच क्षयरोगाच्या प्रतिबंधाला बळ मिळाले.

Sagar said...
गोळ्या खाल्ल्या तरी त्या पचवायला ही बळ हवेच ना..!

Comments

Popular posts from this blog

पाऊसगाणी

निषेध!निषेध!!

बालपणीचा खेळ सुखाचा