स्वप्नांचे जग

डोळे उघडले ते आईच्या आवाजाने. रविवारची सकाळ म्हणजे बर्‍याच आरामशीर उठण्याचा कार्यक्रम. तसे रोज काही फार लवकर उठतो अशातला भाग नाही. पण निदान आठवड्यातून एक दिवस तरी झोपेतील स्वप्ने अर्धवट राहत नाहीत. नाहीतर बाकीचे सहा दिवस म्हणजे साखर झोपेची वेळ, स्वप्न ऐन रंगात आलेले आणि नेमका त्यावर अलार्मचा खणखनाट !
स्वप्ने पाहायला तशी प्रत्येकालाच आवडतात. मला तर झोपेत असंख्य स्वप्न पडत असतात अन् तेही दररोज. ह्या माझ्या मनाचे मला काही करता येत नाही. निवांत झोपावे म्हणाव तर झोपेतही सतत काही ना काही खटपट चालू. हा स्वप्नांचा कारभार गेली कित्येक वर्षे चालू आहे ( अर्थात इतके काही वय नाही झाले माझे...!) म्हणजे फार लहान होतो तेव्हा मला कधी झोपलो अन् जागा कधी झालो हे कळत नव्हते. पण फार लवकरच मी विचार करायला लागलो आणि ही भलतीच दुनिया सापडली...
निद्रितावस्थेतील स्वप्नांबद्दल हल्लीच माझ्या वाचनात आले की माणसाला नेहमी पहाटे पडलेली स्वप्नेच आठवतात. अपवाद फक्त त्या स्वप्नांचा जेव्हा रात्री आपण अचानक दचकून जागे होतो. अन्यथा झोपेतून उठल्या नंतर माणूस ५ मिनिटा पर्यंत ५० % स्वप्न विसरून जातो आणि १० मिनिटा पर्यंत ९०% विसरतो. म्हणजे मनाने घातलेल्या या गोंधळात फारसे काही हाती येतच नाही. ३ तासांचा सिनेमा पाहावा आणि फक्त क्लायमॅक्स सीन आठवावा असे काहीसे. मला रोज रात्री पडणारी स्वप्ने 'पाहता' मी तर रोजनीशी ऐवजी 'स्वप्ननीशी' लिहायला हवी. पण आठवेल तर खरे! आता सकाळी उठल्या उठल्या अर्धवट झोपेत वही काढून त्यात स्वप्नांचे संदर्भ लिहावे, ही कल्पना काही पटत नाही. म्हणून त्या स्वप्नांना माघारी पाठवून मी कामाला लागतो.
असेच काहीसे वाचण्यात आले ते म्हणजे बहुतांश पुरुषांची स्वप्ने 'ब्लॅक अँड व्हाईट' असतात आणि स्त्रियांची स्वप्ने 'कलरफूल'. वा रे वा! म्हणजे स्त्रिया या बाबतीत बर्‍याच पुढारलेल्या दिसतात. म्हणून मी आई आणि ताई दोघींना विचारले तर त्यांना काही तसे दिसत नव्हते. दोघींना चष्मा असल्याने आणि स्वप्नांची वाट तशी धूसर असल्याने मी त्यांची मते फारशी मनावर घेतली नाहीत...
पूर्वीच्या काळी लोकांना म्हणे स्वप्नात दृष्टांत व्हायचे, म्हणजे पुढे काय घडणार आहे. काही अपशकुन वगैरे अशी सूचक स्वप्ने पडायची किंवा काही भक्त गणांना स्वप्नात परमेश्वराचे दर्शन घडायचे व देव ही खुल्या मनाने स्वप्नात ये-जा करीत असे. आता देवाला वेळ मिळत नसावा किंवा तसे सच्चे भक्त सापडत नसावेत. मला मात्र या सूचक स्वप्नांचे फार कुतूहल वाटायचे आणि आज ही वाटते. ज्यांच्या कुंडलीत 'नेपच्यून'ग्रह बलवान असतो त्यांना सूचक स्वप्ने पडतात म्हणून मी नेपच्युनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण बर्‍याच दूरचा ग्रह असल्याने काही जमले नाही..
रात्री भुताचे पिक्चर पाहून स्वप्नात भूत येते असे म्हणतात ( खरे तर रात्री झोप लागायची बोंब...आणि जी स्वप्ने झोपेत पडायची तीच झोप उडवायला कारणी'भूत' ठरतात.) मग मी रात्री झोपण्या पूर्वी नेहमी देवाचे नाव घेई आणि त्याला स्वप्नात भेटण्याचा प्रयत्न करी पण आजतागायत आमच्या स्वप्नी असा काही योग नाही. आमची गाडी नेहमी भलत्याच रूट वरुन पळत सुटते आणि मग ती अशी काही सुसाट सुटते की किती 'ट्रॅक चेंज' होतात हे माझे मला ही कळत नाही.
हिंदी सिनेमातली स्वप्ने तर पाहण्याजोगी असतात. म्हणजे नुसत्याच सुंदर दृष्याखेरीज त्यात बरेच काही 'प्रेक्षणीय' असते. आणि हा सिलसिला तर गेल्या कित्येक वर्षापासून चालूच आहे. हिरोईन हिरोचा विचार करता-करता डोळे मिटते आणि एकदम ढगात जाते. पांढर्‍याशुभ्र ढगांचे आवरण दूर होते, अवती भवती रंगीबेरंगी फुले व हिरवळ किंवा काश्मीर मधील बर्फ आणि मग गाणे. ह्या सिनेमातल्या लोकांचे बजेट भरपूर असल्याने त्यांना एवढ्या उंचावरची स्वप्ने परवडतात. आमचे पाय तर स्वप्नातही जमिनीवरच असतात. चुकुन एखाद्या स्वप्नात डोंगरमाथी गेलो तर खाली पडण्याचीच भीती अधिक वाटते. थोडक्यात आमच्या नशिबी 'असली' स्वप्ने नाहीत.जी आहेत ती मात्र 'असली' आणि वास्तवदर्शी आहेत.
चित्रपटातून जसे स्वप्नांचे निराळे जग पाहायला मिळते तसे काही दिग्गज कवी व गीतकारांनीही आपल्या काव्यातून स्वप्नांचा साक्षात्कार घडवला आहे.
' ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा'
असे म्हणत शांताबाई शेळके यांनी स्वप्नांचे मनोहारी गाव रेखाटले आहे. खर तर कवी मंडळी स्वप्नात अधिक रमतात हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
'स्वप्नात साजना येशील का?' असे म्हणाणारी प्रेयसी ही प्रियकरा विषयीची प्रीति व्यक्त करण्यास स्वप्नांचाच आधार घेते. आणि मग प्रेमात पडणारे सगळेच जन या स्वप्नांच्या दुनियेत रममाण होऊन जातात.
झोपेतल्या स्वप्नास जशा विविध छटा असतात. तशा जागेपनीच्या स्वप्नास ही अनेक रंग आहेत. प्रत्येक जण निरनिराळी स्वप्ने पाहत जगत असतो. कुणी प्रमोशन ची स्वप्ने पाहतो तर कुणी परीक्षेत पास होण्याची. कुणाला कार हवी असते तर कुणाला बंगला. नुसतीच पैशांची अन् श्रीमंतीची स्वप्ने न पाहता कुणी एखादा ' ती' च्या सोबत स्वत: ला पाहतो तर एखादा बाप आपल्या मुलीचे लग्न सुरळीत पार पडण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतो. ही स्वप्नेच त्यांच्या जगण्याचा आधार बनतात.' जो स्वप्ने पाहतो तोच ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो' म्हणून या स्वप्नास आपल्या आयुष्यात आपल्या प्रगतीचे दिशादर्शकच म्हटले पाहिजे.
असे हे स्वप्नांचे विलक्षण जग जितके पाहावे तितके कमीच...मध्यंतरी कुठे वर्तमानपत्रात वाचले की संशोधक आता मेंदूवर नियंत्रण आणण्यास काही 'चीप' बनवत आहेत. म्हणजे ज्याने कॉम्प्युटर प्रमाणे मेंदूतले विचार व कल्पना 'स्टोअर' करता येतील. पण हा तर फारच भयंकर प्रकार व्हायचा. मनातले विचार व स्वप्ने अशी चीप वर रेकॉर्ड होऊ लागली तर माणसाला विचार करण्यास केवढ्या मर्यादा यायच्या. माणसाने स्वप्ने पाहावीत पण ती फक्त चांगल्या विचारांची, नाहीतर घोळच व्हायचा...आणि विचार स्वातंत्र्यावर ही बाधा यायची. कुणाच्या मनात कसली स्वप्ने रंगत आहेत हे कळू लागले तर सभ्यतेचे सारे मुखवटे गळून पडतील आणि लोक एकमेकापासून अधिकच दुरावतील. तूर्तास तरी हे शक्य नाही त्यामुळे वेळ काही अजुन गेलेली नाही...
हे सारे लिहिता लिहिता डोळ्यांवर बरीच झोप येत आहे .त्यामुळे लेख आवरता घेतो. स्वप्नांचे जग आता मला खुणावत आहे आणि मी त्या दिशेने झेपावत आहे. या सार्‍यांतच मोबाईल उचलून पाहतो तर मोबाईलवर मैत्रीणीचा 'Good Night Sms' आला आहे. मी ही त्याला रिप्लाय करतो आणि लिहितो.
' Good Night...See u in Dreams...'

प्रतिक्रिया
सुहास झेले Said:
वाह सही..लिहते रहा.
खूप शुभेच्छा

Sagar Said:
आभारी आहे सुहास...

Comments

Popular posts from this blog

पाऊसगाणी

निषेध!निषेध!!

बालपणीचा खेळ सुखाचा