वेळ न उरला हाती...

वेळ काही कुणासाठी थांबत नाही. ती वेळेवर येते आणि वेळेवर जाते. आपणच मग वेळेच्या मागेपुढे धावत राहतो. वेळेचे महत्व वेळोवेळी सांगितले जाते तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करून वेळेचा अपव्यय करत राहतो आणि मग जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा बोलतो.''अरे वेळच नाहीए रे...!''
खरं तर एवढ्या दिवसांनी ही पोस्ट आली यावरून तुम्ही ओळखले असेलच की माझ्याकडे वेळ किती कमी आहे ( म्हणजे फिल्मी स्टाइलने म्हणत नाहीए...पण माझ्या विचारांच्या मौलिक संशोधनातून( किंवा मौलिक विचारांच्या संशोधनातून) मला कळून चुकले आहे की मी किती ही वर्षे जगलो तरी मला वेळ कधी पुरणार नाही) आणि त्याची कारणे किंवा सबबी देऊन मी लिहिण्याची टाळाटाळ करतोय असे समजू नये. लिहिणे हे माझ्या ( रिकाम्या वेळेतील) आवडत्या छंदांपैकी एक. पण या ना त्या कारणाने ते जमत नाही अन् मी वेळेला मारण्याऐवजी वेळच मला मारुन नेते. माझे इतर ब्लॉगर मित्र दिवसा-दिवसाला धडधड पोस्ट टाकत असताना मला त्या वाचायला ही वेळ मिळत नाही हे पाहून माझा जीव कासावीस होतो(!) आणि मनाची कुचंबणा वगैरे होते तसे ही काही होते(!!) मग मी मोठ्या निर्धाराने ठरवतो की उद्याच नवी पोस्ट टाकुया पण माझ्या दिनचर्येचे वेळापत्रक तपासले की आधीच अनेक कामे उधार असल्याचे दिसून येते पण कधीतरी ही वेळेची देणी फिटतील आणि एक तरी शहाणी ओळ लिहीन या आशेवर मी लेख लिहीण्याऐवजी मी कवितेवर आटपतो.
कॉलेजमध्ये होतो तोपर्यंत सारे ठीक होते. तेव्हा वेळच वेळ होता पण ऑफीस सुरू झाले आणि सारे विस्कटले. रोज आपल धावत-धावत घराबाहेर पडा, बस किंवा रिक्षा पकडा आणि कसे-बसे ऑफीस गाठा. ऑफीस पोहोचेपर्यंत वेळ फास्ट लोकल प्रमाणे भरभर निघून जाते. ऑफीसमध्ये मात्र वेळ धीम्या लोकल प्रमाणे जाता जात नाही. बॉस काही ऑफीस बाहेर जात नाही आणि नसलेले काम असल्याचे दाखवण्यात तरी किती वेळ घालवायचा ? किंवा अगदीच कामे भरपूर असली तरी ती करायचे इच्छा नसल्याने घड्याळाकडे लक्ष लावून बसल्यावर घड्याळ मंदपणे चालत राहते. बारा वाजले की लंच ब्रेकची वाट पाहावी नंतर मग टी-टाइम ची अन् नंतर ऑफीस सुटण्याची. जिथे तिथे वेळेची सारवा-सारव.
शाळेत असताना कधीतरी परीक्षेत 'घड्याळ बंद पडले तर?' असा निबंध आला होता. पेपर संपायला पाचच मिनिटे उरली असता घड्याळ बंद पडले तर ही कल्पनाच भारी आहे.पण असे काही होत नाही कारण ऐनवेळी माझे घड्याळ बंद पडून परीक्षकांची घड्याळे चालू राहतात अन् वेळ घात करते.
ऑफीसला जाण्या-येण्यात होणारा प्रवास हा मला नेहमीच वेळेची बरबादी वाटते. माझे ऑफीस मित्र खरं तर रोज तास-दीड तास प्रवास करून ये-जा करतात पण मी मात्र जवळ राहत असूनही ( असल्यानेच) फार आळशीपणा करतो. पण हे सारे मित्र काम-एके-काम करणारे. दिलेले काम वेळेत पूर्ण करणारे. घरी जाऊन काय करणार म्हणून ओवर टाइम करणारे. हे सारेच जन लघु-उद्योगी म्हणून हे चालायचे. आम्ही बहू-उद्योगी(!) त्यामुळे मला खरं तर वेळेच्या देवतेकडून कर्जच काढायला हवे. पण देवाकडून कसलेही कर्ज घेऊ नये असे मी कुठेतरी वाचले होते म्हणून राहीले.
ऑफीसची कामे सोडली तरी मला इतर अनेक कामांत रस असल्याने माझ्याकडे वेळेची नेहमीच कमतरता असते. पण माझ्या मित्र वर्गात, नातेवाईकांत अन् ऑफीसमध्येही मी काहीतरी ग्रेट माणूस असल्याचा समज आहे. त्यामुळे 'कसं जमतं रे तुला?','वेळ कसा मिळतो तुला?', किंवा 'कधी करतोस हे सारे?' असे कौतुकोद्गार नेहमी माझ्या कानावर पडत असतात व मी ही 'केल्याने होत आहे रे...' वगैरे पंक्ती झाडतो. खरी परिस्थीती अशी आहे की मला कधीच वेळ पुरत नाही. माझ्या आवडी-निवडी, छंद यांना अभ्यास आणि काम यातून वेळ काढत जपणे ही नेहमीच तारेवरची कसरत असते. त्यात एक छंद असते तर ठीक , आमच्या ठायी भाराभर चिंध्या..म्हणजे आपले छंद. त्यामुळे मोकळा वेळ मिळाला की तो खर्च झालाच. शाळेत असताना गणित एवढे चांगले असूनही वेळेचे गणित काही जमले नाही मला. त्यासाठी एखादा टाइम मॅनेजमेंटचा कोर्स करावा असा मी विचार करतोय पण तो करायला तरी वेळ कुठंय?
मला फार मुश्कीलीने मिळणार्‍या मोकळ्या वेळेतील बहुतांश वेळ वाचनासाठी खर्च होतो. मला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड त्यामुळे अभ्यासाची पुस्तकेच खूप काळ वाचत राहिलो. उरल्या वेळेत मग बाकीच्या पुस्तकांवर अन्याय नको म्हणून कथा,कादंबर्‍या वाचत राहिलो. सध्याच्या घडीला ही अनेक पुस्तके घरी आणून ठेवली आहेत( दुष्काळात धान्याचा साठा करून ठेवावा तशी) पण ते वाचायला मुहूर्त काही सापडत नाहीत. ऐतिहासिक कादंबर्‍या वाचायला कुणाला आवडत नाही? म्हणून त्याही मिळेल तिथून मी घरी घेऊन येतो. सध्या म्हणजे ( गेल्या तीन महिन्यापासून !) मी 'श्रीमान योगी' वाचत आहे आणि ती लवकर पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकावेळी सलग शंभर एक पाने वाचवीत असा वेळ तर शोधून ही सापडत नाही म्हणून ' पानोपानी' वेळ खर्च पडत आहे. एवढी हज़ार पाणी कादंबरी वाचायला मला वेळ नसताना लेखक महाशयानी ती लिहिली कशी याचे मला कौतुक आणि कुतूहल दोन्ही आहे. धन्य ते लेखक आणि धन्य त्यांचे शिवाजी प्रेम!
माझे वाचनप्रेम एवढ्यावरच थांबत नाही. धार्मिक आणि अध्यात्मिक वाचनाने व्यक्तिमत्त्व विकास होतो अशी माझ्या काकांची समजूत असल्याने त्यांनी काही धार्मिक पुस्तकेही घरी धाडली आहेत. त्यात शिवपूराण आणि विष्णुपुराण सारखी भली मोठी ग्रंथसंपदा आहेत. आजीकडून वर्षभरापूर्वी आणलेली ज्ञानेश्वरी वाचण्याचा योग अजुन आला नाही. खरं तर ही पुस्तके मी कितीही वाचली तरी कमीच वाटणार. या प्रमाणेच मला नेहमी प्रश्न पडतो की नक्की कोणत्या देवाची पूजा करावी? कारण माझा सर्व देवांवर विश्वास असल्याने आणि देवामध्ये मी कोणताही दुजाभाव करत नसल्याने 'दिसल्या देवा दंडवत' करत राहतो मग सगळ्याच देवांचे फोटो घरी आणून त्यांचे पूजा आणि आरत्या करत बसलो तर त्यापेक्षा एखादा भटजी झालेले बरे! असो,पण तरीही जमेल तेवढे वेळात वेळ काढून वाचायला हवे . शिवाय मासिके, वर्तमानपत्रे ,इंटरनेट ब्लॉग्स यावर ही मिळेल ते( हावरटासारखा ) वाचत राहतोच मी!
वर्तमानपत्र वाचन हे एक रोजचे काम. खरं तर आवड म्हणून ते वाचले पाहिजे पण हल्ली त्याची सवयच झाली आहे. बहुतेकदा या मोहापायी मी ट्रेनची वेळ चुकवली आहे. पण वर्तमानपत्र हाती आले की ते अथपासून इतिपर्यंत सारे वाचलेच पाहिजे असा माझा समज असल्याने मी ते घड्याळाकडे न पाहता वाचत राहतो. मला वाचण्यासाठी विषयांची कमी नाही. क्रिकेट पासून, करीअरपर्यंत आणि टी व्ही सीरियल पासून राज्यातील समस्या सार्‍याच वाचतो. काही महिन्यांपासून घरी ' म टा. बरोबर त्यांचे थोरले बंधू 'TOI' ही धडकले आहेत. मराठी पाने वाचायला वेळ कमी असताना इंग्रजी पाने वाचण्यात (वा)चाळण्यात सकाळचा किती वेळ घालवावा माणसाने! त्यात हे इंग्रजी पेपरवाले, लोकांना पेपर वाचण्याशिवाय काही कामधंदे नसल्याप्रमाणे छापत राहतात. त्यांचे काय जाते( पेपर जातो...तो ही कमी वापरला तर झाडे तरी वाचतील...वॉट an आइडिया!) वेळ जातो तो आम्हा वाचकांचा!!
याशिवायही जे माझे आवडते काम आहे ते करायला मला फारच कमी वेळ मिळतो ते म्हणजे लिखाण. म्हणजे मनात येणारे असंख्य विचार, कविता कागदावर येईपर्यंत उडून जातात. मनातले विचार लगेच मोबाईलवर रेकॉर्ड करायची काही सोय असती तर बरे झाले असते. एक तर सुचते ते महत्प्रयासाने लिहावे अन् पुन्हा तितकेच कष्ट घेऊन नेटवर छापावे हे सगळे करण्यासाठी किती वेळ लागतो हे काय सांगू तुला वाचका! पण 'कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है' तेव्हा कुठे हे लिहिले जाते. आपल्यासारख्या होतकरू लेखकांस अशी रोजची कामे सांभाळून ब्लॉगिंग करणे किती कठीण हे अधिक सांगण्याची गरज नाही. शिवाय एवढे करूनही इतरांचे ब्लॉग वाचण्याचा मोह आवरात नाही.सध्याच्या घडीला माझ्यात डोक्यात दहा- बारा पोस्ट्स आहेत, पण त्या कधी आणि कशा लिहाव्यात याचा विचार करत आहे. म्हणजे करावे तेवढे थोडेच!
ऑफीसमध्ये कामाचा सुकाळ नेहमीच असतो असे नाही आणि कधी असलाच तरी इंटरनेटवर मैत्रिणीबरोबर chatting करण्यासाठी वेळ काढायला हवा ना! अर्थात आपण सारे इंटरनेट किडे असल्याने आपण याशी सहमत व्हाल. इंटरनेटवर करण्यासारखे बरेच उद्योग मी माझ्या संकल्पयादीत लिहून ठेवले आहेत. त्यामुळे एकदा इंटरनेट ऑन झाले की Orkut,Facebook,twitter,blogger पासून buzz पर्यंत सगळीकडे आमची घोडदौड सुरू. अधूनमधून मेलबॉक्स मध्ये वर्षभर खितपत पडलेले मेल्सही चेक करावे लागतात, ते इतरांना फॉर्वर्डही करावे लागतात.( ओफ्फो...सारा काम मुझे ही करना पडता है!) आणि Youtube वरचे नवीन वीडियोस कोण पाहणार? मीच! अशी सगळीकडे मुशाफिरी करत ऑफीसचे काम करणे हे वाटते तितके सोपे नाही. official pending list कडे दुर्लक्ष करून personal pending list ची कामे करणे हे खरे कौशल्य आहे.
चांगल्या सवयी व छंद जोपासण्याचे मला आधीपासूनच व्यसन असल्याने जे चांगले दिसेल ते सगळे 'पाहिजे' म्हणून मी मागे लागतो. पण माणसाला काही मर्यादा असतात म्हणून सारे अडते. भगवंताला एकावेळी अनेक अवतार घेणे शक्य आहे तसे माझ्या अनेक आवृत्त्या किंवा क्लोन्स काढून त्यांना माझ्या नियंत्रणाखाली हवी ती कामे करायला देता आले असते तर किती बरे झाले असते असे मला राहून राहून वाटते. एकाच वेळी मी 'यत्र-तत्र-सर्वत्र' संचार करतो आहे हे मला पाहायला मिळावे अशी माझी फार इच्छा आहे.
रोजच्या रोज एवढा सारा धुमाकूळ घालताना अधून-मधून आजारपणे अडथळे आणत राहतात. व्यायाम वगैरे करणे आरोग्यासाठी चांगले असते म्हणून तो ही नियमीतपणे करावा लागतो म्हणजे तिथे ही एखादा तास खर्च पडतो . योगासन हा निरोगी जीवनाचा पाया आहे म्हणून नुकतेच योगासनाचे प्रकार याचे एक पुस्तक आणले. त्यात एक सोडून १५० आसने दिलेली, मग ही करावी तरी कधी? म्हणजे माणसाने व्यायामच करत राहावा तासनतास. त्यापेक्षा हे सारे प्रकार रविवारी करावे असे ठरवून बहुतेकदा मी शवासन गाठतो.
ह्या सार्‍यात भर म्हणून आम्हाला अभ्यासाची हौस. Graduation करून समाधान नाही झाले म्हणून CA करायचे ठरवले आणि पहिल्या परीक्षेची पुस्तके CST वरुन घरी आणाताना CAच्या डिग्रीला एवढे वजन का आहे हे कळले ( हे CA करणार्‍यांना ठाऊक असेलच ) पण किलो-किलो वजनाची पुस्तके नुसती चाळून उपयोग नाही तर वाचावी पण लागतात. दोन महिन्यावर परिक्षा दिसू लागताच मी रोज ३०-४० पाने वाचली तरी सारी पुस्तके एकदाच वाचून होतील असे लक्षात आले. म्हणजे रोजचा किमान दीड तासाचा अभ्यास तरी हवाच! हे अगदीच न परवडणारे गणित आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात मी लेखक आणि वाचक या दोन्ही भूमिकांतून माघार घेऊन फक्त विद्यार्थी बनणार आहे हे निश्चित. अर्थात पुन्हा कुछ पाने के लिये...
माझे रोजचे वेळापत्रक काढायचे झाले तर, रोज सकाळी ( उशीरा) उठून कसे-बसे आवरायचे व नाश्ता करावा तो ९ वाजलेले. पेपर वाचण्यात १५-२० मिनिटे सहज खपतात. देवपूजा वगैरे करून निघेपर्यंत अजुन १०-१५ मिनिटे व हे सारे आटपून घराबाहेर पडतो तो धावत-पळत ऑफीसला पोचतो.( हे सारे बर्‍याच आरामशीरपणे चालते ) आणि मग ऑफीसमधली कामे !( ती अजुन आरामशीरपणे!!) एरवी सुद्धा मला कुणाची वाट पाहायला बिलकुल आवडत नाही. म्हणजे मी अवक्तशीरपणे उशीरा गेलो तर ठीक पण मित्र ( किंवा कधीतरी मैत्रीण ही) उशीरा आल्यास मात्र तुम्हाला वेळेचे महत्वच नाही असे मी दुटप्पी वागत राहतो. ऑफीसमधून बाहेर पडल्यावरही घरी यावे तर व्यायामासाठी एखादा तास ,अभ्यासासाठी एखादा ,जेवणासाठी ( खाण्यासाठी, बनवण्यासाठी नव्हे) अर्धा एक तास आणि मग टी.व्ही.वर एखादा कार्यक्रम पाहायचा असतो त्याला ही एखादा म्हणजे मग यातून चुकुन एखादा तास राहिला तर त्यात काही करण्यापेक्षा डोळ्यावर आलेली झोप जास्त महत्त्वाची नाही का...?
रविवारची सकाळ तर कधी वेळेवर उजाडत नाही( माझ्यासाठी) सकाळी आरामशीर उठल्यावर न्यूज़ चॅनेल वर फालतू बातम्या पाहण्यात मी न चुकता वेळ दवडतो.मग प्रत्येक कामात आळशीपणा करत वेळ ही वाया घालवण्यासाठीच आहे अशा पद्धतीने वापरतो. रविवारची दुपारही भरपेट जेवणानंतर झोपा काढण्यात जाते व संध्याकाळ होते तेव्हा मन निवांत होते .खिडकीजवळ बसून मी मोबाईलवर एखादे शांत गाणे ऐकता-ऐकता सार्‍या चिंता विसरून जातो आणि पुन्हा पुन्हा एकच ओळ गुणगुणत राहतो,
'उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही'

प्रतिक्रिया-
हेरंब said...
"वेळ नाही वेळ नाही" म्हणता म्हणता किती लिहिलंस रे !! :) मस्तच.

आणि ते 'श्रीमान योगी' आधी संपव. माझं सगळ्यात आवडतं पुस्तक. ४ वेळा वाचलंय. रणजित देसाई महान होते खरंच !!

Sagar said...
अरे लिहायला वेळ नव्हता म्हणून एवढे दिवस लागले पोस्ट करायला.
आणि पुस्तकांना तर आश्वासने दिल्याप्रमाणे ताटकळत ठेवले आहे. ती कधी पूर्ण होणार माहीत नाही.

Comments

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा