पहिला वाढदिवस

मनात येईल ते लिहीत जाणे हा तसा माझ्यासाठी काही नवीन उद्योग नाही. पण आपले लेखन कुठेतरी छापून येईल किंवा ते इतर अनोळखी वाचकांकडून वाचले जाईल आणि त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छाही मिळतील असे काही वाटले नव्हते.पण ते झाले ते या ब्लॉगविश्वामुळे आणि 'माझ्या मनातले काही' लिहिता लिहिता एक वर्ष पूर्ण झाले. शाळेत असताना निबंध लेखन हा माझा आवडता विषय असायचा. पण शाळा सुटली तसा हा प्रकार दिसेनासा झाला. कॉलेज मध्ये आल्यावरही आता मराठीतून लिहीणे होणार नाही आणि परीक्षाही इंग्रजीतून द्यायची म्हटल्यावर मराठी फारच दुरावली. मला प्रिय असलेले बालभारतीचे पुस्तक आणि त्यातील गद्य-पद्य खंड सारे आठवणी म्हणून उरले. मराठीतून लिहिण्याची आवड असूनही कॉलेजमध्ये ती संधी कधीच मिळाली नाही ती मिळाली पार कॉलेज संपल्यावर आणि मग या ब्लॉगरविश्वात मी चोरपावलांनी हळूच शिरलो. १८ नोव्हेंबर २००९ रोजी पहिली पोस्ट टाकली तेव्हा पुढे किती लिहिणार, काय लिहिणार याबद्दल काहीच कल्पना नव्हती. काहीतरी सुचले म्हणून लिहिले आणि ब्लॉग हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठीच पोस्ट केले. सुरुवातीला ब्लॉग हा प्रकार फक्त इंग्रजीत च...