दिवाळी-कालची आणि आजची...

सर्वप्रथम सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!
दिवाळी दरवर्षीच येते आणि दरवर्षी काही ना काही आठवणी ठेवून जाते. पण तरीही दिवाळी म्हटली की सगळ्यांना लहानपणीच्याच आठवणी फार येतात. जणू काही तरुणपणी दिवाळी साजरी करतच नाहीत आणि लहानपणीची दिवाळी म्हणजे पहिले आठवतात ते खूप सारे फटाके. हल्ली आम्ही मोठे झालो आहोत आणि बरेचसे सुजाण नागरिक झालो आहोत असा आमचा समज झाल्याने आम्ही फटाके फोडत नाही कारण या सार्‍यांमुळे किती ध्वनी-प्रदूषण होते, वायू-प्रदूषण होते हे आम्हाला उशीराने का होईना कळून चुकले आहे. म्हणून मग आम्ही 'दुरून फटाके साजरे' असा संकल्प वगैरे करतो. पण लहान असताना जे फटाके फोडले ते अजुनही आठवतात.
तेव्हा सकाळीच लवकर आंघोळ करून पिशवी भरून फटाके घ्यायचो आणि सर्वत्र हिंडत ते फोडायचो. त्यात भुईचक्र, अनार, फुलबाजे, नाग-गोळ्या,लक्ष्मीबार, रश्शी-बॉम्ब आणि काय काय असायचे. सकाळी भरलेली पिशवी दुपारपर्यंत संपवायचीच असा अलिखित नियम, म्हणून मग सारे फटाके संपवूनच विजयीवीर घरी परतत. मला तरी त्या फटाक्यांच्या माळा लावण्यापेक्षा त्या लवंगीबार तोडून लावण्यातच फार मज्जा वाटायची.त्याला मोडून त्याचे चक्र किंवा पाऊस लावण्याकडे ओढा जास्त. आणि इतके सारे फटाके मिळून ही न फुटलेले फटाके शोधायचे आणि तेही फोडायाचे. त्याची दारू गोळा करून पेटवून देणे हा फटाके संपल्यावर या कार्यक्रमाची सांगता करणारा उपक्रम.

तसे सकाळी खूप सारे फटाके फोडले तरी रात्री त्याची पुनरावृत्ती व्हायचीच. तेव्हा सर्व घरांना लागलेले दिवे, आकाश-कंदिल, रांगोळ्या आणि आकाशात रॉकेट्सची होणारी रोषणाई हे पाहताना रात्र पुरत नसे. पण जसजसे मोठे झालो तसे फटाक्यांपासून दुरावलोच.हल्ली दिवाळी आली की मित्रांसोबत शॉपिंग करणे आणि पार्ट्या करणे हेच उद्योग उरले आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नटून-थटून बाहेर पडणे होत नाही. हल्ली आम्ही मोबाईल आणि मेलवर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवतो. तसे पारंपरिक वेशभूषा करून बाहेर जाणे झालेच तर ते कॉलेजमध्ये किंवा ऑफीसमध्ये असणार्‍या दिवाळी पार्टीलाच होते. मग खूप सारे फोटो काढून ते ओर्कुट, फेसबुक वर टाकले जातात. पण लहानपनीचे दिवाळीचे फोटो पाहताना आजचे फोटो त्यापुढे फिकेच पडतात.
दिवाळीबद्दल अजुन एक आवडणारी गोष्ट म्हणजे- दिवाळीचा फराळ. या दिवसात घरोघरी दिवाळीचा फराळ चापण्यात जी मजा आहे ती एरवी कुठे आहे? म्हणून मग आलेला फराळ फस्त करणे हा आवडता उद्योग. हल्ली रेडीमेड फराळ ही मिळतो आहे पण घरी सर्वांनी मिळून केलेल्या गरमागरम फराळाची लज्जत काय सांगावी ? पहिला लाडू देवापुढे ठेवला की पाठोपाठ तीन-चार लाडू पोटात जातातच. लहानपणी घरातले सगळेजण फराळ बनवण्याची मोहिम हाती घ्यायचो तेव्हा शाळेला भरपूर सुट्टी पण असायची, आता दिवाळीला सुट्ट्या मिळतात याचेच फार कौतुक वाटते.
आत्ता ही तीन दिवस सुट्टी मिळाली म्हणून लिहीण्याचा योग आला (आणला). मोठे झाल्यापासून दिवाळीची सुट्टी तर फारच मिस करतोय. दिवाळीचे पाच दिवस संपले तरी काही दिवस फक्त सुट्टी म्हणून अजुन मजा करायला मिळायची ती मिळणे तर दुरापास्तच झाले आहे. दिवाळीच्या सुट्टीत अवांतर वाचन ( जे शाळेत नेहमी करायला सांगितले जायचे) करणे फार आवडायचे. शाळेत असताना किमान दिवाळी अंक तरी वाचले जायचे. आता अभ्यासाची पुस्तकेच धूळ खात आहेत. सध्या झालेच तर वीकेंडला एखादी पिकनिक प्लॅन होते. दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न. पण आयुष्य खूप धकाधकीचे होत चालले आहे तेथे हे असेच चालायचे.
दिवाळी खूप झपाट्याने बदलत चालली आहे असेच वाटू लागले आहे. शाळेत शेवटचा पेपर देण्याची वाट पाहणारे आपण आता सॅलरी आणि बोनसच्या चेकची वाट पाहु लागलोय हे जाणवले तेव्हाच ते लहानपनीचे गाव फार दूर राहिल्याचे लक्षात आले. आता ही जमेल तितकी, जमेल त्या परीने दिवाळी एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो आहेच पण राहून राहून वाटते-काहीतरी मिस होतेय यार...

Comments

 1. छान झालीय पोस्ट...आणि शेवट पटणारा....

  ReplyDelete
 2. धन्यवाद अपर्णा...

  ReplyDelete
 3. अगदी मनातल लिहिले आहेस मित्रा ....

  ReplyDelete
 4. धन्यवाद..ब्लॉगचे नाव ही 'माझ्या मनातले काही' आहे म्हणून..

  ReplyDelete
 5. मस्त...

  वाचून दिवाळीच्या आठवणी ताज्या झाल्या.

  ReplyDelete
 6. आभार नागेश...
  शुभ दिपावली

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी