वर्ल्ड कप आला रे...

क्रिकेट म्हणजे आपला एकदम लाडका खेळ. क्रिकेट खेळणे, पाहणे, क्रिकेट वर गप्पा, चर्चा या सगळ्यातच भारतीय लोकांना प्रचंड रस आहे. हल्ली तसे क्रिकेट मध्ये २०-२० आल्यापासून मूळ क्रिकेटकडे फारच दुर्लक्ष झाले आहे. २०-२० वर्ल्डकप शिवाय आयपीएल यांच्यामुळे क्रिकेट मधील रंगत निघून गेली आहे. सध्याच्या फास्ट लाईफला हे शोभणारे असले तरी अजूनही वन डे आणि टेस्ट बघणे तितकेच छान वाटते. आता तर क्रिकेट पाहायला मोठे कारणच मिळाले आहे ते म्हणजे वर्ल्ड कप २०११. वर्ल्ड कप केवळ १५ दिवसांवर येऊन ठेपलाय आणि क्रिकेट रसिकांमध्येही चर्चेला सुरुवात झालीय.विशेष म्हणजे या वर्षी वर्ल्ड कप भारतात होत आहे त्यामुळे पूर्ण भारतभर सध्या क्रिकेट-फिवर चढला आहे.
स्टंपी-मॅस्कॉट
वर्ल्ड कपचे हे १० वे वर्ष. यापूर्वी ९ वेळा वर्ल्ड कप स्पर्धा घेण्यात आली. दरवर्षी वेगवेगळ्या देशात ही स्पर्धा घेतली जाते. १९८७ च्या वर्ल्ड कप नंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा भारतात आली आहे. माझ्या जन्माच्या आधीपासून वर्ल्ड कप होत असल्याने जुन्या सिरीज काही पाहायला मिळाल्या नाहीत. पण जेव्हा पासून क्रिकेट कळायला लागले तेव्हा पासून हा खेळ आवडतो आहे. वर्ल्ड कप मधल्या माझ्या आवडत्या सिरीज म्हणजे १९९६,१९९९ आणि २००३. कारण या आधीचे वर्ल्ड कप पाहण्याचा योगच आला नाही आणि २००७ च्या वेळी भारताने जी हाय खाल्ली ती पाहून तर जे घडले ते (वाईट) स्वप्नवतच वाटत होते. इतकी चांगली टीम असून पण साखळी सामन्यातच गारद व्हायची वेळ आली हे अगदीच खराब प्रदर्शन होते. आशा करूया कि भारतीय प्रेक्षकांसमोर तरी टीम इंडिया लाज राखेल.

वर्ल्ड कप मध्ये एक गोष्ट नेहमी पाहायला मिळते कि फायनलपेक्षा सेमी फायनल अधिक चुरशीची होते. १९९६ च्या वेळीची सेमी फायनल कोण विसरू शकेल ? कलकत्त्यात इडेन गार्डन्स वर भारतातर्फे सचिन तेंडूलकर सोडून कोणीच खेळले नाही. एक सचिन विरुद्ध श्रीलंका असाच काहीसा सामना वाटत होता आणि सचिनची विकेट गेली तसा घात झाला. एकामागून एक सारे जण फक्त हजेरी लावून माघारी गेले. सेमी फायनल सारख्या महत्त्वाच्या सामन्यात इतक्या बेजबाबदारपणे खेळले कि शेवटी प्रेक्षकांनाही संताप अनावर झाला. निकाल हा लागला की प्रेक्षकांच्या व्यत्ययामुळे सामना श्रीलंकेने जिंकल्याचे जाहीर करण्यात आले. क्रिकेट प्रेमींच्या मनात हा पराभव अजूनही तितकाच सलत आहे.

असाच एक अजून सामना जो कधी न विसरता येण्यासारखा आहे. १९९९ ची सेमी फायनल- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका. चुरशीचे सामने खूप होतात पण फार कमी सामने असे होतात ज्यात अनपेक्षित निकाल लागतात. दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ पण तरीही या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने क्षुल्लक चुका करून सामना गमावला. एक तर हर्शल गिब्स सारख्या अप्रतिम दर्जाच्या खेळाडूने स्टीव वाची सोडलेली कॅच हीच त्यांना फार महागात पडली आणि सामन्याच्या शेवटाच्या षटकात जिथे चार चेंडूत जिंकण्यासाठी फक्त एक धाव हवी होती आणि ते ही स्ट्राईक वर फुल फॉर्म मध्ये असणारा लान्स क्लुसनर ज्याने पूर्ण वर्ल्ड कप मध्ये तुफानी बॅटिंग केली होती. त्या वेळीस ९९% लोकांनी मनोमनी हे मान्य केले होते की दक्षिण आफ्रिका आता अंतिम सामन्यात पोहोचली आहे पण घडले ते काही भलतेच. तिथे ती एक धाव घेताना क्लुसनर आणि डोनाल्ड दोघांनी ही कदाचित हाच विचार केला असावा की आपण जिंकलो आहोत. त्या क्षणी केलेला उतावीळपणा खूप जास्त महागात पडला. दक्षिण आफ्रिका हरली आणि ऑस्ट्रेलिया फायनलला गेली. विस्डेनने या सामन्याला आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्वोत्तम सामन्यांत स्थान दिले आहे.

वर्ल्ड कप मधील अजून एक रंगतदार घटना म्हणजे भारत- पाकिस्तान सामना. आजपर्यंत पाकिस्तान वर्ल्ड कप मध्ये भारताला हरवू शकला नाहीये ही आपल्यासाठी वर्ल्ड कप जिंकल्यासमानच गोष्ट आहे आणि जेव्हा जेव्हा भारत- पाकिस्तान वर्ल्डकप मध्ये समोरासमोर आले आहेत तेव्हा भारतीय संघ चांगलाच खेळला आहे. त्यातील काही किस्से अजूनही रंगवून सांगितले जातात. १९९२ च्या वेळी मियांदाद आणि किरण मोरेची वादावादी असो किंवा १९९६ च्या वेळी आमीर सोहेल आणि प्रसाद मधली खुन्नस.  त्याच वेंकटेश प्रसादने १९९९ मध्येही पुन्हा प्रभावी कामगिरी करत पाकिस्तानला पाणी पाजले. २००३ च्या वेळी झालेली मॅच तर आनंद सोहळा! सचिन तर पेटलाच होता...शोएब, वासिम, वकार सगळ्यांना झोडपले. त्या सामन्यात मारलेले चौकार-षटकार हे त्याच्या एक-एक शतकाच्या बरोबरीस होते. २००७ च्या वेळीस मात्र हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी साखळीतच गारद झाले आणि घरी परतले. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये हा योग येईल कि नाही ते कळेलच.

रेकॉर्ड्स पाहिले तर (किंवा नाही पाहिले तरी ) कळते कि वर्ल्ड कप मध्येही ऑस्ट्रेलियानेच बाजी मारली आहे. ९ पैकी ४ वेळा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला आहे ते ही एका हॅट्रिकसह. वेस्ट इंडीजने ही लागोपाठ दोन वेळा वर्ल्ड कप जिंकला पण भारताने त्यांची परंपरा मोडत १९८३ मध्ये वर्ल्डकपवर नाव कोरले. तो 'याची देही याची डोळा' नाही पहिला पण निदान सचिन जेव्हा पासून खेळतो आहे ते सगळे वर्ल्ड कप पहिले हेच खूप आहे. १९८३ ची विजयगाथा बर्‍याचदा ऐकून आणि पाहून ही झाली. ऑस्ट्रेलियाच्या खेळात मात्र जिंकण्याची जिद्द कायम दिसत आली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ते हार मानत नाहीत आणि हे १९९९ च्या सेमी फायनलला कळलेच होते. इतर ही अनेक वेळा ते हातातून निसटलेले सामने जिंकवून दाखवतात आणि प्रत्येक वेळी जिंकवून देणारे स्टार खेळाडू नसतात हे अजून विशेष. २००३ च्या फायनलला भारताविरुद्ध खेळताना जी 'टीम इंडिया' सलग जिंकत फायनलला पोहोचली होती तिला फायनल मध्ये खेळणे हे काय दर्जाचे असावे लागते हे दाखवून दिले. त्या रिकी पॉंटिंगने जी आपली गोलंदाजी धुतली ती कायम स्वप्नात येऊन छळावी अशी. बाकी रिकी कितीही खडूस ऑस्ट्रेलियन असला तरी मला आवडतो. पण त्या दिवशी काही पाहवेना. २० वर्षांनी आलेली संधी भारताने सहजपणे गमावली.

दक्षिण आफ्रिका माझी आवडती टीम पण ही टीम वर्ल्ड कप मध्ये नेहमी कमनशिबी ठरली आहे. कधी नियमांचे घोळ तर कधी त्यांच्या स्वत:च्याच चुकांमुळे. सर्व दृष्टीने परिपूर्ण असूनही ही टीम कुठेतरी कच खाते आणि बाहेर पडते. यंदाच्या वर्ल्ड कप साठी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही फेवरेटस समजले जात आहेत. आपल्या सचिनचा हा शेवटचा वर्ल्ड कप त्यामुळे त्याच्याकडून सगळ्यांच्या फार अपेक्षा आहेत(नेहमीच असतात). वर्ल्डकप मध्येही त्याच्या नावावर सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड्स आहे आणि अजून नवीन रेकॉर्ड्स करणे त्याच्यासाठी काही अवघड नाहीये. या वेळीस फायनल मुंबईत आहे म्हणजे अजूनच मजा. मुंबईत फायनलला सचिनने अजून एक शतक ठोकले आहे आणि याच मैदानावर भारताने विश्वचषक जिंकल्याचे स्वप्न कोणत्याही क्रिकेटप्रेमीला वाटणे साहजिक आहे आणि त्यात विश्वचषक जिंकण्याचे सचिनचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी लोकांनी नवस वगैरे करायला सुरुवात केली आहे. आता देव पावो किंवा सचिन पावो, वर्ल्ड कप जिंका म्हणजे बस्स!

Comments

  1. तुझं(आपलं) स्वप्न पुर्ण व्हावे ही इच्छा आहे :)

    मस्त लिहले...

    ReplyDelete
  2. धन्यवाद...तुझी पोस्ट ही झकास झाली रे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी