सिरीयल कीलिंग
आज मी एका गंभीर विषयावर लिहायचे ठरवले आहे. पोस्टच्या शीर्षकावरून तुम्हाला जर असे वाटले असेल की हे कुठल्या तरी सिरीयल किलर विषयी लिहित आहे तर तसे बिलकुल नाहीये. हा मुद्दा समस्त पुरुष वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मांडणे जरुरीचेच होते! तशाही स्त्रिया नेहमीच नवरोबांचे डोके खातात पण गेल्या काही वर्षात त्यांच्या डोक्यावर हे सिरीयलचे भूत बसले आहे तेव्हापासून पुरुषांना टी.व्ही. ही पाहायला मिळू नये हे अतीच होत आहे. या संदर्भात कोणी काही मोर्चे वगैरे पण काढत नाहीत. मला गेल्या कित्येक वर्षात मी असा निवांतपणे टी. व्ही. पाहत बसलोय असे आठवतच नाही. दुपारी सगळे झोपलेत आणि मी पिच्चर पाहतोय किंवा सगळेजण आपापल्या कामात आहेत आणि मी तासभर नुसतीच चॅनेलसर्फिंग करतोय हे फार मिस होतंय...पण हे सगळे सुखाचे क्षण आता पुन्हा मिळतील असे वाटत नाही. टी.व्ही.फेकून नाही दिलाय आमचा,पण बिघडलाय जरूर! गेली दहा वर्षे समस्त टी.व्ही.ना ही सिरीयल नामक कीड लागलीय पण 'जिच्या हाती रिमोट कंट्रोल, तीच करील पेस्ट कंट्रोल' असेच म्हणायची वेळ आली आहे. मी टी.व्ही.पाहायचो असे मी हल्ली बोलतो. नाहीतरी लॅपटॉप आहेच त...