कलेचं देणं

कलेला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवाने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे म्हणा. तसे पाहिले तर प्रत्येकालाच कमी-अधिक प्रमाणात कोणत्या ना कोणत्या कलेचे वरदान लाभलेले असते. महत्वाचे हे आहे की आपण त्या कलेला कसे जोपसतो ते. कित्येकांना आपल्या अंगी असणार्‍या कलेचे महत्त्वच कळत नाही. काहींना ते ठाऊक असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. असे म्हणतात की कला हे देवाशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. जिथे आपण 'मी'पणा विसरून त्या कलेच्या धुंदीत हरवून जातो आणि या कलेतून मिळणारा आनंद ही स्वर्गीयच असतो, थेट ईश्वराशी भेट व्हावी असा.

कला नक्की काय आहे? ती एक ईश्वरसेवा आहे, ती मनोरंजनासाठी आहे, समाजप्रबोधनासाठी आहे की केवळ पैसा कमवण्यासाठी आहे. ती याहून बरेच काही आहे. कलेतून पैसा कमावणे हा त्याच्या प्राथमिक हेतू तरी नक्कीच नाही. तरीही जे अगदीच गरीब आहेत, ज्यांचा उदरनिर्वाहच या कलेवर आहे, ज्यांना ती अमुक एखादी कला सोडून काही येत नाही त्यांनी आपला संसार चालवण्यासाठी, आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कलेचा वापर केला तर त्यास काही एक हरकत नाही. बहुधा देवाने ती कला त्यांना यासाठीच दिली असावी. हरकत आहे ती कलेचा बाजार मांडणार्‍यांची. आपली कला विकून भरघोस पैसा कमवण्याची स्वप्ने पाहणार्‍यांची.

जर कलावंत सच्चा असेल आणि आपल्या कलेवर मनापासून प्रेम असेल तर त्या कलाकारासाठी सगळ्यात महत्त्वाचे काय असेल तर ती त्याची कला. तीच त्याची देवता असते आणि तीच सर्वस्व असते. तिच्याशिवाय इतर काहीच रुचत नाही, पटत नाही. आयुष्यात एक निष्ठा राखवी तर ती कलेशी, असे एका कलाकाराचे आयुष्य असते. मग ती विकली कशी जाऊ शकेल? एक सच्चा कलावंत आपल्या कलेशी, आपल्या देवतेशी कायम प्रामाणिक राहतो आणि त्याने तसे वागणेच अपेक्षित आहे. मग कला ही विकाऊ असते का ? मला असे मुळीच वाटत नाही. कला ही कधीही पैशाच्या किंवा कुठल्याही मूल्याच्या प्रमाणात मोजली जाऊ शकत नाही. तिचे कौतुक होऊ शकते, तिला दाद दिली जाऊ शकते. राजाच्या दरबारी कलेला मान मिळत असे. राजा कलावंतांचा सन्मान करी पण त्यांना विकत थोडी न घ्यायचा. जे तिला पैशाच्या तराजूत मोजू पाहतात त्यांची कीव येते मला. आपण फारफार तर कलाकारांचा सन्मान करू शकतो. पैशाच्या मोबदल्यात आपण अमुक एक कला सादर करा हे म्हणणे किती चुकीचे आहे.

पण हल्ली जो कलेचा बाजार मांडला जातोय ते पाहून निश्चितच खटकते. आजकाल अधिक तर लोक प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्याच्या हेतूनेच या क्षेत्रात येत आहेत. रिअलिटी शोमुळे झटपट पैसा आणि नाव कमावण्याच्या दृष्टीने पालक देखील आपल्या मुलांना सहजरीत्याही कलेची आणि स्पर्धेची ओझी पेलायला भाग पाडत आहेत. त्यामुळे हे होतकरू कलाकार केवळ परीक्षकांचे कौतुक, मोठमोठे सेट्स, प्रेक्षकांच्या टाळ्या यात हरवून जाणार आणि हे शो बंद झाल्यावर ही झगमगती दुनिया एकदम नाहीशी होणार आणि ते पुन्हा जमिनीवर येणार. यातून टिकाव धरणे हे फार कठीण असते कारण आपणच त्यांना या ग्लॅमरची सवय लावून देतो. मग यातून कलाकार निर्माण झाले तरी त्यांची निष्ठा पूर्णत: कलेशी राहीलच याची खात्री कशी देणार ?

आजच बालगंधर्वांचा चित्रपट पाहिला. या अशा जुन्या काळातल्या कलाकारांना पाहून वाटते की त्यांनी जी जपली ती खरी कला. आपण जिला कला म्हणतो, जी कला जपतो ती त्याच्या कुठे आसपासही नाही. घर-दार सोडून एका कलेचा ध्यास घेऊन सारे आयुष्य खर्ची पाडणे हे आजच्या पिढीला कितपत जमण्यासारखे आहे. बालगंधर्वांसारखे असे कितीतरी दिग्गज कलावंत कायम पडद्याआडच राहीले असतील त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचली नाही म्हणून काही त्यांनी कलेची सेवा सोडली नाही. जे काम देवाने त्यांना सोपवले ते आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी रसिकांना दिले. जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना आयुष्याची कित्येक वर्षे त्यांनी खर्च पाडली आणि कित्येक कठीण प्रसंगांना तोंड दिले असेल ते तिथे उपस्थित राहून टाळ्या वाजवणारे कल्पनाही करू शकणार नाहीत.

काही दिवसांपूर्वी एक मराठी दिग्दर्शक त्याच्या मुलाखतीत म्हणाला की, 'हल्ली कलेचा व्यवसाय झाला आहे. निर्मात्यांना कला की कलेसाठी नसून पैसा कमवण्यासाठी हवी आहे.'' हे अगदी माझ्या मनातलेच सांगितले त्याने. काही चांगली कला सादर करावी असे फार कमी जणांना वाटते. आनंदाची गोष्ट म्हणजे मराठीत आता नव्या विषयांचे चित्रपट येत आहेत, नवी नाटके येत आहेत. पण लोक घराबाहेर पडून पाहायला गर्दी करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कलेचे हवे तसे चीज होत नाहीये. सीरीयल मात्र खोर्‍याने येत आहेत. जिथून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे तिथे अतिशय टूकार दर्जाची कला सादर केली जाते. मराठी सीरीयल मधे कितीतरी दिग्गज कलाकार काम करत आहेत. पैसा अधिक मिळतो हेच जर त्यामागचे कारण असेल तर हे फार चुकीचे आहे. या कलाकारांनी स्वत:हून पुढाकार घेत हे शिवधनुष्य पेलले पाहिजे. एक कलाकार म्हणून उत्तम तेच सदर करायला आपण बांधील आहोत याची जाणीव केव्हा होणार यांना ? आजच्या घडीला देखील जे कलावंत आपल्या क्षेत्रात यशस्वी आहेत ते त्यांच्या कलेशी प्रामाणिक आहेत म्हणूनच. ग्लॅमरच्या ओघात वाहून जाणारे आपल्या कलेशी एकनिष्ठ कसे राहू शकतील ?

मराठीतल्या एका कलाकाराने मागे मुलाखतीत सांगितले होते की, हल्ली नाटकांना जे अनुदान दिले जाते ते बंद केले जावे कारण नाटक निर्मितीच मुळात अनुदानाचे हिशोब ठेवून केली जाते मग ते नाटक, त्यातील विषय आणि इतर सगळ्याच गोष्टी दुय्यम स्थानावरच राहिल्या. अशाने चांगली कलाकृती कशी पुढे येणार? मराठीत तर नाटकांची मोठी परंपरा आहे. मराठी रंगभूमीवर काम केलेल्या लोकांना इतरत्रही मान दिला जातो. मग ही नाटकेसुद्धा व्यवसायाच्या हेतूने बनवली गेली तर मग ती मालिकांच्या वाटेने जायला वेळ लागणार नाही.

नटरंगचेच उदाहरण घ्यायचे झाले तर, हा चित्रपट म्हणजे सर्व दृष्टीने उत्तम कलाकृती होती. उत्कृष्ट संगीत, अर्थपूर्ण गीतलेखन, सुंदर अभिनय आणि कथानक. चित्रपट अतिशय गाजला तो अजय-अतुलच्या अप्रतिम संगीतामुळे. हीच गाणी सर्वत्र वाजू लागली. हल्लीच एका टी.व्ही.वरील कार्यक्रमात 'नटरंग उभा' या गाण्यावर नृत्य सदर झाले. एकवेळ 'वाजले की बारा' आणि 'अप्सरा आली' या गाण्यांवर नृत्य सादर करणे सोपे आहे पण 'नटरंग उभा' सारख्या गाण्याचे सादरीकरण त्या गाण्याचा अर्थ आणि भाव समजून न घेता केली तर निदान आमच्यासारख्या रसिकांना खटकतेच. आणि श्रोतेही केवळ कानाने ऐकल्यासारखे त्या गाण्यांचा आनंद घेणार असतील तर ते त्या कलावंतांनाही आवडणार नाहीच.

कलेच्या संदर्भातील नेहमी खटकनारी अजुन एक गोष्ट म्हणजे चांगल्या गाण्यांच्या चालीवर देवाची किंवा इतर कसली ही खालच्या दर्जाची गाणी बनवली जातात. म्हणजे आपण देवाच्याच दारातील फुले चोरायची आणि पुन्हा त्यालाच वाहायची. अशाने कोणता देव पावनार आहे यांना? आणि भरीस भर म्हणून ही इतकी वाईट गाणी आनंदाने ऐकनारे लोक ही आहेत. चोरांना असे पाठीराखे असले की अजुन काय होणार?

मी काही कुणी कलाकार नाही. मी फक्त मला जमेल तशा मोडक्या-तोडक्या कविता करतो. गाण्यावर प्रचंड प्रेम आहे पण फक्त ऐकण्याइतकेच कळते. तरीही कविता आणि गाणे या दोन गोष्टींनी माझे सारे आयुष्य व्यापून राहते आणि कायमच राहील. माझ्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, त्यात किती यश, किती अपयश, सुख-दु:ख असेल याहीपेक्षा या दोन गोष्टी कायम माझ्या सोबत असतील याची जाणीव फार सुखावणारी आहे. माझी कला माझ्यासोबत आहे. मला नको तो पैसा, नको ती श्रीमंती कारण इथे समाधान नाही, ते या कलेतून मला मिळते. अजुन तर बरीच वर्षे गाठायची आहेत त्यात बरेच काही करायचे आहे. पण पुढे कधी जर या क्षेत्रात काही करायची संधी मिळालीच तर शक्य तितका कलेशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करील इतके नक्की.

जाता जाता ' बालगंधर्व' चित्रपटातील काही गोष्टी आठवल्या त्या इथे नमूद करतो. बालगंधर्वांनी कायम रसिकांची सेवा करण्यातच धन्यता मानली. बालगंधर्वांनी कलेचा व्यवसाय नाही केला, त्यांनी ती एक तपश्चर्या म्हणूनच स्वीकारले. त्यांनी कधीच पैशासाठी किंवा इतर कुठल्याही मोहासाठी कलेशी, आपल्या रसिकांशी प्रतरणा केली नाही. त्यांना जे काही लाभले होते ते दैवी वरदानच होते तेच त्यांनी रसिकांना वाटले.
तेरा तुझे मैं सोप दूँ....कुछ भी नही है अब मेरा...
गीतकाराने जे लिहिले तेच त्यांच्याबाबत अगदी हुबेहुब लागू होते.एका प्रसंगी बालगंधर्व म्हणतात- 'अमरत्व मिळवण्यासाठी काम नाही करायचे त्यांना, आनंद घेण्यासाठी करायचे आहे' आणि मग असेच कलाकार खर्‍या अर्थी अमर होऊन जातात.

( ता.क.- ही पोस्ट 'बालगंधर्व' पाहण्याआधीच लिहिली होती. पण मुद्दामहून चित्रपट पाहिल्यावरच पोस्ट करत आहे )

Comments

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी