मोरया- जल्लोष की आक्रोश...!!

तूच माझी आई देवा तूच माझा बाप
गोड मानूनी घे सेवा पोटी घाल पाप...
या ओळींसह चित्रपटाची सुरूवात होते आणि सोबतीला सगळ्यांच्या लाडक्या लालबागच्या राजाची मिरवणूक. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणेशाच्या नावाने करावा तशी 'मोरया' चित्रपटाची सुरूवात ही या गाण्याने आणि ज्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहतात अशा लालबागच्या राजाच्या दर्शनाने होते.

(अवधूत गुप्ते ज्यांनी या चित्रपटाचे संगीत आणि दिग्दर्शन अशा दोन्ही बाजू सांभाळल्या आहेत त्यांनी हल्लीच एका मुलाखतीत सांगितले की 'मोरया' चित्रपट करायचा ठरला तेव्हाच म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी ही लालबागच्या राजाची मिरवणूक रेकॉर्ड करायचे ठरवले. तब्बल १० तासाच्या रेकॉर्डिंग पैकी जेमतेम ५-६ मिनिटांची दृश्‍ये या चित्रपटात वापरली आहेत. परंतु ती प्रदीर्घ शूटिंग पाहताना कधीच कंटाळा येत नाही. प्रत्येक भाविकच्या चेहऱ्यावरील भाव, ढोल -ताशाच्या गजरात तल्लीन होऊन नाचणारे भक्तगण पाहताना आपणही हरवून जातो.)

'गणेश चाळ' आणि' खटाव चाळ' या मुंबईतील दोन जुन्या चाळी आणि तेथील २० वर्षांची परंपरा लाभलेले दोन गणेश मंडळे या पार्श्वभूमीवर कथानक आकार घेते. मनोज शिंदे उर्फ मन्या (संतोष जुवेकर) आणि समीर सय्यद (चिन्मय मांडलेकर) हे दोघे अनुक्रमे गणेश चाळ आणि खटाव चाळीचे प्रतिनिधित्व करतात. आपापली गणेश मंडळे सांभाळणारे हे दोघे आणि त्यांची मित्रमंडळी कायम एकमेकांशी स्पर्धा करू पाहतात. मग ती दहीहांडी असो वा गणेशोत्सव प्रत्येक ठिकाणी ते प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे राहतात. या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे ' दिलीप प्रभावळकर' . या दोघांच्या भांडणामध्ये कायम त्यांना समजावून सांगणारे, त्यांची कान उघडणी करणारे 'काका'. गणेशोत्सवाचा मूळ हेतू विसरला जाऊन आपण कसे गटबाजी करून एकमेकांशी स्पर्धा करत आहोत याची वेळोवेळी या दोघांना जाणीव करून देऊनही ते आपला हट्ट काही सोडत नाहीत.

गणेशोत्सवाला सुरुवात होते तशा चित्रपटात वेगवान घडामोडी होऊ लागतात. मन्या आणि समीर नवनवे डाव टाकून आपल्या गणपतीची शेवटची उत्तरपूजा होणार नाही यासाठी शक्य ते सर्व काही करतात पण लढाई जिंकायची तर पैसा लागणार आणि म्हणून दोघेही नाईलाजास्तव राजकारण्यांशी हातमिळवणी करतात. इथून पुढे मग ते स्वत:च आपल्या डावाचे बळी ठरत जातात. या सगळ्याचा पश्चाताप होईपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. आपल्या गणेश मंडळास ग्लॅमर मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नात त्यांची बदनामी आणि समस्यांसह न सुटता येण्यासारखे जाळे विणले जाते.

चित्रपटाची गाणी ही प्रसंगानुरूप आहेत. शीर्षक गीत सुंदर जमलंय. गोविंदा रे गोपाळामुळे दहीहांडीसाठी एक नवे मराठमोळे गाणे मिळाले आहे. संदीप खरे लिखीत कव्वाली तर अप्रतिम झालीये. अवधूतने गाण्याच्या निमित्ताने चित्रपटात दिग्दर्शकाने झळकण्याची हिंदीमधली प्रथा मराठीतही आणली आहे. उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर यांची जुगलबंदी असणारी लावणी प्रेक्षणीय असली तरी तितकीशी श्रवणीय नाही. पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने धिंगाणा घालण्याच्या वृत्तीचा इथे अनुभव येतो आणि प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी खालच्या पातळीवर जाण्याच्या मनोवृत्तीचा इथे निषेध नोंदवला आहे. 'देव चोरला' हे अरविंद जगताप लिखीत गाणे सुरेख झाले आहे. सर्वत्र वाजणारे उत्सवाचे पडघम एकाएकी नाहीसे होऊन शांतता पसरावी तसे हे गाणे मनात रुजत जाते.

स्पृहा जोशी आणि परी तेलंग यांच्या वाट्याला फार कमी दृश्‍ये आहेत ज्यात त्यांचे काम चांगले झाले आहे. मूळ कथानक हे 'मनोज' आणि 'समीर' या दोन व्यक्तिरेखांभोवती अधिक असल्याने नायिकांना फारसा वाव नाहीये. स्पृहाने मनोजला सांभाळून घेणारी आणि स्वाभिमानी मुलीची भूमिका साकारली आहे तर परी तेलंग हि एका न्युज चॅनेलची रिपोर्टर आहे. गणेश यादव यांनी विनोदी ढंगाचा इनस्पेक्टर साकारला आहे. तो 'जोश' मधील शरत् सक्सेनाच्या इनस्पेक्टरच्या भूमिकेची आठवण करून देतो.

राजकारणाचा 'झेंडा' हाती घेऊन चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवणाऱ्या अवधूतने 'मोरया' मध्ये समाजकारणास हात घातला आहे. सामाजिक जीवन असो वा राजकीय, अवधूतने मराठमोळ्या प्रेक्षकांस रुचेल अशी कथानके आणि पात्रे मांडली आहेत. शिवाय टूकार मनोरंजनपर चित्रपट बनवण्यापेक्षा गंभीर आणि संवेदनशील विषय यांची निवड केल्याने प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा दोन्ही चित्रपटांना लाभला आहे.

झेंडाप्रमाणे इथेही राजकारणाचे गल्लिच्छ रूप अवधूतने काही प्रमाणात पडद्यावर आणले आहे. प्रत्येक वाईट घटना आणि गुन्ह्यांमध्ये राजकारण्यांचा असणारा हस्तक्षेप पाहून सामान्य जनतेची कीव येते.याबाबत हिंदीमध्ये राजकुमार हिराणी जे काम करत आहेत ते काही प्रमाणात अवधूतनेही सुरू केले आहे आणि त्याबाबत अवधूतचे विशेष कौतुक.

सुदैवाने मी चित्रपट मल्टिफ्लेक्समध्ये न पाहता एका साध्याच सिनेमागृहात पाहिला. कारण अवधूत गुप्तेना अपेक्षित असणारा प्रेक्षक तिथे मिळेल याची काही खात्री नाही. संतोषच्या आक्रमक संवादांना, चिन्मयच्या शेरो-शायरीला, उर्मिला-क्रांतीच्या ठसकेबाज लावणीला- जिथे जिथे शिट्ट्या आणि टाळ्या अपेक्षित होत्या त्या पुरेपूर होत्या आणि चाळ संस्कृतीची नाळ मध्यमवर्गीय मराठी तरुणाईशी जितकी जुळते तितकी उच्चभ्रू तरुणाईशी नाही जुळत.

गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटात व्यावसायिक यश आणि प्रेक्षकांची पसंती केवळ महेश मांजरेकरांच्या चित्रपटांनाच मिळाली आहे. यंदा अवधूत गुप्तेचे ग्रह चांगले असल्याने त्यांना सर्वत्र यश मिळते आहे. झेंडा आणि मोरयाच्या यशानंतर अवधूतकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.शिवाय संतोष आणि चिन्मय हे दोन अवधूतचे लाडके कलाकार 'झेंडा'नंतर 'मोरया' मध्ये पुन्हा एकत्र आलेत. हिंदीप्रमाणे इथे 'कॅम्पबाजी' मात्र सुरु होऊ नये कारण ते मराठी चित्रपटाच्या प्रगतीच्या दृष्टीने हितकारक नाही.

चित्रपट एकंदर छान जमलाय. शेवट थोडा फिल्मी वाटला तरी तो तसाच होणे अपेक्षित होते आणि योग्यही. जाता जाता एवढेच सांगता येईल की चित्रपटाची गाणी हल्ली नेटवर सर्वत्र उपलब्ध झाली असली तरी पायरटेड कॉपी मिळण्याची वाट पाहु नका. सिनेमागृहात जाऊन पाहून या. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन द्या.

गणपती बाप्पा मोरया!!

ता. क. - अवधूतवर असणाऱ्या प्रेमापोटीच लेखात एकेरी उल्लेख केला आहे .गुप्तेंच्या चाहत्यांना सदर बाब खुपू नये.

Comments

 1. गेल्या रविवारी सहकुटुंब सगळे जाणार होतो 'मोरया' बघायला पण वेळेवर 'प्लान' फसला ...आणि बघायचा राहून गेला ...तुझी पोस्ट वाचून परत एकदा तो थेटरात जाऊन पाहावा अस वाटतेय ..बघुया मुहूर्त कधी निघतो.. बाकी छान 'रिव्यू' लिहला आहेस...

  ReplyDelete
 2. चांगला आहे चित्रपट. अवधूतचे प्रयत्न वाखाणण्याजोगे. बाकी जास्त मजा घेण्यासाठी चित्रपट साध्या सिनेमागृहात पाहावा याच्याशी सहमत.

  ReplyDelete
 3. धन्यवाद देवेन...पिक्चर मस्त आहे...फुल टू करमणूक

  ReplyDelete
 4. अगदी...असला दंगा पाहिजेच अवधूतच्या शिनेमाला

  ReplyDelete
 5. छान परीक्षण लिहिले आहेस ...
  मी पण पहिला हा सिनेमा ..
  आवडला

  ReplyDelete
 6. धन्यवाद बंड्या...
  मराठीत असे नव्या विषयाचे सिनेमे बनायलाच हवेत!

  ReplyDelete
 7. बास,बास,बास !!!
  दुनियादारी, क्रिकेट, आणि मराठी सिनेमा / संगीत …. आपल्या आवडी निवडी फारच सारख्या दिसत आहेत मला ….
  आणि गम्मत म्हणजे दुनियादारी, क्रिकेट वर जसे तू आणि मी लेख लिहिले आहेत तसे मराठी चित्रपटावर देखील लिहिले आहेत.

  मी वावटळ या सिनेमा बद्दल इथे लिहिले आहे : http://prasadgates.blogspot.in/2012/07/blog-post.html

  आणि आता मोरया बद्दल : मला हा सिनेमा शेवटाकडे गंडल्यासारखा वाटला. फारच ढोबळपणे दाखवल्या आहेत गोष्टी. झेंडा
  पुढे मोरया कमकुवत वाटला … गाणी मात्र झेंडा इतकीच जोरदार आहेत

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी