बालपणीचा खेळ सुखाचा

या विषयावर तसं या पूर्वी बऱ्याच जणांनी, बऱ्याच ठिकाणी लिहिले आहे पण तरीही मी पुन्हा लिहिणार आहे. एक तर ही पोस्ट लिहायची असे दीड वर्षापूर्वीच सुचले होते आणि तेव्हापासून मोडक्या-तोडक्या अवस्थेत ती ब्लॉगच्या अडगळीच्या ई-पानात बंद होती आणि काही केल्या लिहायचे होते पण जमत नव्हते. शिवाय लहानपणीचा विषय निघाला आहे तर तेव्हा एखादी गोष्ट तो करतो म्हणून मी पण करणार या त्या वेळच्या स्वभावास अनुसरून मला पण या विषयावर लिहायचे होतेच. बालपणीचे खेळ तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. लिहायला सुरुवात करणार तर प्रत्येक खेळाच्या कैक आठवणी. त्यातील निवडक आठवणी शेअर करतो आहे. पत्ते हे आम्ही पार लहानपणापासून खेळत आलो आहोत. बैठ्या खेळांमध्ये सगळ्यात जास्त हाच खेळला असावा. आम्ही भावंडे गावी जमलो की न चुकता पत्त्यांचे डाव होतात. गावाच्या घरातच तशी काही जादू आहे म्हणून की तिथे फक्त पत्ते खेळल्याच्या आठवणी आहेत म्हणून ते काही ठाउक नाही पण एरवी वर्षभर आम्ही कधी पत्ते खेळत नाही आणि गावी गेलो की पुन्हा लहान होऊन पत्ते मांडून बसतो. त्यात पत्ते खेळण्याचा मोठ्या मंडळींना त्रास कमीच म्हणून त्यांचा ही काही आक्षेप ...