बालपणीचा खेळ सुखाचा


या विषयावर तसं या पूर्वी बऱ्याच जणांनी, बऱ्याच ठिकाणी लिहिले आहे पण तरीही मी पुन्हा लिहिणार आहे. एक तर ही पोस्ट लिहायची असे दीड वर्षापूर्वीच सुचले होते आणि तेव्हापासून मोडक्या-तोडक्या अवस्थेत ती ब्लॉगच्या अडगळीच्या ई-पानात बंद होती आणि काही केल्या लिहायचे होते पण जमत नव्हते. शिवाय लहानपणीचा विषय निघाला आहे तर तेव्हा एखादी गोष्ट तो करतो म्हणून मी पण करणार या त्या वेळच्या स्वभावास अनुसरून मला पण या विषयावर लिहायचे होतेच. बालपणीचे खेळ तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. लिहायला सुरुवात करणार तर प्रत्येक खेळाच्या कैक आठवणी. त्यातील निवडक आठवणी शेअर करतो आहे.

पत्ते हे आम्ही पार लहानपणापासून खेळत आलो आहोत. बैठ्या खेळांमध्ये सगळ्यात जास्त हाच खेळला असावा. आम्ही भावंडे गावी जमलो की न चुकता पत्त्यांचे डाव होतात. गावाच्या घरातच तशी काही जादू आहे म्हणून की तिथे फक्त पत्ते खेळल्याच्या आठवणी आहेत म्हणून ते काही ठाउक नाही पण एरवी वर्षभर आम्ही कधी पत्ते खेळत नाही आणि गावी गेलो की पुन्हा लहान होऊन पत्ते मांडून बसतो. त्यात पत्ते खेळण्याचा मोठ्या मंडळींना त्रास कमीच म्हणून त्यांचा ही काही आक्षेप नाही. रमी, मेंढीकोट, तीन-पानी,चॅलेंज,भिकार-सावकार, लाडू-लाडू,डॉंकी-मंकी,सात-आठ, पाच-तीन-दोन, गटार-उपसी,चटई-चटई, गुलामचोर, जोडपत्ता पासून सगळे खेळ आम्ही उकरून उकरून काढतो.

पत्त्यांची जादू ही आठवत असेलच न तुम्हाला ? लहान मित्रांना अशा जादू करून दाखवायच्या आणि भाव खायचा, मग कधीतरी त्याची युक्तीही 'कुणालाच सांगायची नाही !' या अटीवर सांगून टाकायची. म्हणजे या जादूचा वारसा तसाच पुढे चालू राहावा म्हणून...! पत्त्यांचे घर तर पत्ते खेळणाऱ्या प्रत्येकाने बांधले असेलच. सिनेमात दाखवतात तसे स्वप्नाळू नायिकेने बांधलेल्या पत्त्यांच्या घरापेक्षा आपण प्रथमच बांधलेले पत्त्यांचे घर आणि वाऱ्यापासून वाचवत ते पूर्ण झाल्यावर झालेला आनंद व्यक्त करत सगळ्यांना तो पाहायला बोलावणे हे आता कुठे ?

नव्वदीच्या दशकात ट्रम्प कार्ड्सचा खूप बोलबाला होता. आमच्या मित्र मंडळीत बऱ्याच जणांकडे तसे WWF आणि क्रिकेटचे 'कॅट' होते. हाईट आणि वेट 'क्लॅश' होण्याची शक्यता ही यातच कळली आणि क्रिकेटचे चाहते असाल तर तेव्हाचे Big Fun आणि centre fresh यांनी काढलेले क्रिकेट कार्ड्स तर माहिती असायलाच हवेत. माझ्याकडे कित्तीतरी म्हणजे जवळपास हजारेक कार्ड्स जमले होते आणि ते अजूनही कुठल्याशा बॉक्स मध्ये ठेवले आहेत जपून. त्यातील काही आम्ही दुकानामधून ढापले ही होते हे सांगायला आता मला बिलकुल अपराधी वाटत नाही. कारण चिंगममध्ये इंटरेस्ट नव्हताच आम्हाला...! ट्रम्प कार्ड्स सारखे पैशाने विकत घ्यायचे खेळ तेव्हा परवडत नव्हते म्हणून मग आम्ही माचीसाचे कवर जमा करायचो. असे वेगवेगळे १००-२०० कवर जमवून त्यांनी तशाच प्रकारचा एक खेळ खेळायचो. तो बहुतेक नवीन शोध लावला होता आम्ही.

बैठ्या खेळांमध्ये कॅरम आणि बुद्धिबळ जास्त लोकप्रिय असले तरी लहान असताना ते मोठ्यांना खेळताना पाहायला तितकेच आवडायचे. पत्ते खेळताना 'मला पण घ्या न...'म्हणणारी लहान मुले बुद्धिबळ बघताना कशी सिरीयस होऊन तो खेळ पाहत राहायची. अगदी लहान असायचो तेव्हा हा खेळ कधी समजायचाच नाही असे वाटायचे. केवढे डोके लावावे लागते हा खेळताना...कॅरम मध्ये हाताचे कौशल्य आणि अचूकता लागते पण बुद्धिबळात हुशारी आणि योग्य निर्णयक्षमता असावी लागते हे त्या भाबड्या मनास कसे कळायचे. तेव्हा तरी आम्ही या दोन्हीमध्ये प्रेक्षकच होतो पण कुतूहल मात्र भारी !

त्याशिवाय काही विकत आणलेले खेळ ही त्या-त्या वेळी खूप आवडते असत. सापशिडी आणि ल्युडो हे अगदी घराघरात पोहोचलेले खेळ. मजल-दरमजल करत, शिड्यांच्या सहाय्याने घर गाठायला यावे तर ९८ वर सापाने गिळून पुन्हा १३ वर यावे. या उलट ल्युडो मध्ये सगळ्या चार सोंगट्या घरी पोचवण्याची घाई आणि शिवाय रस्त्यामध्ये शिकार करायची संधी आणि व्हायची भीतीसुद्धा ! त्याचे कवडे फेकताना ही त्यावर जादू फुकून टाकायचे म्हणजे हवे ते आकडे मिळतात. हे सारे खेळ पाहुणे मंडळी आली की विशेष उत्साहाने खेळले जात. सापशिडी पण महाग म्हणून गावी आठ-चल्लस ने जमिनीवर चौकोन आखून एक वेगळा खेळ मांडायचो. त्याचे नाव नाही आठवत. सोंगट्या असायच्या बांगड्यांचे तुकडे किंवा दगडी. आठ किंवा चल्लस पडल्या शिवाय डावाला सुरुवात नाही आणि पट आखायचे ते कोळशाने.

सापशिडी प्रमाणेच 'नवा व्यापार' हा ही एकदम आवडीचा. हा खेळायचा म्हणजे भरपूर वेळ हवा. रविवारी दुपारी खेळायला घेतला तर सूर्य मावळतीला आला तरी पूर्ण होत नाही. सगळे खेळाडू नवी शहरे घेण्यात आणि तिथे घरे बांधून भाडे वसूल करण्यात दंग ! हा खेळ आम्ही बऱ्याचदा मोडायचा नाही म्हणून लिहून ही ठेवायचो...पुन्हा इथून पुढे सुरु करण्यासाठी...तो किती वेळा केला असेल ते काही आठवत नाही. 'व्यापार' सदृश असे नवनवे खेळ आलेही काही पण आमची पिढी रमली ती यातच. क्रिकेट आवडायचे म्हणून एक हिरवी चादर पसरलेला क्रिकेटचा खेळही आणला होता पप्पांनी. ज्यात ११ खेळाडू उभे करायचे आणि घसरगुंडीवरून पडणारा सिसम म्हणजे चेंडू एक होल्डरला जोडलेल्या बॅटने तटवायचा आणि बाउंडरी म्हणून कुंपणदेखील ! पण बसून बसून पाठ दुखून यायची मग संध्याकाळी खऱ्या-खुऱ्या क्रिकेटची ओढ लागायची. 

कागदी खेळांमध्ये 'नाव-गाव-फळ-फुल' आणि 'चोर-पोलीस'. अभ्यासाच्या वहीची पाने आईच्या नकळत फाडली जायची आणि एका पानावर सगळ्या खेळगड्यांची नावे आणि गुण. अर्धा ते एक तास खेळ झाला की 'टोटल'...मग मी पहिला, तू दुसरा आणि चोर कोण ? याने कल्लोळ नुसता...'जानेवारी-फेब्रुवारी' तर अजूनही खेळतो आम्ही...!

फुल्ली-गोळा तर ऑल-टाईम फेवरेट. एका मिन्टात उरकण्याइतका छोटा खेळ. शिवाय मधले बोट ओळखा म्हणत एका हाताच्या पंजात दुसऱ्या हाताची बोटे वेडी-वाकडी लपवायची. नाही ओळखले तर ठेंगा ! अलीकडेच मी फुल्ली-गोळाचा प्लास्टिक गेम पण पाहिला. जुनेच खेळ नव्या रुपात पाहून आश्चर्य वाटले

असेच आठवले...आमच्या लहानपणी काही कागदी फॉर्म मिळायचे ज्यावर १ ते १५ किंवा २० असे चौकोन असायचे आणि त्यावर चिकटवायचे ते विकत घेतलेल्या चॉकलेट सोबत मिळणारे कागदी लेबल. त्या लेबलने ठराविक पान पूर्ण झाले की मग त्यावर सायकल, टोपी, बॅट अशी बक्षिसे असायची. हिरो-हिरोईन पासून WWF असे वेगवेगळे फॉर्म आणि त्याचे लेबल...कमालीचे प्रसिद्ध होते तेव्हा !

घरात कुणीतरी चिमुरडा असायचा ज्याची पाटी आणि दगडी पेन्सिल सहज मिळायची. त्यात मामाच्या घरी जायचा रस्ता शोधायचा खेळ ही आवडता. एक लाईन दुसऱ्याला चिकटली नाही पाहिजे म्हणून अगदी जपून रस्ता काढत सांगितलेल्या आकड्यावर गाडी थांबायची. पाटीवरून आठवली ती 'दगडी पेन्सिल', कळायला लागल्यावरही जी चोखत राहायला आवडायची.

साबणाच्या पाण्याचे बुडबुडे हा दुपारचा उद्योग...गावच्या घरी माडीवर गॅलरीत उभे राहून बुडबुडे सोडायचे आणि लहान भावंडे ती पकडायला खाली. साबणाचे पाणी पण घरीच बनायचे. कपडे धुण्याची पावडर एका ग्लासात किंवा वाटीत घ्यायची आणि फुगे बनवण्यासाठी रिफील काढलेलं पेन किंवा शेविंग रेझरची दांडी. पण अगदीच हे नाही मिळाले तर मोठ्या कागदाची सुरळी करून पण हे फुगे बनवता येतात आणि ते अधिक चांगले बनतात हे आम्हाला उशीराने कळले.

शाळा-कॉलेज मध्ये पेन फाईट हा कॅरम सदृश खेळ कोणी शोधून काढला असेल त्याचे आभार कारण त्यामुळे आमच्या बऱ्याच मधल्या सुट्ट्या रंगल्या होत्या. शेवटच्या पानावर ठिपके काढून आपल्या अक्षराचे बॉक्स बनवण्याचे खेळ तास चालू असतानाही खेळलो आहे. शाळेत तर वहीचे शेवटचं पान हे खेळ खेळण्यासाठीच असायचे.

काय म्हणता ? बसून बसून पाठ दुखून आली...?चला तर मैदानावर!

मैदानी खेळांमध्ये तर रांगच आहे. क्रिकेट आणि फुटबॉल हे विदेशी खेळ सोडले ( ज्यांची हल्ली जास्तच 'क्रेज' आहे ) तरी भारतीय खेळांमध्ये कितीतरी खेळ आहेत आणि ते सगळे मैदानातच खेळायला पाहिजे असेही नाही तर अंगणात, गच्चीवर, मंडपात कुठेही जमू शकतात. 'आंधळी-कोशिंबीर' ह्या खेळात कोशिंबीर कुठून आली पण आम्ही कुणी विचारले नाही आणि बहुतेक कोणाकडे याचे उत्तर असेल असे वाटत नाही. एकाला डोळ्यांवर पट्टी बांधून तीन वेळा गोलाकार फिरवले की आंधळा कारभार सुरु...! 'ए-शुक शुक...इकडे-इकडे, धोका-धोका' असे बोलत, डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या मित्राच्या पाठीवर मारत खेळ रंगत जातो आणि चुकून सापडलो की आपल्या डोळ्यापुढे अंधार...पण राज्य येईल या भीतीने लांब राहिलो तर खेळाची मजा कुठे येणार ?

लपंडाव उर्फ लपाछपी हा कायम संध्याकाळसाठी राखून ठेवलेला खेळ असे. सकाळी किंवा दुपारी हा खेळण्यात मजा येत नाही. सूर्य मावळतीला आला की जणू लपलेले गडी अंधारात गुडूप होऊन जाणार आणि सापडता सापडणार नाही अशा भावनेने लपंडाव खेळायला हुरूप येतो. लपंडाव हे झाले पुस्तकी नाव, गल्लोगल्ली हा लपाछपी म्हणूनच जास्त 'फेमस' होता. राज्य आलेला गडी भिंतीकडे तोंड करून डोळे मिटून, चेहरा झाकून आकडे मोजणार आणि मोजून झाले की 'रेडी का ?'म्हणून विचारणार. 'नो रेडी' असा आवाज आला तर अजून मागे वळायची परमिशन नाही आणि मागून काही आवाज नाही आला तर मग मिशन सुरु. त्यात राज्य असणारा हातात पिस्तुल घेतल्याप्रमाणे शोधाशोध करणार. कुणी सापडलाच तर मग '.....ई-स्टोप' असे जोरात नाव घेऊन पिस्तुल रोखून ओरडायचे. पण लपणारे ही हुशार असत. ते एकमेकांचे शर्ट किंव टी-शर्ट बदलत आणि राज्य असणाऱ्याने त्याला पाहून चुकीचे नाव घेतले की मग 'अंड...!' नाहीतर सगळे मिळून 'धप्पा' करायला टपलेलेच असतात. ते ही सगळे एकत्र दिसले की लांब-लांब पळत नाव घेत -ई-स्टोप, ई-स्टोप ओरडायचे.मग पहिला कोण सापडला त्याच्यावर डाव...आम्ही बहुतेक कच्चे लिंबुच होतो तेव्हा म्हणून दादाच्या मागे-मागेच आमचं शेपूट...

लगोरी उर्फ लिगोर्चा म्हणजे एकावर-एक थप्प्या मांडायच्या आणि बरोब्बर नेम लावून म्हणजे असा एक डोळा बंद करून चेहरा वाकडा-तिकडा करत चेंडू फेकायचा आणि दुसऱ्या टीमने चेंडू घेऊन आपल्याला आउट करायच्या आधी थप्पी पुन्हा लावायची. टिक्कर आणि थप्पीच्या खेळात काही चौकोन आखून थप्पी घेऊन ते पार करायचे असा काहीसा खेळायचे पण आमच्याकडे हा खेळ मुली जास्त खेळात त्यामुळे माहित असूनही खेळलो नाही कधी. तसे खेळायला बरेच खेळ होते पण काही आवडत नसायचे वा येत नसायचे म्हणून कधी खेळलोच नाही. डब्बा -ऐसपैस, आट्या-पाट्या सारखे खेळ आमच्या मित्र-मंडळींना कोणी शिकवलेच नसावेत म्हणून ते खेळ मुकलोच आम्ही. विटी-दांडू हा खेळ पण माहित असूनही फार खेळायलाच मिळाला नाही. विटीला ऐटीत उडवायचे आणि फिरवायचा दांडू की नजर दूर-दूरवर...एक तर एवढे खेळ खेळायला असत की सगळे खेळ खेळणे प्रत्येक वेळी शक्यच होत नसे.

लगोरी प्रमाणे आबादुबी म्हणजे चेंडूची हाणाहानी...प्लास्टिक चेंडूने जास्तच मजा ! चेंडू वरून आठवले तेव्हा 'क्रेझी बॉल्स' मिळायचे जे टणाटण उडायचे पण ते महाग असत त्यामुळे कधीतरी हरवला की पुन्हा घ्यायला पैसे मिळत नसत. आम्हाला जास्त लागायचे ते रबरी बॉल्सच. लंगडी हा खेळ खेळायचा तर जितके जास्त जण तितकी मजा जास्त. एक पाय गुडघ्यात दुमडून एका पायावर पळत सगळ्यांना 'आउट' करायचे आणि नुसतेच हात लावून आउट नाही करायचे तर जोरात धपाटा हाणायचा पाठीत.यात बऱ्याचदा धडपडून गुडघे फुटले होते, खरचटले होते पण म्हणून थांबणार कोण ? शाळेत आम्ही छोट्या वर्गात असे पर्यंत तर मुला-मुलींची एकत्र लंगडी जमायची.त्यात शिवाय किती जणांना आउट केले हे ही मोजले जायचे म्हणजे इज्जत का सवाल! हे असले खेळ कॉलेजमध्ये असताना का नाही झाले ?

खो-खो आणि कबड्डी सारखे खेळ मात्र जास्त करून शालेय स्पर्धापुरतेच मर्यादित राहिले. आवडीने मित्रांनी जमून खेळण्यासाठी हे कधी 'फेवरेट' नव्हते. खो-खो मध्ये शाळेत पण असे काही नियम होते की आउट केले तर 'आउट' बोलायचे नाही, नाही तर आउट झालेला आउट नाही. कबड्डी मध्ये पण कबड्डी किंवा हुतुतू जे बोलायचे असेल ते सिनेमात लीप मुवमेंट करत तशा फक्त पुटपुटायच्या. मग कोणी बोललेच तर 'बोलतोय ना...' असे डोळ्यांनीच खुणावत आवाज वाढवायचा...

गोट्या हा खेळ पण फार लोकप्रिय कारण खेळाचे साहित्य फार काही महाग नाही. मातीमध्ये कुठेतरी खड्डे खणायचे आणि एक वित- दोन वित मोजत नेम लावायचे. नेम लागल्याचा आनंद एक विलक्षण असायचा. गोट्यांचा खेळ आमचा तासंतास रंगायचा. बहुतेक सकाळीच !गोट्यांमध्ये एखादी दुधाळ,पांढरी गोटी लकी समजली जायची. ती हरवून नाही द्यायची. शिवाय नेमबाजीसाठी एखादा खास मोठा 'ढंपर' असायचा. कोयबा हा देखील गोट्यांसारखाच पण खेळला जायचा दगडी पांढऱ्या गोट्यांनी.

गोट्यांप्रमाणे भोवरा हाही अतिफेवरेट खेळ. कोल्ड्रिंक बाटल्यांचे बिल्ले भोक पडून जाळी गुंफायची आणि गुंडाळला भोवरा सर्रकन जमिनीवर वा डायरेक्ट हातावर घ्यायचा. तो तसा घेणे किंवा जमिनीवरून हातावर घेणे हे पहिल्या-पहिल्यांदा फारच कठीण काम वाटायचे. कित्येक भोवरयांना टोकदार खोपचे पडायचे आणि त्यात प्रतिस्पर्ध्यांचे कौशल्य दडलेले. कानावर जाळी घेऊन दुसऱ्या भोवऱ्याला पार करायचे असा ही काही नियम असल्याचे आठवतेय. ह्या बिल्ल्यांवरून आठवले, मुली जशा काचापाणी खेळत तसे आम्ही बिल्ल्यांनी खेळायचो. असे नाविन्यपूर्ण खेळ प्रत्येकाने आपापल्या बालपणी खेळले असतातच. खेळ कोणी आणि कसा बनवला ते महत्त्वाचे नसतेच आनंद महत्त्वाचा !

सायकल चालवणे हा देखील तेव्हा एक खेळच होता. आजकालच्या प्रमाणे तेव्हा प्रत्येक कडे सायकली नव्हत्या आणि घरी विकत घ्यायची तर सगळे मित्र मागत राहतील म्हणून टाळाटाळ केली जाई. तेव्हा सगळे मित्र भाड्याने सायकली विकत घ्यायचो- एक किंवा अर्धा तास आणि मग वाऱ्याशी स्पर्धा. टायर किंवा चाकाचे चक्र एका तारेने पळवत नेण्याचा उद्योग ही एक आगळा-वेगळा खेळ. मला ते लहान असताना जमत नसायचे तर पप्पांनी एका लाकडी काठीला एक छोटे चाक खिळ्याने ठोकून दिले म्हणजे मोठे मित्र हे खेळायला पळत सुटले की माझी ही काठीची गाडी त्यांच्या मागे.

पतंग उडवायचे तर थंडीतच...संक्रांती जवळ आली की बाजार आपोआप पतंगांनी भरले जात. फिरकी धरायला आम्ही आणि पतंग उडवायला दादा. मांजा पण कसा धारदार! ''बदव...बदव अजून...अरे ढील दे ना...''आणि पतंग कटली की धावाधाव...एकदा आमचा एक मित्र अशीच पतंग पकडण्याच्या नादात एका काट्याच्या झाडात जाऊन अडकला होता.

कांदा-फोडी मध्ये ही 'कांदा-फोडी' हे नाव कसे हे न विचारता एक-एक लेवल पार करत उद्या मारणे सुरु व्हायचे.त्यात मी लहानपणापासूनच उंच म्हणून सगळे माझ्या पाठीवरून उडी मारताना माझ्यासकट धडपडायचे. संगीत-खुर्ची, चमचा-गोटी सारखे खेळ सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा मध्ये जास्त खेळले गेले. तळ्यात-मळ्यात, डोंगर का पाणी हेही खेळले जात अधून-मधून...'डोंगराला आग लागली पळा..पळा' आठवतंय की नाही अजून ?

एकदम लहानपणी 'शिवाजी म्हणतो' तसंच करायचं असं आजीने शिकवले आणि त्याचाही एक खेळ झाला...टीपी-टीपी..टीप-टोपं म्हणत कोणता रंग म्हटला की सांगितला रंग शोधायची काय धावपळ. अमुक एकाच्या शर्टावर रंग सापडला तर सगळे त्याला लटकलेले आणि सापडायच्या आधी पकडला की बाद. गावी असलो की आम्ही मंदिराच्या आवारात 'आईचं पत्र हरवलं....तेSSS मला सापडलं' खेळायचो. खेळून बरीच वर्षे झाल्याने अस्पष्टसा आठवतोय. पण ही ओळ आणि तिचा ठेका अजूनही कानात घुमतोय- गाभाऱ्यात घुमणाऱ्या आवाजासारखा.

खुपसनी हा खेळ खास पावसाळी खेळ...लोखंडी सळ्या भिजल्या मऊ मातीत खुपसत अंतर कापत जायचे. सळी पण अशी जोरात फेकायची की ऐटीत उभी राहिली पाहिजे मातीत.आणि हरणार तो लंगडी घालत जिथून सुरुवात केली तिथपर्यंत येणार...पावसाळी दिवसात रस्त्याच्या कडेने वाहणारे पाणी असेल की आम्ही आपापले पान त्यात सोडून वाहवत न्यायचो. पाण्यात होड्या सोडण्यापेक्षा ही हे अधिक प्रिय होते आम्हाला.

काहीच नाही तर मग पकड-पकडी किंवा झटापटी आहेच. हल्ली पिकनिकला गेलो तर शक्य असूनही हे खेळ कोणी खेळत नाही. तिथे सो-कॉल्ड प्रोफेशनल खेळच खेळले जातात. टीम-वर्क चा चांगला धडा देणारे साखळी-साखळी,खांब-खांब, विष-अमृत सारखे खेळ आजची पिढी खेळते असे वाटत नाही. अमुक एका मित्राला विष दिले तर आउट व्हायची भीती असूनही त्याला अमृत देऊन आपल्यात घेणे हे शिकण्यासारखे आहेच ना?

 'टॅमप्लीज' हा प्रकार खेळ सुटले तसा परत दिसलाच नाही.टॅमप्लीज म्हणजे आपण सुरक्षित आहोत. म्हणजे ऑफिस मध्ये एखाद्या महत्त्वाच्या मीटिंग दरम्यान आपण बॉसला मनगटावर थुकी लावून 'टॅमप्लीज' म्हणून बाहेर गेलो तर कसे वाटेल ना ? किंवा असेच 'जास्ती की मेजॉरिटी' असे हात पालथा की सरळ ठेवत सुटण्यातली गंमत कुठे हरवली ? त्या सुटण्यात काय तर दिलासा मिळायचा ! 'राज्य' आपल्यावर नाही !! आणि सुटलो की गुडघ्या खालून हात घालत टाळी वाजवायची. आता मजा करायला मोकळे किंवा राज्य असणाऱ्या मित्राला छळायला तरी !

अजून एक आठवले ते म्हणजे -टीम पाडायच्या युक्त्या. एक तर दोन गटप्रमुख एक-एक जन निवडणार नाही तर मग नाव पाडून या असा आदेश दिला जायचा- मग मी आंबा-तू पेरू, मी वाघ- तू सिंह, मी ढवळ्या- तू पवळ्या...आणि मग ढवळ्या पाहिजे का पवळ्या पाहिजे हे विचारले जायचे. यातून निर्माण होणारी गटबाजी खेळ संपताच मोडली जायची हे किती बरे होते. कट्टी-बट्टीचे रुसवे फुगवे आता कायम स्वरूपी भांडणात बदलले आहेत. हल्ली त्याला 'पॅच-अप' असेही आधुनिक नाव मिळाले आहे.

बाप रे...कित्ती खेळ झाले...किती तरी विस्मरणात ही गेले...आठवतो तो फक्त किलकिलाट...लुटुपुटूची भांडणे, दंगा-मस्ती आणि हसरे चेहरे...आता सुद्धा कित्येक जण हे खेळ आठवून जुन्या आठवणीत रमले असतील पण पुन्हा खेळावेसे वाटले तरी खेळतील का ? आता मोठे झालो म्हणून, लोक हसतील म्हणून का आपण आपले सुखाचे क्षण गमावून बसायचे...जुन्या स्मृतींना उजाळा देण्यापेक्षा पुन्हा आयुष्यभर पुरेल असे सोहळे साजरे केले तर काय वाईट आहे का?

लेख बराच मोठा झालाय...पण आठवणीच इतक्या की संपता संपेना...बऱ्याचशा गोष्टी तर मेंदूला ताण देऊन आठवाव्या लागल्या. इतक्या दूर राहिल्या का त्या आठवणी ? पण लिहिता लिहिता चेहऱ्यावर हसू आले आहे. वाटतंय पुन्हा लहान व्हावं, शाळेच दप्तर टाकून खाली खेळायला पळावं आणि दमून आल्यावर हात-पाय धुवून शांत पडावं. आई बोलावतेय जेवायला आणि मी इकडे झोपेच्या आहारी...कसलीच चिंता नाही...काही नाही...शांत शांत !

तुम्हाला आजूबाजूचे काही ऐकू येतंय की गेलात तुम्हीही भूतकाळात ?

Comments

  1. काहीच ऐकू येत नाही. गेले भूतकाळात . आता परत येण मुश्कील . मस्त लेख

    ReplyDelete
  2. धन्यवाद...ब्लॉगवर स्वागत

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी