पत्रास कारण की...


शेवटचं पत्र केव्हा आलं होतं काही आठवत नाही पण बरीच वर्षे झाली असावीत. बहुतेक विसाव्या शतकातच आले असेल. तेव्हापासून पोस्टमनकाका, पोस्टाचे पाकीट, पोस्टाची तिकिटे काहीच पाहण्यात नाही. तरी त्या मानाने माझ्या (तरुण) पिढीने पत्रे फार काही पाहिलीच नाही. आमची लहान होतो तेव्हाच काय ती पत्रे पाहिली. जसे मोठे झालो तशी पत्रे हळूहळू कमीच झाली आणि मग एकदम साक्षात्कार झाला...पत्र हरवलं कुठे ?

पत्र कारभाराचा इतिहास चाळला तर कळले की इंग्रजांनी १६८८ मध्ये (आमच्या!) मुंबईत देशातील पहिले टपाल कार्यालय सुरु केले. पूर्वी संदेशवहनासाठी म्हणून निर्मिलेले हे दळणवळणाचे साधन हळूहळू जिव्हाळ्याचे झाले. लोक आपल्या प्रियजनांना आपले क्षेम कुशल पत्राद्वारे कळवू लागले आणि त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत पत्रांच्या वाटेकडे डोळे लावून बसले.

पत्रांमध्ये कित्येकांच्या भावना गुंफल्या जात. पत्र लिहायचे तर एकजन लिहिणारा पण त्यात सर्वांचे निरोप, काळज्या, आपुलक्या यांचे मिश्रण होई. पत्र वाचणे हा तर आनंद सोहळाच ! कुणी तरी आपली प्रयत्नपूर्वक आठवण ठेवून, वेळ काढून ( तेव्हा लोक इतके बिझी नव्हते म्हणा! ) आपल्याला पत्र लिहिले आहे याचेच किती कौतुक. पत्र वाचायचे तर घरातील शक्यतो नव्या पिढीच्या मंडळींनी आपल्या अशिक्षित पण जाणत्या वडीलधारया मंडळींस वाचून दाखवावे. दीड पानाच्या पत्रात काय तो मजकूर मावायचा पण त्यात सर्वांची खुशाली वाचून जो दिलासा मिळायचा तो हल्ली सहजासहजी शक्य असणाऱ्या संपर्कातून लोप पावत चालला आहे.

गेल्या दहा वर्षात पत्रांच्या दळणवळणात ७२ टक्क्यांनी घट झाली आहे असे वाचण्यात आले. सर्वत्र आधुनिकतेचे वारे वाहू लागल्याने जिथे-तिथे लोकांच्या खिशात मोबाईल खणखणू लागला आहे. हल्ली तर मोबाईलपेक्षा नेटवर ऑनलाइन भेटीगाठी होत असल्याने टपाल खाते 'बुडित खाते' झाले आहे. हल्लीच्या अभ्यास क्रमातून 'पत्र लेखनाचे' धडे दिले जातात की नाही याबद्दल मला शंका आहे आणि दिले तरी प्रत्यक्षात कोण लिहिणार ते ?

इतिहास अभ्यासकांना ऐतिहासिक पत्रांचा अभ्यास करायची संधी मिळत असते. शिवाजी महाराजांची पत्रे, तसेच स्वातंत्र्य संग्रामात काही थोर लोकांची दुर्मिळ पत्रे आता एखाद्या संग्रहालयात जपून ठेवली जातात. पुढील काही वर्षात साधे पोस्ट कार्ड सुद्धा दुर्मिळ म्हणून गणले जाईल पण तेव्हा या पत्रांना विचारणार कोण ?

टपाल खात्यावर तर आपल्या 'पुलंचेही' प्रेम एवढे की 'माझे पौष्टिक जीवन' सांगताना वाचकांना अगदी पोस्ट हापिसात नेऊन बसवले आहे. टपाल खात्याचे वेगळेपण, त्याचा स्थायीभाव आणि पत्र व्यवहाराचा त्या काळी असणारा प्रभाव पुलंनी जो वर्णिला आहे त्याच टपाल खात्याची आज झालेली दयनीय अवस्था पाहून 'पुल'देखील हळहळले असते.

पत्रांची महती सांगणारी कित्येक गाणी जुन्या पिढ्यांनी गायली. 'ये मेरा प्रेमपत्र पढकर' ,' चिट्ठी आयी है', 'संदेसे आते है', 'कबूतर जा जा...' यां गाण्यांनी पत्रांना सिनेसृष्टीत स्थान दिले. प्रेमपत्र लिहायला प्रेमवीरांना उद्युक्त केले ते या रंगीत दुनियेनेच ! प्रेमपत्रास अधिक गुलाबी छटा देत त्याला ग्लॅमरही मिळवून दिले.

आता ई-मेल, मोबाईल, एसएमएस, इंटरनेट यामुळे कोण पत्र लिहिण्यात वेळ दवडतो. जग एका हाकेच्या अंतरावर आले आहे मग पत्र 'आउट डेटेड' होणार नाही तर काय? पोस्टाची तिकिटे जमवण्याचे छंद जुने झाले नाही का? आईचं पत्र हरवलं हा खेळ सध्याच्या पिढीस माहिती आहे का? की तो काळाच्या ओघात नाहीसा होणार आहे...पत्रासारखाच !

Comments

 1. पत्र लिहिताना जो एक विचार केला जायचा तो आता इमेल आणि एस एम एस च्या जमान्यात राहिला नाही हे लक्षात येत. नव्या वर्षी पत्र लिहायला सुरुवात करायची असा बेत आहे माझा .. वाचायला वेळ असणार का पण इतरांना असा प्रश्न आहे!

  ReplyDelete
 2. जग कितीही प्रगत झाले, मानवाने कितीही नवनवीन शोध लावले तरी "पत्र" या गोष्टी मधला प्रेमाचा ओलावा काही ई-मेल, मोबाईल फोन मध्ये येणार नाही.

  सुंदर लेख मित्रा, कोणाला तरी पत्र लिहावसं वाटलं तुझा लेख वाचून...

  ReplyDelete
 3. सविता ताई,
  माझी ही फार इच्छा आहे की कुणाला तरी पत्र पाठवून सरप्राईज द्यायचे म्हणून...
  तुम्ही जरूर पाठवा पत्र...

  ReplyDelete
 4. नागेश दादा,
  आभारी, मग नक्की लिही पत्र...मला तर शाळेत लिहायचो तीच आठवतायत पत्र..!

  ReplyDelete
 5. मनातील भावनांचे रेखीव प्रकटीकरण जसे पत्रात होऊ शकते तसे एस एम एस किंवा फोनने होऊ शकत नाही ! म्हणून जेव्हा अश्या भावना मनात ओथंबून येतात तेव्हा हात आपोआप पत्राकडे वळतील!

  ReplyDelete
 6. तसे झाले तर फारच छान होईल
  धन्यवाद गीतांजली ताई...

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी