अस्वच्छ भारत

समस्या तर तशा खूप आहेत जगात. सगळ्याच काही माणसाला वैयक्तिक पातळीवर सोडवता येणे शक्य नसते. पण माणूस प्रयत्न करू शकतो आणि खासकरून तेव्हा, जेव्हा या समस्या त्याच्याच चुकांमुळे उद्भवल्या असतील.

मुंबईसारख्या शहरात कधी घराबाहेर पडलो आणि डोक्यातील इतर सर्व विचारचक्रे थांबवून कधी आपल्या शहराचे निरीक्षण केले तर लक्षात येईल कि जिथे-तिथे कचराच कचरा आहे. कचरा जो लक्ष नसेल तर दिसत नाही पण पाहिले तर सगळीकडेच आहे. वैचारिक कचऱ्याच्या गोष्टी नाही करत मी, भौतिक कचराच आहे आणि तो टाकणारेही आपणच. रस्ते पहा, इमारती पहा, भिंती पहा आणि जिथे कचरा टाकू नये असे लिहिले आहे तिथेही माणूस जिवंत असल्याच्या खुणा तो उमटवत जातोच आहे. पान थुंकू नये लिहिले असेल तर तिथेच पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगकाम आढळते. पोस्टर लावू नये लिहिले तर ते जुने पोस्टर काढले तर त्याखाली लिहिलेले सापडते. तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही निर्लज्ज आहोत!

बसचे वा ट्रेनचे तिकीट, चॉक्लेटचे कागद, सिगारेटचे पाकीट, वेफर्सचे रॅपर्स, रिकाम्या बाटल्या ( दारुच्याही), प्लास्टिक पिशव्या....सगळ्या चीजवस्तू काम झाले की निसर्ग नावाच्या कचरापेटीत ! इतका बेजबाबदारपणा ? इतकी बेफिकिरी ? इतके असंस्कृत का आपण ? आपलेच शहर, आपलाच देश आपणच खराब करतो आणि वर अपेक्षा करतो की सरकारने आपले शहर स्वच्छ राखावे. सरकारही जबाबदार आहेच म्हणा याला. स्वच्छता या अति महत्त्वाच्या बाबीकडे कुणाचे लक्ष नाही. जनतेच्या मूलभूत गरजांमध्ये स्वच्छ सुंदर परिसर केवळ पुस्तकात शोभण्यासारखा आहे.

स्वच्छता मोहीमपण एखाद्या अपवादात्मक गावामध्ये घडते तेही कुण्या समाजसेवकाच्या पुढाकाराने. नगरसेवक निवडून येतात, आश्वासने देतात पण आपला विभाग स्वच्छ ठेवण्याचेही आश्वासन देतात का ते? देत असतील तर त्याची अंमल बजावणी करणे विसरत असतील मग आपल्या कामाच्या व्यापात ! मध्यंतरी वाचण्यात आले की गेल्या वर्षाप्रमाणे येत्या महिन्याभरात वार्षिक नालेसफाई सुरु करण्यात येईल. अर्थात नाले ही काही स्वच्छ राखण्याची आवश्यकता वर्षातून एकदाच कशी वाटते. जे कायम डम्पिंग ग्राउंड म्हणून वापरण्यात येते, रोगराई आणि दुषित पर्यावरणाचे कारण बनते ते कायम स्वच्छ नाही का ठेवता येत ? प्लास्टिक पिशव्यांमुळे नाले तुंबतात आणि पावसाळ्यात पंचाईत होते पण चालेल आम्हाला...

रेल्वेने प्रवास करत असाल तर नुसतीच दारात उभे राहून हवा खाण्यापेक्षा कधी रेल्वे ट्रकच्या बाजूचा परिसर पहिला तर दिसेल की मुंबईत सर्वत्र बकाल वस्ती आणि गलिच्छ परिसर आहे. मला हिंदी सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या परदेशातील रम्य स्थळांची चित्रे डोळ्यापुढून गेली, तिथले लोक इथे आल्यावर काय म्हणत असतील...? तरी कौतुकाने फोटो काढतात त्याचे ! त्यात येता-जाता खाड्या दिसल्या की निर्माल्य टाकायला हात जास्तच सरसावतात...देवपूजेचे निर्माल्य असे पाण्यात टाकून घाण वाढवण्यापेक्षा कचऱ्यात टाकलेले चांगले. धार्मिकदृष्ट्या पाप नाही लागायचे पण सामाजिकदृष्ट्या पुण्य तरी मिळेल.

दिवाळी झाली की पहा सर्वत्र फटाक्यांचा कचरा असतो...पिकनिकला जायचे आणि तो सुंदर परिसर घाण करायचा...स्वातंत्र्य दिनी झेंडे मिरवायचे आणि ते मातीत मिळतील याचीही खात्री बाळगायची. कुणाला असे कचरा टाकताना अडवू पाहिले तर ते तुमच्या इज्जतीचा कचरा करू पाहणार...'तुमच्या बापाचं काय जातं म्हणे ?' जागोजागी थुंकायची तर लोकांना एवढी सवय झालीये की जणू सरकारने तरतूद केली आहे थुंकण्याची. कचरा सर्वत्र टाकतो कारण आम्ही टॅक्स भरतो ना...सफाई कामगार आहेत कचरा उचलायला. चुकून एखाद्याला आपल्या चुकीची जाणीव होईल पण आपण प्रयत्न नाही सोडायचे.

स्वच्छता पाहण्यात येते ती फक्त कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये कारण तिथे अमुक एका मालकाच्या हाती सत्ता असते, बिझिनेसमध्ये पाश्चिमात्य देशांकडून आलेली स्वच्छतेची, शिस्तीची, टापटीपपणाची परंपरा स्पर्धेत टिकायला हवे असेल तर जपायलाच हवी म्हणून. अन्यथा भारतातील पारंपारिक व्यवसाय कुठे इतके नियम आणि मॅनर्स पाळायचे. इतका मोठा देश लोकशाही तत्वावर चालवायचा तर त्याची प्रांतवार विभागणी आणि त्या त्या प्रांताची जबाबदारी सांभाळणारे सरकार निवडून देण्यात यावे याच अनुषंगाने राज्यघटना लिहिली असावी ना...पण देशाच्या प्रगतीपेक्षा आपला खिशा कसा भरायचा याची अधिक चिंता म्हणून जिथे 'जाऊ तिथे खाऊ' आणि त्याचे परिणाम म्हणून स्वत:ची मुले सुद्धा याच अस्वच्छ परिसरात वाढणार आहेत हे सर्रासपणे विसरत आहेत.

आपली संस्कृती म्हणून ओळख असणारे किल्ले, प्रेक्षणीय स्थळे तर 'बंटी' लव्स 'बबली' अशा प्रेमवीरांच्या हस्तकलांनी बरबटली आहेत. माझे तिच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला कळले पाहिजे...संस्कृती गेली खड्ड्यात ना ? काय फरक पडतो नाव लिहिले तर...फरक पडतो ना...कुण्या एकाच्या बिनडोक कृत्त्यांनी देशाची लाज जाते पण त्याची पर्वा नाहीच त्यांना. स्वातंत्र्य म्हणजे काय ? त्याची किंमत काय? आणि आज या अशा मनमानी स्वातंत्र्याला आला घालायचा तर इंग्रजी शासनच हवे. त्यांच्या गुलामीत वाढले असते तर इतका माज चढला नसता, नाही का?

या सर्व बेशिस्त कारभारावर कायद्याने दंड करणे हा एक उपाय फक्त डोळ्यापुढे दिसतो. आता काहीजण म्हणतील यातही नेमलेला अधिकारी पैसे खाईल पण १०० ऐवजी २० रुपये जरी द्यावे लागले तरी ते काही कुणाला आवडणार नाहीच. म्हणून हा नियम अतिशय आवश्यक आहे पण सरकारला केव्हा जाग येणार ठाउक नाही. काही ठिकाणी हा नियम सुरु आहे देखील, परिणाम नाही पण !मध्यंतरी क्लीन-अप मुंबई मोहीम आली होती त्याचे काय झाले ? माहित नाही. मला तरी अजूनही सर्वत्र कचरा दिसतोच आहे याअर्थी मोहीम थंडावली आहे एवढे नक्की, की बंद पडली ? स्वच्छता मोहीम ही संघटनांमार्फत न होता सरकारमार्फत व्हायला हवी तरच लोकांना शिस्त लागेल. काही लोकांचा गट कचरा उचलणार आणि बाकीचे परत टाकणार तेव्हा तो उचलला जाईल आणि परत कुणी टाकणार ही नाही अशी खबरदारी घ्यायला हवी. 

मला माझी मुंबई स्वच्छ आणि सुंदर हवी आहे. मला माझा देश स्वच्छ आणि सुंदर हवा आहे आणि ती फक्त माझी वैयक्तिक जबाबदारी नसून आपली सामुहिक जबाबदारी आहे तेव्हा तुम्हीही शक्य असेल तिथे कचरा न करण्याची प्रतिज्ञा करा आणि इतरांनाही याची जाणीव करून द्या.

Comments

  1. स्वच्छतेच्या नावाखालीदेखील आपण कचरा निर्माण करीत असतो.

    ReplyDelete
  2. वातावरण निर्मितीचा एक मोठा भाग असतो. एरवी दिल्ली हे फार घाणेरडे शहर आहे. पण त्याच दिल्ली शहरातल्या मेट्रोचा प्रवास मी मागचे दीड वर्ष करते आहे ... आणि तिथ विश्वास बसू नये इतकी स्वच्छता आहे. अर्थात त्यासाठी मेट्रोने पुरेसे मनुष्यबळ ठेवले आहे हा भाग जसा आहे तसच वातावरणामुळेही लोक आपल वागण बदलतात असा अनुभव आहे.

    ReplyDelete
  3. शरयू...-म्हणजे ?

    ReplyDelete
  4. सविताताई- पण अमुक एका ठिकाणी स्वच्छता आहे यावर समाधान मानायचे का? इतर ठिकाणी कचराच आहे आणि तो दिसत राहतो...लोकांच्या सवयी बदलणे जास्त आवश्यक आणि त्यासाठी कायदाही!

    ReplyDelete
  5. सुरेख विचार आहे... कचरा न करणे ही भावना समाजात निर्माण झालीच पाहीजे. विदेशातल दिलेलं उदाहरण मी स्व:ता अनुभवलं आहे. कचऱ्याचे नियोजन आणि विल्हेवाट या याला तोड नसते. मी ज्या घरात, वसाहतीत, शहरात व देशात राहतो तो स्वच्छ ठेवणे हे आपलं कर्तव्य असावे.

    ReplyDelete
  6. इतर कचरा रस्त्यावर न टाकणे फार दूरची गोष्ट आहे पण न थुंकणे इतकी साधी गोष्ट जमत नाही लोकांना. स्वत:च्या घरात बरे कुठेही थुंकत नाहीत हे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांवर कायद्याने ५० की १०० रुपये दंड आहे. पण तरीही सर्रास लोक थुंकताना दिसतात. मुळात कायदा आहे पण लक्ष द्यायलाच कोणी नाही.

    ReplyDelete
  7. नागेश दादा-
    पण लोक फार बेफिकीरीने वागतात...किती असंस्कृत आहोत असे आपण असे वाटू लागते त्यांना पाहून...

    ReplyDelete
  8. इंद्रधनू-
    कायद्याची अंमलबजावणी होत नाही यामुळे अजूनच परिस्थिती वाईट आहे...सरकार याबाबत कठोर निर्णय का घेत नाही ? अस्वच्छ परिसर तर सरकारला ही पाहावा लागतोच ना...?

    ReplyDelete
  9. वृत्ती हे महत्वाचं कारण आहे या मागे. नियम, कायदे नंतरच्या गोष्टी. परदेशात राहिलं की आपल्या भारतीय वृत्तीचं नवल वाटायला लागतं. आपण रस्त्यातून जाताना दुसर्‍याने काही टाकलेलं उचलू का? पण इथे कोणीही पटकन असा कचरा उचलून टाकतात. आपण फक्त आपली प्रतिमा जपण्याच्या प्रयत्नात. गाव, देश त्याची प्रतिमा, स्वच्छता याच्याशी व्यक्तिश: काहीही देणंघेणं नसतं आपल्याला.

    ReplyDelete
  10. मी एकटा काही बदल घडवू शकतो यावर आपला विश्वास नाहीये म्हणून...चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवीये ना...देश नाही निदान आपला विभाग, आपले शहर तरी बदलवून दाखवू...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा