आमचे क्लासेस जॉइन करा

शाळा सुरु होऊन दोन दिवस झाले होते. राणेसर त्यांच्या गणिताच्या तासासाठी 'दहावी अ'च्या वर्गात आले. इतर शिक्षकांप्रमाणे त्यांनीही सर्वांना यंदा दहावीचे वर्ष आहे आणि त्यांनी भरपूर अभ्यास करायला हवा याबद्दल सूचना दिल्या. त्याच वर्गात सोहम नावाचा विद्यार्थी होता जो गेल्या वर्षी परीक्षेत पहिला आला होता आणि गणितात तो विशेष हुशार असल्याने सरांचाही लाडका होता. आपला तास संपल्यावर राणेसरांनी त्याला शाळा सुटल्यावर भेटायला सांगितले त्याप्रमाणे तोही सर्व विद्यार्थी गेल्यावर स्टाफरूमकडे निघाला. सर त्याची वाट बघत स्टाफ रूमच्याबाहेरच उभे होते.

''काय सर, तुम्ही बोलावलं होतं मला ?''
''हो, अरे यंदा दहावी, अभ्यास जोरदार असायला हवा या वर्षी !"
"ठाउक आहे सर, सुट्टीत सुरुवात केलीये थोडी"
"ते अपेक्षित होतंच मला, अभ्यास कसा चाललाय मग? "
"चालू आहे...नेहमीप्रमाणे "
"तू या वर्षीही क्लास लावला नाहीयेस म्हणे. गेल्या वर्षीपर्यंत ठीक होते पण आता दहावीला एक-एक मार्क किती महत्त्वाचा ठरतो माहिती आहे ना"
"माहिती आहे सर...पण मला...नाही जायचंय क्लासला "तो थोडासा अडखळत बोलला.
तो असं बोलल्यावर सरही क्षणभर त्याकडे पाहू लागले.
"तुझ्या घरी काही अडचण आहे का? म्हणजे पैशाची वगैरे? "
"नाही...नाही, तसे काहीच नाहीये. बाबांनी मला विचारले होते क्लास लावायचा आहे का म्हणून पण मलाच आवडत नाही."
"अच्छा, पण तुला जमेल का हे सगळे, या वर्षीही तू शाळेतून पहिला येशील या बद्दल मला काही शंका नाही पण..."
"तुम्ही आहात ना सर, अभ्यासात मला काही अडचण असेल तर विचारेनच तुम्हाला "
"ते आम्ही आहोतच रे, पण तू क्लास लावलास तर जास्त उजळणी होईल, त्याचा तुला फायदाच होईल ना "
"त्याची गरज नाहीये. मी माझा अभ्यास स्वत: करू शकतो या बद्दल मला खात्री आहे आणि...क्लासेस हा प्रकार मला कधीच पटत नाही...म्हणून मग नाहीच."
"ठीक आहे मग,जशी तुझी इच्छा."
सर निघाले तसा तो ही माघारी वळून चालू लागला.

पुढील काही महिन्यात शाळेत जेव्हा जेव्हा परीक्षा झाल्या त्या सगळ्यात त्याची अभ्यासातील प्रगती दिसत होतीच. अधून-मधून सोहमने बोलल्याप्रमाणे तो काही शंका विचारायचा तेव्हा आपण याची काही मदत करू शकतो म्हणून सरांनाच जास्त आनंद वाटायचा. जसजशी अंतिम परीक्षा जवळ येऊ लागली तशी सर्वांनाच खात्री वाटू लागली की सोहमच शाळेतून पहिला येणार. बघता बघता परीक्षा आली आणि संपली देखील.

लवकरच परीक्षेच्या निकालाचा दिवस उजाडला तेव्हा सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे सोहमने उत्तम मार्क्स मिळवले होते. मेरीट ४ मार्कांनी हुकली होती याचे इतरांना थोडे वाईट वाटले पण सोहमला सरांनी विचारले तेव्हा तो म्हणाला,
" मला बिलकुल वाईट वाटले नाही सर. मला जे हवे होते ते मी मिळवले. यापुढेही मिळवत राहीनच."
आणि शेवटी त्याने बोलल्याप्रमाणे क्लासेसशिवायच यशाचे शिखर गाठले होते. राणेसरांना आपल्या नव्या विद्यार्थ्यांना सांगण्यासारखी अजून एक गोष्ट मिळाली होती. "
*****************************************************************************************************************

आता काही दिवसांपूर्वीच दहावी-बारावीचे निकाल लागलेत आणि त्यामुळे सगळीकडे 'आमच्या क्लासच्या' विद्यार्थ्यांनी यशाचे झेंडे रोवल्याचे फलक झळकू लागलेत. पेपरभर, टी.व्ही. वर आमच्या क्लासचे गुणवंत विद्यार्थी आणि क्लासचा यशाचा आलेख यांच्या बातम्या दिसत आहेत. मेहनतीने यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक होण्यात काहीच गैर नाही पण या सगळ्या मागचा उद्देश हा क्लासची प्रसिद्धी आणि त्यातून अधिकाधिक पैसा मिळवणे असाच असतो. 'कोचिंग क्लास' घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला शिक्षणाची तळमळ वा गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य वगैरे करण्याचा हेतू असेल असे बिलकुल वाटत नाही.

मला कायम त्या विद्यार्थ्यांचे कौतुक वाटत आले आहे जे गरिबीतून जिद्दीने अभ्यास करून पुढे आले आहेत. केवळ गरीब आहेत म्हणून नाही पण ते सर्वच जण जे स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण करण्यासाठी तितक्याच जोमाने कष्ट देखील करतात. आपल्याला पुढे काय व्हायचे आहे हे बऱ्याच जणांना कळत नसले तरी या बाबत जरा विद्यार्थ्यांनी विचार करायला हवा. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जबाबदारीची फार जाणीव नसली तरी घरात आणि आजूबाजूला काय चालले आहे हे कळण्याइतपत समज त्यांना असते. आपले पालक मेहनतीने कमावलेला पैसा केवळ आपल्या सुरक्षित भवितव्यासाठी खर्च करत असतात. हल्ली दहावी-बारावीचा गाजावाजा होऊन क्लासेसचा खर्च इतका वाढला आहे की या तीन वर्षात साधारणपणे लाख-दीड लाख रुपये क्लासेसच्या फीसाठी खर्च होतात. अडमिशनचा खर्च वगैरे वेगळाच. सांगायचा मुद्दा हा आहे की इतका वारेमाप खर्च आपल्या शिक्षणासाठी होतो आहे हे ठाउक असूनही कित्येक विद्यार्थी ह्या खर्चाला पर्याय नाहीच असा समज बाळगून आहेत आणि पर्यायाने त्यांचे पालकसुद्धा हे मान्य करतात की क्लासशिवाय मुले पास होणार नाहीत वा चांगले मार्क्स मिळवणार नाहीत.

सगळी मुले क्लास लावतात म्हणून मलाही पाहिजे असे जे त्यांचे म्हणणे असते त्याचे कारण म्हणजे एकतर या सगळ्यांचाच आपण क्लासशिवाय चांगला अभ्यास करून पास होऊ असा त्यांना विश्वास नसतो वा आपल्या क्षमतेविषयी न्यूनगंड असतो. दुसरे म्हणजे या वयात जिथे घरच्यांपेक्षा मित्रमंडळी जवळची वाटतात तिथे साहजिकच त्यांच्या सहवासात राहायला अधिक आवडते. क्लासच्या निमित्ताने मित्रांसोबत मजा मस्ती करायला मिळते जी क्लास नसता करता येणे अवघड असते. क्लासच्या निमित्ताने नवे मित्र-मैत्रीण जोडता येतात हे काही नव्याने सांगायला नको. नवे कपडे आणि नव्या फॅशनचे प्रदर्शन करायला मिळते हे सुद्धा क्लासला जाण्यामागे एक कारण असते आणि यातील कैकांना आपल्यासाठी पालकांनी भरमसाठ फी भरली आहे ही सामान्य गोष्ट वाटते.

आता हे सगळे मी यासाठी लिहित नाहीये की मी शाळेत हुशार विद्यार्थी होतो आणि मला कधीच क्लासची आवश्यकता भासली नव्हती. पण क्लासची कल्पनाच मुळात मला पटत नाही. फार फार तर खाजगी शिकवणी असेल तर ठीक आहे पण 'कोचिंग क्लास' नावाचा प्रकार गेल्या काही वर्षात बळावला आहे तो अगदीच अमान्य आहे. आपण स्वत:हूनच नकारात्मक पद्धतीने विचार केल्याने 'कोचिंग क्लास'ला पर्याय नाही, याच निष्कर्षावर शेवटी पोहोचतो.

माझ्या बाबतीत एक गंमतीचा किस्सा घडला होता. बारावीच्या परीक्षेत कॉलेजमधून मी पहिला आलो होतो आणि हे कॉलेजभर बऱ्याच जणांना ठाऊकही होते. पण जो मुलगा दुसरा आला होता तो एका नावाजलेल्या क्लासचा विद्यार्थी होता आणि त्यामुळे आमच्याच कॉलेजच्या बाहेर त्याचा फोटो आणि अभिनंदनपर फलक लागले होते. वास्तविक मी कुठल्याही क्लासशिवाय पहिला आलो याचे कौतुक व्हायला हवे होते. अर्थात मला या गोष्टीचा राग नाही आला उलट हसूच आले.

शाळा-कॉलेजात म्हणजे अगदी बी.कॉम पर्यंत सुद्धा मी कुठली शंका असेल तर शिक्षकांना विचारायला कचरायचो नाही आणि याबाबत एखादा अपवाद वगळला तर कुणीच शिक्षक विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यास टाळाटाळ करत नाहीत. ही म्हटली तर खूप साधी गोष्ट आहे म्हटले तर बरीच मोठी आहे. क्लासला जाणारे विद्यार्थी शाळेत-कॉलेजमध्ये कधीच शिक्षकांना शंका वा प्रश्न विचारत नाहीत, त्यात त्यांना भीती वाटते की कमीपणा वाटतो ते त्यांना ठावूक पण हे असे आहे. क्लासेसमध्ये काही फालतू प्रकार चालतात असे म्हणणे नाहीये माझे पण जे काही चालते त्याचे मोल तितके नक्कीच नाही जितके लोक समजतात. क्लासेसमध्ये फार फार तर वेगळे काय होते ते अभ्यासाची उजळणी आणि शिवाय अवांतर परीक्षा. हे सारे काही विद्यार्थ्याच्या मनाची तयारी असेल तर तो करू शकतो हे क्लासला न जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या यशावरून दिसून येते. शिक्षणासाठी इतका पैसा मोजायची वेळ का आली आहे? मान्य आहे की सगळीकडे स्पर्धा वाढली आहे. पण आपल्या मुलाने अधिक चांगले मार्क्स मिळवून चांगल्या कॉलेजला अडमिशन घ्यावे यासाठी इतका पैसा ओतण्यापेक्षा मुलांमध्ये ते क्लासेसशिवाय हे यश मिळवू शकतात हा आत्मविश्वास निर्माण करायची कुणीच तसदी घेत नाही का ?.

आधी म्हटल्याप्रमाणे मी आजपर्यंत कुठलेच क्लास लावले नाही पण मी सगळ्याच परीक्षांत उत्तम मार्कांनी पास होत आलो आहे. मी काही फार बुद्धिमान प्राणी नाही जे काही यश मिळाले ते अभ्यासातील सातत्याने आणि मेहनतीनेच मिळाले. क्लासेस नसल्याचा उलट प्रचंड फायदा व्हायचा आणि आजही होतो. मला स्वत:साठी कायम भरपूर वेळ मिळतो. मी जेव्हा-जेव्हा माझ्या मित्रांशी बोलतो ते सारेच या धावपळीच्या चक्रात अडकलेले असतात आणि मुळात हे बदलू शकते हे त्यांच्या मनाला मान्य नसते. आज पहिली-दुसरी पासून पालक आपल्या चिमुरड्यांना क्लासेसना घालत आहेत. इतका अभ्यास लादल्यावर कसे व्हायचे त्यांचे ? पर्याय आहे पण तो आपण स्वत:हून टाळतो आहोत. कसे बदलणार हे चित्र ?

तुम्हाला काय वाटते?

Comments

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी