बीईंग स्कॉलर

आयुष्यात कधी आत्मचरित्र लिहिले तर त्यातील शैक्षणिक कारकीर्दीत लिहिण्यासारखे बरेच काही आहे. पुढील लेख हा त्यातीलच एक उतारा म्हणता येईल. लेखात मांडलेले सर्व विचार स्वानुभवावरून लिहिले असून ते काल्पनिक मुळीच नाहीयेत.

'स्कॉलर' ही काही पदवी किंवा गौरव नाहीये. तो एक शिक्का आहे जो स्वकर्तृत्वाच्या पूर्वपुण्याईने मिळत असतो. जेव्हापासून मला आठवते तेव्हापासून मला कायम 'स्कॉलर' 'गुणी मुलगा' 'अभ्यासू मुलगा' अशा अगदी 'टाइड' ने धुतलेल्या पांढर्या कपड्याइतकी स्वच्छ प्रतिमा लाभली आहे. मी काही वाईट बोललो किंवा वागलो की मला असे वागणे शोभत नाही, तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे बरेच काही ऐकून घ्यावे लागते. थोडक्यात स्कॉलर असणाऱ्या मुलांना सगळ्यांनी 'गुड बॉय'चा शिक्का मारून ठेवलेला असतो आणि त्याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत.

स्कॉलर इमेज टाळण्याचा प्रयत्न करणे फार कठीण काम आहे. म्हणजे स्कॉलर लोकांच्या चेहऱ्यावरच ते तेज किंवा तो दोष असतो. शाळेत तर सगळे शिक्षक मुलांना व्यवस्थित ओळखून असतातच. अमुक एक मुलगा हुशार आहे कळल्यावर त्या मुलाला अभ्यास न करण्याचा पर्यायच उरत नाही. सिनियर कॉलेजला असताना मी फ़ायनल इयर सोडून कधीच फार अभ्यास केला नाही पण तरीही मी हुशार मुलगा असल्याचे शिक्षकांना कळायचे ते माझ्या चेहऱ्याकडे पाहून ओळखत असावेत बहुधा. चार लोकांत बसलो की हा वेगळा प्राणी आहे हे सहज शोधून काढता येते. मित्र-मैत्रिणींच्या घरी गेलो की त्यांच्या आई-वडिलांना फार कौतुक असते माझे. माझ्याकडून त्यांच्या मुलांनी कसे शिकले पाहिजे हा पेटंट डायलॉग प्रत्येकाच्या तोंडी असतो जेव्हा मी समोर असतो. त्याला काही इलाज नाही कारण एवढे हुशार असूनही आमच्या घरीही मला हेच ऐकावे लागते.

स्कॉलर लोकांनी केवळ अभ्यास करावा असे सर्वांना वाटते. म्हणजे त्यांना या व्यतिरिक्त काही जमते किंवा ते करायला वेळ कसा मिळतो हाच त्यांना प्रश्न पडतो. मी कविता लिहितो हे काही लोकांना खरे वाटत नाही. शिवाय मला बऱ्यापैकी नाचता येते हे अनेकांना माहितच नव्हते. त्यांना फार धक्का वगैरे बसला जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. त्यात मला चष्मा लागला नाहीये (देवाच्या कृपेने) याचे अनेकांना कुतूहल. एकदा असा गमतीशीर किस्सा झाला की कॉलेजमध्ये एका मुलाशी माझी ओळख झाली जो माझ्याच शाळेतून होता. आमची चांगली मैत्री झाल्यावर काही दिवसांनी त्याला कळले की तो शाळेतला हुशार मुलगा मीच आहे. तेव्हा मी त्याला वाटलो होतो तसा नाहीये असे त्यानेच कबूल केले होते. कुठल्याही व्यक्तीशी ओळख नसताना तिच्याविषयी मत बनवणे किती चुकीचे आहे.

परीक्षा म्हणजे स्कॉलर लोकांनी भाव खाण्याचा काळ. शाळेत असेपर्यंत माझी एक सवय होती ती म्हणजे परीक्षेच्या दिवशी वर्गात जाईपर्यंत पुस्तक हातात धरून वाचत राहायचे. स्कॉलर मुलांनी असे काही केले की 'पाहा किती अभ्यास करतोय हा' असे कुजबुजताना मी स्वत: ऐकले आहे. तसेही स्कॉलर लोकांबाबत नेहमीच लोक कुजबुजतात.(आपण काही मनावर घ्यायचे नसते) नंतर शाळा सुटली आणि कॉलेजमध्ये गेलो तेव्हा काही सवयी बदलल्या. कॉलेजचे वारे लागल्याने आणि अभ्यासाची हौसही बऱ्यापैकी फिटल्याने मी परीक्षेच्या आधी पुस्तक चाळणे सोडून दिले. कॉलेजच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे(!) कानात इअरफोन्स आणि डोळ्यांवर गॉगल कायम ठेवूनच कॉलेजमध्ये एन्ट्री व्हायची. आता असे करूनही आम्हा स्कॉलर मुलांचा अभ्यास आधीच झालेला असतो असे त्यांचे म्हणणे असते. म्हणजे काही केले तरी आम्ही स्कॉलर आहोत ना !

स्कॉलर मुलांबाबत मुलींमध्ये बरेच गैरसमज असतात असे आढळून येते. मुले इतर मुलांशी जितक्या सहजतेने बोलतात ते मुलींना जमत नाही त्यामुळे स्कॉलर मुले भाव खातात हा मोठा गैरसमज आहे. मी वर्गात शिरल्याबरोबर क्षणभर मुलींची कुजबुज बंद व्हायची, असे का ते मी कधी विचारले नाही पण असे व्हायचे. मी स्कॉलर असल्याने मी नोट्स लिहित असेन या विचाराने काही मुली नोट्स ही मागायच्या. (मुले कधीच नोट्स मागायच्या भानगडीत पडत नसत) पण मी नोट्स लिहित नाही असे सांगितल्यावर त्याची बरीच निराशा व्हायची. मी मुद्दामहून नोट्स देत नाही असे वाटून मी त्यांना आखडू वाटत असेन पण मला त्याने काही फरक पडत नव्हता. हे असे गैरसमज जोपर्यंत ओळख आणि मैत्री होत नाही तोपर्यंत कायम राहतात आणि माझ्या बर्‍याच मैत्रींनींचे माझ्याबद्दल असणारे मत आमची ओळख झाल्यानंतर बदलले आहे. 

आपल्याकडे स्कॉलर म्हणजे जे मार्क्स चांगले मिळवतात किंवा जे कायम अभ्यासात मग्न असतात. माझ्यामते स्कॉलर त्याला म्हणायला हवे जो कमी अभ्यास करून पण चांगले यश मिळवू शकतो किंवा निदान त्याला तो विषय कळलेला असतो. अजून एक मुद्दा म्हणजे असा की काही जणांना विषय कळलेला असूनही परीक्षेत तो कसा लिहावा हे जमत नाही. ज्याला काय आणि कसे लिहावे हे कळते तो साहजिकच चांगले मार्क्स मिळवतो. पण चांगले मार्क्स म्हणजेच यश असा आपल्याकडे समज आहे.

स्कॉलर असण्याचा फायदा म्हणजे आपण खोड्या काढल्या ( पकडले गेलो नाही तर ) तरी आपल्यावर लोक संशय घेत नाहीत. विश्वास नावाची काही गोष्ट असते ती लोकांना आपल्याबाबत जरा जास्तच असते. त्याचा गैरफायदा घेऊ नये पण छोट्या-मोठ्या भानगडीतून आपण सुखरूपपणे सुटतो.

शाळा तर प्रत्येकालाच प्रिय असते आणि बऱ्याच वर्षांनी पुन्हा शाळेत गेल्यावर शिक्षकांनी आपल्याला ओळखावे याचा आनंदही केवढा मोठा. माझ्या सुदैवाने आजही मी शाळेत गेल्यावर आजही सर्व शिक्षक आपुलकीने चौकशी करतात. त्यात मी हुशार विद्यार्थी असल्याने शाळा सोडल्यानंतरही काही वर्षे उदाहरण म्हणून प्रत्येक वर्गात माझा उल्लेख असायचा. पण ते केवळ अभ्यासात हुशार असण्यापेक्षा माझ्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक त्यांना वाटत असावे असे माझे मत आहे. पुढे बाहेरचे जग पाहिल्यावर वाटू लागले की केवळ अभ्यासात नाही प्रत्येक बाबतीत आपण स्कॉलर असायला हवे. तसा अट्टाहास नाहीये पण प्रयत्न तरी आहे. शेवटी आयुष्यात यश मिळवायचे तर परिश्रमाला पर्याय नाही.

ब्लॉगिंग हे माझ्या स्कॉलर असण्यामुळेच शक्य झाले कारण शाळेत असल्यापासूनच निबंध लेखनाची मला फार आवड होती आणि तीच जोपासत ठेवल्याने ते लिखाण ब्लॉगच्या रूपात आले. त्याचे फायदे-तोटे विचारात घेतले नाहीत पण सध्या याचा आनंद घेता येतोय हे पुरेसे आहे.

Comments

Popular posts from this blog

बालपणीचा खेळ सुखाचा

वेळ न उरला हाती...

पाऊसगाणी