मनातला किल्लाकाही चित्रपट करमणूक करतात, काही चित्रपट सामाजिक असतात. किल्ला सारखे काही चित्रपट भावनिक असतात. अशा चित्रपटात पटकथेत अनेक अदृश्य संवाद लिहिलेले असतात. ते सांगत राहतात मुक्याने जे सांगायचे ते. ती भाषा ज्यांना कळते त्यांना चित्रपट कळतो आणि भावतो.

पुण्यात वाढलेला चिन्मय काळे आणि त्याची आई अरुणा यांच्या भोवती मुख्य कथानक लिहिले आहे. पतीच्या निधनानंतर सरकारी नोकरीच्या बदलीमुळे हे दोघे गुहागर येथे स्थायिक होतात. शहरातून गावाकडे स्थलांतरित होणे जिथे अनेक सुविधांचा अभाव आहे चिन्मयला सोपे जात नाही. त्याची आई जी परिस्थितीला सामोरी जात स्वत:ला व मुलाला सावरू पाहते आहे तिलाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सगळ्यात या दोघांचे नाते कधी कोमेजते तर कधी बहरते पण तरीही घडत जाते.

पुण्यासारख्या शहरी वातावरणातून गुहागर येथील ग्रामीण ठिकाणी नवी शाळा, नवे मित्र, नवा परिसर यांच्याशी जुळवून घेणे हे चिन्मयसाठी अवघड होऊन जाते. बालवयात अनपेक्षितपणे अशा बदलांना सामोरे जाताना चिन्मयचे जगही बदलत जाते. सुरुवातीला मनाविरुद्ध या गावी आलेला, वेळोवेळी परत पुण्याला जाण्याचा हट्ट धरणारा चिन्मय आणि शेवटी सामंजस्याने परिस्थितीला स्वीकारणारा चिन्मय या प्रवासात त्याची आई, त्याचे मित्र, कोकणचा निसर्ग, तिथला पाऊस आणि किल्ला असे सगळेच त्याला काही न काही शिकवत जातात. निसर्गासारखा दुसरा शिक्षक नाही असे म्हणतात. आई व मित्रांशी कटुता आल्याने चिन्मयला कोकणातला पाऊस, निसर्ग, समुद्रकिनारा आणि किल्ला हेच जवळचे वाटतात. त्याच्या एकाकीपणाचे प्रतिक म्हणजे हा किल्ला. दुर्लक्षित पण ज्याला बरेच काही बोलायचे आहे असा किल्ला.

किल्ला मध्ये मुख्य पात्र आहेत अमृता सुभाष (चिन्मयची आई), अर्चित देवधर (चिन्मय), पार्थ भालेराव (बंड्या), गौरीश गावडे (युवराज), अथर्व उपासनी (ओंड्या), उमेश (स्वानंद रायकर), निसर्ग आणि किल्ला. नेमक्या शब्दांत सांगायचे तर किल्ला म्हणजे सुंदर कथा, उत्तम पात्ररचना, संयत अभिनय, उत्कृष्ट छायाचित्रण आणि विलोभनीय पार्श्वसंगीत. छायाचित्रण आणि पार्श्वसंगीत इतके चांगले नसते तर चित्रपटाचा दर्जा नक्कीच खालावला असता. अभिनय सर्वांचाच सुरेख झालाय. युवराज आणि बंड्या ही पात्रे करमणूक करतात म्हणून लक्षात राहतात पण त्यांनी कामही चांगले केले आहे. अमृता सुभाषने हतबल तरी आपल्या मुलासाठी झटणाऱ्या आईची भूमिका छान केली आहे. चिन्मयची भूमिका करणारा अर्चित देवधर याची प्रमुख भूमिका असल्याने त्याच्या भोवती सर्व कथानक लिहिले आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रसंगात ही निवड सार्थ असल्याचे सिद्ध होते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आहे म्हणून पाहायलाच पाहिजे अशी जरी लोकांची विचारसरणी असेल तरी अनेक प्रेक्षकांना असे चित्रपट फारसे कळतच नाहीत. किल्ला हा असा चित्रपट आहे जो नि:शब्दपणे बरेच काही सांगत असतो ते टिपता नाही आले तर असा उत्तम चित्रपटही प्रेक्षकांकडून 'ठीक' या दर्जात गणला जाऊ शकतो. आपण कुठल्या प्रकारचा चित्रपट पाहायला जात आहोत यानुसार आपली मानसिकता बदलली पाहिजे. अनेक प्रेक्षकांना युवराज आणि बंड्याचे विनोदी संवाद आणि प्रसंग सोडून बाकी फार काही लक्षात राहिले नसावे आणि ते या कथानकात गुंतलेही नसावेत. किल्लाचे वैशिष्ट्य हे म्हणता येईल की कुठेही संवाद वा पात्र लाऊड होत नाहीत. चित्रपट एका संथ लयीत चालत राहतो. हा निवांतपणा, ही तरलता ज्यांना प्रिय आहे तो त्यात हरवून जातो.

जाता जाता एवढेच सांगता येईल की सौंदर्य ही अनुभवण्याची गोष्ट आहे. प्रत्येकाची सौंदर्यदृष्टी वेगळी असते तेव्हा प्रत्येकाला त्याचा आस्वाद आपापल्या तऱ्हेने घेऊ देत. किल्ला सारखे चित्रपट अथांग सागराप्रमाणे असतात. त्यातून जितके मोती टिपता येतील तितके टिपून घ्या.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बालपणीचा खेळ सुखाचा

वेळ न उरला हाती...

पाऊसगाणी