गुड मॉर्निंग

रोज सकाळी उठलो की मी बेडरूमची खिडकी उघडतो. सवयीप्रमाणे मी खिडकी बाहेर डोकावतो. बाहेर बरेचसे उजाडलेले असते. पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडतो. नेहमी प्रमाणे मला 'गुड मॉर्निंग' म्हणतात ते, पण माझा काहीच प्रतिसाद नसतो. सूर्याची कोमल किरणे मला गोंजारत जागवण्याचा प्रयत्न करतात. मी फक्त डोळे उघडलेले असतात मन मात्र घट्ट मिटून बंद असते. मी डोळ्यांवर पाणी मारुन झोप उडवण्याचा प्रयत्न् करतो. मन तसेच राहते..बेशुद्धावस्थेत. कळत असूनही कळत नसल्यासारखे.

हे सारे तसे साहजिकच होते.सात-आठ महिन्यांच्या आजारपणात आपण किती सहन करू शकतो ह्याची स्वत:च परीक्षा पाहायची आणि त्यात स्वत:च हात पुढे करून नसलेला मदतीचा हात असल्याचे समजून स्वत:ला पुढे खेचण्याचे बळ आणायचे. रोज काहीतरी कारण शोधून नवी उमेद निर्माण करायची. आशावादास ही काही मर्यादा आहेत की नाही ? सहनशक्तीची अशी परीक्षा होत असताना मन क्षणोक्षणी अधिक बधिर होत जाते, वाट चुकल्या प्रमाणे भरकटत राहते.

हे सारे आता रोजचेच झाले होते. अवतीभवतीचा निसर्ग मला हर प्रकारे खुश करू पाहत होता. पण शून्य..मनातल्या अंधारात तो शून्यही अधिक गडद होत जातो. खिडकीतील कुंडीत अधून-मधून फुले उमलतात. ती कोमेजून ही जातात काही दिवसात...पण पुन्हा नवी फुले उमलतात. मला काहीच शिकता येत नाही त्यांच्याकडून. खिडकीवर साचलेली धूळ कुणीतरी साफही करत, मला तरीही चित्र भुरकटच दिसत राहते. खिडकीला लावलेल्या 'ग्रील'ला चढलेला गंज हाच तेवढा मला सारखा भासतो.. तो ही वाट पाहत असतो...कधी दिवाळी येइन अन् मला पुसले जाईल...नवा रंग येईल माझ्या अंगास. माझी परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. मी ही वाट पाहत होतो काहीतरी चमत्कार घडण्याची.

एरवी मला पाऊस फार आवडतो. त्यात चिंब भिजताना सर्व चिंता पाण्यासवे धुतल्या जात. आजकाल तो ही कसले दुखा:चे सूर आळवतो आहे असेच भासते. खिडकीतून आत शिरू पाहणार्‍या त्याच्या सरी सुखद वाटण्या ऐवजी अंगाला टोचू लागतात. मी निमुटपणे खिडकी बंद करतो पण पावसात भिजावेसे मला वाटत नाही. तो ही निराश होतो अन् मी ही.

पण असेच काहीसे होत असताना एके दिवशी काहीतरी संकेत मिळावा अशा प्रकारे मला सकाळी जाग येते. खिडकी उघडता क्षणीच एखादे सुमधुर गाणे कानी पडावे आणि मन विचलित व्हावे असे काहीसे होते. मी बाहेर पाहतो तर कालचाच पाऊस नव्याने माझ्या समोर...मनात वाटते की बोलावे , 'मला नाही बोलायचे तुझ्याशी'पण असे म्हणण्या ऐवजी मी त्या पावसाचा नाद कानी रुजू देतो. एक दोन मिनिटातच चित्र पालटते आणि सूर्याची सोनेरी किरणे पावसाच्या सरींची जागा घेतात आणि बरसू लागतात मुग्धपणे... मी माघारी फिरून काहीतरी काम करावे असा विचार मनात येतो अन् त्याच क्षणी पुन्हा मी घाईघाईने खिडकी बाहेर डोकावतो. आकाशात डाव्या बाजूस ते मोठ्या डौलात उभे असते. तेच ते...रंगीबेरंगी अन् अनाकलनीय सुखद भावनांचे इंद्रधनू ! मी क्षणभरही त्याला पाहण्यात वेळ दवडत नाही आणि थेट गच्चीकडे पळत सुटतो. आज कित्येक दिवसांनी हा माझा मित्र मला दिसला... त्याला पाहून गगन ठेंगणे झाले होते. काही क्षण पुन्हा मी हरवल्यासारखा पाहत राहतो. इतका की तो डोळ्यांसमोरून नाहीसा झाल्याचे लक्षात ही येत नाही. काही वेळाने शुद्धीवर येतो मी.. अन् कुणीतरी आवाज देतय अस वाटत म्हणून मागे वळून पाहतो तर हा आपला मित्र सूर्य ढगाआडून डोकावतो, हसत हसत मला 'गुड मॉर्निंग' म्हणतो. माझा मूड आता बऱ्यापैकी छान असतो. मी त्याला एक स्माईल देतो. मनातल्या मनात काहीतरी पुटपुटतो अन् परतीची वाट धरतो. त्या वेळी मात्र मनातल्या आभाळात अनेक इंद्रधनू उमटलेले असतात. त्या प्रत्येकातून माझ्या कानी काहीसे एकच स्वर ऐकू पडतात, ' गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे'!!!

पोस्ट दिनांक- १८ नोव्हेंबर २००९

Comments

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी