पुन्हा आत्महत्या

आज पुन्हा एक आत्महत्या. शाळकरी मुलाने अभ्यासाच्या तनावाखाली येऊन गळफ़ास घेऊन जीव दिला.रोज रोज हेच चालले आहे. अभ्यास, परीक्षा, स्पर्धा, जीवघेणी स्पर्धा...आणि शेवटी अंत. ह्याला जबाबदार कोण? आजची शिक्षणपद्धती, मुलांचे पालक, आजु बाजुची परिस्थिती कि मुले स्वत: ? विषय तसा फ़ारच गंभीर आणि विचार करण्याजोगा आहे. हे असे का घडते? का म्हणून हि मुले अभ्यासाच्या तनावामुळे जीव देण्यापर्यंत पाऊल उचलण्याचे धाडस करतात ? शाळेत तर आपण सर्वच जातो, सर्वजण हया अभ्यास आणि परीक्षेच्या चक्रातुन आपल्या योग्यतेनुसार बाहेर पडतात. कुणी जेमतेम पास होतात, कुणी बर्‍यापैकी मार्क्स मिळवतात तर कुणी मेरिटलिस्ट मध्येही नाव नोंदवतात, पण यश-अपयशाची व्याख्या सर्वत्र सारखी असतेच असे नाही. नापास होणारी मुले जिथे आत्महत्या करतात तेच मेरिटलिस्ट मध्ये न आल्याने निराश होणारे ही करतात. याउलट रिझल्टच्या टेन्शनमुळे त्याला सामोरे न जाण्याच्या भीतिने ही काहीजण या अनमोल जीवनास गमावुन बसतात. मग या सर्वावर उपाय काय?
या सर्व परिस्थितीत त्या मुलांच्या मनाचा विचार करण्याचीही फ़ार आवश्यकता आहे आणि हे सर्व घडण्यामागे एक कारण प्रकर्षाने जाणवते ते म्हनजे भीती. समाजाची भीती, शिक्षकांची भीती, पालकांची अन स्वत:चीही. लोकांच्या नजरा जशा त्याला टोचून बोलू लागतात तसे स्वत:चीही नजर त्याला खाऊ लागते.’ मी नापास झालो...नापास झालो..’ नापास झालो म्हणजे हरलो, नापास झालो म्हणजे संपलो. सर्व काही संपले अशा काहीशा समजुतीपोटी ते स्वत:च स्वत:ला कमी लेखू लागतात. नापास होणार्‍या मुलांच्या बाबतीत हे खरे असले तरी चांगल्या मार्कानी पास होऊनही हवे तितके मार्क्स न मिळाल्याने जीव देणारे काही असतात, मग यामागचे कारण काय? पालकांच्या अपेक्षा आणि मुळातच चुकीची दिली जाणारी शिकवणूक. चांगले मार्क्स मिळवणे म्हणजेच सर्व काही. ते मिळाले म्हणजे कॉलेजमध्ये अड्मिशन मिळेल. पुढे नोकरीही चांगली मिळेल. समाजात प्रतिष्ठा राहील. ज्याला हे जमत नाही तो नालायक. त्याच्याकडून पुढे आयुष्यात काहीच उल्लेखनीय घडणार नाही. मुळात या मार्क्सवादी सिस्टीमचा प्रभाव गेल्या काही वर्षात अधिक प्रकर्षाने जाणवू लागला आहे. त्यापूर्वी किंवा अगदी मागच्या पिढीतही ह्याला अवाजवी महत्त्व कधीच दिले गेले नव्हते. त्यावेळेस ही यशाची व्याख्या चांगले गुण मिळवणे हेच होते पण त्याचे अवडंबर माजले नव्हते आणि शिक्षण हे सर्वांगीण विकासासाठी असून त्यात आलेली स्पर्धा व त्यामागुन आलेल्या अपयशाचे परिणाम हे निश्चीतच शिक्षणाच्या चुकिच्या दिशेने होणारी वाटचाल दर्शवते.
आज आपले सामजिक जीवन इतक्या झपाट्याने बदलत आहे की त्यामुळे बर्या्च मुलांच्या मनात संभ्रम वाढत चालला आहे. ध्येय प्राप्तीसाठी लागणारी एकाग्रता, त्यासाठी करावी लागणारी मेहनत आणि अपयशावर मात करण्यासाठी लागणारी चिकाटीपनाची वृत्ती हे या फास्टफूड च्या जमान्यात दुर्मिळ होत चालले आहेत. या रंगीबेरंगी दुनियेत त्यांना अनेक प्रलोभने भुलावात आहेत ज्यामुळे त्यांना नक्की कोणत्या दिशेने वाटचाल करायची आहे हे निश्चित करता येत नाहीये आणि या दृष्टीने विचार करणार्‍या मुलांना सहकार्य करण्याची गरज त्यांच्या पालकांना वाटत नाहीये ही तर अधिकच खेदजनक बाब आहे. पालक आणि मुलांतील दुर्मिळ होत चाललेला संवाद याकडे पालकांचे दुर्लक्ष होत चालले आहे. मुलांच्या या वयात जिथे मानसिक व शारिरीक बदलातून त्यांच्या मनात उभे राहणार्याे प्रश्नांची योग्य उत्तरे त्यांना कुठूनही मिळत नाहीत. ती मिळतात पण त्यांच्याच वयाच्या इतर मित्रांकडून, जे त्यांचे मार्गदर्शन करण्यास समर्थ नसतात. मग ते स्वत:च याचे उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. चित्रपट, वर्तमानपत्रे , टी.व्ही. यांच्या माध्यमातून त्यांना प्रचंड माहिती मिळत राहते पण त्यापैकी चांगले काय नि वाईट काय हे ठरवण्याइतपत ते सक्षम नसतात. थोड्याफार तनावात ही त्यांना सुटका म्हणून आत्म्हत्या हा अगदी सोपा पर्याय वाटू लागतो. इथे पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. वाहवत चाललेल्या मुलांच्या मनास सांभाळून घेण्यास, त्यांना समजावून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यास पालकांनी त्यांची एक गरज म्हणून सदैव प्राधान्य दिले पाहिजे.
शालेय आणि महाविद्यालयीन जीवन ही मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रमुख काळ आहे. या प्रवासातील हा अवघड वळनांचा घाट मार्ग सुरळीत पार पडल्यावर पुढचा प्रवास सुकर होतो. पण याच काळात संयम आणि धैर्याने आलेल्या अडचणीस सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी मनाचा खंबीरपणा, अपयश पचवण्याची तयारी आणि ध्येय निश्चित करून त्याकडे सर्व अडथळे पार करून जाण्याची जिद्द या गुणांचा विकास करण्याची नितांत गरज आहे. शालेय जीवनातील यश-अपयशास मिळालेले अवाजवी महत्त्व यामुळे मुलांचा नैसर्गिक विकास व सर्वांगीण वाढ खूंटत चालली आहे. अभ्यासाव्यतिरिक्त ही इतर छंद, कला, आवडी-निवडी हे देखील विरंगुळा म्हणून गरजेचे आहेत. पण ही क्षेत्रेही रियालीटी शो च्या नावाखाली मुलांवर यशस्वी होण्याचे प्रचंड दडपण आणत आहेत. जी मुले हे सर्व करण्यास समर्थ नाहीयेत त्यांना हा आपला दोष समजून त्यास कमीपणाचे समजत आहेत. त्यांच्या मनाचा एक कोपरा दिवसेंदिवस कुजत चालला आहे. तेव्हा या फुलांना असेच कुजत द्यायचे की योग्य ते खात पाणी घालून त्यांचे मनोहारी बागेत रुपांतरण करायचे हे आपणच ठरवायचे आहे. त्यांना आपल्या आधारची गरज आहे आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे हे आपले कर्तव्य आहे.
शेवटी पुन्हा एक गाणे मनात येते...
''एका तळ्यात होती बदके पिले सुरेख... 
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक''
ह्या सर्व कुरूप पिल्लास ते राजहंस असल्याची जाणीव करून द्यायला हवी नाहीतर जन्मभर ते स्वत:च या कोड्यात अडकून पडतील व आपली खरी ओळख गमावून बसतील.

Comments

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी