रिऍलिटी शो जिंकायचाय ?

हल्ली सगळीकडे रिऍलिटी शो ची चलती आहे. प्रत्येक चॅनेलवर एक तरी रिऍलिटी शो आहेच. काही वर्षापूर्वी जिथे डेलीसोप्सने कब्जा केला होता तिथे आता रिऍलिटी शो ने त्यांची जागा बळकावली आहे. गायन, नृत्य, अभिनय, विनोद यांच्याबरोबरच अनेक विषयांवर रिऍलिटी शो सुरू झाले आहेत. त्यात क्वीज कॉंटेस्ट, कुकिंगपासून वेट लूसिंग पर्यंत बर्‍याच विषयांनी घुसखोरी केली आहे. आणि विशेष म्हणजे लोकांना हे पाहायला आवडत आहेत.कॉलेजगोइंग क्राउड पासून ते ऑफीसमधल्या स्टाफ पर्यंत सर्वत्र याची चर्चा चालू असते.

रिऍलिटी शो मधले स्पर्धक ही रातोरात स्टार होऊन जातात. इतक्या कमी वेळात प्रसिद्धी मिळत असेल तर कोणाला नको आहे. म्हणून या स्पर्धांमध्ये भाग घेऊन झटपट नाव कमवायच्या हेतूनेच सर्व जण इथे रांगा लावतात. एकदा टी. व्ही. वर झळकलो की पुढचा मार्ग सोपा होऊन जातो आणि त्याहून पुढे जर ती स्पर्धा जिंक्लो तर लॉटरीच लागली.

रिऍलिटी शो जिंकण्यासाठी काय करावे लागते? तसा तर काही १००% यशस्वी होणारा फॉर्म्युला यासाठी नाहीये पण जर तुम्ही किंवा तुमचे मित्र, नातेवाईक या स्पर्धेत भाग घेत असतील तर काही गोष्टींकडे जरूर लक्ष द्या. तुम्हाला रिऍलिटी शो जिकायचा असेल तर खालील काही गोष्टी तुमच्यात असणे गरजेचे आहे.

  • पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे स्पर्धेत उतरण्याइतके तरी टॅलेण्ट असायला हवे. अगदीच ओ की ठो माहीत नसणार्‍याला स्पर्धकास यशस्वी होता येत नाही.( आपण स्पर्धेत उतरण्यास लायक आहोत की नाही हे निदान आरशात पाहून तरी जा !)

  • तुमच्याकडे चांगली निरीक्षणशक्ती आणि आकलन शक्ती असायला हवी. काय केल्याने आपण परीक्षकांवर प्रभाव पाडू शकतो याचा विचार तुम्हाला करता यायला हवा.(इतरांनी तुम्हाला काही आइडिया सुचवन्यापेक्षा तुम्हाला त्या सुचल्या तर अधिक चांगले)

  • परीक्षकांशी आणि इतर स्पर्धकांशी नम्र रहा. आपल्याला जास्त येत आहे असे चुकुनही भासवण्याचा प्रयत्न करू नका. उलट त्यांच्यामुळे आपण नवीन-नवीन गोष्टी कशा शिकत आहोत हे नेहमी सांगत रहा.( बहुतेक स्पर्धेत अंडरडॉग समजले जाणारे स्पर्धकच नंतर जिंकतात हा अनुभव आहे)

  • इतर स्पर्धकांचे कौतुक करा आणि त्यांना मदत ही करा. तुमचा अधिक कठीण स्पर्धक कोणता या प्रश्नावर मात्र , ' माझी स्पर्धा माझ्याशीच आहे' असे उत्तर दिले तर चांगले. या सगळ्यांतून तुमची प्रेक्षकांमध्ये चांगली प्रतिमा तयार होईल.(तुम्ही लोकांची मने जिंकू शकत नाही तर शो कसा जिंकणार ?)

  • तुमच्यात इतर काही कलागुण असतील तर ते ही सादर करण्यास हरकत नाही म्हणजे तुमच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची लोकांना ओळख होईल. ( किंवा तशा दुसर्‍या शो मध्ये तुम्हाला भाग घेण्याची संधी ही मिळते)

  • तुम्हाला प्रामाणिकपणे जिंकावस वाटत असेल तर चुकुनही स्पर्धेदरम्यान कुणाशी वाद घालू नका. या सगळ्याने चॅनेलचा टीआरपी वाढेल पण तुमचे नाव ही खराब होईल. या रीतीने मिळणारी प्रसिद्धी तुम्हाला हवे ते यश नक्कीच देणार नाही.( लोकांच्या चर्चेचा विषय व्हाल पण चांगल्या अर्थाने नव्हे! )

  • प्रेक्षकांचे आभार मानायला विसरू नका. आपल्याला मिळणारे यश प्रेक्षकांकडून मिळणार्‍या पाठिंब्याशिवाय शक्य होणार नाही हे मान्य करा.( म्हणजे तुम्हाला भरपूर मत मिळतील)

  • जिंकलात तरी पुन्हा प्रेक्षकांचे आभार माना. यातून तुम्ही कृतज्ञ असल्याची जाणीव तुम्हाला मते देणार्‍यांना होईल.( म्हणजे शो नंतर तुम्हाला ते विसरून जाण्याची शक्यता कमी होते)

  • एवढे सगळे करून ही नाही जिंकलात आणि स्पर्धेबाहेर पडलात तर त्या वेळी परीक्षक हमखास बोलणारे वाक्य नेहमी लक्षात ठेवा ,'' ही स्पर्धा म्हणजे सर्व काही नाही.( इतर स्पर्धा ही आहेत) बाहेरच्या जगात अशा अनेक स्पर्धांना तोंड द्यावे लागेल आणि मला खात्री आहे तू या क्षेत्रात मोठे नाव कमावशील.''

गमतीचा भाग सोडला तर स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेनंतर आपल्याला मिळालेली ओळख, आपल्यात झालेले बदल आणि सुधारणा हे देखील आपले यशच आहे तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.एक स्पर्धा हरलो म्हणजे आयुष्यात हारल्यासारखे मानू नका. माणूस जोपर्यंत स्वत:हून हार मानत नाही तोपर्यंत तो हरत नाही आणि जिंकणे महत्त्वाचे नसून प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे तेच तुम्हाला यश मिळवून देईल हे ही विसरू नका.

Comments

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी