संकल्पाची ऐशीतैशी

दरवर्षी संकल्प होतात, दरवर्षी मोडले जातात. मोठ्या उत्साहात आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपले संकल्प सांगून मोकळे होतो आणि संकल्प पूर्ण करण्याची 'जबाबदारी' ही सोडून मोकळे होतो. यातील बहुतेकांचे संकल्प तर पहिल्या दिवशीच मोडले जातात. पण उपवास मोडला तरी चालेल पण संकल्प पूर्ण करायचाच असे हट्टाला पेटणारे ही काही आहेत. मग तऱ्हेतऱ्हेचे संकल्प सोडले जातात त्यातील पूर्ण किती होतात हे महत्वाचे नसले तरी संकल्प करतात हे खरे. काही दिवसांनी हेच लोक नसत्या फंदात पडलो म्हणून वैतागतात आणि जे शहाणे लोक असतात ते या लोकांची फजिती पाहत बसतात.
संकल्प करणार्‍यांपैकी फार कमी जण ते पूर्ण करतात नाहीतर इतरांना त्यांनी संकल्प केले होते याची आठवण करून द्यावी लागते. आणि मग,

''अरे हो रे,
केला 'होता',
वेळ नाही मिळत रे,
तर तर लक्षात आहे माझ्या...,
बरी आठवण केलीस '' असली उत्तरे मिळतात. काही जण फक्त लोकांना सांगण्यासाठीच संकल्प करतात आणि ते पूर्ण होणार नाही याची खात्री बाळगूनच.संकल्प कोणता करावा आणि कोणता करू नये यावर काही एक बंधन नाही कारण ती प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. ज्याला त्याला आपआपले संकल्प करायचे स्वातंत्र्य आहे. तरी ही आजु-बाजूला पहिले तर तेच-तेच संकल्प जिथे-तिथे पाहायला मिळतात.

सगळ्यात जास्त केला जाणारा संकल्प म्हणजे खोटे न बोलण्याचा संकल्प. नेहमी खरे बोलावे असे लहानपणापासून शिकवले जात असूनही आपल्याला काही ना काही कारणास्तव खोटे बोलावे लागते आणि मग कुठेतरी मनास लागून राहते. मग नववर्षाचा मुहूर्त शोधून आपण ठरवतो की यापुढे खोटे बोलायचे नाही. आतापासून आपण राजा हरिश्‍चंद्र झालो. बरे पण हा संकल्प गुपचुप आणि गाजावाजा न करता केला तर बरे. नाहीतर आपण याआधी बोलायचो ते सारे खोटे असा समज होऊन पकडले जायचो. खरे बोलायचा महत्वाचा फायदा म्हणजे कधी आणि काय खोटे बोललो हे लक्षात ठेवावे लागत नाही. आणि मग खरे बोलायला सुरूवात केल्यावर अधून-मधून खोटे बोलणेच बरे होते हे कळू लागते.

माझ्या बाबतीत असे काही होत नाही कारण मी (निदान) असले (तरी) संकल्प करत नाही. मी फार सफाईदार पणे खोटे बोलतो आणि माझी समाजातील प्रतिमा [(?)(:P)] फार चांगली असल्याने सगळे सहज विश्वास ठेवतात. अर्थात कसल्याही स्वार्थी हेतूने खोटे बोलत नसलो तरी गरज पडेल तिथे मी सराईतपणे थापा ठोकतो.(परीक्षेत खासकरून) आणि म्हणून खोटे बोलणे ही कला अंगी बाळगणे यात काही एक चुकीचे नाही(असे माझे मत आहे).

अजुन एक हिट संकल्प असतो तो म्हणजे वजन कमी करणे. ह्याला काहींनी डाएट असे सोज्वळ नाव दिले आहे.नाव काहीही असो पण शेवटी जुने कपडे अंगभर मावत नाहीत आणि आपोआपच आरसा बारीक झाल्याचे वाटू लागले की मग आता वजन कमी झालेच पाहिजे या निष्कर्षवर येऊन पोहोचतो. एकीकडे खाण्यावर नियंत्रण ठेवणे काही होत नाही आणि त्यामुळे वजन ही लवकर कमी होत नाही. जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा तर फारच कंटाळा असतो. मग एके दिवशी मरायचेच आहे तर उपाशी राहून मरण्यापेक्षा थोडे जाडजूड होऊन मेले तर काय वाईट असा साक्षात्कार ही काही जणांना होतो.यावर अजुन 'अगदीच काही जाड नाही रे मी' हे चारचौघात बोलणारे मनात मात्र 'वजन कमी करणे काही आपल्या हाती नाही' हे ठरवून मोकळे झालेले असतात. अर्थात 'वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो' असे कुणीतरी म्हटलेले आहेच. इथेही माझ्या बाबतीत असा प्रश्न येत नाही कारण मला वजन कमी करण्यापेक्षा वजन वाढवण्याची जास्त इच्छा आहे. निदान समाजातील वजन वाढले तरी मूठभर मांस अंगी चढून वजन वाढेल अशा भ्रामक समजुती करून देखील वजन आहे तसेच आहे.

नवीन वर्षानंतर परीक्षा फारच जवळ असल्याने कॉलेज मधले कट्टेबाज आता अभ्यासाकडे लक्ष देण्याचे संकल्प करतात. दिवाळी, कॉलेज फेस्टिवल, पिकनिक, थर्टी फर्स्टची पार्टी...बास्स झाले. आता मोर्चा लायब्ररीकडे!लेक्चर्स अटेंड केले पाहिजेत, आपल्या नोट्स आपणच काढल्या पाहिजेत असले संकल्प नाही केले तर निदान स्कॉलर मित्रांकडून चार महत्वाचे टॉपिक्स तरी जाणून घ्यावेत इ.इ.

आपल्या ब्लॉगर मंडळींनी मात्र नियमीत ब्लॉग लिहीण्याचा संकल्प केला आहे आणि त्यात काही एक विशेष नाही. त्यातील काहींनी या वर्षी ट्रेकिंग करायचेही ठरवले आहे. काहींनी खादाडी वर नियंत्रण ठेवायचे पण तीच खादाडी न चुकता ब्लॉगवर पोस्ट करायची असे इतर खादाड ब्लॉगर्सना पाहून ठरवले आहे.
आपल्या सारखे नेहमी कामात बिझी असणारे लोक वेळात वेळ काढून आपल्या छंदांना जोपासण्याचा संकल्प करतात. आपले कितीतरी छंद आपल्या नकळत आपण विसरून जातो किंवा लक्षात राहीले तरी ते पूर्ण करण्यासाठी वेळ काढण्यापेक्षा ते या ना त्या कारणाने टाळत राहतो. म्हणून आता आपल्यातील कलाकारास पुन्हा एक संधी देण्यासाठी थोडा प्रयत्न करू. नुसतेच करियर आणि पैशामागे धावायाचे का? स्वत:साठी ही वेळ द्यायला हवा ना!

माणूस आपल्या चुकांमधून बरेच काही शिकतो. कोणत्या चुका केल्या पाहिजेत, कोणत्या चुका महागात पडतील याचा विचार करून चुका टाळण्याचा संकल्पही आपण करतो. आपल्या आयुष्यातील आधी झालेल्या चुका पुन्हा करायच्या नाहीत.(नवीन चुका कराव्यात) वाईट धंदे सोडून चांगल्या मार्गाला लागण्याचे जसे संकल्प होतात तसे पुन्हा प्रेमात न पडण्याचेही संकल्प होतात. कॉलेजलाइफ मध्ये रोमीयोगिरी करणारे कॉलेजच्या शेवटच्या वर्षी( शेवटच्या तीन महिन्यात)- आता सगळी लफडी सोडून अभ्यास करायचा बाबा! तर एखादा स्कॉलर 'यावर्षी वॅलेन्टाईन डेला तरी तिला प्रपोज़ करायचेच!' असे ही संकल्प करतात. कुणाचे काय तर कुणाचे काय ?

सगळ्यात गंभीर पण तितकाच गमतीशीर संकल्प म्हणजे दारू सोडणे. हा बहुतेकदा थर्टी फर्स्टच्या नाईटला टाइट होण्यापूर्वी केला जातो. या वर्षीची ही शेवटची, उद्यापासून बंद म्हणजे बंद! जसे काही आता डायरेक्ट पुढच्या थर्टी फर्स्टच्या पार्टीलाच प्यायची आहे. दारू सोडण्याचा संकल्प हा महाकठिण! ( हे अनुभवाचे बोल नाही बरे!!) पण माणूस दारूच काय कुठल्याही गोष्टीच्या आहारी गेला की त्याला व्यसन जडते आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.( अरे देवा!!)

सगळयात शेवटी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कोणताही संकल्प केलेला नाही. माझे संकल्प कधीही, केव्हाही सुरू होतात आणि केव्हाही बंद होतात. सगळा मनमौजी कारभार. खास ठरवून करण्यात काही करण्यात गंमत नाही. 'जे कराल ते मनापासून करा' असे (हल्लीच) कोण्या थोरपुरुषाने म्हटलेले आहेच.म्हणून आतापुरते एवढेच. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

Comments

 1. मस्त पोस्ट रे ....माझे संकल्प पण तुझ्यासारखेच ,म्हणून आता करताच नाही ... :)

  ReplyDelete
 2. सहिये पोस्ट...!!! :-)

  ReplyDelete
 3. धन्यवाद दर्शना...नववर्षाच्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 4. धन्य रे देवेन...
  आळशीपणा आणि काय?
  कशाला ते संकल्प करायचे?

  ReplyDelete
 5. आभारी हा मैथिली...
  नववर्षाच्या खूप शुभेच्छा!

  ReplyDelete
 6. माझ्यापण संकल्पाची वाट लागने सुरु झालेले आहे.

  ReplyDelete
 7. धन्यवाद
  आणि ब्लॉगवर स्वागत आहे.

  ReplyDelete
 8. संकल्पांची ऐशी तैशी....:)
  ब्लॉगर मंडळीचे संकल्प झकास आहेत....२०१२ च्या शुभेच्छा...

  ReplyDelete
 9. धन्यवाद अपर्णा ताई
  तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा...

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी