महाशतकवीर

'वाट पाहुनी जीव शिणला' होता सगळा चाहत्यांचा पण तो सोनियाचा दिवस काही येतच नव्हता. गेल्या वर्षी आफ्रिकेविरुद्ध ९९चा आकडा गाठला आणि तेव्हापासून त्या १०० व्या महाशतकाची महाप्रतीक्षा सुरु झाली. मग सेमी फायनलला पाकविरुद्ध करणार, फायनलला वानखेडेवरच करणार, इंग्लंडला क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डसवर नक्कीच, त्याच्या आवडत्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध १०० टक्के असे करता करता १६ मार्च उजाडला आणि एकदिवसीय सामन्यात ज्याची पाटी कोरी होती त्या बांग्लादेश विरुद्ध 'महाशतक' लागले आणि तमाम क्रिकेटप्रेमींचे वर्षभराचे टेन्शन संपले.

सचिनबद्दल काही बोलायचे म्हणजे आपल्या क्षेत्रात कितीही ग्रेट असलो तरी आपण ह्या सागरातील एक थेंबही नाही असे वाटत राहावे असा त्याचा पराक्रम. तसे मी १ वर्षाचा होतो तेव्हापासून तो खेळतो आहे. २२ १/२ वर्षांची त्याची कारकीर्द, त्याचे वय, त्याचे कर्तृत्व पाहता मी त्याला सचिनजी किंवा सचिनसरच म्हणायला हवे पण इतका आदर असूनही त्याला हे असे संबोधणे माझ्या आणि माझ्यानंतरच्या पिढीलाही जमले नाही. आम्ही कायम त्याला सचिन, सच्चू आणि कधीकधी तेंडल्याही म्हटल्याचे आठवते पण त्यात अनादर करण्यापेक्षा त्याच्याविषयीचे प्रेमच जास्त असल्याचे जाणवते. ह्या प्रेमामुळेच आपण हक्काने त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि तो प्रत्येक वेळी शक्य नसले तरी सातत्याने त्या पूर्ण करत आला आहे. क्रिकेटविश्वात रसिकांचे इतके प्रेम लाखातून एका एकाच खेळाडूला मिळाले आहे आणि तो आपला मराठमोळा सचिन रमेश तेंडूलकर आहे.

आज सचिनच्या महानतेविषयी फार काही बोलायचे नाही. तो खेळाडू म्हणून, माणूस म्हणून कसा महान आहे. सचिन गुणांची खाण आहेच हे सांगायला त्याची यादी करायची आवश्यकता नाही. त्याचे परिश्रम, जिद्द, चिकाटी, निष्ठा या सर्व गुणांचा गौरव त्याच्या निवृत्तीच्या वेळी पुन्हा करूच. आज केवळ शतकांचा उत्सव. शतकांचे शतक ही अशक्यप्राय गोष्ट होती आणि पुढील किमान दशकभर तरी राहील.

इतक्या सातत्याने शतकांचा सपाटा लावण्याची किमया केवळ सर डॉन ब्रॅडमन करू शकत होते. त्यांचा वारसदार बनून त्याने हे शिखर गाठले. त्याचे समकालीन खेळाडू उशीराने आले आणि गेले सुद्धा, तो अजूनही आहे. तो थकला नाही आणि लोकही त्याचे कौतुक करताना थकले नाही. सचिनच्या शतकांच्या आठवणी चाहत्यांच्या मनावर इतक्या कोरल्या आहेत की जुन्या मित्रांना भेटल्यावर आठवणींना उजाळा देत अनेक स्मृतीदालने उघडावीत तसं सचिनच्या आठवणी निघाल्या की त्यांचं होतं कारण असे अनेक आनंद सोहळे त्याने दिले आहेत, अजूनही देतो आहेच.

अवघ्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनने सुरुवातीपासूनच सर्वांचे लक्ष वेधले होते. इंग्लंड दौऱ्यावर पहिले वहिले शतक वयाच्या १७ व्या वर्षी झळकावले आणि तेव्हापासून शतकांची रांग सुरूच आहे. विशेष म्हणजे पहिली चार शतके भारताबाहेरील मैदानांवर केली ते ही विशी ओलांडण्यापूर्वी. त्यातील दोन ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच राज्यात तेही वेगवान खेळपट्ट्यांवर. पर्थमध्ये केलेले ११४ हे अजूनही सर्वात कठीण शतकांपैकी एक गणले जाते. त्याच दौऱ्यात सिडनीला जेव्हा फिरकीचा जादुगार शेन वॉर्नने पदार्पण केले त्याला फटकावून शतक लावले होते. तेव्हापासूनच त्याने सचिनचा धसका घेतला असावा.

एकदिवसीय सामन्यातील पहिले शतक यायला वेळ लागला खरा (७९ सामने) पण ५० षटकांच्या खेळात सचिनची आकडेवारी इतर कुठल्याही फलंदाजापेक्षा सरस आहे. कसोटीत कदाचित सचिन इतकी शतके कुणी करेलही पण मर्यादित षटकांच्या खेळात हा विक्रम मोडणे अधिकच कसोटी पाहणारे आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता हे कित्येकांना माहित नसेल पण हाच खेळाडू नंतर एकाहून एक विक्रम प्रस्थापित करेल हे तेव्हा कुणाला माहिती होते. संपूर्ण क्रिकेट विश्वात सर्वाधिक विक्रम सचिनच्याच नावावर आहेत.

शारजा मधील शतकांचा उल्लेख नाही झाला तर मी सचिनला पाहिलेच नाही असे म्हणावे लागेल. शारजात सचिनने तब्बल शतके ठोकली आहेत. १९९८ च्या मोसमात ज्या वर्षी सचिनने सर्वोत्तम कामगिरी करत १२ शतके नोंदवली त्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या दोन शतकांचा समावेशही होता. लागोपाठ दोन सामन्यात वादळी खेळी करत सचिनने भारताला कप जिंकून दिला. आपल्या २५व्या वाढदिवशी सचिनने स्वत:च भारताला भेट म्हणून विजय मिळवून दिला. बिचाऱ्या शेन वॉर्नला स्वप्नातही सचिन दिसायचा म्हणे !

सचिनवर कायम टीका केली जाते की तो मॅच विनर नाही, त्याने शतक झळकावले की भारत हरतो तर त्यांनी हा रेकॉर्ड पाहावा. ज्या वेळीस सचिन चांगला खेळूनही भारत हरतो तेव्हा एकतर इतर फलंदाज हाराकिरी करतात किंवा गोलंदाज तरी प्रचंड मार खातात. भारताला सातत्यपूर्ण कामगिरी करणारे चांगले गोलंदाज न लाभल्याने सचिनच्या शतकांवर पाणी पडले तर हा त्याचा दोष नव्हता. १९९९ च्या चेन्नई कसोटीत पाकिस्तान विरुध्द १२ धावांनी पराभव पत्करावा लागला पण पाठदुखीचा प्रचंड त्रास होत असूनही त्याने १३६ धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा भारताला जिंकायला १६ धावा हव्या होत्या पण उरलेल्या ३ विकेट्स ४ धावांतच गेल्या आणि पराभव हाती आला. ज्या काही मोजक्या सामन्यात सचिनने शतक करूनही भारताला जिंकता आले नाही त्यापैकी हा एक.

सचिन परदेशात चांगला खेळत नाही असे कुणाला वाटत असेल तर कसोटीत ५१ पैकी २९ शतके परदेशात आली आहेत आणि एकदिवसीय सामन्यात देखील ४९ पैकी २९ शतके भारताबाहेर आहेत. २००४च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेले द्विशतक-(नाबाद २४१) फार महत्त्वाचे होते असे सचिनलाही वाटते. त्या आधीचा काही काळ तो फॉर्ममध्ये नव्हता आणि त्या खेळीत म्हणूनच फार संयम राखत तो खेळपट्टीवर उभा राहिला. त्या नंतर दोन महिन्यांनीच त्याला पाकिस्तान विरुद्ध पुन्हा एकदा द्विशतक करण्याची संधी आली होती पण कर्णधार द्रविडने डाव घोषित केला आणि सचिन १९४ वर नाबाद राहिला. त्या वेळेस याचा बराच गाजावाजा झाला पण संघहित लक्षात घेत त्याने कधीच या वैयक्तिक विक्रमाला महत्त्व दिले नव्हते आणि तेव्हाही नाही दिले. याचेच अजून एक उदाहरण म्हणजे १९९९ च्या विश्वचषकादरम्यान सचिनच्या वडिलांचे निधन झाले पण भारतीय संघाला आपली गरज आहे याची जाणीव ठेवत सचिन केनिया विरुद्धच्या सामन्यासाठी पुन्हा इंग्लंडला रवाना झाला आणि १४० नाबाद धावा करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली. क्रिकेटप्रती इतकी निष्ठा फार कमी खेळाडू बाळगतात त्यात सचिनचे नाव कायम मोजले जाते.

२००८ साली भारतात २६/११ च्या वेळी आतंकवादी हल्ला झाला आणि संपूर्ण भारतभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तेव्हा इंग्लंड विरुद्ध चेन्नई कसोटीत ४थ्या डावात शतक (नाबाद १०३) झळकावत ३८७ धावांचे लक्ष्य गाठले आणि दु:खात ही लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम त्याने केले. २२ वर्षाच्या कारकिर्दीत हे पुण्य त्याने अनेकदा कमावले आहे त्यासाठी प्रत्येक वेळेस त्याला शतक करण्याची ही आवश्यकता नव्हती.

२ वर्षापूर्वी असाच अशक्यप्राय विक्रम सचिनने केला तो ग्वालीयारच्या मैदानात द्विशतक (नाबाद २००) झळकावले. त्या खेळीत आफ्रिकन गोलंदाजांची इतकी धुलाई झाली की तसेही फेअरनेस क्रीम लावून गोरे झालेल्या गोलंदाजांचे चेहरे अधिकच पांढरे झाले. राजाच्या मुकुटाने राजाची कीर्ती अधिकच झळाळून उठली आणि सचिन नामाचा जप सर्वदूर पुन्हा चालूच राहिला. त्याच्याच काही महिन्यापूर्वी हैदराबाद मध्ये सचिनने १७५ धावांची तुफानी खेळी करत भारताला विजयाच्या दारात आणले होते पण शेवटी शेपूट गळाले आणि ३ धावांनी पराभव झाला. ३५० चे धावांचे लक्ष्य गाठताना निम्म्याहून अधिक धावा त्याने केल्या पण तरीही सामना गमावला आणि सचिनने शतक केल्यावर भारत हरतो हा परिणाम केवळ लक्षात राहतो लोकांच्या.


एकदिवसीय सामन्यात सचिनने १६० हून अधिक धावा ४ वेळा केल्या आहेत जिथे इतर अनेक महान फलंदाज एकदाच पोहोचू शकले आहेत. मोठी खेळी करण्याची जिद्द सचिनकडे आहेच पण मैदानावर टिकून राहण्याइतका संयमही आहे. विश्वचषकात देखील सर्वाधिक शतके सचिनच्या खात्यात जमा आहेत. एकदिवसीय सामन्यातील ४९ शतकांपैकी ३३ वेळा भारताचा विजय झाला आहे तर १४ वेळा पराभव झाला आहे. १ सामना अनिर्णीत तर एक बरोबरीत सुटला आहे. कसोटीत ५१ शतकांपैकी २० वेळा भारताचा विजय झाला आहे. २० वेळा कसोटी अनिर्णीत राहिली आहे तर केवळ ११ वेळा पराभव झाला आहे. म्हणजे १०० शतकांपैकी एक चतुर्थांश पराभव असेल तरी पण आपण सचिनला दोष द्यायचा का ?

सचिनचे टीकाकार सचिनवर या ना त्या कारणाने कायम टीका करत राहतीलच पण जो फलंदाज इतकी वर्षे सातत्याने भारताचा आणि क्रिकेटचा सन्मान वाढवत आला आहे त्याला पाठींबा देण्यापेक्षा त्याबाबत नकारात्मक बोलण्यात धन्यता वाटते तर तो त्यांचा दोष आहे. त्याच्या निवृत्तीची चर्चा २ वर्षापूर्वीपासूनच सुरु आहे त्यानंतरही त्याने द्विशतक केले, विश्वचषकात २ शतकांसह नवे विक्रम केले. शेवटी या शतकांच्या यज्ञातून महाशतकाची ज्वाला बाहेर आली आणि तिच्या तेजाने केवळ क्रिकेटविश्व नव्हे तर सारे जगच झळाळून उठले. अजूनही बोलण्यासारखे बरेच आहे, कायमच असणार आहे. ते त्याच्या पुढील विक्रमासाठी राखून ठेवू. या जादूगाराच्या पोतडीतून कधी काय बाहेर पडेल हे त्या (सचिन) देवालाच ठावूक.

Comments

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा