पायरसीची शाळा


साधारण महिन्याभरापूर्वी ही बातमी वर्तमानपत्रात झळकली होती. सुजय डहाके दिग्दर्शित 'शाळा' या मराठी चित्रपटाची पायरेटेड कॉपी युट्युबवर उपलब्ध झाल्याची आणि लगोलग ती कॉपी लिक करणाऱ्या इसमावर कारवाई केल्याचीही. मराठी चित्रपटाचे रूप पालटत आहे. नवे विषय आणि नवे तंत्र यांच्या सहाय्याने त्याने कात टाकली आहे. 'शाळा' चित्रपट हा त्या मराठी चित्रपट सृष्टीतील बदल घडवणाऱ्या चित्रपटांपैकी एक. प्रदर्शनापासून आणि खरेतर त्या पूर्वीपासूनच तो प्रेक्षकांना आकर्षित होता. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की पायरसीची बातमी कळताच दिग्दर्शक सुजय डहाके यांनी पुणे सायबर कॅफेकडे तक्रार नोंदवली. कारवाई नक्की काय केली हे कळले नसले तरी पायरसी रोखण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे हे महत्त्वाचे.

पायरसी ही केवळ चित्रपट आणि गाण्यांचीच होते असे नाही. पुस्तकांची, माहितीची, तंत्रज्ञानाची आणि आम्ही ब्लॉगर जे काही लिहितो त्याचीही होते. कुठल्याही प्रकारची चोरी ही वाईटच. त्याचे समर्थन होऊ शकत नाही पण त्यामागे काय कारण आहे ते देखील पाहायला हवे. विशेष म्हणजे चित्रपटांच्या बाबत पायरसीला जितका विरोध आहे तितका गाण्यांच्या बाबत नाही.चित्रपट निर्मिती मध्ये अनेक तंत्रज्ञ कार्यरत असतात ज्यामुळे चित्रपट केवळ अभिनय आणि कथेपुरता मर्यादित न राहता प्रेक्षणीय होतो. चित्रपट हा सिनेमागृहात पाहण्यात जो आनंद आहे तो घरबसल्या सीडीवर वा इंटरनेटवरून डाऊनलोड करून पाहण्यात नाही. शिवाय चित्रपटाचे आयुष्य फार थोडे असते.सध्याच्या फास्टफूड जमान्यात चित्रपट २ ते ३ महिने जास्तीत जास्त टिकू शकतो. तोच हल्ली अल्पावधीत टी. व्ही. वर प्रदर्शित होतो आणि एखादा दुसरा चांगला चित्रपट सोडला तर त्याला रिपीट वॅल्यूही कमीच असते. त्यामुळे पायरेटेड सीडीस विकत घेऊन चित्रपट पाहण्यापेक्षा सिनेमागृहात तो पाहावा या बाबत काही दुमत नाही आणि त्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जावेत.

गाण्यांबाबत मात्र चित्र वेगळे आहे. चित्रपट संगीत, अल्बम, नाट्यसंगीत, भावगीते यांच्या सीडीस जुन्या आणि नव्या दोन्ही बाजारात येत असतात. ओरिजिनलही आणि पायरेटेडही. लोकांना आवडणारी गाणी सदा सर्वकाळ ऐकली जातात. आजची पिढी मोठ्या प्रमाणावर गाणी ऐकते. पूर्वी कॅसेट्स आणि सीडीस वर ऐकली जाणारी गाणी आता लॅपटॉप आणि आयफोनवर ऐकली जातात. मोबाईल संस्कृतीत जिथे उच्चभ्रू आणि काही मध्यम वर्गीय तरुणाईही गाण्यांसाठी पैसे खर्च करायला कचरत नाही तिथे फ्री डाऊनलोडिंग करण्यातही कुठे कमतरता नाही. बऱ्याच इंटरनेट साईटस फुकट गाणी मिळवून देतात आणि असे असताना कुणी त्या साठी पैसे का खर्च करावे असे आपले म्हणणे. कॅसेट्सतर आता कालबाह्य होत चालल्यात, सीडीस सुद्धा हवी ती शोधून सीडी प्लेयरमध्ये टाकून ऐकण्याइतका वेळ नाहीये. त्यामुळे इंटरनेटवरून सर्रासपणे फुकट डाऊनलोडिंग केले जाते आणि इंटरनेट हाच सध्या पायरेटेड मटेरीअल मिळवण्याचा मुख्य स्त्रोत आहे.

फ्री डाऊनलोडिंग मुळे गाण्याशी संबंधित गायक, संगीतकार, गीतकार, म्युझिक कंपनी यापैकी कुणालाच मानधन मिळत नाही ज्याचे ते हकदार आहेत. त्यांना यातून त्यांचे उत्पन्न मिळावे असे वाटत असूनही आपण फ्री डाऊनलोडिंगचा पर्याय सोडत नाही. या आपणमध्ये मी सुद्धा आहेच. गाण्याची आवड असल्याने कायम कोणती ना कोणती गाणी ऐकणे सुरूच असते. त्यासाठी ऑनलाईन ऐकण्याची सोय असूनही तो थोडा त्रासदायक वाटल्याने डाऊनलोडिंगचा सोपा मार्ग आपण निवडतो. तसे आजच्या पिढीला इंटरनेटवरून गाणी डाऊनलोड करायची इतकी सवय झाली आहे की उद्या खरच पायरसी विरोधात कडक नियम अमलात आणले गेले तर पैसे खर्च करून नवी गाणी किती ऐकली जातील याबद्दल शंका आहे. म्हणजे गाणी नसेल तर मोबाईलला काय शोभा आणि याउलट फुकट ते पौष्टिक मानणाऱ्यांना हे पचनी पडेल काय असेही आहे.

गाणी ऑनलाईन ऐकणे हा डाऊनलोडिंगला पर्याय असू शकतो पण त्यातूनही कलाकारांना काही मानधन मिळत असावे असे काही माझ्या ऐकण्यात नाही. शिवाय गाणी अल्प दरात उपलब्ध करूनही पायरसीला तोपर्यंत आळा बसणार नाही जोपर्यंत फ्री डाऊनलोडिंग साठी एक ना अनेक साईट्स आहेत आणि नव्याने येत आहेत. पायरेटेड सीडीस इतक्या अल्पदरात मिळत असताना ओरिजिनल सीडीस भलेही चांगल्या दर्जाच्या का असेना त्याहून १० पट किमतीला मिळत असतील तर चित्रपटाप्रती, कलेप्रती कितीही निष्ठा बाळगली तरी हे समीकरण जुळत नाही. मनोरंजनासाठी खिसा किती रिकामा करावा याचा विचार प्रत्येक जण करणारच. कलाकारांना सीडीतून मिळणारा नफा नाही मिळाला तरी ते त्यांचे एकमेव उत्पन्नाचे साधन नाही. मध्यम वर्गीय लोकांना परवडू शकेल असे सिनेमाचे दर ठेवल्यास लोक का नाही सिनेमा गृहात जाणार ? ते होत नाही म्हणून त्यावर उपाय म्हणून पायरसी होत राहते. सिनेनिर्मात्यांनी या अर्थकारणाकडे दुर्लक्ष करून केवळ पायरसीला दोष देण्यापेक्षा त्याचे कारण आधी शोधले पाहिजे आणि मग त्यावर उपाय शोधायला हवा. बरे आम्ही कलेची सेवा करतो म्हणावे तर मग केवळ जी श्रीमंतांना परवडू शकेल अशीच कलेची सेवा करता का?

हल्लीच एका मुलाखतीत अजय-अतुल यांनी सांगितले की जोगवा चित्रपटाची -ज्या चित्रपटाच्या संगीताला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याची ओरिजिनल ऑडीओ सीडीच बाजारात नाहीये. ते कुठल्याही टुकार चित्रपटांबरोबर एमपी थ्री सीडीत न येता त्याचे वेगळेपण जपले जावे म्हणून आता ते जोगवाची सीडी बाजारात आणत आहेत. असे केल्याने त्यांनी त्यांच्या तर्फे संगीताशी निष्ठा राखली असेलही पण तरीही गाणी उत्तम असल्याने रसिकांनी ती डोक्यावर घेतलीच.

मराठी माणूस कलेवर प्रेम करणारा आहे आणि म्हणूनच चित्रपटांबाबत, गाण्यांबाबत पायरसी होत असली तरी मराठी नाटकांना मात्र तो आवर्जून हजेरी लावतो अर्थात इथेही तिकिटाचे दर हा कळीचा मुद्दा आहेच. पण नाटकांची पायरसी फारशी होत नसल्याने लोक मराठी चित्रपट आवर्जून सिनेमागृहात जाऊन पाहत नसले तरी नाट्यगृहांना गर्दी असते. पायरेटेड चित्रपट, गाण्यांमध्ये मूळ दर्जा बराच खालावलेला असतो पण लोकांना जिथे ताकावर तहान भागवायची सवय झाली आहे तिथे दुधाच्या चवीचे अप्रूप काय ? सिनेनिर्मात्यांनी या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात की कोणताही व्यवसाय हा 'मागणी तसा पुरवठा' या तत्वावर चालतो. कमी दरात चित्रपट पाहायला मिळावा अशी जर प्रेक्षकांची मागणी असेल तर त्याचा विचार करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

शेवटी पायरसीला आळा घालण्याच्या या मतप्रवाहाच्या आपण कोणत्या बाजूस आहोत त्यावरही बरेच काही अवलंबून आहे. सामान्य श्रोत्याला असे वाटणे साहजिक आहे की त्याला हवे आहे ते फुकट मिळत राहावे पण त्याच सामान्य श्रोत्याने उद्या संगीत क्षेत्रात पाऊल टाकले आणि स्वत:ची कलाकृती सादर केली तर तिची योग्य किंमत मिळावी असे तेव्हा वाटले तर आश्चर्य नाही. ज्याने त्याने आपापली बाजू मांडत राहावी. कलेचे कौतुक होतच राहील. न्याय कलाकाराला मिळतो की प्रेक्षकाला हे ज्याचे त्याचे वैयक्तिक मत आहे.

Comments

  1. 'आपल्याला हवे ते फुकटात मिळावे' असं वाटणा-या सामान्य श्रोत्यांची संख्या जोवर कमी होत नाही तोवर हा प्रश्न संपणार नाही.

    ReplyDelete
  2. खुपच छान लेख आहे !!!

    ReplyDelete
  3. खूप प्रामाणिक मतं मांडलीयेस.
    मी पायरसी का करतो याची काही कारणं आहेत.

    १) गाणी: मला अनेकदा कुठेतरी अर्धवट कानावर पडलेलं गाणं पूर्ण ऐकून बघायचं असतं. शिवाय असलेल्या सीडीज्‌मधली सगळीच गाणी मला हवी असतात असंही नाही. अनेकदा सीडीज्‌ मधे निम्म्याहून जास्त गाणी फाल्तू असतात. मग मी एका हव्या असलेल्या गाण्यासाठी आख्खी सीडी विकत घेणार नाही. दुसरं म्हणजे जुन्या ठुमर्‍या, नाट्यगीतं मार्केटमधे मिळतच नाहीत. मग नेटवर शोधणं किंवा यूट्यूब व्हिडिओज डाऊनलोड करून ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करणं इतकंच हातात उरतं.
    फ्लिपकार्टवर मस्त कलेक्शन आहे. ५-१० रुपयात एक गाणं एम्पीथ्रीमधे मिळतं. बडे गुलाम अली खांसाहेबांची ठुमरी मला ६ रुपयात मिळणार असेल तर एनीटाईम!! :)

    २) सिनेमे: बॉलीवूड मेन्स्ट्रीम सिनेमामधे मला फारसा रस नाही. किस्लॉस्की, स्पीलबर्ग, हिचकॉक प्रभृतींचे सिनेमे बघायचे तर टोरंट्स हा एकच पर्याय उरतो. बेकायदेशीर असला तरी! आणि बॉलीवूडी सिनेमे मी कष्टाने कमवलेले दोन दोनशे रूपये उधळण्याच्या लायकीचे मुळीच नसतात. त्यामुळे सिनेमागृहात जाणे हा पर्यायच नाही. आणि मी टोरंट वापरून डाऊनलोड करूनही बघत नाही हा भाग अलाहिदा! :D

    ReplyDelete
  4. @साविताताई- फुकट मिळते आहे हे माहित आहे म्हणून...पायरसी विरोधी कडक कायदे असते तर प्रेक्षकांनीही हे सत्य स्वीकारले असते.

    ReplyDelete
  5. धन्यवाद विनायक

    ReplyDelete
  6. @आल्हाद -मजबुरी का नाम पायरसी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा