आयपीएलचा बाजार

नाही म्हणता म्हणता आयपीएलचे पाचवे पर्वही संपले. आयपीएल सुरु झाले तेव्हा कुमार वयात असणारे आम्ही आता तारुण्यात आलो असे हल्लीच माझ्या लक्षात आले. सुरुवातीला आयपीएलच्या बाबतीत आम्ही फार काही खुश नव्हतो. पहिलेच वर्ष असल्याने फारच गोंधळ दिसत होता. एरवी भारत-पाकिस्तान, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया या व्यतिरिक्त काही रंजक सामने होऊ शकतात अशी कल्पना नव्हती. आता आयपीएलचा कारभार, आयपीएल टीम्स सगळ्या अंगवळणी पडल्याने मुंबई-चेन्नई, दिल्ली-कोलकाता अशा मॅचेससुद्धा आवडीने पहिल्या जाऊ शकतात हे कळले आणि आयपीएलच्या बाबतीत कुठलीही मॅच रंगतदार होऊ शकते त्यामुळे वेडा क्रिकेटप्रेमी हौशीने सगळ्या मॅचेस पाहत बसतो.

एखादे नव्या पद्धतीचे गाणे पहिल्यांदा ऐकले की कळत नाही आणि आवडतही नाही पण वारंवार ऐकून आणि बाकीच्यांना कळते आणि आवडते तर मला का नाही म्हणून आपल्याला ही आवडायला लागते तसे आयपीएलचे झाले आहे. पहिल्या वर्षी हा प्रकार काय आहे, तो राहणार की जाणार हे कळेपर्यंत स्पर्धा संपलीदेखील. आता आयपीएलला नावे ठेवणार्यांनीही हे स्वीकारले आहे आणि एन्जॉय करायला सुरुवात केली आहे. काहींनी त्याकडे पाठही फिरवली आहे पण पैसा मिळतोय तर आयोजक खुश आणि हे सगळे एन्जॉय करणारे प्रेक्षकही खुश. 

केवळ करमणूक आणि नफा या दोन गोष्टींसाठी आयपीएल खेळवली जाते. दाखवायचे दात म्हणतील की नव्या खेळाडूंना संधी मिळायला हवी, विदेशी खेळाडूंसह खेळण्याचा अनुभव घ्यायला हवा पण खायचे दात मात्र पैसा कसा आणि किती मिळवता येईल एवढेच लक्षात घेतात. आयपीएलमध्ये खेळणाऱ्यांना आणि खेळवणाऱ्यांना दोघांना भरपूर पैसे मिळत असल्याने अशी संधी कोण सोडणार आणि लोकांना 'पैसा फेको तमाशा देखो' या तत्त्वावर साडे तीन तास मनोरंजन मिळते म्हणून मग ते ही स्वखुशीने आयपीएलचा बाजार पाहायला येतात. 

टी-२० वर टीका करणारे व न करणारेही आयपीएलवर टीका करत आहेत. काहींना टी-२० हा प्रकारच आवडत नाही पण आज क्रिकेट (मैदानात जाऊन) पाहणाऱ्यांना तोच प्रकार आवडतो आहे. कसोटी हा क्रिकेटचा पाया आहे हे मान्य पण हल्ली कसोटीला स्टेडीयम ओस पडत आहेत आणि टी-२० ला ती खच्चून भरत आहेत. काहीजण मात्र आयपीएल हा नुसताच पैशाचा खेळ आहे आणि भारतासाठी एकजुटीने खेळणारे खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळतात म्हणून नापसंती दर्शवतात. त्यात आयपीएलमुळे फिक्सिंगला मोठा वाव मिळू शकतो हे एक मोठे टीकेचे कारण झाले आहे. क्रिकेट न आवडणार्यांनी तर आयपीएलच्या नावाने अधिकच बोटे मोडली आहेत. जिथे इतर खेळांना आणि खेळाडूंना योग्य तो सन्मान आणि पैसा मिळत नाहीये तिथे भारतात केवळ क्रिकेटचाच दबदबा असल्याने आणि तो वाढत चालल्याने युवा खेळाडूंना केवळ क्रिकेटमध्येच करीअर करावे असे वाटू लागले तर तो इतर खेळांचा पराभव म्हणावा लागेल.

कसोटीवर प्रेम करणारे म्हणतात टी-२० मध्ये खेळाडूंचे कौशल्य पणाला लागत नाही. हे काही आपल्याला पटत नाही. कसोटी आणि टी-२० दोन्हीमध्ये खेळाडूकडून वेगळ्या प्रकारच्या खेळाची अपेक्षा असते. कसोटीमध्ये संयम आणि चिकाटी आवश्यक असेल तर टी-२० मध्ये आक्रमकता आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. उत्तम खेळाडू तोच ठरतो जो दोन्हीमध्ये गरजेनुसार खेळत बदल घडवून आणतो. टी-२० मध्ये नशीब फॅक्टर फार महत्त्वाचे ठरते. कारण प्रत्येक निर्णय, चाल प्रत्यक्षात आणण्यासाठी वेळ फार कमी असतो. टी-२० प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवतो आणि त्यामुळेच तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात आयपीएल सुरु करणे हे आयोजकांच्या अधिकच पथ्यावर पडले आहे आणि हल्ली जिथे कसोटीला स्टेडियम ओसाड दिसू लागली आहेत ती २०-२० साठी तुडुंब भरत आहेत. आता आयपीएलमध्येही मॅच फिक्सिंगचे पिल्लू शिरल्याने खेळाडूंच्या निष्ठेविषयी खात्री कोणी द्यावी. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणे वेगळे आणि आयपीएलमध्ये एका विकत घेणाऱ्या संघासाठी खेळणे वेगळे. इथे निष्ठा असलीच तर केवळ क्रिकेटशी असू शकते आणि जे देशाशी प्रामाणिक राहू शकत नाही ते खेळाशी प्रामाणिक राहतील अशी अपेक्षा आपण कशी ठेवणार ?

आयपीएलचे बरेच सामने विद्युतझोतात खेळवले जातात त्यामुळे एकीकडे राज्यात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरु असताना मनोरंजनासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर करणे खरंच गरजेचे आहे का? असाही एक नाराजीचा सूर उमटला आहे. खेळाचा आनंद लुटणाऱ्या शहरी समाजाला ग्रामीण लोकांच्या समस्यांचे काहीच सोयरसुतक नाही असे म्हणूया का? लोक मनोरंजनाच्या इतके आहारी गेलेत की आता ते अगदी सहज त्यासाठी पैसा खर्च करत आहेत. 

आयपीएलचे असे झाले आहे की हा सगळा कारभार पटत तर नाहीये पण पाहायला मात्र आवडतो. राजकारणी लोक समाजाची दिशाभूल करणाऱ्या अशा संध्यांची वाट पाहताच असतात. दरवर्षी आयपीएल सुरु झाले की लोक कामधाम सोडून त्याच्या मागे लागतात. भ्रष्टाचार, पेट्रोल दरवाढ, घोटाळे, आतंकवादी हल्ले या साऱ्या समस्यांतून लोकांना आनंद देणारे चार क्षण मिळाले तर काय वाईट आहे असे ते म्हणणार कारण त्यामुळेच ते सुरक्षित राहतात.

आयपीएल असो वा नसो पण टी-२० हे आजच्या क्रिकेटची गरज आहे. आजचा प्रेक्षक धावत्या राहणीमानात वेगवान खेळाची अपेक्षा ठेवतो. जे मूळ क्रिकेटचा पाया आहे ते पाहायला आपल्याकडे वेळ आणि संयम दोन्ही नाहीये ते आवडत असले तरी कालबाह्य होणार आहे. सच्चे क्रिकेटप्रेमी सोडले तर बाकीचे आज कोण कसे खेळले? कोणती टीम जिंकली यावर गप्पा मारणार आणि उद्याच्या मॅचची वाट पाहणार.

Comments

  1. लेख आवडला, नेहमी प्रमाणे मस्त... पण (कदाचित प्रथमच) काही मुद्दावर मी असहमत आहे. टी-२० हा फार लक चा खेळ आहे. आज हिरो तर कल झिरो, मक्क्लम घे, वल्थाटी घे. एक सिजन गाजवला आता नामोनिशाण नाही. खरा खेळ "कसोटी" क्रिकेटच. याचा कधीच बाजार झाला नाही.

    ReplyDelete
  2. नशीबावर भरोसा ठेवूनच सगळे चालते खरे...पण मोक्याच्या क्षणी एखादा खेळाडू सामना जिंकवून देतो की नाही ते महत्त्वाचे. खेळाडू अयशस्वी ठरतो तो त्याच्या चुकांमुळे किंवा विरोधी संघाच्या चांगल्या खेळामुळे.

    ReplyDelete
  3. Mast Lekh ahe majyakde pn bharpur lekh ahet bt blog ksa kraych mla sangu shakal ka koni

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी