कृष्णधवल पाने

निमित्त झाले ते रणबीर कपूरच्या एका जाहिरातीचे. जुन्या काळातल्या रहदारीविरहित मुंबईतून गाडी चालवत गाणे गुणगुणत जाणारा नायक आणि तोही कृष्णधवल रंगांत. भूतकाळात डोकावणे हा तसाही माझा आणि माझ्यासारख्या इतर अनेक स्वप्नाळू माणसांचा आवडता छंद आणि त्यात आपण न पाहिलेल्या काळात डोकावणे म्हणजे कायमच कुतूहल वाढवणारे...

माझ्याबाबतीत असे आहे की मला कायमच इतिहासाचे किंवा आपण न पाहिलेल्या काळाचे आकर्षण आहे. विज्ञानाने माणसाला भविष्याकडे पाहण्याची दूरदृष्टी दिली तरी इतिहासाने त्याला अनुभवाने आलेले शहाणपण दिले. वर्तमान हातात आहे, भविष्य तर काय येणारच आहे. पण भूतकाळ मात्र येणार नाही. भूतकाळात किंवा स्वप्नरंजनात फार काळ रमणे ठीक नसले तरी भूत आणि भविष्य या दोघांपैकी काही निवडायची वेळ आली तर मी भूतकाळात डोकावणे पसंत करेन.

गतकाळाकडे प्रामुख्याने आकर्षित करणारी माध्यमे म्हणजे सिनेमे आणि छायाचित्रे. पुस्तके किंवा छापील साहित्य आपल्याला बरीच माहिती देते पण कल्पनेच्या माध्यमातून ते डोळ्यांपुढे येण्यासाठी आपण पाहिलेल्या घटनांचेच संदर्भ जुळतात. या भूतकाळाबाबत नेहमी असे वाटते की तो मुळातच अशा कृष्णधवल रंगात असेल. काही जुनी गाणी पाहताना ती रंगीत असतील तर ती तितकी जुनी भासत नाहीत पण कृष्णधवल रंगात चित्रित झालेली गाणी पाहिली की एकदम जुन्या काळात खेचले जातो. हा सारा जुना काळ मला आकर्षित करत राहतो कारण तो कधी पाहायला मिळाला नाही. कधीतरी आजीकडून त्यांच्या काळच्या आठवणी ऐकताना कसे हरवून जायला होते. ते ऐकताना आजचा काळ अधिक सुखावह आहे हेही आपण विसरून जातो.

आपल्या महाराष्ट्राने असंख्य गड-किल्ले इतिहासाची साक्ष म्हणून आपल्याला दिले आहेत. प्रत्येक गड त्यावर लढलेल्या मराठा वीरांच्या पराक्रमाचे गोडवे गात असतो, ते या गड-किल्ल्यावर प्रेम असणाऱ्या, त्यांचा अभिमान बाळगणाऱ्या आजच्या मावळ्यांनाही ऐकू येत असतील. ऐतिहासिक कादंबऱ्या वाचताना तर कित्येक प्रसंग डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहतात. त्याचे यश पूर्णत: लेखन कौशल्याला द्यायला हवे. स्वराज्य प्राप्तीसाठी लढलेला प्रत्येक मावळा, त्यांनी लढवलेला प्रत्येक किल्ला यापुढे आपण किती खुजे आहोत याची जाणीव करून देतो. दुर्दैवाने आज अनेक गडांकडे दुर्लक्ष झाल्याने ही संपत्ती लयाला जात आहे. 

आजच्या या शहरीकरणामुळे वाढलेले प्रदूषण आणि लोकसंख्येचा भार यामुळे शहरी लोक खास करून निसर्गरम्य ठिकाणी जाणे पसंत करतात. कधीतरी जुन्या गाण्यात आपली पूर्वीची मुंबई दिसली की वाटते तेव्हाची गर्दी आणि प्रदूषण नसलेली मुंबई कधी आपल्याला पाहायला मिळेल का? की आता मुंबई आणि गर्दी हे शब्द एकरूप झाले आहेत ? कालांतराने मुंबईच्या बाहेर स्थायिक झालेला मूळचा मुंबईकर कधी जुन्या मुंबईत आला की अशा कित्येक आठवणी जाग्या होतात.

इतिहास हा आवडता विषय असल्याने अभ्यासाव्यतिरिक्त इतर माहिती शोधण्याकडे आधीपासूनच कल होता. जुन्या काळचे संदर्भ, साहित्य वाचताना त्या त्या काळची जीवनशैली, तेव्हाची विचारसरणी त्याबद्दल विचार करायला भाग पाडते. कसा असेल स्वातंत्र्यापूर्वीचा भारत ? तेव्हा आजच्या सारखी मनोरंजनाची साधने नव्हती की अत्याधुनिक तंत्रज्ञान ही नव्हते. विचारी मनास न पटणाऱ्या सामाजिक रूढी आणि व्यक्ति स्वातंत्र्यावर असणारी अनेक बंधने. शिवाय हा सारा काळ आणि एकूणच इतिहास अनेक रक्तरंजित घटनांनी माखलेला आहे. ब्रिटीशांचे जुलुमी शासन आणि त्याविरुद्ध प्राणाची पर्वा न करता पेटून उठलेले भारतीय क्रांतिकारक. स्वातंत्र्य म्हणून आपण जे उपभोगतो आहोत त्यासाठी किती प्राणाच्या आहुती दिल्या गेल्या असतील याची काही गणतीच नाही.

केवळ भारताचाच इतिहास नव्हे पण जगाचा इतिहासही त्या त्या देशाची संस्कृती, विचारसरणी त्यांच्या इतिहासातून सांगतो. आज सहजी उपलब्ध असणारे तंत्रज्ञान त्या काळाच्या संशोधकांच्या अविरत परिश्रमाचे फळ आहे. जेथे सोयी उपलब्ध नव्हत्या तेथे त्या निर्माण करून मानवाने क्रांती घडवली. विज्ञानाने ज्या काही अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवल्या त्या साऱ्यांची इतिहासाने नोंद घेतली जेणेकरून पुढील पिढीस त्याचा कायमस्वरूपी उपयोग व्हावा. हा केवळ अमुक एक राष्ट्राचा विजय न ठरत मनुष्य प्राण्याचा विजय होता.


पण खरंच कधी भूतकाळात शिरकाव करता आला तर किती आणि काय काय करता येईल. कित्येक आवडत्या व्यक्तींना भेटता येईल, कित्येक न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरेही सापडतील. आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वार होताना ही कृष्णधवल पाने कायम खुणावत राहतील. गतकाळ आपल्या यशाचे गुणगानही गातो आणि आपल्या चुकांमधून शिकायला ही भाग पाडतो. मूक शिक्षकाप्रमाणे तो अनुभवाचे अमुल्य ज्ञान देत राहतो. आपण त्यातून काय शिकायचे हे महत्त्वाचे.

Comments

 1. लेखाचा शेवट अर्थपूर्ण केला आहे.
  येथे जर्मनीत सैदैव भूतकाळाच्या आठवणी माझ्या डोक्यात पिंगा घालत असतात.

  ReplyDelete
 2. असे खरेच भूतकाळात जाता आले तर कितीतरी गोष्टी वेगळ्या वाटांनी घडवता येतील.. :)

  ReplyDelete
 3. धन्यवाद निनाद
  ब्लॉगवर स्वागत.

  ReplyDelete
 4. फॅंटेसीच्या विश्वास मर्यादा कुठे ?
  धन्यवाद!

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी