गेले कित्येक दिवस ब्लॉगवर काहीच खरडले नसल्याने फारच अस्वस्थ वाटत होते. ब्लॉग लेखनाचा छंद असा आहे की बराच काळ लिहिले नाही म्हणजे अपराध केल्यासारखे वाटू लागते. त्यात इतर ब्लॉगर मित्रही झोपी गेल्याने अधिकच कंटाळा आला होता. पण शेवटी मौन सोडायचे ठरवले आणि ब्रेक नंतर परत यायचे ठरवले. गेली दोन्ही वर्षे परीक्षेमुळे गावी जाण्याचा योग आला नव्हता आणि यंदा अस्मादिकांच्या कुठल्याच परीक्षा नसल्याने ही संधी साधत खुशाल दहा दिवस सुट्टी टाकली आणि गावाकडे निघालो.
गावी गेलो की हमखास पत्त्यांचे डाव रंगणारच. गावचे घर आणि पत्ते यांचा वर्षानुवर्षांचा संबंध आहे. आम्ही सगळी भावंडे वर्षभर पत्त्यांकडे ढुंकूनही पाहत नाही आणि गावी आल्यावर मात्र पत्ते एके पत्ते. हल्ली पूर्वीची चिल्लर गँग मोठी झाल्याने 'तुला काही येत नाही' असं सांगून कटवताही येत नाही. प्रत्येकाने एक-दोन सेट आणल्याने गावी दहा-बारा कॅट जमले होते यंदा. सगळ्यात आवडते म्हणजे रमी आणि मेंढीकोट. बरेच कॅट असल्याने चॅलेंज सुद्धा रंगायचे. शिवाय गावी काही गोट्यांच्या बरण्या सापडल्या तेव्हा मग तीन-पानी सुद्धा सुरु झाले. गोट्या सापडल्या त्यामुळे परत एकदा अंगणात गोट्यांचे खेळ सुद्धा सुरु झाले.
 |
पत्त्यांचे डाव |
 |
गोट्यांचा खजाना |
गावी जाताना मी वाचायला हमखास एक-दोन पुस्तके बरोबर घेऊन जातो आणि सालाबादप्रमाणे ती तशी फार काही न वाचताच घेऊन येतो. दिवसभर न चुकता दंगा करण्यात व्यस्त असल्याने एकांत मिळायचा प्रश्नच येत नाही. तरी गावी टी व्ही, लॅपटॉप नसल्याने आणि मोबाईल मुद्दामहून बंद ठेवल्याने पुस्तके वाचायला आवडते. गावी वेळ भरपूर असल्याने काय वर्तमानपत्रसुद्धा अ ते ज्ञ पर्यंत वाचून काढेन मी.
ज्या विशेष कारणासाठी गावी गेलो होतो ते म्हणजे गावची जत्रा. आमच्या गावी म्हणजे सालगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे दर वर्षी 'साल सिद्धेश्वराची जत्रा' भरते. सालोबा नावाने प्रसिद्ध असलेले हे जागृत देवस्थान आहे. गावच्या जत्रेचे आकर्षण म्हणजे खाद्यपदार्थ आणि बैलांची शर्यत. ह्या बैलांच्या शर्यती पाहायला अनेक गावाहून लोक जमतात. खाद्यपदार्थांमध्ये रेवड्या, शेंगुळ्या, पेढा आणि भेळला जोरदार मागणी असते. शहराहून आलेले लोक तर न चुकता हे सारे काही घेऊन जाणार. गावचा कुंदा पेढा हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे. हा एकसलग पेढ्याचा मोठा गोळा असतो आणि त्याच्या इतका चविष्ट पेढा मी इतर कुठेही चाखला नाहीये.
यंदाच्या दौऱ्यात दोन विशेष गोष्टी घडल्या. आमचे ग्रामदैवत असलेले सालोबाचे मंदिर पूर्वी तेथे नव्हते. मंदिराला लागुनच असलेल्या एका डोंगराच्या माथ्याशी मूळ मंदिर आहे. सालोबाच्या एका निस्सीम भक्तासाठी देव खाली आला अशी आख्यायिका आहे. तर हे डोंगरावर असलेले मूळ मंदिर लहानपणापासून आम्ही लहान आहोत म्हणून आजपर्यंत कधी पाहायलाच मिळाले नाही. आता माझ्यासकट सगळीच भावंडे मोठी झाल्याने या वेळेस जत्रेच्या दिवशीच वरच्या सालोबाचे दर्शन घेऊन आलो. त्या निमित्ताने ट्रेकिंगचा आनंद ही घेता आला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे पहिल्या पावसात ते ही गावाकडल्या भिजायला मिळाले. घरासमोर अंगण आणि अंगणात आमचा धिंगाणा. गावी गेल्यावर पावसाची भेट होण्याआधीच परतावे लागते अनेकदा त्यामुळे असा योग परत येणे दुर्लभच आहे.
 |
सालोबा मंदिर |
 |
वरचा सालोबा |
तरी आमचे गाव बरेच सामान्य आहे. पाहण्यासारखे आणि मजा करण्यासारखे विशेष काही नाहीये गावात. आमचे मन रमते ते पूर्ण कुटुंब एकत्र येण्याने आणि अभ्यास-कामातून मिळालेल्या विश्रांतीने. हल्ली गावात अनेक बंगले बांधले जात आहेत. आमचे कौलारू घर अजूनही जुन्या दगड-मातीच्या बांधकामाचे आहे. ते अजून किती वर्षे टिकणार याबद्दल शंका आहे पण ते तसे कित्येक वर्षे टिकून राहावे असे मनापासून वाटते. रात्री अंगणात झोपायची मजा आहे तिला काही तोड नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा थंडगार वारा आणि गोधड्या अंगावर घेऊन जी झोप लागते ती चार भिंतीच्या आत कधीच मिळायची नाही.
बघता बघता पुन्हा शहराकडे निघायचा दिवस येतो आणि आता वर्षभर पुन्हा येणे होणार नाही हे कळून येते. इकडे मुंबईत सगळ्या सोयी सुविधा आहेत आणि या जगण्याची सवयही फार झालीये त्यामुळे कायमस्वरूपी गावी राहणे शक्य होणार नाही. मनामध्ये काही दिवस 'स्वदेस' मधले 'ये जो देस है' वाजत राहते, मग विसरून जायला होते. वर्षामागून वर्षे सरत चालली आहेत आणि पुन्हा पुन्हा गावी जाण्याचा दिवस चेहऱ्यावर हसू आणत आहे.
ॐ
ReplyDeleteमी पण गोट्या ब्लॉग केला आहे अशा चं खुप गोट्या जमिनीवर ठेवल्या
आहेत गोट्या खेळ कसा खेळतात लिहिला आहे ती माहिती माझ्या मुलाने
सांगितली आहे आपल्या ब्लॉग मध्ये गोट्या बरणी पाहून मजा वाटली !
मजा आहे की.. अरे राहून यायचं काही दिवस अजून..:)
ReplyDeleteधन्यवाद वसुधाताई.
ReplyDeleteआम्हालाही अनेक वर्षांनी गोट्या खेळून मजा आली.
सुट्ट्या नव्हत्या ना…
ReplyDeleteतुम्ही एफ-बी आणि मी ब्लॉगिंग सोडल्यापासून काही संपर्कच नाही.
प्रतिक्रिया पाहून आनंद झाला.