'टाईमपास'वाला लव

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ज्या चित्रपटाची भरपूर हवा झाली आहे तो म्हणजे 'टाईमपास'. रवि जाधव यांचा हा चौथा चित्रपट. नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक सारखे उत्तम चित्रपट देणाऱ्या रवि जाधव यांनी त्याचा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केलाय आणि त्याला उत्तमरित्या प्रसिद्धी मिळवून दिल्याने जिकडे तिकडे 'टाईमपास'ची चर्चा आहे.

ही आहे दगडू आणि प्राजक्ताची लवस्टोरी. दगडू जो एका गरीब घरातील वाया गेलेला मुलगा आहे आणि प्राजक्ता जी एका संस्कारी घरातील गुणी मुलगी आहे. पण प्रेमाला वय, जात-पात, गरीब-श्रीमंत कसल्याच मर्यादा नसतात त्यामुळे प्राजक्तासारखी सुंदर मुलगी देखील दगडू सारख्या मवाली पोराच्या प्रेमात पडू शकते हे चित्रपट पाहताना आपल्याला मुळीच खटकत नाही. मित्रांच्या सांगण्यावरून दगडू प्रेमात पडायचे ठरवतो आणि प्राजक्ताला पटवण्याची शपथ घेतो. मग मुलीला पटवण्यासाठी जे काय करावे लागते ते अनेक उद्योग करतो आणि प्राजक्ताला पटवतो. पण दोघे मनापासून प्रेम करत असले तरी या वयातील प्रेमाला लफडी म्हणून जे सर्वसामान्य पालक करतात तेच त्यांचे पालक करतात आणि शेवटी प्रेमाची गोष्ट केवळ 'टाईमपास' होऊन राहते. जगाच्या दृष्टीने ते टाईमपास असले तरी पहिले प्रेम खासच असते आणि तेच या चित्रपटातून दाखवले आहे.

पात्र निवडीमध्ये प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर एकदम योग्य आहेत. प्रथमेश हा दगडू म्हणून अगदी 'छा गया है'. त्याच्या देहबोलीपासून संवाद फेकीपर्यंत आणि केशरचनेपासून ते वेशभूषेपर्यंत त्याने अचूक साधले आहे. केतकीला शाळामधील 'शिरोडकर'मुळे आधीच खूप सारे फॅन्स मिळाले होते ते आता 'प्राजक्ता'मुळे अधिकच वाढलेत. तिचे सुंदर दिसणे आणि हळूवार बोलणे यामुळे प्रत्यक्षातही तिच्यावर 'एम-एम' चा शिक्का पडला आहे त्यात काही आश्चर्य नाही. वैभव मांगले हे तिसरे महत्त्वाचे पात्र. प्राजक्ताचे वडील म्हणून ते काही प्रसंगी विनोदी आहे आणि काही वेळेस गंभीरही आहे. वैभव मांगले यांच्या अभिनय क्षमतेवर काही शंका नाहीये. ते विनोदी आणि गंभीर दोन्ही भूमिका उत्तम साकारू शकतात. त्यानंतर भालचंद्र उर्फ भाऊ कदम यांचा शांताराम परब हा दगडूचा गरीब बाप ही सुरेख जमलाय. भाऊ कदम यांनी स्वत:ला विनोदी भूमिकांत अडकवून ठेवू नये. त्यांच्या चेहऱ्यावर कारुण्याची जी झलक आहे ती गरीब बाप म्हणून ठळकपणे दिसून येते. मेघना एरंडे, उर्मिला कानेटकर, भूषण प्रधान यांचे काम चांगले आहे. त्याशिवाय दगडूचे अवली मित्र फार मजा आणतात. त्यांच्या सांगण्यावरून दगडू हा टाईमपास सुरु करतो आणि मग प्रेमातच पडतो.

चिनार-महेश यांचे संगीत फार उत्कृष्ट नसले तरी चांगले आहे. 'मला वेड लागले' हे सुंदर गाणे स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी सुरेख गायले आहे आणि त्याचे चित्रीकरणही उत्तम केले आहे. दगडू सारख्या हिरोला स्वप्नीलचा आवाज काहींना खटकला असेल पण प्रेमात पडल्यावर प्रत्येकजण इतका रोमॅंटिक तर होणारच. चित्रपटात नसलेले स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडेच्या आवाजात हेच गाणे सीडीमध्ये उपलब्ध आहे. 'ही पोली साजूक तुपातली' हे रेश्मा सोनावणेच्या आवाजातील गाणे आधीच हिट झाले आहे आणि ते येत्या काही महिन्यात अधिकच हिट होत जाईल. 'शिबानी दांडेकर'वर चित्रित केलेले गाणे आणि त्याला आगरी-कोळी नृत्याची साथ यामुळे जोरदार शिट्ट्या हमखास मिळणार. इतर गाणी वाईट नसली तरी फार लक्षात रहात नाहीत.

संवाद आणि प्रासंगिक विनोद ही चित्रपटात सर्वात जमेची बाजू आहे. 'आई-बाबा आणि साईबाबांची शप्पथ, चला हवा येऊ द्या, हम गरीब हुए तो क्या हुआ, काजू कतली आणि प्राजू पतली' असले फिल्मी संवाद आधीच प्रोमोमधून प्रेक्षकात पोहचवल्याने त्यांच्या उत्सुकता निर्माण होते. संवादाशिवाय प्राजक्ताच्या गाण्याच्या शिकवणीत 'भेट आपली स्मरशी','मी मज हरपून','गुंतता हृदय हे' सारखी योग्य गाणी पेरून ठेवली आहेत त्याचे विशेष कौतुक. फिल्मी चालींवर साईबाबांची गाणी पण मस्त जमली आहेत. शिवाय करमणूकपट असल्याने प्रेक्षकही तशा अपेक्षेनेच येतो त्यामुळे काही गंभीर प्रसंगी सुद्धा एखाद्या कमेंटने खळखळाट पसरतो.

चित्रपटाच्या शेवटी वेग थोडा मंदावतो पण तो तसा होणे अपेक्षित आहे. कुमारवयातील लवस्टोरी असल्याने ती पूर्णत्वास नेणे चुकीचे ठरले असते. त्यापेक्षा प्रत्यक्षात जे अनेक प्रेम कथांमध्ये पहिल्या प्रेमाबाबत होते ते योग्य वाटते. शेवटी कथा पुढे वाढवण्याची संधी ठेवली आहे त्यामुळे दगडू-प्राजक्ताच्या स्टोरीत पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्यालाही थांबावे लागेल.

टाईमपास आपल्याला काही अंशी बालक-पालक ची आठवण करून देतो. ९० च्या दशकातील गोष्ट असल्याने आणि रवि जाधव यांचाच गेल्या वर्षीचा चित्रपट असल्याने असे वाटत असेल. पण बालक-पालक मधून जो संदेश देण्याचा प्रयत्न केलाय तसा इथे काहीच नसल्याने प्रेक्षकांनीही निव्वळ करमणूकपट म्हणूनच टीपी कडे पहावे.

काही खटकणाऱ्या गोष्टी म्हणजे त्या काळाप्रमाणे कॉलेजचे वातावरण न दाखवता त्याची वेशभूषा आजची वाटते. वल्लभ जो प्राजक्ताचा भाऊ आहे तो देखील आजच्या काळातील फॅशनचे टी-शर्ट आणि शूज वापरतो. या गोष्टी प्रत्येकाच्या लक्षात येतीलच असे नाही पण त्याकडे लक्ष दिले असते तर बरे. प्रोमोमध्ये भूषणला न दाखवता आदेश बांदेकरला दाखवल्याने उर्मिला-आदेश अशी जोडी आहे असा समज होतो. आदेश बांदेकर यांना केवळ गोविंदा डान्स पुरते घेतले ते ठीक पण भूषणला प्रोमो मध्ये न दाखवण्याचे कारण कळत नाही.

योग्य ती प्रसिद्धी मिळवून दिल्यास मराठी प्रेक्षक चित्रपटास गर्दी करतात हे पुन्हा सिद्ध होत आहे. नव्या पिढीचे दिग्दर्शक आणि कलाकार त्या दृष्टीने नवे विषय आणि नव्या संकल्पना घेऊन येत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. टाईमपास सध्या अनेक ठिकाणी हाउसफुल चाललाय आणि त्याचा अधिक प्रेक्षक वर्ग तरुणच आहेत. तरुणांना आकर्षित करतील असे अधिकाधिक मराठी चित्रपट आणण्याची आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.

Comments

  1. मी फारसे चित्रपट पहात नाही.. त्यामुळे त्या बाबतीत नो कॉमेंट... बाकी पोस्ट नेहमीप्रमाणेच उत्तम.. परीक्षण म्हणावे की आस्वाद?

    ReplyDelete
  2. आस्वादच बरे. चित्रपट परीक्षण करावे इतकी माझी योग्यता नाही. लिहावेसे वाटते म्हणून लिहितो.

    ReplyDelete
  3. तुमचे पोस्ट आवडतात, looking forward to FANDRY

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बालपणीचा खेळ सुखाचा

वेळ न उरला हाती...

पाऊसगाणी