कार्टून नेटवर्क-रिलोडेड

माणूस किती ही मोठा झाला तरी ही त्याच्या लहानपनीच्या आठवणी निघाल्या की त्यात हमखास रमतोच. लहानपनीचे अल्लड, खेळकर दिवस, गमती-जमती आठवताना सारे काही विसरून जातो. त्याच लहानपणातील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लाडक्या म्हणजे कार्टून फिल्म्स. आता आपण मोठे झालो, कार्टून बघायला वेळ मिळत नाही हे सगळे खरे असले तरी तेव्हा त्या आपल्या रोजच्या आयुष्यातील अगदी अविभाज्य घटक असायच्या आणि म्हणूनच खूप खर्‍या वाटायच्या. चला तर मग, आपल्या काही आवडत्या कार्टून्सच्या आठवणींना उजाळा देऊया.

कार्टून्स विश्वाची सफर करायची म्हटले तर सर्वप्रथम आपल्या समोर येते ती म्हणजे मोस्ट फेव्हरेट- 'टॉम अँड जेरी'. गेली कित्येक वर्षे ही उंदीर-मांजराची जोडी आपल्याला खळखलून हसवत आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच हिचे चाहते आहेत. उंदीर- मांजराच्या करामती आणि खोड्या इतक्या वेळा पाहूनही पुन्हा पाहताना कंटाळा येत नाही. 'टॉम अँड जेरी' या पात्रांना हल्लीच ७० वर्षे पूर्ण झाली तरी ती अजुनही हविहवीशी वाटते. यातील इतर पात्रे जसे किलर डॉग, ब्लॅक कॅट, ट्वीटी बर्ड शिवाय जेरीचा नातलग असलेला छोटु उंदीर सगळेच धमाल आहेत.' टॉम अँड जेरी' हा कार्टून विश्वातील एक स्वतंत्र अध्याय लिहिता येईल इतपत मोठा खंड आहे. लिहु तितके थोडेच.
टॉम अँड जेरी नंतर आपली आवडती कार्टून कॅरेक्टर्स म्हणजे डिस्ने वर्ल्डची कार्टून्स. डिस्ने वर्ल्डने मिकी-मिनी. डोनाल्ड, प्लूटो, गूफी ही सारी पात्रे आणली आणि धमाल उडवून दिली. मिकी-मिनीची रोमॅंटिक जोडी जशी छान होती तशाच बाकीच्या जोड्या ही छान होत्या. मिकी-डोनाल्ड, डोनाल्ड-प्लूटो, गूफी-प्लूटो सगळ्या एकाहून -एक. प्रत्येकाची स्टाइल,बोलण्याची लकब वेगवेगळी. डोनाल्डच्या चिप अँड डेल सोबत किंवा त्याच्या ३ भाच्यांसोबत असलेल्या कार्टून्स तसेच गूफीच्या नवीन गोष्टी शिकतानाच्या कार्टून्स मस्त होत्या. तो कधी ड्रायव्हिंग शिकायचा, कधी डान्स, कधी स्केटिंग तर कधी काय? आणि त्यामागे असणारे निवेदन अजुनच मजा वाढवायचे.
डिस्नेची अजुन एक सुंदर कार्टून म्हणजे अल्लादीन. अल्लादीन-जस्मिनची जोडी, अल्लादीनचा जादुई दिवा, त्याचा जिनी, त्याचा महाल,उडणारी चटई-सगळेच सुंदर वाटायचे. जिनी मला फार आवडायचा. माझ्या चित्रकलेच्या वहीत त्याची बरीच चित्रे काढली होती तेव्हा.
'डकटेल्स' ही माझी फार आवडते कार्टून फिल्म( लहानपणी कार्टून फ्लिम म्हणायचो) त्याचे शीर्षक गीत (दोन्ही-हिंदी व इंग्रजी) पण मस्त होते. त्यातला खडूस आणि कंजूस' स्क्रूज मॅकडक'- त्याचा निळा कोट, जांभळी टोपी, त्याचा बंगला, त्याचा लकी कॉइन,डॉलर मार्कचा त्याचा तैखाना. ते सगळेच सही होते. आणि त्यात तो पोहायचा सुद्धा. स्क्रूजचे तीन भाचे सॉलिड उद्योगी-ह्युई,ड्युई अँड ल्युई. डकवर्थ मधील बदमाश गुंड-बीगल बॉयस त्याच्या ममा बीगल आणि जादुगार मेजिका बरोबर कारस्थाने रचायचे. इतर कॅरेक्टर्स जसे 'लॉंचपॅड मॅकवॅक' जो नेहमी प्लेन क्रश करायचा, सायण्टिस्ट जाएरो, गिज्मो डक, स्क्रूजचा दुश्मन फ्लिंटहार्ट ग्लॉमगोल्ड सगळेच रियल वाटावे असे.
त्यातल्या त्यात भारतीय वाटावी अशी गाजलेली कार्टून- म्हणजे जंगल बुक. मोगली आणि त्यातील कॅरेक्टर्स बगीरा,शेरखान, भालू,आकडू-पकडू, सरपंच सगळे हिंदीमध्ये बोलताना सहिच वाटायचे.( बगीरा की शेरखानसाठी नाना पाटेकरचा आवाज ही वापरला होता बहुतेक) इतर कार्टून्स सारखी ही विनोदी नसली तरी रंजक नक्कीच होती. ती बघता-बघता हरवून जायचो त्यात.

पुन्हा कार्टून नेटवर्ककडे वळलो तर टॉम अँड जेरी शिवाय ही काही कार्टून्स तेव्हा फार आवडायच्या. सकाळी-सकाळी ७ वाजता मी बरोबर उठायचो-' पोपाय द सेलर मॅन' पाहायला. त्याची शरीरयष्टी एवढी विचित्र असूनही 'स्पिनिच' खाल्ल्यावर तो पैलवान ब्लूटोची सॉलिड धुलाई करायचा.( ते स्पिनिच ही कसेही करून मिळायचेच त्याला शेवटी ).त्याची प्रेयसी 'ऑलिव ओईल' तर त्याहून कडकी, त्याचा मित्र नेहमी बर्गर खात राहायचा. पोपायचे भाचेही सगळे दंगेखोर. ते मात्र त्याचे खूप हाल करायचे.

पोपायनंतर लगेचच 'स्कूबी अँड स्क्रॅपी डू शो' असायचा. स्कूबी आणि त्याचा मित्र शॅगी घाबरत असूनही त्यांच्या फ्रेड,वेल्मा आणि डॅफ्नी या मित्रांसोबत 'द मिस्ट्री मशीन' मधून रहस्य शोधत फिरायचे. स्कूबी बरोबरचा छोटा डॉगी स्क्रॅपी डेरिंग करत पुढे जायचा आणि हे दोघे नेहमी खाण्याच्या मागे लागलेले.
'स्कूबीस ऑल स्टार' ही कार्टून ही काही वेळा असायची. त्यातील स्कूबी-डूबिस, योगी-याहूईस आणि रिली रोटेर्स हे टीन ग्रूप एकमेकांशी शर्यती करत आणि रिली ग्रूपचे नेहमी चीटिंग करत आणि हरत. त्यांच्या शर्यती पण गमतीशीर असत.

लूनी टून्स ने ही काही छान-छान कॅरेक्टर्स कार्टूनविश्वात आणली. बग्स बनी,डॅफी डक, ट्वीटी बर्ड, पुसी कॅट,पोर्की पिग हे सगळे कसे विसरणार? बग्स बनी तर झकासच होता. जितका नाटक्या तितकाच खट्याळ. सगळ्यांना शेंड्या लावून पसार व्हायचा. शेवटी पोर्की पिग ड्रम फोडून बाहेर यायचा आणि म्हणायचा- द द डॅट्स ऑल फोक्स!' त्याहस्या बरोबर डॅफी डकच्या खोड्या, निरागस ट्वीटीचे ' आय थॉट आय सॉ अ पुसी कॅट' वेरी क्यूट!

सुपरहिरोस हे तर कार्टूनविश्वानेच बच्चेकंपनीत हीट केले. यात सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन सगळेच होते. मला त्यांच्या कार्टून्सपेक्षा चित्रपट जास्त आवडले. 'द मास्क' हा विचित्र असूनसुद्धा मस्त वाटायचा. त्याचा अवतार आणि करामती इतरांपेक्षा खूप वेगळ्या. इतरही काही हीरो जसे बर्डमॅन, कॅप्टन प्लॅनेट हे त्यावेळेस फार आवडीने पाहायचो. 'फॅंटॅस्टिक फोर' ही एक खूप मस्त होती. तसेच 'टर्टल्स' ही चार बेडकांची एक्शनपट कार्टून. स्वेट-कॅट मधील बडे मियां आणि छोटे मियां आणि त्यांची फायटर विमाने. भारीच होते.

अजूनही बर्‍याच कार्टून्सची नावे आठवतात जसे- फ्लिन्स्टन्स, जेटसन्स, योगी बेअर, टेलस्पिन,डार्कविंग डक,पिक्सिस अँड डिक्सिस आणि आजकाल पाहायला न मिळणार्‍या बर्‍याच काही.

या विषयी लेख लिहायचे ठरवले तेव्हा प्रथम गूगलवर इमेजस शोधू लागलो आणि मोठा खजानाच सापडला. एकाहून एक सरस चित्रे सापडली. फक्त नाव टाकायची खोटी. मग मी ही हावरटा सारखा कॉपी करत सुटलो. ह्या भरात काही विस्मरणात गेलेल्या कार्टून्सही सापडल्या. उदा. टिनटिन. अजुन एक सापडली ती म्हणजे- 'हेकले अँड जेकले'. ही कार्टून मी १ली-२री त असताना लागायची ते ही सकाळी ६ वाजता आणि मी किलकिल्या डोळ्यांनी उठून पाहायचो. त्याच्या पाठोपाठ 'माइटी माउस' ही असायची. या कार्टून्स नंतर कित्येक वर्षे कुठेच पहिल्या नाहीत.

गेल्या काही वर्षात आलेल्या नव्या कार्टून्स मात्र मला आवडल्याच नाहीत. आपल्या लहानपणी पाहिलेल्या कार्टून्स किती सुरेख आणि जिवंत वाटायच्या. आताच्या सर्व कंप्यूटराइस्ड आणि अॅनिमेटेड वाटतात. बेनटेन, पोकिमोन, शिनचान सगळया नकली वाटतात. ज्या चांगल्या होत्या त्या आज ही चांगल्याच वाटतात, किती ही वेळा पहिल्या तरी!बाकी या सगळ्यांच्याच किड्स सीरीस आल्या त्या कोणत्याच चांगल्या नव्हत्या. जे ओरिजिनल तेच बेस्ट!

लहानपणी एक कार्टून नेटवर्क सोडून इतर कुठलाच चॅनेल मी पाहत नसे. मोठ्या भावंडांनी चॅनेल बदलून गाणी लावली तर वाटायचे काय हे सारखे गाणी लावून ठेवतात. मला नाही आवडत. मला फक्त कार्टून नेटवर्क पाहिजे!
त्या वेळेस शाळेचे दप्तर, वॉटरबॅग, कम्पास, वह्यांचे स्टिकर्स सगळ्यांवर कार्टून्स! काय क्रेज होती त्यांची! जिथे-तिथे कार्टून्स! अर्थात आपले बालमित्र होते ना ते ! पण मोठे होत गेलो तसे दुरावतच गेलो. आता आपल्यालाच वेळ नाही त्यांच्यासाठी. कधी मिळालाच तर बघा एखादी कार्टून थोडा वेळ. लहान झाल्यासारखे वाटेल नक्कीच. जास्त लांब कशाला यूट्यूब वर एखादा सर्च द्या. मिळतील तुमचे बालमित्र तिथे. पण त्यापूर्वी हा स्लाइड-शो मात्र नक्कीच बघा. तुमच्या आवडत्या कार्टून्स इथेच सापडतील कदाचित.

Comments

  1. मला सगळ्यात आवडणारी गोष्ट या टीवीवर..कार्टून्स..तुम्ही मोठे असा वा लहान कार्टून बघण्याचे वेड ना कधी गेलय ना कधी जाणार...आता डक टेल्स बघतोय :)

    ReplyDelete
  2. माझी पण फेव्हरेट...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी