पहिला वाढदिवस

मनात येईल ते लिहीत जाणे हा तसा माझ्यासाठी काही नवीन उद्योग नाही. पण आपले लेखन कुठेतरी छापून येईल किंवा ते इतर अनोळखी वाचकांकडून वाचले जाईल आणि त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छाही मिळतील असे काही वाटले नव्हते.पण ते झाले ते या ब्लॉगविश्वामुळे आणि 'माझ्या मनातले काही' लिहिता लिहिता एक वर्ष पूर्ण झाले.
शाळेत असताना निबंध लेखन हा माझा आवडता विषय असायचा. पण शाळा सुटली तसा हा प्रकार दिसेनासा झाला. कॉलेज मध्ये आल्यावरही आता मराठीतून लिहीणे होणार नाही आणि परीक्षाही इंग्रजीतून द्यायची म्हटल्यावर मराठी फारच दुरावली. मला प्रिय असलेले बालभारतीचे पुस्तक आणि त्यातील गद्य-पद्य खंड सारे आठवणी म्हणून उरले. मराठीतून लिहिण्याची आवड असूनही कॉलेजमध्ये ती संधी कधीच मिळाली नाही ती मिळाली पार कॉलेज संपल्यावर आणि मग या ब्लॉगरविश्वात मी चोरपावलांनी हळूच शिरलो.
१८ नोव्हेंबर २००९ रोजी पहिली पोस्ट टाकली तेव्हा पुढे किती लिहिणार, काय लिहिणार याबद्दल काहीच कल्पना नव्हती.
काहीतरी सुचले म्हणून लिहिले आणि ब्लॉग हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठीच पोस्ट केले. सुरुवातीला ब्लॉग हा प्रकार फक्त इंग्रजीत चालतो असे वाटायचे आणि मग अचानक मराठी ब्लॉग विश्व सापडले. तिथे इतके सारे ब्लॉग्स पाहून मला कळेना की कोणते आणि किती ब्लॉग वाचू. पण निदान नियमीत लेखन करणार्‍यांचे ब्लॉग तरी वाचू असे ठरवले.
मग हळूहळू बरेच ब्लॉगर आणि त्यांचे ब्लॉग्स ओळखीचे झाले. ब्लॉग म्हणजे काही तरी अवघड गोष्ट आहे अशी माझी पूर्वी समजूत होती पण इथे खादाडी पासून ते ट्रेकिंग पर्यंत सारे काही खपते हे लवकरच कळून चुकले. आणि या व्यतिरिक्त ही बर्‍याच गोष्टी आपण इथे शेअर करू शकतो- जणू आपली पर्सनल डायरीच.
सुरुवातीच्या काही दिवसात ब्लॉग कसा लिहितात, फोटो किंवा स्लाइडशो कसे टाकतात हे काहीच माहीत नव्हते. हळूहळू हे सारे सोपे वाटू लागले. मग ते जुने टेंप्लेट टाकून माझ्या ब्लॉगने ही कात टाकली अन् नवनव्या रंगात येऊ लागला. बरेच ब्लॉगरमित्र ही येऊ-जाऊ लागले. काहींनी मला फॉलो केले, काहींना मी फॉलो केले. पहिला फॉलोवर, पहिली कमेंट यांचे कौतुकतर वाटलेच पण आज ही नवीन कमेंट आल्या की तितकाच आनंद होतो.
वर्षभरापूर्वी लिहायला घेतले ते काहीतरी वेडेवाकडे सुचले आणि म्हणून लिहून टाकले. त्यानंतर नियमितपणे लिहिणार की नाही याची काही खात्री नव्हती. तसे पहिले तर वर्षभरात फार कमी पोस्ट करू शकलो पण वारंवार लिहिण्यास वेळ मिळत नव्हता आणि उगाच काहीतरी लिहावे त्यापेक्षा न लिहिलेले बरे. जे मनापासून लिहावेसे वाटले तेच लिहीत गेलो. माझ्यामागून आलेले कित्येक ब्लॉगर माझ्या पुढे निघून गेले पण मला काही घाई नाही. इतरांशी स्पर्धा करावी म्हणून लिहिण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे लिहिण्यासाठी मला नवे विषय कधीच शोधावे लागले नाही. उलट अजुन बरेच विषय माझ्या लिखाणवहीत रजिस्टर झाले आहेत.ते लिहीण्याचा योग कधी येईल तेव्हा येवो. पण अजुन बरेच लिहायचे आहे एवढे नक्की. तोपर्यंत तुम्ही या केकचा आनंद घ्या...

Comments

  1. अभिनंदन अभिनंदन आणि वादिहाहाशु.. लिहीते रहा !!

    ReplyDelete
  2. धन्यवाद गौरव...ब्लॉगवर स्वागत

    ReplyDelete
  3. धन्य रे हेरंबा...मी फार मंद गतीने लिहीत आहे रे
    आणि माझ्या वर्षभरातील पोस्ट तर तू एका महिन्यातच संपवशील...
    असो...मंडळ आभारी आहे!

    ReplyDelete
  4. सागरा,उशिरा देतो आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा,पण गोड मानुन घे.
    आणि तुझ्या मनातले काही असाच लिहत राहा.पुढील वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा...!

    ReplyDelete
  5. धन्यवाद देवेन!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निषेध!निषेध!!

पाऊसगाणी

बालपणीचा खेळ सुखाचा