परीक्षा संपली !!!

हुश्श ! संपली एकदाची. कधीपासून वाट पाहत होतो परीक्षा संपण्याची आणि आज 'सोनियाचा दिन उजाडला ( परीक्षा संपून तसे दहा दिवस झालेत पण वेळ नाहीए ना ! ) या आधीही परीक्षा देण्याचे प्रसंग आले आहेत पण दरवेळीस हा दिवस नवीन वाटतो. काहीतरी अदाभुत पराक्रम केल्याचा आनंद माझ्या चेहर्‍यावर दिसू लागतो आणि मग विजयीवीराच्या थाटात घरी आल्यावर सरळ आडवा पसरतो.
मला आजही ते परीक्षा संपण्याचे दिवस आठवतात...खास करून दहावी-बारावीचे. दरवर्षी परीक्षा देऊनही बोर्डाच्या परीक्षा देणे हे दिव्य पार पाडण्याचा आनंद तो काय ! म्हणजे अगदी पंख लाभल्यासारखे भासु लागते, भर उन्हाळ्यात पावसात भिजल्या सारखे वाटू लागते, निदान दुसर्‍यादिवशी शौवर खाली आंघोळ करताना तरी नक्कीच ! कित्येक दिवस रात्रंदिवस अभ्यासाचा प्रसंग असताना कधी तो पाऊस बरसायचा या आशेने कधी तो दिवस उजाडायचा अशी वाट पाहत बसतो. परीक्षा सुरू होण्यापूर्वी नेहमी चालते ते 'काऊंटडाऊन' तेव्हा तर हमखास सुरू होते. म्हणजे शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशीच 'अजुन काही तास फक्त'चे पालुपद सुरू होते. सकाळी उठल्यावर ही अजुन ८ तास, ६ तास हीच गणिते डोळ्यांपुढे. मग कधी एकदा परीक्षेला जातो आणि पेपरला फाडून खातो असे काहीतरी वाटते. मग शेवटी तो पेपर शिक्षकांच्या हाती दिला की बस्स ! आता काहीही होवो !!
कॉलेजच्या परीक्षा तर बर्‍याच गमतीमध्ये दिल्यासारख्या वाटतात. म्हणजे देऊन टाकू चल- अशा काहीतरी उद्देशाने दिलेल्या. त्यात अभ्यासाची, टेन्शनची काही मजा नव्हती. बाकी फायनल ईयर ला मात्र मी परीक्षेचा पाहिला नाही इतका माझा परीक्षेने अंत पाहिला. कोणताच पेपर मनासारखा जाऊ नये म्हणजे काय ? एक तर उन्हाळ्याने घर्मबांबाळ होत होतो आणि कुठलेच उत्तर आठवत नसल्याने डोळ्यांपुढे अंधारीच. पण शेवटचा पेपर दिला आणि हाय खाल्ली ! घरी येऊन बेडवर कोसळलोच होतो.
पण सुखाचे दिवस क्षणिक असतात आणि अभ्यासाचे व्यसन इतक्या सहजी कसले सुटायचे म्हणून सी.ए. च्या परीक्षेसाठी अभ्यासाचा नारळ फोडला. मला आजतागायत परीक्षेचे कधीच टेन्शन आले नाही पण हल्ली मात्र येऊ लागले आहे, सी.ए. च्या परीक्षेचा लोकांनी आणि खुद्द विद्यार्थ्यांनीच एवढा बागुलबुवा करून ठेवला आहे की नुसत्या विचारानेच घाम फुटावा आणि ती अभ्यासाची पुस्तके घरी आणातना जो घाम फुटतो तो अजुन वेगळाच. त्या मानाने सध्या जी परीक्षा देऊन आलो ती फारच चिरीमिरी होती त्यात फक्त एकच दिवस पेपर ! सकाळी दोन तासाचा एक आणि दुपारी दोन तासाचा दुसरा. म्हणजे परीक्षा सुरू झाली पण आणि संपली पण ! एकाच दिवशी पहिल्या पेपरची धाकधुक आणि शेवटच्या पेपरची उत्सुकता. नाहीतर एरवी परीक्षा सुरू झाली की दिवस सरवा मंद गतीने असला प्रकार चालतो पण तीच खरी अभ्यासाची वेळ असते कारण परीक्षा संपल्यावर वेळ निघून गेलेली असते.
परीक्षेचा पेपर लिहिताना तर अजुनच चल-बिचल असते. बहुतेक वेळा मी गाणी गुणगुणत पेपर लिहील्याचे मला आठवते. काही वेळेस स्वखुषीने तर काही वेळेस 'क्रॉस कनेक्शन' झाल्याप्रमाणे गाणी वाजतच राहतात. ती थांबवणे फार मुश्कील होऊन जाते. जसजसा मोठा होत गेलो तशी गाण्यांबरोबर कविताही सुचू लागल्या. मग ती उत्तरपत्रिकेवर लिहिले तर उगाच काहीतरी संकेत वाअतू नयेत म्हणून मनातच ठेवावी लागते आणि एखादी पुरवणी घेऊन त्यावर लिहावी अन् परत न करावी तर ती कॉपी वाटेल अर्थात गणिताच्या पेपरला कवितेचा काय संबंध ? पण रिस्क कशाला ?
शाळेत असताना किंवा अगदी कॉलेजमध्ये असतानाही परीक्षा संपल्यावर एक काम मी न चुकता करी ते म्हणजे घरी आल्यावर सर्व वाहया पुस्तकांची रद्दी बांधून ठेवणे. पास होण्याची खात्री असल्याने आता ह्या वह्या- पुस्तकांना 'अलविदा' म्हणावे लागणार आणि संध्याकाळी वह्यांचा खान साफसफाई करून रिकामा केला की मग परीक्षा अन् अभ्यासाची पुस्तके दोन्हींतून सुटका झाल्याचे मनोमन पटते.
परीक्षेच्या दिवसात एक नेहमी घडते ते म्हणजे अभ्यास सोडून इतर अनेक गोष्टी सुचू लागतात. कविता सुचतात, लिखानाचे नवे विषय सुचतात, नवे उपक्रम, नवे छंद सुचतात. पण अभ्यासाच्या हुकुमशाहीपुढे त्यांना नमते घ्यावे लागते आणि परीक्षा संपल्यावर मात्र विसरत गेलेल्या स्वप्नाप्रमाणे ते धूसर होत जातात.
सध्या बरीच शांतता आहे. उन्हाळा सारून पाऊस मुक्त कंठाने बरसतो आहे. अजुन काही महिने तरी निवांत जातील मग दिवाळीचा अभ्यास आणि उन्हाळ्याची परीक्षा यायची आहेच. तोपर्यंत हवे तेवढे ब्लोगिन्ग करू. अर्थात निकाल चांगला लागला तरच !

प्रतिक्रिया-


rahul nagmal said-
Nemaka lihahle ahes parikshevishayi.

Sagar Said-
Dhanyawaad Rahul...

मीनल said-
परीक्षेच्या दिवसात एक नेहमी घडते ते म्हणजे अभ्यास सोडून इतर अनेक गोष्टी सुचू लागतात.
Exactly..
नविन एखाद्या छंदाची याचवेळी नेमकी कशी आठवण होते हे मलाही न सुटलेले कोडे आहे.

Sagar Said-
आपण जितकी बंधने मनावर घालू पाहतो तितके ते त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असावे म्हणून असेल कदाचित..

Comments

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी