वटपौर्णिमेचे आधुनिकीकरण (सीरियलीकरण)

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. गोष्ट तशी जुनीच पण थोड्या नव्या रंगात, नव्या ढंगात सादर करत आहे. म्हणूनच आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने काही जुन्या घटनांची उजळणी करूया. इतिहासाची पुनरावृत्ती होते तशी त्या इतिहासातल्या घटनांची नवी आवृत्ती ही येऊ शकते. त्याच संदर्भातली एक गोष्ट इथे सांगत आहे. विषय आहे- वटपौर्णिमा आणि कथेची नायिका आहे महाभारतातील द्रौपदी.(पोस्ट लिहून दोन आठवडे झाले पण छापायला फारच वेळ लागला. असो आमचे घोडे नेहमीच वरातीमागून असते)


आधुनिकीकरण करायचे तर मूळ पात्र तशीच ठेवून कथानकात थोडे फार फेरफार करण्यात आले आहेत. जसे कौरव-पांडव हस्तिनापूर सोडून मुंबईत आले आहेत आणि वाडवडिलांचा बिझनेस सांभाळत आहेत. बिझनेस आयकॉन पंडूच्या मृत्यूनंतर बिझनेसचा वारस कोण ? या प्रश्नावर कौरव-पांडवामध्ये वाद चालू राहतात आणि कोर्टात केस दाखल होते. आता ते पूर्वीसारखे राजवाड्यात न राहता कुठल्याश्या मोठ्या कॉंप्लेक्समध्ये राहताहेत. जिथे सारे हस्तिनपूरचे रहिवासी अर्थात कंपनीचे कर्मचारीही राहत आहेत. पण कौरव-पांडव वादामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

अशातच मग वटपौर्णिमेचा दिवस उजाडतो.( द्रौपदीचा रोल एकता कपूरच्या कोणत्याही सीरीयलमधल्या एखाद्या सुनेला देऊन टाकू.) द्रौपदी नेहमीप्रमाणे लवकर उठून स्नान वगैरे आटपून राजमाता कुंतीच्या बेडरूममध्ये जाते.(कुंतीच्या रोलसाठी निरूपा रॉय टाईप कोणतीही जुनी अभिनेत्री घेता येईल.) राजमाता आज थोड्या अस्वस्थ वाटतात.
'' शुभ प्रभात, राजमाता'' द्रौपदी प्रवेश करते.
( मुंबईत येऊनही 'गुड मॉर्निंग' म्हणण्याइतकी द्रौपदी पुढारलेली नाही.)
कुंती उसने हसू आणत तिला बसायला सांगते.
'' काय झाले, राजमाता? आज तुमच्या चेहर्‍याचा रंग का उडाला आहे?
यावर इथे माझ्या आयुष्याचा रंग उडाला आहे म्हणून हे पांढरे वस्त्र नशिबी आले असे काहीतरी कुंती मनातल्या मनात पुटपुटते आणि मग द्रौपदीकडे पाहून उद्गारते,
'' आज यांची फार आठवण येते आहे ग!'' कुंतीचा स्वर हळवा होतो व पापण्याच्या कडा ओलावतात.
जुन्या घटनांच्या आठवणीने कुंती 'फ्लॅशबॅक' मध्ये जाते. तेवढ्या वेळात द्रौपदीची दोन-चार वाक्ये तिला ऐकू येत नाहीत. मग ती भानावर येते तेव्हा द्रौपदी बोलत असते,
'' मी ही माझ्या पतींना(आदरार्थी आणि अनेकवचनी दोन्ही) फार मिस करतेय!(थोडे फार इंग्रजी येत असते म्हणा तिला)कंपनीच्या कामानिमित्त परदेश दौर्‍यावर गेल्याला कित्ती दिवस झालेत. पण आज सकाळीच यांचा फोन आला होता तिकडची खुषाली कळवायला. म्हणाले लवकरच परततील भारतात'' पांडवांच्या परतण्याच्या वार्तेने कुंतीला दिलासा मिळतो.
'' राजमाता, आता मी निघते. वटपूजेला जायला हवे. नाहीतर गर्दी वाढली तर वेळ लागेल फार'' असे म्हणत द्रौपदी कुंतीचा निरोप घेते.
पाच पांडवांना सांभाळून घेणारी द्रौपदीसारखी सून लाभली म्हणून कुंतीचे डोळे भरून येतात. पण त्याच वेळी तिला ज्येष्ठ पांडवाची आठवण होते. आज तो पांडवांसह असता तर द्रौपदीला सहा पतींचे भाग्य लाभले असते. अन् साती जन्मी हाच पती लाभू दे असा वर जिथे सर्व स्त्रिया मागतात तिथे द्रौपदीला या जन्मी सहा पती लाभता पुढील सहा जन्मी सहा पती कसे'डिस्ट्रीब्यूट' झाले असते हे चित्र दिसू लागले किंवा मग वडाच्या झाडास ३५ फेर्‍या मारण्यापेक्षा ४२ मारल्या तर कुठे फारसे बिघडणार होते. पण नियतीपुढे कोणाचे काय चालणार? या विचाराने कुंती पुन्हा खिन्न होते.(इथे मग हळवे सूर ऐकू येतात- बॅकग्राउंड म्युझिक)

द्रौपदी मात्र तिच्या पतींची खुषाली कळल्यामुळे आनंदात असते. पूजेची तयारी करत असतानाही' मेरे पिया गये रंगून' असे काहीसे गुणगुणत असते. आरशात पाहून कुंकू लावतानाही माझ्या कुंकवांच रक्षण कर असे देवापुढे सांगायला ती विसरत नाही. अर्थात कुंकवाचा एकच ठिपका लावते ती) पण एवढ्यातच लाईट जाते. अन् ''अरे देवा, हे काय झाले?''( ढॅन..ढॅन..ढॅन -बॅकग्राउंड म्युझिक) असे म्हणताना द्रौपदीच्या मनात शंकेची पाल चुकचुकते.' हा काही अपशकुन तर नाही ना!' द्रौपदी चिंतातूर. पुन्हा देवाकडे धावा.लाईट गेल्यामुळे लिफ्ट बंद होते व त्यामुळे जिण्याच्या पायर्‍या उतरत तिला खाली यावे लागते. पण द्रौपदी असतेच मुळी सोशिक तेव्हा ते सारे भाव तिच्या चेहर्‍यावर सहजपणे येतात.

बिल्डींगमधून खाली उतरल्यावरही द्रौपदीच्या मनाची चलबिचल सुरुच असते. त्याच वेळेस कौरवांच्या इमारतीतून कौरवांच्या बायका येताना दिसतात. त्यांना पाहून पुन्हा द्रौपदी अस्वस्थ होते तरीही वटपूजा करायलाच हवी या निर्धाराने द्रौपदी चालू लागते. द्रौपदीकडे पाहून कौरवांच्या बायका आपसांत कुजबुजू लागतात. त्यांकडे दुर्लक्ष करत द्रौपदी वडाच्या दिशेने चालू लागताच'थांब द्रौपदी' असे तिखटपणे उद्गारत त्यातील एक तिला आडवी येते.(इथे पुन्हा -ढॅन..ढॅन..ढॅन..म्युझिक)
'' तुझी हिंमतच कशी झाली इथे येण्याची? ही कौरवांची प्रॉपर्टी आहे. ही कंपनी, ह्या इमारती, ही झाडे सारे सारे काही कौरवांचे आहे. तुझा यावर काडीचाही हक्क नाही. दुर्योधनाने काय सांगितले ते विसरलीस का? ह्या वडाच्या झाडाच्या एकाही पारंबी अन् एकाही पानावर तुझा अधिकार नाही'' डोळ्यांतून आग ओकत दुर्योधन पत्नी उद्गारते.(इथे मग भर उन्हात ढग गडगडू लागतात, वीजा कडाडू लागतात अन् इकडून तिकडून कॅमेरे द्रौपदीच्या हतबल चेहर्‍यावर.)अन् मग गंगा- यमुना वाहू लागतात.झाल्या अपमानाने द्रौपदी पेटून उठते,
'' चांडाळीनो, मी तुमचे काय वाईट केले आहे ज्याबद्दल मला ही शिक्षा देत आहात. लक्षात ठेवा, माझे पती जेव्हा कोर्टातील केस जिंकतील तेव्हा कौरवांस भीक मागण्याची पाळी येईल.( नव्या महाभारतात कौरवांस ठार मारणे उचित ठरत नाही म्हणून त्यांना कारावासात धाडूया.)तुमच्या या दुष्टपणाची फळे तुम्हाला नक्कीच भोगावी लागतील.( बॅकग्राउंडमध्ये देवीचे मंत्र, घंटानाद, ढोलताशे सारेच काही वाजू लागतात.)डोळ्यांतील आसवे पुसत द्रौपदी तशीच माघारी फिरते अन् झरझर चालत बिल्डींगची वाट धरते. कौरव-बायका मात्र नाक मुरडत माघारी वळतात आणि एका-मागोमाग शंभर जणी वडापुढे रांग लावून उभ्या राहतात.

तिकडे द्रौपदी अपमानाने संतप्त होऊन बिल्डींग मध्ये शिरते. एव्हाना पर्यंत लाईट आलेली असते पण तिच्या ते लक्षात येत नाही.ती तशीच जिन्यावरून धावत सुटते. शेवटच्या मजल्यावर पोहोचेपर्यंत तिची लंकेची पार्वती होते. धावत धावत ती घरातील देव्हार्‍यापुढे जाते आणि देवाशी भांडू लागते, '' देवा का छळत आहेस मला असा? कुठल्या पापाचे फळ भोगावे लागत आहे मला? वगैरे वगैरे...''
तिचा आर्त स्वर ऐकून कुंती बाहेर येते.
'' द्रौपदी, काय झाले एवढे? तुझ्या डोळ्यांत अश्रू का?'' मग द्रौपदी सारी हकिकत सांगते.
'' देवा कुठे आहेस तू? एका पतिव्रतेची अशी विटंबना होत असताना इतक्या निष्ठुरपणे तू पाहत आहेस? ''
तिच्या या डायलॉगवर लगेच दारावरची बेल वाजते. द्रौपदी जाऊन दार उघडते तर 'साक्षात श्रीकृष्ण समोर' ( श्रीकृष्णाच्या रोलसाठी मात्र छोट्या-मोठ्या कलाकारास न घेता डायरेक्ट एका सुपरस्टारला घेण्यात आले आहे तो म्हणजे-रजनीकांत !एक तर श्रीकृष्ण काळा आणि रजनीकांतही काळा, शिवाय कृष्ण आणि रजनीकांत दोघांनाही अशक्य असे काहीच नाही, म्हणून मग कृष्णाच्या रोलसाठी याहून चांगला पर्याय नव्हताच.) आपला रक्षणकर्ता, संकटहर्ता श्रीकृष्ण दारात आल्याचे पाहून द्रौपदीस फार आनंद होतो. नवा कृष्ण मात्र थोडा मॉडर्न आहे, अर्थात रजनीकांत असल्यामुळे तो त्याची स्टाईल मारत काळा गॉगल हवेत उडवतो व कमरेला अडकवतो(!)' तुमने पुकारा और हम चले आये' असे गाणे म्हणत हसत-हसत घरात प्रवेश करतो.
'' काय प्रॉब्लेम आहे, द्रौपदी? कशासाठी बोलावून घेतलेस मला?''
मग द्रौपदी रडगाणं गात सारी हकिकत कृष्णास सांगते.( इथे फक्त लिप मूव्हमेण्ट्स होतात अन् मागे बॅकग्राउंड म्युझिक )
''हात्तीच्या, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मला बोलावलंस? आता तुझा प्रॉब्लेम सॉल्व करतो बघ. बस हा एका मिनिटात आलो मी! आणि तिथून गायब होतो तो (बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे) एका मिनिटाच्या आत छोटे वडाचे झाड घेऊन हजार होतो. ते पाहून द्रौपदीच्या आनंदास पारावार उरत नाही.
'' कृष्णा, धन्य आहेस तू! धन्य तुझ्या लीला! माझ्या आग्रहाखातर तू वडाचे झाड घेऊन आलास. रामायणात हनुमानाने पर्वत उचलून आणला होता आणि तू इथे वडाचे झाड घेऊन आलास''
'' द्रौपदी, तू कधी घराबाहेर पडत नाहीस याचा हा परिणाम. अग, हल्ली बाजारात मिळतात अशी लहानशी वडाची झाड. तिथुनच घेऊन येतोय आणि पर्वत तसा मीही उचलला होता तो ही एका करंगळीवर, विसरलीस की काय?''
'' होय कृष्णा, तुझी लीला खरंच अगाध आहे'' कुंती आणि द्रौपदी दोघींच्या चेहर्‍यावर आनंदी-आनंद.
त्याच वेळेस द्रौपदीची सून उत्तरा ही येते.(उत्तराच्या रोलसाठी नव्या होतकरू नायिकांना संधी मिळावी.)
'' अरे क्रिश, तू केव्हा आलास ?'' (उत्तरा नव्या पिढीची असल्याने कृष्णाशी एकदम फ्रँकली वागते)
'' हा काय आत्ताच आलो!''
पण कुंती मात्र उत्तरावर भडकते,'' उत्तरा, ही काय वेळ झाली यायची? आज वटपौर्णिमा आहे. माहीत नाही का तुला? आणि सकाळ पासून होतीस कुठे तू? वटपूजा करायची नाही का तुला?''
यावर उत्तरा हसून उद्गारते,'' राजमाता, अहो मी माझ्या बेडरूममध्येच होते आणि वटपूजा तर झाली सुद्धा. अहो इंटरनेटचा जमाना आहे. मी ऑनलाइनच वटपूजा केली''
यावर कुंती आणि द्रौपदी आश्चर्यचकित होतात 'ऑनलाइन वटपूजा?'
''हो, अभिमन्यूलाही आधीच सांगितले होते मी. एव्हानापर्यंत डिलीवरी रिपोर्टही मिळाला असेल त्याला''
''डिलीवरी रिपोर्ट! म्हणजे सूनबाई काही गोड बातमी की काय? '' द्रौपदीचे डोळे चमकतात.
'' नाही हो सासूबाई, वटपूजा सक्सेसफूल झाल्याचा रिपोर्ट त्याच्या मोबाईलवर पोहोचला असेल, त्याबद्दल बोलते आहे मी!''
उत्तरेच्या या नव्या कल्पना ऐकून दोघी अवाक् होऊन पाहू लागतात.
'' आणि काय रे क्रिश, तू तर सर्वज्ञानी आहेस मग तुला ऑनलाइन पूजेविषयी माहीत नाही काय?
''उत्तरे ठाऊक आहे मला सारे, पण म्हटले तुझ्या सासूला हे सारे पटायचे नाही. म्हणून तिच्यासाठी हे वडाचे झाडच बरे! आणि माझ्या १६००० बायकांना ऑनलाइन वटपूजाच शिकवली आहे मी. एवढ्या जणी जर वडापुढे उभ्या राहिल्या तर किती वेळ लागेल पूजेला, नाही का? जमाना बदललाय, आपणही बदलायला हवे. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस आलेत.''
यावर कुंती आणि द्रौपदीने कसनुसं हसत माना डोलावल्या.
''उत्तरा, तुझ्या सासूलाही हे सारे शिकव म्हणजे मला वारंवार येण्याची गरज लागणार नाही''
उत्तरेने होकारार्थी मान हलवली.
'' तर मग निघतो मी, घाईघाईत मोबाईल घरीच विसरलो. आत्तापर्यंत वटपूजेचे बरेचसे डिलीवरी रिपोर्ट आलेही असतील. अच्छा फिर मिलेंगे'' गॉगल चढवत कृष्ण म्हणाला अन् क्षणात अंतार्धान पावला.
उत्तरेनेही मग द्रौपदीचे वटपूजेचे फोटो वगैरे काढून ट्विटर आणि फेसबूकवर शेअर केले.
अशा तऱ्हेने वटपौर्णिमा अध्याय संपला.

Comments

 1. chhan aahe...........

  tuhi lihitos he mala navyane kalal.......

  abhinandan.....aani shubhechha....

  ReplyDelete
 2. हो रे अधूनमधून...
  धन्यवाद

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वेळ न उरला हाती...

बालपणीचा खेळ सुखाचा

पाऊसगाणी